हे दोघेही सराईत गुन्हेगार नव्हते, हे उघड होतं. सराईत असते, तर कदाचित त्या मुलीवर आणखी बिकट प्रसंग ओढवला असता. त्यांची पोलिस दफ्तरी नोंद असणं अवघड होतं. मागे बसलेल्या माणसाच्या वर्णनावरून त्याला शोधणं अवघड होतं. त्यापेक्षा रिक्षाचं वर्णन, रिक्षा चालवणार्याचे तपशील, यावरून काही शोध लागण्याची शक्यता वाघमारेंना वाटत होती.
– – –
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या विनयभंगाच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिस यंत्रणेवरही ताण आला होता. कॉलेजमधून घरी निघालेली ही मुलगी थोड्याशा कमी वस्ती असलेल्या भागात आल्यावर तिचा पाठलाग करत असलेली एक रिक्षा तिच्यापाशी थांबली. मागे बसलेला माणूस उतरला, त्याने तिला आत ओढून घेतलं आणि रिक्षा सुरू झाली. खरंतर तिला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचाच या नराधमांचा इरादा दिसत होता, मात्र तिने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला, सुटण्यासाठी धडपड केली. एका क्षणी त्या माणसाच्या हाताला चावा घेऊन तिने धावत्या रिक्षातून बाहेर उडी मारली आणि सुसाट पळत सुटली. तिचा पाठलाग करणं काही त्या रिक्षाला शक्य झालं नाही, त्यामुळे तिच्यावरचं पुढचं संकट टळलं. खचून गेलेली ती मुलगी आईवडिलांसह पोलिस स्टेशनला आली, तेव्हा इन्स्पेक्टर वाघमारे तिथेच हजर होते. त्यांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं, तिच्या आईवडिलांनीही समोर येऊन तक्रार करण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचीही प्रशंसा केली आणि गुन्हेगारांचा छडा नक्की लावू, असं आश्वासन दिलं.
संकटात सापडलेल्या या मुलीचं प्रसंगावधान एवढं होतं की तिनं स्वतःची सुटका तर करून घेतलीच, पण तिला ज्या रिक्षात कोंबण्यात आलं, त्याचं नीट निरीक्षणही केलं. रिक्षा थोडीशी जुनीच असावी. स्वच्छ असली, तरी फार सजावट नव्हती. सीट थोडीशी फाटलेली होती, टायरही बर्यापैकी झिजलेले वाटत होते. मागच्या बाजूला साईबाबांचा फोटो होता, त्याखाली ओम साई असं लिहिलेलं होतं. रिक्षाचा नंबर मात्र तिला त्या धावपळीत टिपता आला नव्हता.
“हरकत नाही, तू मोठं धाडस दाखवलंस. तू सांगितलेल्या वर्णनावरून आपल्याला गुन्हेगारांपर्यंत नक्की पोहोचता येईल. त्यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील, काळजी करू नको.“ वाघमारेंनी तिला आश्वस्त केलं. तिला जरा धीर आला.
विनयभंग, छेडछाड अशा घटना आधी घडल्या नव्हत्या, असं नव्हे. मात्र, शहराच्या मध्यवस्तीत, तेही दिवसाढवळ्या असा प्रकार अगदीच क्वचित घडत असे. महिलांवरच्या अत्याचारांबद्दल वाघमारेंना विशेष चीड होती. “या गुन्ह्याचा छडा लावलाच पाहिजे. समाजातून ही कीड नाहीशी करायची जबाबदारी आपली आहे!“ वाघमारेंनी सहकार्यांना सूचना केली. पोलिसांनी हे आव्हान म्हणून स्वीकारलं असलं, तरी मोहीम सोपी नव्हती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या रिक्षाचा नंबर मिळाला नव्हता. साईबाबांचा फोटो आणि ओम साई ही अक्षरं ही अगदीच ढोबळ माहिती होती. ती अनेक रिक्षांवर असू शकत होती. तरीही प्रत्येक रिक्षाची छाननी करून संशयित रिक्षांच्या चालकांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन यायची वर्दी वाघमारेंनी दिली. त्यांची टीम कामाला लागली आणि दोन दिवसांत असे बारा रिक्षाचालक पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले.
“हे बघा, एका मुलीच्या अब्रूवर हात टाकणार्या नालायक, हलकट माणसांचा आम्ही शोध घेतोय. तुम्ही ते केलं असेलच, असं मी म्हणत नाही. मात्र, तुमच्यापैकी कुणीतरी एक यात सामील असूही शकतो. आत्ताच तुम्हाला गुन्हा कबूल करायची संधी देतो. आमच्याकडे सगळे तपशील आहेत. आम्ही पुरावे दाखवायच्या आधी कबुली द्या, नाहीतर परिणामांना तोंड द्यायची तयारी ठेवा!“ वाघमारेंनी पोलिसी भाषेत सगळ्यांना दम दिला. आधीच कावरेबावरे झालेले रिक्षाचालक आता जास्तच गयावया करायला लागले.
“साहेब, आम्ही संसार, मुलंबाळं असलेली माणसं आहोत. असलं वाईट काम करणार नाही. आमच्यापैकी कुणीच कधी कुठल्या बाईच्या वाटेला जात नाही साहेब, गिर्हाईकांना तर आम्ही देवासारखी वागणूक देतो.“ सगळ्यांच्या बोलण्याचा सूर एकच होता.
“गिर्हाइकांना तुम्ही कशी वागणूक देता, हे आम्हाला सांगू नका. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी कुणी हा गुन्हा केलाय का? किंवा कुणाला गुन्हेगाराबद्दल काही माहिती आहे का? शेवटचं विचारतोय!“ वाघमारेंनी पुन्हा दम भरला.
`नाही साहेब, गरीबाला उगाच ह्यात अडकवू नका साहेब!` `आम्ही प्रामाणिकपणे धंदा करतो साहेब`, `कधी कुणाच्या वाकड्यात शिरलो नाही!` एकच गलका झाला. वाघमारेंनी सगळ्यांना समोर बोलावून कठोर पवित्रा घेतलेला असला, तरी यापैकी कुणाविरुद्धही त्यांच्याकडे ठोस पुरावा नव्हता. या बारा जणांच्या रिक्षाच्या मागे साईबाबांचे फोटो आणि अक्षरं असली, तरी त्या मुलीने दिलेले तपशील तंतोतंत जुळत नव्हते. केवळ संशयावरून या सगळ्यांना हजर करण्यात आलं होतं. वाघमारेंनी खडा टाकायचा प्रयत्न केला होता, पण तो या वेळी तरी अयशस्वी ठरला.
“शिंदे, रात्रीपर्यंत सगळ्यांना इथेच पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवा. कोण काय विरघळतोय का बघा, नाहीतर द्या सोडून! पुढचं पुढे बघू!“ त्यांनी सहकारी हवालदारांना सूचना केली. आपल्याला हवा असलेला गुन्हेगार ह्यापैकी नाही, याची त्यांना खात्री होती. त्या मुलीवर अचानक हल्ला झाला, तेव्हा ती भेदरून गेली होती. रिक्षाच्या मागे बसलेल्या माणसाने तिला धरलं होतं, त्याचा चेहराही ती नीट बघू शकली नव्हती. झटापटीत एकदोनदा नजरानजर झाली, तेवढीच. रिक्षावाला तर फक्त पुढे बघून चालवत होता. त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित तो फक्त गुन्ह्यात मुख्य गुन्हेगाराला मदत करत असावा किंवा नाईलाजाने त्याच्याबरोबर आला असावा, असा तर्क वाघमारेंनी केला. त्या मुलीशी बोलल्यावरही या तर्काला दुजोरा मिळाला. तो रिक्षावाला अधूनमधून `सोड रे, जाऊ दे, नको ह्या लफड्यात पडू,` असंही मागे बसलेल्या साथीदाराला सांगत होता, ही अतिरिक्त माहिती वाघमारेंना मिळाली.
हे दोघेही सराईत गुन्हेगार नव्हते, हे उघड होतं. सराईत असते, तर कदाचित त्या मुलीवर आणखी बिकट प्रसंग ओढवला असता. त्यांची पोलिस दफ्तरी नोंद असणं अवघड होतं. मागे बसलेल्या माणसाच्या वर्णनावरून त्याला शोधणं अवघड होतं. त्यापेक्षा रिक्षाचं वर्णन, रिक्षा चालवणार्याचे तपशील, यावरून काही शोध लागण्याची शक्यता वाघमारेंना वाटत होती.
“त्या रिक्षावाल्याबद्दल आणखी काही सांगशील का? त्याचा चेहरा, त्याच्या केसांची ठेवण, त्याची एखादी विशिष्ट खूण, असं काही आठवतंय का?“ वाघमारेंनी तिला पुन्हा विचारलं. अशा अवस्थेत तिला आपण त्रास देतोय, याची त्यांना कल्पना होती, पण नाइलाज होता. तिच्या मदतीशिवाय या गुन्ह्याचा छडा लावणं अवघड होतं.
“रिक्षाची माहिती दिलीच आहे साहेब, पण रिक्षावाल्याबद्दल….“ मुलगी बोलता बोलता विचारात हरवून गेली. तिनं आणखी आठवण्याचा प्रयत्न केला.
“काहीतरी वेगळं आठवत असेल, तरी मदत होईल,“ वाघमारे तिच्याकडून आणखी माहिती काढण्यासाठी उत्सुक होते.
“हां, साहेब. त्याच्या डोक्यावर भरपूर केस होते. त्यानं ते उलटे फिरवले होते आणि केसांतून हात फिरवायची त्याला फार सवय होती.“
हे खरंतर आधीच समजून घ्यायला हवं होतं, असं वाघमारेंना वाटलं. त्यांनी तिच्याशी झटापट करणार्या मागच्या माणसावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि रिक्षावाल्याचे तपशील घ्यायचे राहून गेले होते. आता हे वर्णन कळल्यावर त्यावरून रिक्षाचालक शोधून काढण्याची मोहीम सुरू झाली. लांब केसांचे दोन रिक्षाचालक त्या भागात व्यवसाय करतात, हे लक्षात आलं. मात्र त्यांच्या रिक्षा अगदीच वेगळ्या होत्या. त्या मुलीने वर्णन केलेली कुठलीच खूण रिक्षाला लागू होत नव्हती. पोलिसांचा तपास पुन्हा एकाच ठिकाणी येऊन थांबला.
—-
हवालदार शिंदे एके दिवशी ड्यूटीवरून लवकर घरी आले होते. आज त्यांनी कधी नव्हे ते बाहेरून काहीतरी खायला आणलं होतं आणि बायकोबरोबर गप्पा मारत छान जेवण करू, असा त्यांचा विचार होता. प्रत्यक्षात ते आले, तेव्हा त्यांची बायको घरी नव्हती. अर्ध्या तासाने ती घरी आली, ती वैतागूनच.
“काय हे रिक्षावाले? आपल्या भागात यायचं तर आधी नाही म्हणूनच सांगतात. दहा रिक्षावाल्यांना विचारल्यावर एखादा थांबतो आणि आपल्यावर उपकार केल्यासारखा इकडे यायला तयार होतो. आपण ही जागा बदलूया आता!“ तिनं आल्या आल्या कटकट सुरू केली. शिंदेंना आज मूड अजिबात खराब करायचा नव्हता. भांडायचा तर मुळीच उत्साह नव्हता.
“त्यांना सांगायचं ना, हवालदारांची बायको आहे म्हणून?“ ते म्हणाले.
“शेवटी तेच केलं, म्हणून येताना रिक्षा तरी मिळाली. नाहीतर सकाळी आपल्या इथे स्टँडवर उभा असलेला रिक्षावाला बाजारातही यायला तयार नव्हता. नुसता केसांतून हात फिरवत बसला होता झाडाला टेकून!“ ती म्हणाली आणि शिंदेंचे डोळे चमकले.
“काय म्हणालीस? केसांतून हात फिरवत होता?“
“नाहीतर काय! इथेच असतो, रस्त्यापलीकडच्या स्टँडवर. हल्ली बर्याच वेळा दिसतो. मला वाटलं, नेहमीचा आहे, तर कुठेही यायला तयार होईल, पण छे! शेवटी बसने गेले,“ ती आणखीही बरंच काही सांगणार होती, पण शिंदेंनी तिला थांबवलं. जेवणाचा विषय काढला. तो रिक्षावाला नेमका कुठे उभा असतो, कसा दिसतो, याची माहिती जेवता जेवता विचारून घेतली आणि सकाळी त्याची भेट घ्यायला जायचं निश्चित केलं.
दुसर्या दिवशी सकाळी ते स्टँडवर पोहोचले, तेव्हा त्यांना हवा असलेला तो रिक्षावाला झाडाला टेकून उभा होता. त्यांनी तात्काळ त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. त्यानंही सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली. रणजीत भांगरे असं त्याचं नाव होतं. शिंदेंनी त्याची रिक्षा तीनतीनदा तपासली, पण रिक्षाचं वर्णन त्यांच्याकडे असलेल्या वर्णनाशी अजिबात मिळतंजुळतं नव्हतं. रिक्षावाल्याबद्दल मात्र त्यांच्या मनात किंचित संशय होता. मग रिक्षाचा नेमका घोळ काय होता? त्याचं लायसन्स त्यांनी ताब्यात घेतलं. त्या मुलीनं तो चेहरा पाहून हाच तो माणूस असावा, असा अंदाज केला, पण तिलाही खात्री नव्हतीच.
“आता काय करायचं, साहेब? आपलं कुठेतरी चुकतंय का?“ शिंदेंनी वाघमारेंच्या समोर सगळे तपशील ठेवले. एखादा छोटासा धागा कुठेतरी निसटतोय. तो जोडला की बरोबर मार्ग सापडेल, याची वाघमारेंना खात्री होती. त्यांनी या रिक्षावाल्यावर बारीक नजर ठेवायची जबाबदारी एकदोघांवर दिली आणि त्याच्याविषयी जी माहिती मिळेल, ती काढायला सांगितलं.
दोनच दिवसांत त्यांना हवी ती माहिती हाताशी आली. रणजीतने अलीकडेच रिक्षाचं संपूर्ण हूड बदललं होतं. त्यासाठी पैसे नव्हते, तरी कुठून कुठून उधारी करून खर्च केला होता, हे एक दोन रिक्षावाल्यांकडून कानावर आलं आणि हरवलेला धागा जोडला गेला.
रणजीतच्या मुसक्या आवळून त्याला पोलिस स्टेशनला आणलं गेलं. त्या मुलीनं लांबूनच त्याला बघून ओळखलं. रिक्षा बघितल्यावर तर तिची खात्रीच पटली. रणजीतने रिक्षाचं हूड बदललं असलं, तरी बॉडी तीच होती. रिक्षाच्या हँडलपाशी एक सोनेरी रिंगसारखा आकार होता, हेही त्या मुलीने बघितलं आणि ओळखलं. दोन थोबाडीत दिल्यावर रणजीत पोपटासारखा बोलायला लागला.
“साहेब, मी काही केलेलं नाही, माझा एक मित्र आहे, दिनेश नावाचा, त्याला हा नाद आहे. त्याला नको नको सांगत होतो, तरी त्यानं ऐकलं नाही साहेब…! मला भरीला घालून मला ह्यात अडवकलं…मी ताईंच्या अंगाला हात पण लावला नाही साहेब…!“ तो हातापाया पडायला लागला.
“हरामखोर! गुन्हेगाराला मदत करणं हासुद्धा तेवढाच मोठा गुन्हा असतो!“ असं म्हणून वाघमारेंनी त्याला आणखी दोन लाथा घातल्या. त्याच्या गुन्हेगार मित्राला त्याच रात्री घरून उचललं गेलं. त्यानंही गुन्ह्याची कबुली देऊन टाकली.
गुन्हेगारांनी गुन्हा करून आपण कुणाच्या नजरेत येणार नाही, याचा आटोकाट प्रयत्न केला होता. रणजीतने तर त्यासाठी रिक्षाचं रंगरूप बदललं, व्यवसायाची जागाही बदलली. पण कुठलाही गुन्हा जास्त काळ लपून राहत नाही, तो कधी ना कधी उघड होतोच, याची प्रचीती त्यालाही शेवटी आलीच.