झी टीव्ही वाहिनीवर २ मेपासून ‘राधा मोहन’ ही नवी मालिका सुरू झाली आहे. तत्पूर्वी या मालिकेचे अनावरण नुकतेच नवाबी शहर असलेल्या लखनौ शहरात करण्यात आले. यावेळी प्रमोशनचा भाग म्हणून नायिका राधा म्हणजेच निहारिका रॉय आणि नायक मोहन म्हणजे लोकप्रिय अभिनेता शब्बीर अहलुवालिया हेदेखील लखनौ शहरात आले होते. यावेळी निहारिकाने ग्रुप डान्समध्ये भाग घेत अप्रतिम नृत्य सादर केले, तर शब्बीर अहलुवालियासह तिने लाईव्ह परफॉर्मन्सही दिला.
‘राधा मोहन’ मालिकेची निर्मिती स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स या संस्थेने केली आहे. निहारिका रॉय म्हणाली, या मालिकेत मला ही मोठी संधी दिल्याबद्दल मी झी टीव्हीची आभारी आहे. राधाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी माझं सर्वस्व देईन. राधा या व्यक्तिरेखेसारखीच मीही आहे. लखनौतील या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहून मला नवा हुरूप आला आहे, असेही तिने सांगितले. ही मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री ८ वाजता दाखवली जाणार आहे.
रात्री ८ वाजताच्या प्राइम टाइममध्ये ‘राधा मोहन’ ही नवी मालिका सुरू करून प्राइम टाइमच्या प्रेक्षकांना नवा उत्साह देण्याचा चॅनलचा प्रयत्न आहे. याच प्राइम टाइमला सध्या ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेच्या कथानकाचा काळ नुकताच सात वर्षांनी पुढे नेण्यात आल्याने ही मालिकाही आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. पण आता तिचे प्रसारण रात्री १० वाजता केले जाईल. त्या जागी ‘राधा मोहन’ दाखवली जाणार आहे, असे झी टीव्हीच्या व्यवसायप्रमुख अपर्णा भोसले म्हणाल्या. या मालिकेत मोहन नावाच्या एका बासरीवादकाची कथा दाखवण्यात आली आहे. आपल्या बासरीच्या मधुर स्वरांनी मोहन सर्वांवर मोहिनी घालत असे. त्याला पुन्हा हसवण्याचा प्रयत्न राधा करते असे कथानक आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता शब्बीर अहलुवालिया एका नव्या रूपात दिसणार आहे. गेली सात वर्षे शब्बीरने अभीच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
शब्बीर अहलुवालिया म्हणाला, ‘नवी व्यक्तिरेखा साकारण्यास मी आजवर कधीच नकार दिलेला नाही. उलट एखादी नवी व्यक्तिरेखा साकारण्यास मी नेहमीच उत्सुक असतो. प्यार का पहला नाम राधा मोहन या माझ्या नव्या मालिकेचं कथानक फारच अभूतपूर्व आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कथेला अनेक कलाटण्या मिळणार आहेत. मोहनची व्यक्तिरेखा शक्तिशाली आणि सुस्पष्ट आहे. पण त्याच्या व्यक्तिरेखेला असलेल्या अनेक छटांमुळे ती चांगलीच आव्हानात्मकही बनली आहे. मी आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका रंगविण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे आता या भूमिकेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची मला खूप उत्सुकता लागून राहिली आहे. आमच्या पत्रकार मित्रांपुढे आम्ही या मालिकेची एक झलक सादर केल्याबद्दल मला आनंद होतो, लखनौतील या लोकांचा प्रतिसाद खरंच भारावून टाकणारा होता.’
निहारिका रॉय म्हणाली, ‘राधाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी माझं सर्वस्व देईन आणि ही भूमिका साकारण्यास मी खूपच उत्सुक झाले आहे. किंबहुना राधाच्या व्यक्तिरेखेचं माझ्या वास्तव व्यक्तिमत्त्वाशी खूपच साधर्म्य आहे. शब्बीरसर आणि मालिकेचे सर्व सहकलाकार आणि कर्मचारी यांच्याबरोबर काम करताना मला खूप छान वाटलं. पण लखनौतील या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहून मला खूप हुरूप आला आहे.’ शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय यांच्याशिवाय या मालिकेत स्वाती शाह, संभावना, कीर्ती नागपुरे आणि मनिषा पुरोहित यांच्यासारखे अनेक नामवंत आणि दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका पार पाडतील.