दिलीप प्रभावळकर एक व्यक्ती, दिलीप प्रभावळकर एक अभिनेता आणि दिलीप प्रभावळकर एक व्यक्तिचित्र किंवा एक व्यंगचित्रभूमिकाकार अशा तिन्ही स्वरूपात मी त्यांना गेली अनेक वर्षे पाहतोय. या व्यक्तीत एक सतत जागरूक असा चाणाक्ष निरीक्षणकर्ता दडलेला आहे, जो सतत मिष्किलपणे एकूण जग पाहत असतो. त्यातली व्यंगे, त्यातले विचार, त्यातलं माणूसपण, त्यातलं कारुण्य शोधत असतो. आपल्याला यातले काय योग्य आहे, याचा विचार जिथल्या तिथे ठरवत असतो.
– – –
‘पुरू, तुझ्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या पाच प्रती मी विकत घेणार आणि माझ्या वाचक मित्रांना त्या सप्रेम भेट देणार…’
मी लिहिलेल्या ‘क्लोज एन्काऊंटर्स’ या माझ्या पहिल्यावहिल्या व्यक्तिचित्रं संग्रहाचं राजहंस प्रकाशनाने पुस्तक केलं आणि त्याचं प्रकाशन १५ डिसेंबर २०१९ला झालं आणि मला आश्वासन दिल्याप्रमाणे दिलीप प्रभावळकर यांनी, म्हणजेच दिलीपभय्याने प्रत्यक्ष ‘राजहंस’मधून त्याच्या पाच प्रती विकत घेतल्या, त्याचा फोटोही मला पाठवला. माझ्या पहिल्या एकांकिका आणि नाटकापासून माझ्या एकूण कारकीर्दीवर लक्ष्य ठेवून असलेल्या दिलीपभय्याचे मला कौतुक वाटले. कधी कधी एखादा माणूस बोलून जातो आणि विसरतो, पण इथे दिलीपभय्या जसे बोलला तसे वागला.. माझ्या अलीकडच्या लेखांना सातत्याने प्रोत्साहन देणारा दिलीपभय्या स्वत: एक मोठा अभिनेता, लेखक आणि उत्तम वाचक आणि रंगकर्मी आहे, ही गोष्ट तर सर्वपरिचित आहे. प्रत्येक कलावंताला वाटत असते की आपण जे काही सादर करतो त्याला दाद मिळावी आणि त्यात दिलीप प्रभावळकरसारख्या इतक्या संपन्न कलावंताने प्रत्यक्ष भेटून अथवा फोन करून दाद देणं हे त्याच्यातल्या निखळ आणि निर्मळ कलावंताचं प्रत्यक्ष दर्शन असतं. हा गुण एखाद्या कलावंतामध्ये असणं हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे. आणि दिलीपभय्याकडे समोरच्याचे कौतुक करण्याचा तो गुण आवर्जून आहे.
१९७८ साली मी ‘अलवरा डाकू’ नाटक राज्य नाट्य स्पर्धेला केले, ते माझे लेखक दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून पहिले नाटक होते. आमच्या रिहर्सल्स शिवाजी पार्कच्या अँटोनिओ डिसिल्व्हा शाळेत पहिल्या मजल्यावर असायच्या. आणि तळमजल्यावर रत्नाकर मतकरींच्या ‘लोककथा ७८’ या नाटकाच्या तालमी चालायच्या. दिलीप प्रभावळकर तेव्हा ‘रॅलीज फार्मास्युटिकल’मधली नोकरी सांभाळून मतकरींच्या ‘सूत्रधार’ या संस्थेच्या नाटकातून किंवा एकांकिकांमधून काम करायचे. ‘लोककथा ७८’मध्ये ते नव्हते, पण ‘सूत्रधार’च्या ‘आरण्यक‘ या प्रायोगिक नाटकात ते होते. त्यामुळे प्रयोगाच्या आधी कधी रिहर्सल असल्यास ते तिथे दिसायचे आणि मग दूरदर्शनच्या आठवणी निघायच्या.
‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रवाणीच्या जमान्यात दूरदर्शनवर गाजलेली त्यांची ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही मराठी मालिका घराघरात लोकप्रिय होती. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकसुद्धा ती मालिका आवडीने पाहात, कारण त्यातली भोळी भाबडी मराठमोळी पात्रे. चिमण-गुंड्याची लॉरेल हार्डीसारखी, जाड्या-रड्याची मराठी जोडी वाटत असे. पण यात गुंड्याभाऊ जाड्या असला तरी चिमणराव रड्या नव्हता. तो अत्यंत हुशार आणि चाणाक्ष असूनही पापभीरू आणि कुटुंबवत्सल असल्यामुळे शक्यतो मर्यादा ओलंडणारा नव्हता. गुंड्याभाऊसारखा बलदंड सुदृढ मित्र आणि चिमणराव, दोघे एकत्र मिळून कुटुंबाच्या भल्यासाठी ज्या करामती करायचे त्या अत्यंत मोहक आणि मनोरंजक असायच्या. प्रभावळकर हे चिमणरावच्या भूमिकेत पराकोटीचे लोकप्रिय झाले होते. तसेच गुंड्याभाऊच्या भूमिकेत बाळ कर्वे. दिलीपची ‘काऊऽऽऽ’ ही हाक शम्मी कपूरच्या ‘याहूऽऽऽ’इतकीच लोकप्रिय होती. शम्मीजींच्या हाकार्यात रांगडेपणा त्यांच्या स्वभावमुद्रेतून आला होता, तर चिमणरावची ‘काऊऽऽऽ’ ही हाक त्याच्या कुटुंबवत्सल भाबडेपणातून आली होती.
दिलीपभय्याने साकार केलेले सगळे ‘चिमणराव’ जवळून बघण्याचा मला योग आला. म्हणजे दूरदर्शनवरच्या मराठी मालिकेतला (१९७५ ते ७७), नंतर झालेल्या मराठी चित्रपटातला (१९७९-८०) आणि त्यानंतर काही वर्षांनी हिंदी मालिकेतला (१९८७-८८), हे सर्व चिमणराव मी जवळून पाहिले. दूरदर्शन केंद्रात चिमणरावाचे शूटिंग सुरू असायचे, तेव्हा मी तिथे ग्राफिक सेक्शनमध्ये चित्रकार म्हणून काम करीत होतो आणि आमच्या सेक्शनच्या जवळच असलेल्या ‘बी’ स्टुडिओत त्यांचा सेट लागायचा. त्यामुळे अधूनमधून डोकावल्यास चिमणरावांचे कुटुंब शूटिंगच्या लगबगीत दिसायचे.
पुढे दूरदर्शनचे निर्माते विनय धुमाळे यांनी ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ हा मराठी चित्रपट केला, त्याची पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहिली होती. या सिनेमातही मालिकेतलीच पात्रयोजना होती आणि दूरदर्शनमधले बरेच तंत्रज्ञ त्यात होते. बी. पी. सिंह हे कॅमेरामन माझे चांगले मित्र होते, त्यांच्यामुळे मी या चित्रपटात बबन दळवी याच्याबरोबर कलादिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे प्रभावळकर यांचा ‘पुन्हा चिमणराव’ जवळून पहाता आला.
या चिमणरावाचा आणि माझा प्रवास इथंच संपत नाही. पुढे १९८६च्या दरम्यान ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त हे ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही हिन्दी मालिका करीत होते. पुन्हा योगायोगाने यात चिमण आणि गुंड्याच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वेच भूमिका करीत होते. चिं. वि. जोशी यांच्या मूळ कथेला यावेळी नाटककार सुरेश खरे यांची पटकथा होती. यावेळी निर्माते होते, शाम खरे, सुरेश खरे आणि दिलीप प्रभावळकर. या तिघांची एक कंपनी होती ‘कॅलिडो’ नावाची, ती या मालिकेची निर्मिती करीत होती. मालिका डीडी मेट्रोसाठी तयार होत होती. त्यावेळी माझ्या काही माहितीपटांचे एडिटिंग सुरेश खरे यांच्या ‘कॅलिडो’ एडिटिंग स्टुडिओत व्हायचे. त्यावेळी मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या (हमाल! दे धमाल) तयारीला लागलो होतो. तत्पूर्वी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी दोन वर्षे हातातली सर्व नाटके थांबवून प्रॅक्टिकल अनुभव घेण्याच्या शोधात होतो. सुरेश खरे यांनी मला सुचवले की राजदत्त यांना या मालिकेसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून तू काम का करीत नाहीस? एवढ्या मोठ्या मातब्बर मराठी चित्रपट दिग्दर्शकाकडे काम करायची संधी मी सोडली नाही. मी ताबडतोब ऑफर स्वीकारली आणि दत्ताजींना सहायक म्हणून काम करू लागलो, मालिका होती ‘चिमणराव गुंड्याभाऊ.’ या मालिकेचे बरेचसे चित्रण पुण्यात झाले. जवळजवळ सहा महिने अधूनमधून चित्रीकरण व्हायचे. कॅमेर्यामागचा सहाय्यक म्हणून माझा पहिलाच अनुभव आणि दत्ताजी हे अत्यंत शांतपणे सगळं चित्रित करायचे. लिहून आलेले स्क्रिप्ट सकाळी बर्याच वेळा स्वत:च्या हस्ताक्षरात पुन्हा लिहून काढायचे आणि त्यात त्यांना हवे तसे बदल करायचे. मग ते स्क्रिप्ट माझ्याकडे देऊन मी सर्व कलाकारांकडे त्याच्या पुनर्लिखित कॉपीज पोचवायचो आणि त्यांची जुजबी रिहर्सल घ्यायचो. तोपर्यंत इकडे सेटवर लायटिंग आणि शॉटची तयारी व्हायची. या दरम्यान माझी दिलीपभय्याशी गट्टी झाली, चांगली मैत्री झाली. तोपर्यंत माझी अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली होती. मी पुढे चित्रपट करण्यासाठी हातातली नाटके सोडून ट्रेनिंग घेतोय याचे दिलीपभय्याला केवढे अप्रूप होते. मधल्या वेळात ते मला खूप प्रोत्साहन द्यायचे, अनेक प्रश्न विचारायचे, ‘पुरू, तुला आता शॉट डिव्हिजन म्हणजे काय ते कळले असेल ना? लुक्सची गणितं कळली का रे? तरी ही मालिका आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. तुला दत्ताजींबरोबर एखादा सिनेमा करावा लागेल, तो अनुभव वेगळा असेल, असा सल्लाही दिला. खरे तर दत्ताजी ही सिरियल सिनेमासारखीच शूट करीत होते आणि ते इतके डिटेलमध्ये करायचे की कधी कधी शाम खरे या निर्मात्यांना शूटिंग वेळेत संपेल की नाही यांचे टेन्शन यायचे.
या सहवासात दिलीपभय्याचा मिश्किल स्वभावही कळून आला. दत्ताजींचा दरारा एवढा होता की सहसा त्यांच्यापर्यंत कोणी काही विचारायला पोहोचत नसे. बर्याच कलावंतांचा एक ठरलेला प्रश्न असे की ‘किती वाजता पॅकअप आहे?’ आणि ‘आणखी किती शॉट्स आहेत?’ पण हे दत्ताजींना कोणीही विचारायला जात नसत, त्यांना मी बरा पडायचो. त्यात अत्यंत उत्सुकता असे ती दिलीपभय्याल. मग तो कोणाच्या तरी नावाने माझ्याकडे शब्द टाकायचा, ‘पुरू, अरे बाळ (कर्वे) विचारतोय, साधारण लंच ब्रेक किती वाजता होईल? अजून किती शॉट्स आहेत? नाही, तुला माहिती आहे ना? त्याला भूक अनावर होते, म्हणजे जरा उशीर झाला तर गुंड्याभाऊच जणू त्याला आतून सतावत असतो..‘ वगैरे… खरं तर लंच ब्रेकची वेळ टाळून गेलेली असायची आणि दत्ताजी शांतपणे ठरलेले काम पुरे केल्याशिवाय कोणताही ब्रेक घेत नसत किंवा पॅकप करीत नसत. मग मी त्यांचं स्क्रिप्ट असलेलं पॅड हळूच चाळून चाळून पाहायचो आणि बाळ कर्वेना अंदाजे वेळ सांगायचो. पण ते तर म्हणायचे, ‘अरे ठिकाय, मला काही प्रॉब्लेम नाही, मी कुठे विचारतोय कधी संपणार ते?’ ही माहिती दिलीपभय्यालाच हवी असायची, पण स्वत: नामानिराळा राहून तो ती काढून घ्यायचा. हे सर्व करीत असताना चेहरा अत्यंत नॉर्मल आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा असे.
दूरदर्शनवरची मराठी मालिका गाजली, पण, मराठी सिनेमा कधी लागून गेला कळलेच नाही. हिंदी मालिकेचे तेरा भाग शूट झाले, पण डीडी मेट्रोच्या अधिकार्यांना बहुतेक चिमणराव कुटुंबाचे पुणेरी हिन्दी रुचले नसावे. ती मालिका प्रसारित होण्याच्या रांगेतच उभी राहून संपली. खरे तर हे पुणेरी हिन्दी एकेकाळी प्रभातच्या चित्रपटातून जगभर गाजले होते. पंजाबी किंवा बंगाली अथवा दाक्षिणात्य हिन्दीपेक्षा कितीतरी उजवे होते हे हिन्दी. पण उत्तर प्रदेशीय दादागिरीमुळे कदाचित ही मालिका दिल्लीत रूजली नसावी.
मात्र दिलीपभय्यांचा चिमणराव दीर्घकाळ स्मरणात राहिला. इतका की दिलीप प्रभावळकर म्हणजे फक्त चिमणरावच असा ब्रँड झाला. नेमकी हीच दिलीपभय्याला अडचण वाटली असावी. साहजिकच आहे, एखाद्या नटाचा केवळ एकाच पद्धतीच्या भूमिकांसाठी विचार करणे त्या नटाला अतिशय त्रासदायक होते, तसे दिलीपभय्याला झाले असावे.मग पुढे येणार्या नाटक-सिनेमात दिलीपने जाणीवपूर्वक चिमणरावसारख्या भूमिका टाळल्या. अतिशय कष्टाने त्याला त्यात यश आले. ‘पोर्ट्रेट’ नावाच्या रत्नाकर मतकरींच्या एकांकिकेत एका अत्यंत कडक शिस्तीच्या मिलिटरी अधिकार्याच्या भूमिकेत दिलीपने जबरदस्त बेअरिंग घेऊन ती भूमिका यशस्वी केली. त्यात चिमणरावाचा कुठे लवलेशही नव्हता. त्या काळी ‘नाट्यदर्पण रजनी’ रात्रभर चालायची. त्यात विविध कार्यक्रम व्हायचे. एका रजनीमध्ये दिलीपने धमाल उडवली. त्यांनी चक्क, एक आफ्रिकेत सेटल झालेली मराठी स्त्री अनेक वर्षानी मुंबईत येते आणि आपल्या हरवलेल्या मुलाला शोधत शोधत नाट्यदर्पण रजनीत दाखल होते, हा एक अफलातून प्रकार सादर केला. त्यात त्यांनी उभी केले ‘दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा’ या विचित्र नावाचे एक स्त्री पात्र. नऊवारी साडीत समोर ही उभी राहिली तेव्हा खरंच ती एक सौंदर्यवती असल्यासारखे वाटले. स्वत:च लिहिलेली ती व्यक्तिरेखा दिलीपभय्याने अशी काही सादर केली की त्यांचा चिमणराव कुठच्या कुठे हरवून गेला. ‘सूर्याची पिल्ले’ नाटकातली भूमिकाही अशीच गाजली. त्यांतर दिलीप प्रभावळकर म्हणजे ‘भूमिकेतलं वैविध्य’ हा नवीन ब्रँड पुढे आला. नाटकातून विविध भूमिका करता करता दिलीप प्रभावळकर सिनेमासृष्टीही गाजवत होते. अशोक सराफ, रंजना, यांच्याबरोबर ‘एक डाव भुताचा’ हा सिनेमा गाजला, त्यातली ‘मास्तुरे’ ही अशोक सराफांनी मारलेली हाक आणि कॅरेक्टर दोन्ही गाजले. नंतर आला ‘झपाटलेला’ या चित्रपटातला व्हिलन तात्या विंचू, हा चित्रपटात सुरुवातीला थोडा वेळ प्रत्यक्ष आणि नंतर बाहुलीच्या आवाजाच्या रूपाने अजरामर झाला. ‘चौकट राजा’ या सिनेमातील मंदबुद्धी मुलगा प्रभावळकरांनी अतिशय समर्थपणे सादर केला. त्यातल्या विविध शेड्स अत्यंत कठीण होत्या, सिनेमात त्या दाखवणे तर जास्तच कठीण होतं. त्यात तो काळ अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या गाजणार्या विनोदी जोडीचा होता. त्या लाटेत एक वेगळा सिनेमा आणि वेगळा सशक्त अभिनय या भूमिकेतून रसिकांसमोर आला आणि त्याने रसिकांची मने काबीज केली. त्यानंतर अनेक चित्रपटांतून प्रभावळकरांनी महत्वपूर्ण भूमिका सादर केल्या. त्या आजतागायत.
लेखक म्हणून त्यांनी सुरुवातीला विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन केलं. त्यातली ‘अवती भवती’, ‘कागदी बाण’, ‘बोक्या सातबंडे’ ही सदरे पुस्तक रूपानेही प्रसिद्ध झाली. पण रंगभूमीवर त्यांनी सादर केलेलं ‘हसवाफसवी’ हे अनेक पात्री प्रहसनात्मक बहुरूपी नाट्य त्यांना आणखी एक ओळख देऊन गेले. त्याचवेळी झी मराठीवर गाजलेली ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आणि नंतर हिन्दी चित्रपटात आलेले ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील त्यांनी सादर केलेय महात्मा गांधी. अशी तिन्ही माध्यमातील कामगिरी दिलीप प्रभावळकर हा काय ताकदीचा लेखक आणि नट आहे हे दर्शवून जाते.
‘हसवाफसवी’मधील संगीत नट कृष्णराव हेरंबकर म्हणजे एका अत्यंत वृद्ध नटाचे व्यक्तिचित्र- विनोद आणि कारुण्य यांचा एकत्र आविष्कार, एकेकाळी समृद्ध आणि प्रचंड लोकप्रिय असलेला हा वृद्ध नट वृद्धापकाळातही दमछाक होत असताना लोकप्रिय नाट्यसंगीत गाण्याची ज्या पद्धतीने वय विसरून तोशीस घेतो, ते पाहण्यासारखे होते. इतकेच नव्हे तर त्यातला कोंबडीचा व्यवसाय करणार्या नाना मुंजे यांचे व्यंगचित्र अभिनयातून आणि भाषेतून तुफान विनोदी पद्धतीने ते सादर करीत. दीप्ती, चायनीज पात्र चँग, ब्रिटिश प्रिन्स या एकापेक्षा एक व्यक्तिरेखा या नाट्यप्रयोगात अनेक दृश्यात्मक धक्के देत असत.
इतकी सगळी विनोदी व्यंगचित्रे, निखळ विनोद सादर करणारे दिलीपभय्या स्वत: एक अत्यंत गंभीर आणि चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. ‘अनुदिनी’ ही रोजनिशी एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबाची बखर लिहिल्यासारखी लिहून त्यांनी त्यातून ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही व्यक्तिरेखा उभी केली आणि केदार शिंदेच्या मालिकेतून ते संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा घराघरात पोचले. त्यातला दिलीपभय्यांचा टिपरे पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला, अगदी चिमणरावाइतकाच. प्रत्यक्ष दिलीप प्रभावळकर आणि त्यांनी उभी केलेली व्यक्तिरेखा यांच्यामध्ये जमीन-आसमानाचा फरक असतो. त्रयस्थपणे पाहिलेल्या या सर्व व्यक्तिरेखा उभ्या करताना दिलीपभय्या जेव्हा त्या भूमिकेत शिरतात, तेव्हा त्यांचे केलेले निरीक्षण एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्याप्रमाणे भूमिकेवर फटकारे मारून उभे करतात. आवाज आणि बोलण्याची शैली ते इतके बेमालूम बदलतात की आश्चर्यचकित व्हायला होते.
‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात त्यांनी उभ्या केलेल्या महात्मा गांधीजींच्या भूमिकेचा पोतच विलोभनीय होता. मुळात पुढे कधीकाळी दिलीप प्रभावळकर यांच्या वाट्याला महात्मा गांधींची भूमिका येईल, असे दिलीपभय्याच काय, पण प्रत्यक्ष गांधीजीना देखील वाटले नसेल. खरे तर या दोन व्यक्तींमध्ये कोणतेच साम्य नाही, पण तरीही त्यांनी तो सगळा थाट बेमालून उभा केला. ती व्यक्तिरेखा हे व्यंगचित्र नव्हते, ती एक भूमिकाच होती, एक विचार होता, आणि कोणतीही लेक्चरबाजी न करता, एका सामान्यातल्या सामान्य माणसाला साधं सोप्पं जीवन जगून दाखवायचं आव्हानच त्या भूमिकेतून द्यायचं होतं. हा सगळा आतला अर्थ दिलीपभय्याने कमालीचा टोकदार उभा केला. याच ‘लगे राहो मुन्नाभाई’च्या सक्सेस पार्टीत संजय दत्तच्या समोर जेव्हा दिलीपभय्या गेले, तेव्हा कोणीतरी पार्टीला आलेले आमंत्रित असतील म्हणून संजयने लक्षच दिले नाही. नंतर कोणीतरी त्यांची ‘खरी’ ओळख करून देताच संजय दत्तने हजार वेळा त्यांची माफी मागितली. कारण याआधी त्याने दिलीपभय्याला गांधीजींच्या गेटपमध्येच पहिले होते. तो असा त्यांना प्रत्यक्षात प्रथमच पाहात होता. त्यानंतर मात्र त्याने त्यांची प्रचंड स्तुती केली. त्या बिचार्यानेसुद्धा इतका साधा नॉन फिल्मी आणि विनम्र अभिनेता यापूर्वी क्वचितच पहिला असावा. चार आण्याच्या वकुबाचा चारशे रुपये डोलारा दाखवणारी ही इंडस्ट्री संजय दत्तने अनेक वेळा पाहिली असेल, पण बंदा रुपया पहिल्यांदाच पहिला असावा.
दिलीप प्रभावळकर एक व्यक्ती, दिलीप प्रभावळकर एक अभिनेता आणि दिलीप प्रभावळकर एक व्यक्तिचित्र किंवा एक व्यंगचित्रभूमिकाकार अशा तिन्ही स्वरूपात मी त्यांना गेली अनेक वर्षे पाहतोय. या व्यक्तीत एक सतत जागरूक असा चाणाक्ष निरीक्षणकर्ता दडलेला आहे, जो सतत मिष्किलपणे एकूण जग पाहत असतो. त्यातली व्यंगे, त्यातले विचार, त्यातलं माणूसपण, त्यातलं कारुण्य शोधत असतो. आपल्याला यातले काय योग्य आहे, याचा विचार जिथल्या तिथे ठरवत असतो. त्याच्यातल्या अभिनेत्याकडे आलेले एखादे नाटक, सिनेमा, किंवा भूमिका किती वजनाची आहे, आपल्याला ती पेलवेल का, किती निभावू शकू याचा ताळा करण्याचे एक कॅल्क्युलेटर त्याने बनवून ठेवले आहे. ते तो सर्वांसमोर वापरत नाही. आज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तो उद्या देतो, कारण ते उत्तर सर्वांगीण विचारपूर्वक असे द्यायचे असते. त्यांनी दिलेला नकारसुद्धा प्रथम परितोषिकाच्या करंडकासारखा ते अलगद हातात देतात आणि होकार असेल तर त्याच्या सर्व शक्यता, अशक्यता पडताळून तो सावकाश लँड होणार्या विमानासारखा असतो.
दिलीप प्रभावळकरांची आणि माझी ओळख १९७६ला दूरदर्शनमध्ये झाली, त्याला आता ४६ वर्षे होत आली. प्रेक्षक आणि रंगकर्मी म्हणून आम्ही एकमेकांची सर्वच नाटके पहिली. मी पहिले व्यावसायिक नाटक लिहिले, ‘टुरटुर’ त्यातली प्राध्यापकाची भूमिका दिलीपने करावी म्हणून मी एक वाचनही त्याच्यासाठी केले. पण केवळ मित्र आहे म्हणून होकार न देता, त्यावेळी इतर ठिकाणी व्यग्र असल्यामुळे दिलीप त्या नाटकात येऊ शकला नाही. मात्र पुढे ‘ई टीव्ही’साठी ‘टुरटुर’ ही मालिका सादर झाली, त्यात मात्र दिलीपभय्याने एका वर्षात ५२ एपिसोड, प्राध्यापक सुटेकरची भूमिका केली. त्या वर्षभरात त्यांच्या एकूण व्यावसायिक शिस्तीचा पुन्हा एकदा मला चांगला अनुभव आला. त्या आधी ‘वासूची सासू’ या नाटकाचे मी संगीत केले होते, त्यात ‘सासू’ची अप्रतिम भूमिका दिलीपभय्याने केली होती. त्या आधी विजय चव्हाणचे ‘मोरूची मावशी’ गाजत होते, तरीसुद्धा सासूचा अप्रतिम आविष्कार सादर करून दिलीपभय्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. २००८मध्ये मी ‘निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट केला त्यात एक छोटी पण अत्यंत महत्वाची भूमिका दिलीपभय्याने केली. प्रत्येकवेळी हो म्हणायला वेळ घेतला, पण माझ्या चित्रपटात काम करायची आणि त्यांना दिग्दर्शन करायची संधी त्यांनी मला दिली.
दिलीपभय्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा पट खूप मोठा आहे. सर्व आठवून झाले असे वाटत असतानाच, त्यांची रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यातली, म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’मधली चेटकीण विसरून कसे चालेल? विजय केंकरेच्या ‘अप्पा आणि बाप्पा’, तसेच ‘जावई माझा भला’ या नाटकातल्या अत्यंत परिपक्व भूमिका, ज्यांत कसलेच कॅरिकेचर नव्हते, त्याही आठवाव्या लागतील. पु. ल. देशपांडे लिखित वामन केंद्रे दिग्दर्शित `एक झुंज वार्याशी’ या नाटकातील मुख्यमंत्र्याला जाब विचारणार्या सामान्य माणसाची भूमिकाही विसरुन चालणार नाही.
नुकतीच ‘द ग्रेट’ अशोक सराफ यांनी वयाची पंचहत्तरी गाठली, साजरीही केली. दिलीपभय्या अठ्ठ्याहत्तरीत आहेत. अशोक सराफ, विक्रम गोखले, मोहन जोशी, मोहन आगाशे या दिग्गज अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिकांचे द्वंद्व खेळून झाले आहे. ही सर्व मंडळी मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीचे वैभव आहेत.
शिस्त, सर्जनशीलता, आपल्या अस्तित्वाची जाणीव, सततची जागरूकता यामुळे एक अभिनेता कारकीर्द किती समृद्ध करू शकतो यांचे चालते बोलते उदाहरण म्हणजे दिलीप प्रभावळकर.. ‘चिमणराव’च्या इमेजमध्ये स्वत:ला गुरफटवून न टाकता अनेक मोठमोठ्या ऑफर्सचा त्याग करून त्यातून दिलीपभय्या बाहेर आले आणि त्यामुळे पुढे अनेक अफलातून व्यक्तिरेखा, व्यंगचित्रभूमिका, रासिकांना पाहायला मिळाल्या ही त्यांची खूप मोठी देणगी आपल्याला लाभली.
दिलीप प्रभावळकर म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’. त्यांच्या शाळेत निंदानालस्तीचा तास नसतो; राग, लोभ, चिडचिड, आरडाओरड असे षड्रिपू आसपासही फिरकत नाहीत- जेवढ्यास तेवढे नक्की असते, पण जशास तसे नसते. खूप दिवसांनी भेटले तरी रोज भेटल्याचा आनंद ते देतातच. स्वभावात कुठेही टिपिकल पुणेकर नाही की वागण्यात कुठेही मुंबईकर नाही, तरीही मुंबईची दगदग सोडून पुण्यात स्थिर व्हायचे ठरवूनसुद्धा रसिकांच्या मनात कायमचे वास्तव्य करणारे दिलीप प्रभावळकर हा धीरगंभीर नव्हे तर ऊतू जाणारा आनंदाचा अवखळ डोह आहे.