दंगल करणारे, मारणारे आणि मार खाणारे यांना मी जवळून पाहात होतो. थोड्या वेळाने त्यांना भेटून विचारपूस केली. आपल्याला कोणत्या जमातीतल्या माणसाने कशासाठी मारले हे त्यांनाही ठाऊक नव्हते.
– – –
दुधाला योग्य भाववाढ मिळत नाही म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार्या दूधविक्रेत्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून टाकलेले आपण पाहिले आहे. म्हणजे दुधाचे उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होत असावे याची कल्पना येते. अलिकडे तबेल्यातील तसेच महानंद, गोकुळसारख्या दूध उत्पादन संस्थाकडून हवे तेवढे मलईदार दूध घरपोच मिळण्याचीही सोय झाली आहे. परंतु दूध रस्त्यावर ओतून फुकट घालवणार्या आंदोलकांना हे माहीत नसावं की याच दुधासाठी लोकांना रस्त्यावर येऊन दंगल करावी लागली होती… काही वर्षांपूर्वी एक बाटली दुधासाठी पहाटे पाच वाजता किंवा दुपारी एक वाजता सरकारी दूध विक्री केंद्रावर रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत होते.
मुंबईत कामाठीपुरा येथील शासकीय दूधविक्री केंद्राबाहेर दूध मिळण्यासाठी लांब रांग लागली होती. दूधवाटप करणारी बाई विशिष्ट जमातीच्या लोकांना अधिक दूध देते असे वाटल्याने इतर जमातीच्या लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. रांगेत उभ्या लोकांनी रांग मोडून केंद्रासमोर गोंधळ घातला. सर्वांना समान दुधाचे वाटप झाले पाहिजे म्हणून जो तो हातघाईवर आलेला लोकांचा राग अनावर झाला आणि सर्व बाईच्या नावाने शिव्या घालू लागले. लोकांचा राग पाहून बाई घाबरली आणि दूध टाकून पळून गेली. जमावाने केंद्राचा ताबा घेतला आणि दुधाची मनसोक्त लुटालूट सुरू झाली. हातात मिळतील तितक्या बाटल्या घेऊन लोक पळू लागले. धावत असताना काही बाटल्या रस्त्यात पडल्या आणि फुटल्या. सर्वत्र फुटलेल्या काचांचा कचरा झाला. काही काचा लोकांच्या पायाला लागल्या आणि रक्त वाहू लागले. मग नको त्या अफवा पसरल्या आणि दगडफेकीला सुरुवात झाली.
घाबरलेल्या व्यापार्यांनी धडाधड दुकाने बंद केली. लोकांनी खिडक्या-दरवाजे लावून घेतले. रस्त्यावर रणांगणाचे स्वरूप आले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने आमच्या ऑफिसमध्ये फोन करून हिंदू मुस्लिम दंगा सुरू झाल्याची खबर दिली. मी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून परिस्थितीची माहिती करून घेतली. पोलीस म्हणाले, हिंदू मुस्लिम दंगा नाही, पण दोन गटांत तुंबळ हाणामारी चालू आहे. तेथे तणाव वाढला असल्यामुळे पोलिसांची जादा कुमक पाठविण्यात आली आहे.
मी स्कुटर घेऊन अलेक्झांड्रा थिएटरपाशी गेलो, जिथून कामाठीपुराच्या अनेक गल्ल्या सुरू होतात. रस्त्यावर सन्नाटा पसरला होता. एरवी इथे नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. बायांचा बाजार भरत असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी वाहनचालक संथगतीने गाड्या चालवतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. आज रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हते. सर्व `पशुपक्षी’ आपापल्या पिंजर्यात गेले होते.
खांद्यावर रायफल घेऊन गस्त घालणार्या पोलीसाला मी विचारले, तो म्हणाला, पुढे फार जाऊ नका तेथे रायट चालू आहे. कान टोचलेल्या माणसाला हिंदू समजून भोसकतात. पहिले नाव विचारतात मग कानाकडे बघतात.
मी दचकलोच; माझे कान टोचलेले आहेत की नाही हे अद्यापपर्यंत मी कधी पाहिले नव्हते. मला ते आठवत नव्हते. पण लहानपणी टोचले असतील कदाचित म्हणून मी कान धरून पाहिले. पण टोचल्याची खूण हाताला लागली नाही. उगाच धोका नको म्हणून मी स्कुटरच्या आरशात निरखून पाहिले, बापरे, माझे कान टोचलेले दिसत होते. आता काय करावं! थंडीत आपण कान झाकतो तसे रुमालाने कान झाकले. पण पोलिसाने मला झापले. पुढे जायचे असेल तर तुमच्या जबाबदारीवर जा किंवा गणवेषातील पोलिसांना सोबत घ्या, असा त्याने सल्ला दिला. मी म्हटलं, तुम्हीच चला की सोबत. पण नेमून दिलेली जागा सोडून जाता येत नाही, असे तो म्हणाला. मी त्याला राम राम केला आणि राम… राम… म्हणत पुढे एकटाच निघालो. इमारतीच्या बंद खिडकीतून कुणी डोकावून पाहिले की पोलीस बंदुकीच्या धाकाने त्यांना आत जाण्यास सांगायचे.
संचारबंदी पुकारण्यात आली होती दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश आहेत, असे पोलीस म्हणाले. रस्त्याच्या कडेने इमारतीखालून भीत भीत पुढे चालत होतो. अशा संतप्त वातावरणात पोलीस प्रथम दिसेल त्याला फटकवतात. ते फटके बसू नयेत म्हणून मी कॅमेरा गळ्यात घालून ओळखपत्र ठेवले होते.
प्रत्येक गल्लीच्या सुरुवातीस आणि शेवटी पोलीस बंदूक घेऊन उभे असायचे. पण मध्यभागी निर्मनुष्य ठिकाणी जाताना मन घाबरायचे. पुढे पोलीस दिसले की हायसे वाटायचे. अशा अनेक गल्ल्या पार करून एका छोट्या पोलीस चौकीपाशी आलो. आत काही पोलीस आणि पाच सहा क्राइम रिपोर्टर जीव मुठीत घेऊन बसले होते. त्यात भिवंडकर नावाचा ज्येष्ठ पत्रकार होता. हा जुनाजाणता अनुभवी क्राइम रिपोर्टर असल्यामुळे त्याचे अंदाज बरोबर निघायचे. भिवंडकर म्हणाला, भडेकर, इथे चौकीतच बस पुढे जाऊ नकोस, फुकट मार खाशील. पण मी त्याला जुमानले नाही. आपणच भ्यालो तर फोटो कोण देणार! भिऊ नको कोण कोणाच्या पाठीशी नसते. आपली (लागते) लढाई आपल्यालाच लढावी लागेल असे मनात पुटपुटलो आणि लढाईवर निघाल्याच्या आव्ोशात छाती पुढे काढून निघालो. वाटेत एक मशीद आली. त्या पोलीसाने सांगितलेला कानाचा किस्सा आठवला आणि मी कान टवकारले. सर्चलाइट मारावा तसे डोळ्याने दूरवर कटाक्ष टाकला. कुठे हालचाल दिसत नव्हती. मी क्षणभर स्तब्ध उभा राहिलो. माझ्या डाव्या हाताला एक पन्नास फुटावर मशीद होती. १९८३च्या सुमारास याच ठिकाणी दंगल उसळली होती. येथून वीस फुटाच्या अंतरावर इमारती खालील गटारात नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोखले यांना ठार मारून त्यांच्यावर लोखंडी पत्रा टाकून प्रेत झाकून ठेवले होते. त्यांचा खूप शोध घेतल्यानंतर दुसर्या दिवशी पत्र्याखालून तपकिरी रंगाचे बूट दिसले, तेव्हा पोलिसांना त्यांचा शोध लागला होता. मला हेही आठवले की त्या दिवशी गोखले यांच्याबरोबर बडगुजर नावाचा अधिकारी होता. पण सुदैवाने ते वाचले आणि दुदैवाने गोखलेंचा बळी गेला.
हे सर्व आठवल्यानंतर माझी काय मनस्थिती झाली असेल? जेथे पोलीसांना संरक्षण मिळत नाही तेथे आमचे काय! येथे माझ्यावरही या क्षणी अकस्मात हल्ला होऊ शकतो. मग पळायचे कोणत्या दिशेने? जिथे तुळशीच्या झाडाच्या कुंड्या होत्या, तिथे हिंदू राहात असावेत आणि काळ्या रंगाचे बुरखे वाळत घातले होते, तिथे मुस्लिम राहात असावेत. असा अंदाज करून सुरक्षित जागा शोधत असताना पलीकडच्या गल्लीतून दगडफेक आणि गोळीबाराचे धडाम् धडाम् आवाज येऊ लागले. तेथे धावत जाऊन पाहिले तर एका तरुणाला कुणीतरी भोसकले होते. तो रक्तबंबाळ झाला होता. चार-पाच जण त्याला घेऊन इस्पितळाकडे निघाले होते. पुन्हा दुसर्या गल्लीतून आरडाओरडा आणि काचा फुटल्याचा आवाज. प्रत्येक गल्लीत आलटून पालटून नियोजित पद्धतीने चालले होते. दंगलीने पुन्हा जोर धरला. संतप्त जमावाने पोलीसांवर हल्ला करण्यात सुरुवात केली. आता मात्र भयंकर टेन्शन वाढले. बंदूकधारी पोलिसांना भीती नव्हती, पण ज्यांच्या हातात फक्त दंडुके होते त्या पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेटवर दगड येऊन पडायचे तेव्हा टणाटण आवाज घुमायचा. या घंटानादाला आवर घालण्यासाठी पोलीस उपायुक्त शं. मि. मुश्रीफ पुढे सरसावले आणि त्यांनी सर्विस रिवॉल्व्हरमधून गोळीबार केला. लोक त्यामुळे अधिक खवळले. मुश्रीफ साहेबांची मोटार समजून उपायुक्त मीरा बोरवणकरांच्या मोटारीस आग लावण्यात आली.
दंगल करणारे, मारणारे आणि मार खाणारे यांना मी जवळून पाहात होतो. थोड्या वेळाने त्यांना भेटून विचारपूस केली. आपल्याला कोणत्या जमातीतल्या माणसाने कशासाठी मारले हे त्यांनाही ठाऊक नव्हते. एक वृद्ध मुस्लिम दिसला. तो काठी टेकत चालला होता. त्याचा हात धरून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी जाऊन बसलो. त्याने फ्रिजचे थंडगार पाणी पाजले. आजूबाजूला मुस्लिम वस्ती होती. शेजारपाजारचे मला भेटायला आले. त्यांच्याशी बोलत असताना माझ्या मनातील भीती दूर झाली. मला अधिक कॉन्फिडन्स आला. त्यांच्या वस्तीत त्यांच्या बरोबरीने फिरलो. पण येथील वातावरण पाहता हा हिंदू-मुस्लिम दंगा वाटत नव्हता.
दुधाचे निमित्त झाले आणि दुधखुळी माणसं डोक्यात राख घेऊन एकमेकांना ठार मारायला निघाली होती. मला जे दिसले भेटले त्यांचा मुलाखत आणि फोटो घेऊन मी ऑफिसात आलो. दुसर्या दिवशी मी पुन्हा कामाठीपुरा विभागात फिरून पाहाणी केली. वातावरण शांत होते. काल झालेल्या दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नाहक बळी गेलेल्या दिनेश पाटीलची आज अंत्ययात्रा निघणार होती. फुलाने सजवलेल्या ट्रकवर दिनेशचा पार्थिव देह ठेवला होता. त्याचे दर्शन घेण्यासाठी पाच सहा हजाराचा जमाव जमला होता. त्यातील काहीजण पोलीसांच्या नावाने शिमगा करत होते. दिनेशचे घर इमारतीच्या तळमजल्यावर होते. तेथे घराबाहेर येऊन त्याची आई मोठ्याने रडत होती. तिचे छायाचित्र घेताना एका तरुणाने माझा कॅमेरा धरला आणि रागारागात म्हणाला. `तुम्हाला शरम नाही वाटत त्यांचा फोटो घेताना? त्यांचा मुलगा गेला. त्या दु:खी आहेत आणि त्यांचा रडताना फोटो घेता! उद्या पेपरात त्यांचा फोटो पाहून त्या पुन्हा दु:खी होतील, रडतील, याचा थोडातरी विचार करा. तुम्ही पत्रकार म्हणवता स्वत:ला मग तुम्हाला समजायला पाहिजे. हा प्रसंग फोटो घेण्यासारखा आहे का?
मी म्हटलं अहो, आम्ही तुमच्यासाठीच इथे आलो आहोत तुमचं दु:ख सरकारला नको का समजायला? त्याने एक क्षण अंत्ययात्रेकडे पाहिले आणि दुसर्या क्षणी मी त्याच्या नकळत दिनेशच्या आईचा फोटो घेतलाच.