• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

- पुरुषोत्तम बेर्डे (ब्रेक के बाद)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 1, 2022
in ब्रेक के बाद
0
शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

कित्येक अविस्मरणीय भूमिका करीत आज अशोकजी पंचाहत्तरीत पोहोचलेत हे खरेच वाटत नाही. सिनेमातला हीरो आपल्या मनात जेवढा आपण सुरुवातीला पाहिलेला असतो तेवढाच शिल्लक असतो. तसे अशोकजी रसिकांसमोर आजही आहेत. कधी ते नायक म्हणून डोळ्यासमोर येतात, तर कधी खलनायक म्हणून, कधी बेरक्या राजकारणी तर कधी साधासुधा ‘मास्तुरे’ म्हणून. चित्रपटात पहिला ब्रेक मिळाल्यापासून गेले पन्नास वर्षे सातत्याने चित्रपटच करीत राहाणारी ही एकच व्यक्ती असावी.
– – –

येत्या चार जूनला मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतोय… आणि त्याचबरोबर कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सवही साजरा करतोय.. त्या महान कलावंताचं नाव आहे अशोक सराफ.
कोकणस्थ वैश्य समाजाच्या महाजनवाडीत मी आणि लक्ष्या आम्ही लहानपणापासून गणेशोत्सवात एकांकिका अथवा वेशभूषा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. शाळा संपली आणि कॉलेज सुरू झाले, आमचे नाट्यक्षेत्र थोडे विस्तारले. लक्ष्मीकांतचे साहित्य संघ मंदिरात बरेच जाणे येणे असे आणि साहित्य संघ हा तेव्हा हौशी आणि प्रायोगिक नाटकवाल्यांचा अड्डा होता. त्यामुळे नाट्यवर्तुळात घडणार्‍या नवनव्या घटना तिथे नित्यनेमाने कळत असत. त्यातच एक बातमी पसरली, आंतरबँक एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीत रमेश पवार लिखित ‘म्हॅऽऽऽ’ नावाची एक एकांकिका झाली आणि त्यातल्या रमेश पवार आणि अशोक सराफ या दोन नवीन नटांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. अंतिम फेरीत ती एकांकिका पुनः साहित्य संघात होणार होती, ती बघायला मला लक्ष्याने खास बोलावलं होतं.
मी कॉलेजातून जेमतेम संघात पोहोचलो, उशीर झाला होता, स्पर्धेची आणि एकांकिकेची एवढी प्रचंड हवा झाली होती की थेटरमध्ये मुंगी शिरायलाही जागा नव्हती. लक्ष्याने मला कसेबसे गर्दीतून स्टेजसमोरच्या खड्डयात, म्हणजे ऑर्केस्ट्रा पिटात नेले आणि तिथे बसून आम्ही दोघांनी ती ‘म्हॅऽऽऽ’ ही एकांकिका बघितली, आणि अक्षरश: उडालोच. रमेश पवार आणि अशोक सराफ या दोघांनी कमाल केली होती. ती एकांकिका संपूर्णपणे मायमिंग या प्रकारावर आधारित होती आणि दोन चोरांच्या पळापळीवर बेतली होती. ती पळापळ आणि पोलिसांचा ससेमिरा, त्यातून सुटका, मग वकील, कोर्टकचेरी आणि सुटका, एवढा सगळा प्रवास त्यात होता.. त्यांच्या मायमिंगने सर्वांना वेड लावले होते, अशोक सराफने अत्यंत बोलक्या अशा चेहर्‍याने आणि विनोदांच्या टायमिंगने बहार उडवून दिली होती. मी आणि लक्ष्या तर खड्ड्यात बसून हसायचं वगैरे सोडून या माणसाच्या या करामती न्याहाळत होतो. हे याला कसे जमत असेल, याचा विचार करीत होतो, त्यामुळे टाळ्या वाजवायचेही आम्ही विसरूनच गेलो होतो. एकांकिका संपली आणि त्या गर्दीतून बाहेर येता येता, गप्प गप्प असलेल्या लक्ष्याला मी विचारले, ‘काय रे? गप्प का?’ तर म्हणाला. ‘काय साला बेफाम माणूस आहे रे हा… साला एक दिवस मी पण बनेन अशोक सराफ, एवढेच लाफ्टर घेऊन दाखवेन, एवढेच हशे, आणि एवढ्याच टाळ्या..’
अशोक सराफने तसा चमत्कार केलाच होता, लक्ष्याच नव्हे तर अनेक तरूणांवर त्याने मोहिनी घातली होती..
डोक्यावर प्रचंड केस आणि वेगळीच हेयरस्टाइल.. दाट भरलेल्या काळ्याभोर केसांच्या भुवया, मोठ्ठे डोळे करून कपाळावर आठ्या घालून एका विशिष्ट लकबीत केलेली संवादफेक आणि त्यातून खणखणीत निर्माण होणारा हास्यस्फोट, हा अशोक सराफचा हुकूमी एक्का कित्येक तरुणांना, विनोद सोप्पा करून सांगत होता. पण हे टायमिंग किती कठीण आहे, हे त्यांना कळत नव्हते. लक्ष्याने केलेली प्रतिज्ञा त्याच्यातल्या विनोदी कलाकाराला दिशा देणारी ठरलीr. त्या खड्ड्यातल्या अनुभवातून दोन वेगळे महामार्ग निघाले, एक लक्ष्याचा, जो विनोदी अभिनेत्याचा होता; दुसरा दिग्दर्शकाचा, जो बारीकसारीक हालचालीतून काहीतरी प्रतीकात्मक सांगू इच्छित होता. साहित्य संघाच्या त्या निमुळत्या गल्लीतून दोन नाटकवेडे चालले होते, एकाच्या मनात विनोदाचा बादशाह बनण्याची स्वप्ने तर दुसर्‍याच्या मनात हाच प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने करून बघता येईल का, असे प्रायोगिक विचार…
कालांतराने तोच लक्ष्या पुढे अशोक सराफबरोबर जोडीने मराठी सिनेमावर अधिराज्य गाजवेल आणि तोच मी अशोक सराफबरोबर ‘भस्म’, ‘निशाणी डावा अंगठा’ यांच्यासारखे आडवळणाचे मराठी चित्रपट करेन, असे साहित्य संघाच्या त्या निमुळत्या गल्लीला सुद्धा वाटले नसेल.
यानंतर मग मराठी रंगभूमीवर व्यावसायिक नाटकांचे दरवाजे अशोक सराफ यांना खुले झाले.. पांडुरंग धुरत यांच्या माऊली
प्रॉडक्शनने या विनोदी नटाला ‘डार्लिंग डार्लिंग‘ या नाटकात संधी दिली. त्यातली भूमिका गाजेपर्यंत चक्क, प्रभातच्या चित्रपटात गाजलेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांनी अशोक यांची कीर्ती ऐकून सिनेमात बोलावले आणि ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात सॅनिटरी इन्स्पेक्टरची तुफान विनोदी भूमिका देऊ केली आणि तात्काळ सराफ यांना चित्रपटाचेही दरवाजे खुले झाले. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच एवढा वेगवान प्रवास सुरू झाला आणि तो तसाच सुरू राहिला. ती भूमिका बघून सराफ यांना दादा कोंडके यांनी आप्ाल्या पुढील चित्रपटात आपल्याएवढीच तोलामोलची भूमिका देऊ केली आणि ‘पांडू हवालदार’मध्ये लाचखाऊ सखाराम बनलेले अशोक सराफ, अख्ख्या महाराष्ट्रात गाजू लागले. पुढे ‘राम राम गंगाराम’मधला ‘म्हमद्या खाटीक’ही तसाच गाजला. पुढे दादांच्या चित्रपटातल्या भूमिकांमधला तोच तोच पण टाळण्यासाठी सराफांनी मोर्चा इतर चित्रपटांकडे वळवला. ही त्यांनी त्या काळात घेतेलेली मोठी रिस्क होती. पण मुळातच स्वत:वर प्रचंड विश्वास असलेल्या सराफ यांनी घेतलेले निर्णय फळास आले आणि एकापेक्षा एक अशा वैविध्यपूर्ण भूमिका त्यांच्या वाट्याला येतच गेल्या.
सुरुवातीला विनोदी अभिनेता असा शिक्का बसला पण नंतर नंतर त्यांचे काही असे सिनेमे आले, ज्यात त्यांनी ऐन तरूणपणात खलनायक सादर करून एक धक्काच दिला. पुढे वैविध्यपूर्ण भूमिका करून अनेक पुरस्कार मिळवले. ‘खरा वारसदार’, ‘बहुरूपी’ वगैरे सिनेमात त्यांनी गंभीर भूमिका केल्या आणि आपण अष्टपैलू अभिनेते आहोत हेही सिद्ध केले.
‘टुरटुर’ नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे मराठी रंगभूमीवर हिट झाला आणि पुढे ‘हसली ती फसली’ या चित्रपटात त्याला पहिली भूमिका मिळाली तरी ‘धूमधडाका’ या चित्रपटात त्याला विनोदी अभिनेता म्हणून मान्यता मिळाली आणि पुढे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अशी जोडी जमत गेली. या जोडीने जवळजवळ शंभरच्या वर मराठी सिनेमे केले आणि एक काळ मराठी चित्रपटसृष्टी आपल्या धमाल अभिनयावर तारून नेली.
डॉ श्रीराम लागू, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटांना प्रेक्षक खेचून आणले. त्याकाळी त्यांना घेऊन अनेकांना चित्रपटकथा सुचू लागल्या आणि तसे निर्मातेही मिळाले. मात्र तरीसुद्धा अनेकदा चित्रपट निर्मात्यांचा दर्जाही सुमार असे. अशा चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळी या सर्व नटांना जो मनस्ताप होई, त्यातून तरून जाऊन पुढे अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभे राहणे म्हणजे कसरतच होती. डॉक्टर लागू हे शिस्तीचे पक्के, तरीही शिस्त मोडणारे निर्माते काही कमी नसत. त्यात निळूभाऊ निर्मात्याला सवलतीचे दारच उघडून देत, ‘जाऊ दे रे, करतोय ना मराठी सिनेमा, करू दे, गरीब आहे बिचारा, देईल पैसे‘ या विचाराचे, तर अशोकजी थोडी फार धमकी देऊन पाहत, आणि तरीही नाही जमलं तर तो चित्रपट पूर्ण तरी करीत. लक्ष्मीकांत मात्र या ना त्या कारणाने निर्मात्याकडून एकेक पैसा वसूल करून सिनेमा पूर्ण करीत असे. त्यामुळे पुढे लक्ष्या, अशोक सराफ जोडी जमल्यानंतर या प्रकाराला बर्‍यापैकी आळा बसला आणि सगळ्यांनाच पैसे मिळायला लागले. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांना अनेक विविध प्रकारच्या निर्मात्यांना तोंड देत प्रवास करावा लागला. त्यात ते कधी कठोर होत तर कधी दिलदार. मी त्यांची ही दोन्ही रूपं अगदी जवळून पाहिली.
माझ्या पहिल्या चारही चित्रपटात, (‘हमाल! दे धमाल’, ‘शेम टू शेम’, ‘एक फूल चार हाफ’, हाच सूनबाईचा भाऊ’) लक्ष्मीकांत बेर्डेचीच प्रमुख भूमिका होती. मात्र पुढचा सिनेमा करण्यासाठी मला एन. चंद्रा यांनी बोलावले. सिनेमात खूप मोठी स्टारकास्ट होती, मधुकर तोरडमल, पद्मा चव्हाण, शिवाजी साटम, अजिंक्य देव, कविता लाड, जॉनी लिव्हर वगैरे. आणि त्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या भूमिकेसाठी अशोक सराफच हवे होते. माझ्या चित्रपटात भूमिका करावी म्हणून मी प्रथमच त्यांच्याकडे जाणार होतो. मला कुणीतरी उगाचच घाबरवले होते की तू त्यांना तुझ्या आधीच्या चित्रपटासाठी कधी विचारले नाहीस म्हणून ते तुझ्यावर रागावले आहेत. माझा त्यावर विश्वास नव्हता, कारण त्याआधी ‘टुरटुर’च्या ३००व्या प्रयोगाला मी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते, तेव्हा ते आनंदाने आले होते. तरीही मनात थोडी धाकधूक होतीच. मी त्यांना सिनेमाची गोष्ट सांगितली, मूळ तेलगू सिनेमावरून आम्ही करतोय वगैरे सांगितले, अभिराम भडकमकर पटकथा संवाद लिहितोय हेही सांगितले. त्यांना गोष्ट आवडली, भूमिकाही आवडली, आता राहिला व्यवहार. ते कधी व्यवहारासाठी अडून राहत नाहीत हे ऐकले होते, त्यामुळे सर्व आलबेल होते. पण.. एन. चंद्रा यांच्या वतीने आलेला कार्यकारी निर्माता केतन मजदेकर याला त्यांनी एक रक्कम सांगितली आणि तो आकडा ऐकून केतन अक्षरश: उडाला. ज्या तयारीने तो आला होता, त्यापेक्षा ती कितीतरी जास्त होती. केतनने आणि सोबत आलेल्या प्रॉडक्शन हेडने विनंती करून पाहिली, पण अशोकजी त्या रकमेच्या खाली येईनात. बराच वेळ गेला. अशोकजींनी स्पष्ट सांगितले, हे एवढे देणार नसाल तर मला नाही घेतलेत तरी चालेल, पण एवढेच. अखेर केतनने एन. चंद्रांना फोन केला. परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगितलं. चंद्राजींनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि या भूमिकेसाठी अशोक सराफच हवा, असे ठासून सांगितले.
या सर्व प्रकारात एक दिग्दर्शक म्हणून एका बाजूला गप्प बसण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. सर्व काही मान्य झाल्यानंतर मात्र पुढे संपूर्ण चित्रपट पूर्ण होऊन प्रकाशित होईपर्यंत अशोक सराफ हे किती सफाईदार व्यावसायिक नट आहेत याची प्रचिती आली. दिलेल्या तारखांमध्ये चुकूनही बदल नाही, कधी उशिरा येणे नाही की कधी लवकर जाण्याची विनंती नाही. कसली एक्स्ट्रा मागणी नाही की कसला त्रास नाही. माझ्या एकूण कामावरही त्यांनी वेळोवेळी खूश होऊन दादच दिली. मात्र उगाचच स्तुतीमध्ये फापटपसारा नाही. मोजकी आणि नेमकी शाबासकी त्यांच्याकडून मिळत असे आणि तेवढी पुरेशी असे. या एन. चंद्रा निर्मित ‘घायाळ’चा कोल्हापुरात प्रीमियर शो होता. आम्ही सगळे तिथे हजर होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी अशोकजी लवकर मुंबईला निघणार होते म्हणून मी त्यांना निरोप द्यायला हॉटेलवर गेलो. माझ्या हातात तेव्हा ‘भस्म’ या कादंबरीचे पुस्तक होते. निरोपाच्या गप्पा झाल्यावर अशोकजींनी मला हातातल्या पुस्तकाबद्दल विचारले. मी म्हटलं, कादंबरी आहे, उत्तम बंडू तुपे यांची…
‘बघू..’ असे म्हणून त्यांनी पुस्तक हातात घेतले आणि चाळले..
‘काही करतोयस काय याचं?..’ असा प्रश्न विचारला..
‘होय..’ मी बिचकत बिचकत होय म्हटले.
‘सिनेमा करतोयस?..’
‘होय..’
पुस्तकाच्या मागच्या ब्लर्बवर आशय होता, तो वाचून त्यांनी विचारले, ‘यातली ही शंकरची भूमिका कोण करतंय?’
‘अजून ठरवले नाही, पण.. पण बजेट एकदम कमी आहे..’
मी चटकन बोलून गेलो.. आणि ते खरेच होते. मला ‘भस्म’ या कादंबरीवर आधारित सिनेमा करायचा होता, पण मी त्यात दिलीप कुलकर्णी या अभिनेता मित्राचा विचार करीत होतो… निर्माताही मीच होतो आणि अशोक सराफ यांचे मानधन मला परवडणारे नव्हते. ‘घायाळ’च्या वेळची बोलणी आठवली आणि मी बजेट वाढेल म्हणून हबकलो होतो..
‘बजेट?.. मी तुला बजेट विचारलं?..’ त्यांच्या आवाजात एक प्रकारची जरब होती, आपुलकी होती, आस होती.. भूमिका करायचे आव्हान स्वीकारल्याची सूचना होती..
‘ही भूमिका मला आवडली, आणि मी केली तर तुला चालेल?’
‘पण अशोकजी, तुमचं मानधन मला..’
‘मी पैशाचं काही बोललो?..’ पुनः आवाजात जरब.. ‘हे पुस्तक मी घेऊन गेलो तर चालेल? वाचतो आणि कळवतो, कुणाला बोलला नसशील तर आणि ही भूमिका आणि कादंबरी मला आवडली तर मी करेन..’
मी दिलीप कुलकर्णीला बोललो नव्हतो, फक्त कादंबरीचे हक्क घेऊन ठेवले होते आणि ‘घायाळ’ पूर्ण झाला की यावर काम सुरू करायचे असे ठरवले होते.. अचानक या प्रोजेक्टला कलाटणी मिळाली. अशोक सराफ ही भूमिका करतील तर सिनेमा किती वेगळा होईल आणि उंचीवर जाईल याचा विचार मी करू लागलो.
दोन दिवसांनी स्वत: अशोकजींचा मला घरी फोन आला, ‘मला कादंबरी आवडली आणि भूमिकाही.. कधी सुरू करतोस बोल..’
‘पण अशोकजी.. तुमचं मानधन..?’ मी धास्तावून परत विचारले..
‘हे बघ, हा चित्रपट निर्माण करायचं तू धाडस करतोयस आणि त्या धाडसाचा एक भाग व्हायला मला आवडेल.. तू हा सिनेमा खरंच करणार असशील तर मी याचं एक पैसाही मानधन घेणार नाही.. फक्त माझ्या ड्रायव्हरचे आणि मेकपमनचे पैसे तुला जमले तर दे, तेही नाही दिलेस तर मी देईन… पण मी यात आहे.. तू तयारीला लाग ..’
ओह माय गॉड.. मला खरेच वाटेना.. मी धास्ती घेतली होती ‘घायाळ’च्या वेळच्या अशोक सराफ यांची.. त्यावेळची व्यवहाराची बोलणी कुठे आणि आत्ताची कुठे..
माझ्या प्रत्येक चित्रपटाचा सल्लागार लक्ष्मीकांत बेर्डे असायचा, मी त्याला ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘अरे, काही हिशेब वेगळे असतात, ते त्या त्या वेळीच करायचे असतात. ते त्याने केले असावेत. इथे या भूमिकेची ताकद त्याने ओळखली असणार, शिवाय तुझ्या कामावर खूश असल्याची लक्षणे आहेत ही..’
संपूर्ण ‘भस्म’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एकाग्रता, समर्पणाची भावना, भूमिकेचा सर्वांगीण विचार, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, त्याग, या सर्व गोष्टींची प्रचिती अशोकजींकडून आली. शंकर या मसणजोग्याच्या भूमिकेसाठी असलेल्या दाढी आणि मिशा खास बनवून घेतल्या होत्या. त्या एकूण दीड किलो वजनाच्या होत्या. हा सर्व मेकअप करायला त्यांना दीड तास लागायचा… या चित्रपटात त्यांच्या बरोबरीने चारुशिला साबळे-वाच्छानीची अप्रतिम भूमिका होती, ती पाच मिनिटांत तयार व्हायची.
‘उद्या शिफ्ट कितीची?
‘सकाळी नऊची. पहिला शॉट तुमचाच आहे,’ असे म्हणताच ‘ठिकाय मी साडेसातला येतो,’ हे ते स्वत:च ठरवायचे.. शूटिंग मुलुंडला छोट्या छोट्या पाड्यांमध्ये असायचे आणि कधी कधी तर रात्रीचे बारा एक वाजायचे पॅकप व्हायला.. मग मी म्हणायचो.. ‘अशोकजी, एवढ्या रात्री रोज घरी अंधेरीला का जाताय? मी तुमची मुलुंडमध्येच सोय करतो..’
पण नाही.. त्यांनी कधी ऐकले नाही.. उलट एक वाजता अंधेरीला घरी जाऊन सकाळी नऊच्या शिफ्टला ते साडेसातला हजर असत…
‘भस्म’चा क्लायमॅक्स भर दुपारी रणरणत्या उन्हात शूट होणार होता.. मे महिन्याचे कडक उन, अंगभर कपडे आणि चेहेर्‍यावर दीड किलो वजनाचे दाढी मिश्यांचे ओझे.. त्या कठीण परिस्थितही ‘हूं की चुं’ ना करता अशोकजी शूट करीत होते. त्यामुळे इतर कोणाला त्या भगभगीत उन्हाच्या त्रासाबद्दल तक्रार करायची सोयच नव्हती. उलट सर्वांचाच उत्साह वाढत असे.
‘भस्म’ चित्रपट पूर्ण झाला पण सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला. खरं तर त्यात तसं काही नव्हतं, ‘केवळ स्मशानातली गोष्ट’ या एकाच मुद्द्यावर सेन्सॉर बोर्डावरच्या अमराठी सभासदांनी तो ‘प्रौढांसाठी’ म्हणून पास केला. वाङ्मयीन पुरस्काराने सन्मानित कादंबरीवरचा जो चित्रपट शासनाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला होता तो सर्वांनी (यू) पाहू नये, अशा प्रमाणपत्रात सेन्सॉरने बांधून ठेवला. राज्य शासनाच्या स्पर्धेत जर या चित्रपटासाठी अशोकजींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी डावललं गेलं नसतं तर त्यावर्षी, त्यांची हॅटट्रिक झाली असती.
त्यानंतर अशोकजींबरोबर मी दोन चित्रपट केले. एक ‘जमलं हो जमलं’ आणि दुसरा ‘निशाणी डावा अंगठा’. या चित्रपटात अत्यंत वेगळी अशी भाऊसाहेबांची भूमिका अशोकजीनी अगदी समरसून केली. एखाद्या चित्रपटात समरसून भूमिका करायची म्हणजे साधी गोष्ट नसते. शूटिंग ‘तुकड्या तुकड्यात’ होत असते, मध्ये गॅप असते, आज सुरुवातीचा ‘सीन’ तर उद्या, शेवटचा, आणि अशावेळी त्या इतर सिनेमांचं शूटिंग करून येऊन पुन्हा त्या भूमिकेत शिरून काम करायचं म्हणजे खूप कसरतीचं आणि स्मरणशक्तीचं काम.. पण सुदैवाने अशोकजींनी भाऊसाहेब या जिवंत व्यक्तिरेखेचे (जी बुलढण्याच्या शाळेत प्रत्यक्ष होती) मॅनरिझम्स हुबेहूब पकडलेत…. विशेष म्हणजे विदर्भातली भाषा, तिचे हेल, टोन, आरोह अवरोह आणि उच्चार, शिकवण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमधला विदर्भातलाच एक मुलगाच ठेवला होता. शूटिंगच्या अगोदर १५ दिवस त्याने अशोकजींना त्या भाषेचे आचार, उच्चार समजावून सांगितले. विशेष म्हणजे अशोकजींनी ते शिकून घेतले.
कित्येक अविस्मरणीय भूमिका करीत आज अशोकजी पंचाहत्तरीत पोहोचलेत हे खरेच वाटत नाही. सिनेमातला हीरो आपल्या मनात जेवढा आपण सुरुवातीला पाहिलेला असतो तेवढाच शिल्लक असतो. तसे अशोकजी रसिकांसमोर आजही आहेत. अनेक नाटके गाजवली, अनेक गाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर विविध माध्यमातून अभिनेता म्हणून मोठे होत गेले. कधी ते विनोदी म्हणून डोळ्यासमोर येतात, तर कधी खलनायक म्हणून, तर कधी नायक म्हणून, तर कधी बेरक्या राजकारणी तर कधी साधासुधा ‘मास्तुरे’ म्हणून.
चित्रपटात पहिला ब्रेक मिळाल्यापासून गेले पन्नास वर्षे सातत्याने चित्रपटच करीत राहाणारी ही एकच व्यक्ती असावी. त्यांनी जेव्हा नाटके केली, (म्हणजे रंगमंचावरील) तेव्हा त्यांच्या शिस्तबद्ध आणि सफाईदार व्यावसायिक दृष्टिकोनामुळे आजपर्यंत एकाही नाटकाचा प्रयोग रद्द झाला नाही की शूटिंग मागे पुढे झाले नाही. मराठी नाटके, मोठमोठ्या दिग्दर्शकांचे आणि बॅनर्सचे मराठी चित्रपट, हिन्दी चित्रपट, ‘हम पाँच’सारखी माइलस्टोन मालिका, इत्यादी माध्यमांमधून अत्यंत शिस्तबद्ध सफर करताना हा माणूस कधी थकला नाही. प्रत्येक माध्यमांमध्ये वेगळा आविष्कार, सातत्य, वैविध्य अचंबित करणारे आहे.
ऐन तारुण्यात चित्रपटसृष्टीत प्रवेश करून प्रौढत्वाच्या मार्गाने आज तथाकथित वार्धक्यात ते पदार्पण करीत असले, तरी त्यांचा उत्साह आणि तरतरीतपणा जराही कमी झालेला नाही. अनेक आमिषे दाखवून मानसिक संतुलन बिघडवणारी आणि अनेक व्यसनांनी परिपूर्ण अशी ही मनोरंजनाची दुनिया… इथे जो सर्व आकर्षणांवर हुकूमत गाजवतो आणि स्वत: त्यावर आरुढ होऊन हवे तेवढेच एन्जॉय करतो, मौजमजा करून पुनः आपले ‘शरीर’ म्हणजे ‘आध्यात्म’ सांभाळतो, तो या मनोरंजनाच्या दुनियेत, आपल्या ‘शारीर माध्यमातून’ या मनोरंजनसृष्टीवर दीर्घकाळ राज्य करू शकतो.
अशोकजींच्या आयुष्यात त्यांची पत्नी आणि आमची एकेकाळची सहरंगकर्मी, निवेदिता जोशी-सराफ हिचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांच्या उत्तरायुष्यात आलेली शिस्त, व्यावसायिकतेमधला सफाईदारपणा, एकूण स्टायलायझेशन, थोडक्यात सर्वत्र सहभाग ठेवून त्वरित घर गाठणं, या सर्व गोष्टी निवेदिताच्या अंकुशामुळेच दिसून येतात, यात शंका नाही.
अत्यंत कुटुंबप्रिय आणि कुटुंबवत्सल अशा अशोक सराफ यांना घरातून बाहेर काढणं ही अत्यंत कठीण गोष्ट. भूमिका निवडताना जितके चोखंदळ तितकेच घरातून बाहेर पडण्याच्या बाबतीतही. उगाचच कुठे बोलवाल तर अजिबात येणार नाहीत. तिथे का जायचं, हे पटलं पाहिजे, हे नाटक मी का करावं, हे पटलं पाहिजे. ह्या सिनेमातली ही भूमिका मी का करावी, हे पटलं पाहिजे, आली स्क्रिप्ट आणि केली भूमिका, हा प्रकार कधीच बंद झालाय.
मी त्यांच्या कारकीर्दीवर एक भरगच्च इव्हेंट करायचं योजलं, त्याबद्दल विचारलं, तर म्हणाले ‘नको रे, कशाला?’ म्हटलं ‘अशोकजी आजच्या तरुणांना तुमच्या कारकीर्दीचा प्रवास बघून प्रेरणा मिळेल’, तर हाताचा एक विशिष्ट आकार करून दाखवत (म्हणजे ‘बाबाजी का ठल्लू’ टाइप) म्हणाले, ‘XX फरक पडतो तरुणांना?’.. ऐकेचनात. नकोच म्हणाले… मग मी त्या इव्हेंटचं एक दृकश्राव्य प्रेझेंटेशन तयार करून त्यांना दाखवले, तेव्हा त्यातलं गांभीर्य त्यांना कळलं आणि ते तयार झाले. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की नाही यांची एक ‘आत्मपरीक्षण यंत्रणा’ सतत त्यांच्या मनात घुमत असते आणि मग ते निर्णय घेतात. म्हणूनच आज पंचहत्तरीतसुद्धा अशोक सराफ या नावाचं गारुड, रसिकमनावर आरुढ आहे.
उद्या तुम्ही त्यांच्याकडे भारताच्या पंतप्रधानपदाची ऑफर घेऊन गेलात तर ते चेहेरा अत्यंत चिंताग्रस्त ठेवून, तुम्हाला वेड्यात काढण्याच्या हावभावात म्हणतील, ‘नको रे, कशाला? कोण जाणार त्या दिल्लीला? कोण ते देशाचे प्रॉब्लेम सोडवत बसणार? कोण त्या विरोधी पक्षांच्या लोकांना कंट्रोल करणार?… नकोच ते, ते आपलं काम नाही, आपलं हे बरं.. नाटक सिनेमा, कॅमेरा, नाटकाचे पडदे आणि आपल्यावर गेली पन्नास वर्षे प्रेम करणारा आपला रसिक प्रेक्षक.’
केवळ काम, काम, आणि काम, तेही नाटक, सिनेमा आणि मालिका या माध्यमांना वाहून घेतलेल्या, आपल्या कारकीर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या आणि त्यातच पंचाहत्तरी गाठून झंझावाती प्रवास सुरू ठेवणार्‍या, या नटश्रेष्ठ दिग्गजाला, साष्टांग नमस्कार..
ऐसा ‘शंभर नंबरी सराफ’ होणे नाही..

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

नव्या व्यावसायिकांसाठी भरारी!

Next Post

नव्या व्यावसायिकांसाठी भरारी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.