पूर्वी राजकीय नेत्यांच्या डोक्यावर हमखास दिसणारी टोपी हल्ली जवळपास गायब झाली आहे. सध्याच्या महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या डोक्यावर मात्र ही टोपी दिसते. मागच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते ते हरिभाऊ बागडे यांच्या डोक्यावर मात्र टोपी दिसायची.
पूर्वी यशवंतराव चव्हाण यांच्या डोक्यावर असणारी तिरकी टोपी चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्त्व खुलवून टाकायची. १९७४ साली शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शंकररावांच्या डोक्यावर अगदी सरळ आणि मध्यभागी काहीशी फुगीर स्वरुपाची टोपी पाहायला मिळायची. कडक शिस्तीच्या शंकररावांना ही टोपी भलतीच शोभून दिसायची. धोतर, कुडता, जाकीट आणि डोक्यावर टोपी अशा वेशातील शंकररावांना हेडमास्तर म्हणूनच राजकीय जीवनात ओळखायचे. पंडित नेहरूंच्या डोक्यावरही सरळ पण काहीशी तिरकी टोपी पहायला मिळायची.
मंत्रालयात आमदार निवासाच्या परिसरात कोणी तिरका टोपीवाला दिसला की, ‘आज बापू टोपी घातली आहेस?’ असे विचारले जायचे. डोक्यावर गांधी टोपी असे वर्णन नेहमी ऐकायला मिळते, पण स्वतः गांधीजींनी मात्र कधीही टोपी घातली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील हे मुळातच अत्यंत देखणे नेते होते. त्यांच्या डोक्यावर असणार्या तिरक्या टोपीने ते अधिकच सुंदर दिसायचे.
वसंतदादांचे सरकार पाडताना शरद पवार यांना ज्यांनी साथ दिली त्या सुंदरराव सोळंके यांच्या डोक्यावरही छान पण काहीशी तिरकी टोपी दिसायची. हल्ली मात्र शक्यतो कुठल्याही नेत्याच्या डोक्यावर टोपी दिसत नाही. शरद पवार, अजित पवार असोत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत, हे सर्व नेते टोपीपासून काही हात लांब असतात, फक्त झेंडावंदनाच्या वेळी मात्र हमखास टोपी परिधान केली जाते. प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री नियुक्त केलेला असतो. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी जिल्ह्यात झेंडावंदन केले जायचे त्यावेळी त्यांना टोपी घालूनच झेंडावंदन करावे लागायचे आणि ही प्रथा अनेक ठिकाणी अगदी आजही पाहायला मिळते.
काही काळापूर्वी शिक्षकांच्या विशेषतः प्राथमिक शिक्षकांच्या डोक्यावर टोपी दिसायची. शाळेतील मुलांच्या गणवेशातही पूर्वी ग्रामीण भागात आवर्जून टोपीचा समावेश असायचा, पण हल्ली शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही टोपीला फाटा दिल्याचे जाणवते. १९७२ साली सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या भगवानराव पाटील यांच्या डोक्यावरील टोपी त्यांना इतकी शोभून दिसायची की भगवानरावांचा विधानसभेत प्रवेश झाला की त्यांच्या टोपीचीच चर्चा काही काळ ऐकायला मिळायची.
वसंतदादा पाटील मातब्बर नेते होते, पण त्यांनी कधीही टोपी परिधान केलेली पहायला मिळाली नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई अत्यंत कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अत्यंत कडक अशी गांधी टोपी त्यांच्या डोक्यावर पाहायला मिळायची. ज्यांनी काही काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले त्या सीताराम केसरी यांच्या डोक्यावरही टोपी पहायला मिळायची. सध्या महाराष्ट्राचे राज्यपालपद जे भूषवित आहेत त्यांच्या डोक्यावरही एक विशेष प्रकारची काळी टोपी पाहायला मिळते. त्या टोपीच्या दोन्ही बाजू काहीशा कडक असतात.
काँग्रेस पक्षाच्या संस्थापकांपैकी एक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या लोकमान्य टिळकांच्या डोक्यावर मात्र टोपी ऐवजी पुणेरी पगडी विराजमान असायची. काँग्रेसचे अध्यक्षपद ज्यांनी बराच काळ भूषविले ते नेताजी सुभाषचंद्र बोस हेही हमखास टोपी परिधान करायचे. महाराष्ट्र विधानसभेत काही वर्षांपूर्वी न चुकता कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातर्पेâ निवडून येणारे त्र्यंबक सीताराम कारखानीस हे कायम टोपी परिधान करायचे. नंतर त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हल्ली मात्र सणसमारंभ आणि काही धार्मिक विधींच्या प्रसंगीच टोपीचे महत्त्व उरले आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण ओवाळते, तेव्हा भावाच्या डोक्यावर टोपी पहायला मिळते. विवाहप्रसंगी वराच्या डोक्यावरही टोपी घालण्याची प्रथा ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला, त्या अत्यंत भावुक क्षणी दोघाही नेत्यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. शिरोभूषण म्हणून जिची सर्वदूर ओळख आहे ती टोपी मात्र आता काळाच्या ओघात नामशेष होऊ लागली आहे. सणसमारंभ आणि झेंडावंदन एवढ्यापुरतेच तिचे महत्त्व आता उरले आहे. टोपीला तिचे वैभवाचे दिवस परत कधी मिळणार? हा संशोधनाचाच विषय ठरावा.
शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द प्रणवदा पाळतात तेव्हा…
२०१२ ते २०१७ या काळात काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी घोषित झाली तेव्हा त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. शिवसेनेकडेही तेव्हा राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा हक्क असणारी अनेक मते होती. सहाजिकच प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनेची मतेही आपल्याला मिळायला हवीत या भावनेने आणि प्रचाराचा एक भाग म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुखर्जी यांच्यापूर्वी प्रतिभा पाटील या मराठमोळ्या नेत्या राष्ट्रपतीपदावर होत्या. राष्ट्रपती म्हणून त्यांचे काम फारसे स्पृहणीय नव्हते. ज्यांना फाशीची शिक्षा झाली आहे आणि ज्यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनीही फेटाळला आहे, अशा गुन्हेगारांना, किमान देशद्रोह्यांना तरी फाशीची शिक्षा अंमलात आणायला हवी, अशी शिवसेनाप्रमुखांची मनोमन इच्छा होती. पण प्रतिभा पाटील यांनी त्या बाबतीत काहीही केले नाही. हीच गोष्ट बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जी यांच्या कानावर घातली आणि २००२ साली ज्याने संसदभवनावर हल्ला करण्याचा कट रचला त्या देशद्रोही अफजल गुरूला आणि मुंबईवर हल्ला करून अनेक निष्पापांचे बळी घेणार्या पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला तरी फासावर लटकवा. ही गोष्ट तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच ती पूर्ण करू शकता, अशा अत्यंत सडेतोड शब्दांत बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जी यांच्याकडे मागणी केली.
त्यावर तुमच्या मागणीचा मी जरूर विचार करेन असा असे आश्वासन प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना देताच शिवसेनेची सर्व मते तुम्हालाच मिळतील अशी व्यवस्था मी करतो असा शब्द बाळासाहेबांनी मुखर्जी यांना दिला. बाळासाहेबांच्या मागणीत तथ्य आहे हे प्रणव मुखर्जी यांनाही जाणवले आणि त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय मनोमन घेतला. राष्ट्रपती म्हणून स्थिरस्थावर झाल्यानंतर एक दिवशी प्रणव मुखर्जी यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अत्यंत गुप्तपणे भेट घेऊन अजमल कसाबच्या फाशीची शिक्षा अंमलात आणण्याचे ठरवले. कसाब तेव्हा आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि महाराष्ट्राच्या तुरुंग अधीक्षक असलेल्या मीरा बोरवणकर यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्व सूत्रे हलवून कसाब याला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून अत्यंत कडक बंदोबस्तात पुण्याच्या येरवडा कारागृहात हलविण्याची व्यवस्था केली आणि तिथेच त्याला फासावर लटकवण्यात आले. अफजल गुरू याला तिहार कारागृहात तर अजमल कसाब याला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आले. दोन अत्यंत खतरनाक दहशतवाद्यांना कायमचे संपून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखवला.