कथन करताना ते शिवकालात घेऊन जात. जणू या गावचेच नाहीत, असे वाटे. शिवाजी महाराजांचा एखादा सरदार आपल्याला त्या वास्तू दाखवतोय, असा भास होत होता. महाराजांच्या पुतळ्याचे वर्णन करताना ते इतके तल्लीन होत, शब्दकथन इतके भारदस्त असे की वाटे, महाराज सजीव होऊन आपल्याशी बोलतील. एवढा अफाट गडपरिसर पण त्यांनी प्रत्येक इंचाइंचाने वर्णन करून आमच्यापुढे प्रत्यक्ष तो काळ उभा केला. बाबासाहेबांना गडावर पाहून इतर अनेक हौशी मंडळी आमच्यामध्ये समाविष्ट झाली. तास-दोन तास तोच जथ्था गडभर फिरत होता.
– – –
बाबासाहेब पुरंदरेंना जाऊन आता सहा महिने झालेत… हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेबांइतकं निस्सीम प्रेम कुणीही केलेले नसावे. इतिहास अभ्यासकांची चांगली फळी म्हणजे सेतुमाधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गो. नी. दांडेकर, दत्तो वामन पोतदार, य. न. केळकर आदी. भूतकाळातल्या अंधारलेल्या गुहेतून या लोकांनी मिणमिणत्या पणत्या घेऊन इतिहासातली अनेक स्थाने आपल्या पिढीसाठी शोधून ठेवलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी तर शिवाजी महाराजांवर राजा शिवछत्रपतीसारखे इतकं सुंदर पुस्तक लिहिलंय. त्यात दीनानाथ दलालांसारख्या नामवंत चित्रकारांची रेखाटने म्हणजे सोने पे सुहागा. लाखो लोकांनी हे चरित्र अनेकदा वाचून काढले आहे. सोपी सुटसुटीत भाषा… इतकी सहज आणि प्रसंगी नर्मविनोदाची झालर असलेली की वाचणाराला महाराज आपले कुणीतरी थोरले आजोबाच आहेत असे वाटावे. आग्य्राहून सुटकेच्या प्रसंगात बाबासाहेब म्हणतात, अनेक जण शत्रूच्या हातावर तुरी देऊन पळतात. पण औरंगजेबाच्या हातावर मिठाई देऊन पळणारे महाराज हे एकमेव.
बाबासाहेबांनी अनेक व्याख्याने दिली. ‘जाणता राजा’सारखे भव्य प्रयोगही हजारो लोकांना दाखवले. शिवाजी महाराजांची ठाम व्यक्तिरेखा हजारो-लाखो मराठी माणसांच्या मनावर ठसवली. एकेका शहरात त्यांची आठ ते दहा दिवसांची शिवचरित्रावरील व्याख्याने होत.
एके वर्षी पुण्यात बालगंधर्वमध्ये व्याख्यानमाला सुरू होती. ऑडिटोरियम खचाखच भरलेला होता. पहिल्या लायनीत नामवंत साहित्यिक द. मा. मिरासदार यांची कन्या, तीन-चार वर्षं वय असलेल्या छोट्या मुलीसह बसली होती. बाबासाहेब शिवाजी महाराजांची जन्मकथा रंगवून सांगत होते. वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते. लहान मुलगी कंटाळून गेली आणि ती कुरकुरत बडबड करू लागली. श्रोत्यांनी शुक् शुक् करायला सुरुवात केली, मुलीला बाहेर न्या म्हटले. आईनेही मुलीला चूप बस म्हणून दटावून पाहिले, पण मुलगी आणखीच चिडली आणि स्टेजकडे बोट दाखवून म्हणाली, ‘ते आजोबा केव्हाची बडबड करत आहेत, त्यांना कोणी काही म्हणत नाही आणि मलाच गप्प बस गप्प बस म्हणतायेत.’ बाबासाहेब अवाक् झाले. जवळचे श्रोते आणि बाबासाहेब हसू लागले.
इतरांचे माहीत नाही, पण मंगेशकर कुटुंबीयांकडे बाबासाहेब व गो. नी. दांडेकरांचे नेहमी जाणे येणे असे, बरेचदा मुक्कामही असे. आशाताई आणि लता दीदी भाषणात नेहमी तसा उल्लेख करीत. १९८८ साली डिसेंबरात आम्ही, बाबासाहेब, त्यांचे आठ ते दहा तरणेबांड ट्रेकर शिष्य, आमच्यासारखे काही, पोलीस अधिकारी अरविंद इनामदार यांचे मित्र, अजय पोहनकर, श्रीनिवास खळे असे सारे रायगडावर गेलो होतो. दोन दिवस तिथे राहिलो. बाबांनी गडकिल्ल्याची इत्यंभूत माहिती सांगितली. दरबारी, महाराज कोठे बसत ती दालने दाखविली. कडेलोट कडा, बाजारपेठ दाखवली. कथन करताना ते शिवकालात घेऊन जात. जणू या गावचेच नाहीत असे वाटे. शिवाजी महाराजांचा एखादा सरदार आपल्याला त्या वास्तू दाखवतोय, असा भास होत होता. महाराजांच्या पुतळ्याचे वर्णन करताना ते इतके तल्लीन होत, शब्दकथन इतके भारदस्त असे की वाटे, महाराज सजीव होऊन आपल्याशी बोलतील. एवढा अफाट गडपरिसर पण त्यांनी प्रत्येक इंचाइंचाने वर्णन करून आमच्यापुढे प्रत्यक्ष तो काळ उभा केला. बाबासाहेबांना गडावर पाहून इतर अनेक हौशी मंडळी आमच्यामध्ये समाविष्ट झाली. तास-दोन तास तोच जथ्था गडभर फिरत होता.
एके ठिकाणी महाराजांचा आवडता कुत्रा वाघ्या याचा पुतळा असलेला उंच स्तंभ दिसला. बाबा त्याची माहिती सांगू लागले. महाराज निधन पावले, तेव्हा त्यांचा आवडता कुत्रा जवळ होता. महाराजांना चितेवर ठेवले असताना चिता भडकली, तसा वियोग अनावर होऊन वाघ्याने चितेत उडी घेतली, अशी कथा सांगतात. एका दगडावर बसून बाबा कथा सांगू लागले. समोर पाचपन्नास मंडळी एकटक पाहात ऐकू लागली.
महाराजांच्या छत्रीसमोर वाघ्याची समाधी असावी, असे काही लोकांना जुन्या काळात वाटले होते. त्यांनी एक समिती स्थापन केली. त्यात लोकमान्य टिळकही होते. मात्र, समाधी बनवण्यासाठी समितीकडे पैसा नव्हता. त्यासाठी तीन एक हजार रुपये खर्च येणार होता. त्यासाठी एका संस्थानिकांना गळ घालण्यात आली. संस्थानिक तयार झाले आणि त्यांनी समितीला भेटीस बोलविले. ठरल्या दिवशी टिळकांनी न. चिं. केळकर आणि बाबासाहेब खापर्डे यांना समितीतर्फे संस्थानिकांकडे पाठविले. ते संस्थानात गेले, तेथे पंत सचिवांची आणि त्यांची भेट झाली. पंत सचिव म्हणाले, ‘महाराजांना सुतक आहे, ते आठ-दहा दिवस तुम्हाला भेटू शकणार नाहीत.’ केळकर-खापर्डे चक्रावले व त्यांनी गंभीरपणे विचारले, महाराजांच्या कुटुंबातले कुणी निर्वतलेय का? पंत सचिव म्हणाले, कुटुंबीयापेक्षाही जवळची त्यांची अनेक कुत्री आहेत. त्यापैकी एक कुत्रा काल वारला. महाराज त्या दुःखात आकंठ बुडालले आहेत. कुत्र्याचेही सुतक असते हे ऐकून केळकर अवाक् झाले. त्यांनी पंत सचिवांना म्हटले की, ‘ तिथे समाधीचे काम अडले आहे, आमचा फक्त निरोप तरी द्या!’ पंत सचिव समजूतदार होते. त्यांनी सांगितल्यावर महाराज भेटीला कबूल झाले. केळकर-खापर्डे महाराजांना भेटायला गेले. महाराजांनी दुःखाने अंथरूण धरले होते, दाढी वाढली होती. महाराज उभयतांना म्हणाले, ‘सुतककाळामध्ये आर्थिक व्यवहार बंद असतात, त्यामुळे आपण नंतर कधीतरी यावे.’ खंड्या कुत्र्याच्या समाधीचे काम कसे चालले आहे, हे त्या दोघांनी समजावून सांगितले. महाराज म्हणाले, ‘ठीक आहे चला. एका प्रशस्त मोठ्या हॉलमध्ये महाराज त्यांना घेऊन गेले. तेथे कुत्र्यांचे अनेक पुतळे तयार केलेले होते. महाराज म्हणाले, ‘समाधीपेक्षा असा एखादा पुतळाच बसवला, तर ते उचित ठरेल. ‘केळकर-खापर्डेंना ते पटले. महाराजांचा पर्याय स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता. तेथून एक वाघ्याशी मिळताजुळता पुतळा निवडून रायगडावर आणण्यात आला, ही कहाणी त्यांनी अगदी रंगवून सांगितली.
संध्याकाळचे जेवण बाबांनी एका कुणब्याच्या घरी सांगितले होते. बाबासाहेब व आम्ही आठ दहा जण होतो. गडाच्या कोपर्यावर पाच-सहा कुणब्यांच्या शाकारलेल्या झोपड्या होत्या. सारवलेल्या जमिनीवर आम्ही जेवायला बसलो. पितळेची ताटे, पितळेचे तांबे पुढे ठेवण्यात आले. कांदा झुणका आणि ज्वारीची गरमागरम भाकर वाटण्यात आली. एक दोन बायका छोट्याशा कोपर्यात चुलीवर भाकरी थापत होत्या. झुणका झणझणीत होता, तोंड भाजत होते.
जराशाने पितळेच्या ग्लासामध्ये पातळ ताक वाढण्यात आले. तोंड भाजलेले असल्याने ते अमृततुल्य वाटले. जेवण झाल्यावर सगळे ओसरीवर येऊन बसले. बाबांनी सुरस कथा सांगायला सुरुवात केली. बाबांच्या मावळ्यांपैकी एकाने घरून गुलाबजाम आणले होते. तो डबा काढला. प्रत्येकाला द्रोणात वाढण्यात आले. जरा वेळ सगळेच खुश झाले, कारण तोंड भाजले होते. गुलाबजाम हा पदार्थ शहाण्या बाईने कधी घरी करू नये. गुलाबजाम आणणार्याने बाबांना विचारले, ‘बाबा, कसे वाटले गुलाबजामुन?’
बाबा तसे बरेच समंजस, ते म्हणाले, बेटा, सूनबाईने केले असतील तर फारच छान… हलवायाकडून आणले असतील तर गेल्यावर त्याच्या पार्श्वावर…
‘जाणता राजा’चा प्रयोग छोटा गावात होता. प्रयोगासाठी दोन-अडीचशे माणसे लागत. म्हणून कार्यक्रम असेल तेथील बायकापुरुषांना काम करायची संधी मिळे. त्यामुळे मंडळी एकदम खूष असत. काही सरदार काही मावळे व शिपाई बनत. बायका राजघराण्यातल्या असल्याने नटून थटून भाग घेत. एका प्रसंगात गावातील जिजाऊ, सुना, घरातल्या मुली होत्या. त्यांना स्टेजवर बोलवण्यात आले. सुना व मुली आल्या. जिजाऊ आल्या नाहीत. कारण विचारलं तर कळलं की जिजाऊ रागावल्यात, सुनेने त्यांची पैठणी व दागिने स्वतः घातले होते म्हणून. कशीबशी समजूत घालण्यात आली. सासूबाईंना दुसरी उंची साडी दिली गेली. तरीही खर्या दागिन्यांसाठी त्या हटून बसल्या. खोटे दागिने मी वापरणार नाही, म्हणाल्या. बाबासाहेब गमतीने म्हणाले, प्रयोगाच्या वेळी असे खूप किस्से सांगता येतील. ‘जाणता राजा’च्या निमित्ताने खूप अनुभव आलेत.
दुसर्या दिवशी पहाटे पहाटे शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच्या पटांगणात पंडित अजय पोहनकर यांचे गाणे झाले. गडावरच्या रसिकांनी मोठी दाद दिली. मोठा जमाव जमला होता. आयुष्यभर गडकिल्ल्यावर पायपीट, सोबत अन्न-पाणी असेलच, असे नाही. म्हटलं तर भणंग आयुष्य, म्हटलं तर शिवरायांचा शोध घेण्यासाठी आयुष्यभर चाललेली धडपड. कुणासाठी? तुमच्या-आमच्या मुलाबाळांसाठी समाजाच्या संस्कारासाठी. महाराष्ट्राची इतिहासाची पाने समृद्ध करण्यासाठी.
सहज गमतीचा किस्सा म्हणून वाचा, त्याला ‘खरे-खोटे’ ची फुटपट्टी मात्र लावू नका. ग. दि. माडगूळकर ज्यावेळी कथाकथन करीत त्यावेळी घोड्याची एक गोष्ट सांगत, असे मी ऐकून आहे. त्यांचा एक नमुनेदार किस्सा.
मुंबईत पूर्वी बग्गी होती, तिला चार चार घोडे असत. मात्र बग्गी गेली आणि घोडे-बग्गीवाले पोरके झाले. त्यातला एक बग्गीवाला रमेश मंत्री या लेखकसाहेबांकडे आला आणि म्हणाला, साहेब, माझ्याकडे चार घोडे विकणे आहेत. आपणास हवेत का? फक्त दोनशे रुपयांत. मंत्री म्हणाले, मला स्कूटर लावायला जागा नाही, हे चार घोडे ठेवून कुठे? गयावया करीत तो म्हणाला, साहेब, अरबी घोडे आहेत. इतर कुणाला विचारून पाहा ना. मुंबई व पुण्याच्या साहित्यिकांत तशी कायमची खुन्नस. श्रेष्ठत्वाचा वाद, दुसरं काय? मंत्रींनी पुण्याच्या श्री. ज. जोशींना फोन लावला आणि म्हणाले, जोशी, माझ्याकडे चार चांगले अरबी घोडे विकणे आहे, फक्त हजार रुपयात. कोणाला हवे असेल तर सांगा. जोशी म्हणाले, मीच घेतो. हजार रुपये संध्याकाळी मिळतील, मात्र घोडे उद्या मिळायला हवेत. मंत्री खुश झाले. यानिमित्ताने पुणेकर किती मूर्ख आहेत हे गावभर सांगायची सोय झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संध्याकाळी एका माणसाच्या हाती मंत्र्यांना हजार रुपये मिळाले. बग्गीवाल्याला बोलावून ते म्हणाले, हे तुझे दोनशे रुपये आणि शंभर रुपये तुला घोडे पुण्याला पाठविण्यासाठी. मात्र व्यवस्थित पोहोचव. बग्गीवाल्याने ट्रकमध्ये पाठवून दिले. मंत्रींना भेटून म्हणाला, ‘साहेब एक फक्त अडचण होती. चारही घोडे मेलेले होते, हे मात्र पार्टीला कळवा. रमेश मंत्रींना घाम फुटला. ते चिडून म्हणाले, मला फसवतोस! शरम वाटायला हवी. तो म्हणाला, साहेब, मी ऑफर दिली, तेव्हा तुम्हाला लक्षात यायला हवे होते. एवढ्या महागाईत चार घोडे दोनशे रुपयांत कसे मिळतील? मेलेले असले तरी अरबी होते हे विसरू नका. मंत्रींना या व्यवहारात सातशे रुपये फायदा झाला होता, पण जोशी आपणास जिवंत ठेवणार नाहीत हे नक्की झाले होते. दुसर्या दिवशी, तिसर्या दिवशी जोशींच्या फोनची ते वाट पाहत राहिले. फोन आला नाही. मंत्री घाबरले, त्यांना वाटले जोशी नक्कीच केस टाकणार. त्यांनी जोशींना पुण्याला फोन लावला. जोशी आनंदात बोलत होते. घोड्यांविषयी त्यांनी ब्र काढला नाही. मंत्रींनीच त्यांना न राहावून विचारले, घोडे मिळालेत का? कसे आहेत? सुस्थितीत होते ना? हो, थोडे मेलेले होते, पण त्यात विशेष काही नाही, जोशी पलीकडून बोलले. मंत्री चाट झाले. थोडं थांबून जोशी म्हणाले रमेश मंत्री, तुम्ही मुंबईकर स्वतःला फार शहाणे तद्वत बुद्धिमान समजता, पण गाठ पुणेकराशी आहे हे विसरलात. मंत्री म्हणाले, सॉरी जोशी बुवा, पण त्या घोड्यांचं तुम्ही केलं तरी काय? घोडे आल्याची रिसीट मला मिळाली. त्यात लिहिलेले होते, ‘चार घोडे मेलेले.’ मी शांत बसलो. काल संध्याकाळी साहित्य संघात आमची मीटिंग होती. दहा जण आले होते, त्यांना मी सांगितले, ‘माझ्याकडे चार घोडे विकणे आहेत कुणाला हवेत?’ प्रत्येक जण मागू लागला, म्हटले, असे करू नका प्रत्येकी हजार रुपये द्या. आपण चिठ्ठ्या टाकू. त्यातली एक काढू. ज्याची असेल त्याने घोडे घेऊन जावे. दहा हजार रुपये जमा झाले. बाबासाहेब पुरंदरे यांचे नावाची चिठ्ठी निघाली. दुसरे दिवशी त्यांचा फोन आला संतापून बोलत होते. ‘मेलेले घोडे तुम्ही माझ्या पदरी घातलेत. पुणेकरांना फसवताना शरम वाटायला हवी.’ मी म्हटले, ‘बाबासाहेब आता आपणास काय हवे?’ मला माझे हजार रुपये परत हवेत. बाबासाहेब उद्गारले. मी माझ्या नोकराहाती त्यांना त्यांचे हजार रुपये पोचते केले. दहा हजार जमा झाले होते. त्यांना आणि तुम्हाला प्रत्येकी हजार देऊन आठ हजार उरलेत. पुणेकराशी डोके लावताना यापुढे चार वेळा विचार करा.