मार्मिकच्या स्तंभलेखिका आणि प्रसिद्ध विनोदी लेखिका सई लळीत यांच्या ‘तेरा त्रिक एकोणचाळीस’ या बालकथासंग्रहातील एक कथा…
– – –
‘नको रे बाबा, तुमची मुंबय! तुमची मुंबय तुमकाच लखलाभ. ह्या जन्मात परत येवक झेपात असा काय वाटना नाय.’
हे वाक्य दरवेळी म्हणत माझी गावाकडची आजी आमच्या घरात पाऊल टाकते. ही माझ्या बाबांची काकी. गोरी सडसडीत कुरळ्या केसांची आजी चित्रातल्या आजीसारखी दिसते. नऊवारी साडी नेसणारी ही माझी फक्त एक आजी आहे.
मशेरी लावून बरी गोडशी चाय प्याली की ती बरोबर आणलेलं मोठ्ठ गाठोडं उघडते. मी याच क्षणाची ती आल्यापासून वाट बघत असतो. त्यावेळी बाबा पण माझ्या बाजूला मांडी ठोकून बसतात आणि किचनमधल्या आईचं सगळं लक्ष बाहेरच असतं.
काजूगरांची पुडी ती माझ्या हातात ठेवते. बाबांच्या हातात खडखडे लाडू, शेंगदाणा लाडू, खोबर्याची कापं, असं काही बाही ठेवते. मग पांढरे शुभ्र पाच नारळ बाहेर काढून म्हणते, ‘हे रसाचे आसत. मोदक करा, सोलकडी करा, खीर करा. काल येताना चकण्या बाबूकडून उतरवून घेतलंय.’
‘गे सुने’ आई लगबगीने बाहेर येते. सासू येणार म्हणून आई साडी नेसून मोठ्ठं कुंकू लावते.
ही तुका भेट. हो आबुलेचो वळेसार, ही ओवळा, ओवळा म्हणजे तुझ्या भाषेत बकुळा. ही सोनचाफी, ही माली.. ओल्या कपड्यात गुटाळून आणलंय म्हणान ताजी टवटवीत रवली. तुका वासाची फुला आवाडतत ना? माळ होई तितकी..
घे हे शंभर ओले काजूगर आसत. कल येता येता त्या हातमोडकीनं हाडून दिल्यान. जाताना तिका माहीमचो हलवो व्हराक होयो. हिरवी वायंगी, ओली मिर्ची, ओले गर, ओला खोबरा टाकून भाजी कर. माझ्या ह्या झिलाक खूप आवडतत, ती बाबांकडे प्रेमाने बघून म्हणते.
बाबांचं आधी असंय.. त्यांना कोण ओरडलं भांडलं तर रडू नाय येत. कोण मायेनं बोललं की डोळे भरतात. सगळ्यांना वस्तू देताना आजी मऊ हसत असते.
मग आजीच्या गजाली सुरु होतात. गेंगाळो, भेरो, मोनो, दातपडको, टकलो, समजाबाळु, काळो किरीष्णा, बटाटो, हातमोडकी, चाकरमानीण, वळेसारीण, पुष्पगुच्छ, डोळेफुटकी.., उलट्या काळजाची अशी नांव तिच्या तोंडून परत परत ऐकू येतात. त्या प्रत्येक नावामागे एक गमतीशीर कथा आहे. त्या गोष्टी लाईट काढून अंथरुणावर लोळत ऐकायला खूप मजा येते.
आजी आली की घरातला टीव्ही बंद होतो. बाबा सारखे काही ना काही तिला विचारत असतात. तिच्या लहानपणीच्या गोष्टी विचारतात. गावात कोण खपलं विचारतात. त्यांच्या आठवणी काढतात. आजोबांच्या आठवणीने डोळ्यातून पाणी काढतात. बाबा घरात लहान मुलासारखे बडबडत असतात.
खाली डोकं आणि वर पाय करायचं फक्त बाकी आहे… आई हळूच पुटपुटते.
आजी आली की तिने आणलेल्या कच्च्या फणसाची भाजी करणं हा एक मोठ्ठा बोवाळ असतो. लगेच भाजी करायची असेल तर बाबा दुपारनंतर हाफ डे घेवून घरी येतात. ऑफीसमधे काय कारण सांगतात कोण जाणे. चहा झाला की फणस फोडायला घेतात.
दारातल्या फणसाचो फणस आसा बाये.. कौतुकाचो.. आई विळी, खोबर्याचं तेल देताना पुटपुटते. खोबर्याचं तेल हाताला लावलं की फणसाचा डिक चिकटत नाही. बाबा एका घावात फणस फोडून आईकडे बघतात.
एक घाव दोन तुकडे.. टाळ्ये वाजवा आता सगळ्यांनी.. फणसाचा उद्घाटन झालेला आस, आई प्रसन्न हसत म्हणते.
खोलीभर पांढर्या शुभ्र फणसाच्या भेशींचा पसारा असतो. कच्च्या फणसाचा कच्चा दरवळ सगळीकडे पसरतो. शेजारच्या केरकर वैनी, पपी, राणी, सुर्वे आजी सगळीच मदतीला येतात. घे गजाली रंगतात.
माझा लगीन झाला तेवा आमच्याकडे रोज फणसाची शाक आणि पेजच असायची. गरीबी खूप त्या टायमाक… आजी विषयाला सुरवात करते.
बोलता बोलता गर्याच्या पाती काढून गरे फोडून भाजीचा आणि गोष्टींचाही डोंगर तयार होतो. आई एका बाजूला फणसाच्या घोटया दगडाने फोडून सोलत असते आणि सोलून झाल्या की वेगळ्या शिजत ठेवते. ती नेहमीच असं स्वतंत्र खातं घेते. मला घरात खूप छान सण असल्यासारखं वाटतं.. वाटतं घरात रोज फणसाची भाजी व्हायला हवी.
थोडे गरे बाजुक ठेव. नातवाक गरे तळून वेफर करूया. इसारशीत तर बघतंय तुका.. आजी आईला बजावते. आईला हे दटावणं, ओरडणं सगळं खूप आवडतं.
मग संध्याकाळी फणसाची तिखट भाजी आणि चहा असा कार्यक्रम होतो.
ही भाजी चांदीवड्याच्या पानावर खावक होई… बाबा दरवर्षी हे वाक्य म्हणणारच…
आई शेजार्यांना घरी न्यायला पण डबे भरून भाजी देते.
मस्त झाली शाक, आजी आईला कौतुकाने म्हणते.
फणस पण बरो होतो ताजो.. म्हणान जमली, बाबा एक डोळा बारीक करत म्हणतात.
रात्री मी अभ्यास करताना आजी माझ्याजवळ येवून बसते.
‘तू आमच्या घराण्याचा नाव काढतलस. माका तुझ्याबद्दल ग्यारंटी आसा. मी सगळयांका सांगतंय माजो नातू सोन्यासारखे आसा. तुझ्या रुपान आमचे हेच परत इलेले आसत.’
ती मला जवळ ओढून डोक्यावरुन हात फिरवते. आलाबला घेते तेव्हा बोक्यासारखा गुरगुर असा आवाज करत मला बसून राहावंसं वाटतं.
असं गाव आणि अशी गावाकडची आजी खरंच प्रत्येकाला हवी. म्हणजे आपणाला मांजरासारखी ऐश करता येते.