अशी आहे ग्रहस्थिती
रवि-राहू-बुध मेषेत, केतू तुळेत, शनि-प्लूटो मकरेत, शुक्र-नेपच्युन-मंगळ कुंभेत, गुरु मीनेत, चंद्र मकरेत, त्यानंतर कुंभ आणि सप्ताहाच्या अखेरीस मीन राशीत. दिनविशेष – २६ एप्रिल रोजी विरुधीनी एकादशी, ३० एप्रिल रोजी चैत्र शनी अमावस्या
मेष – अनपेक्षितपणे घेतलेल्या निर्णयामुळे या आठवड्यात मोठा लाभ मिळेल. लग्नी आलेला राहू स्वाभिमान वाढवेल. मात्र, अहंकार बाजूला ठेवा. शुभकार्यासाठी प्रवास घडतील. लग्नी राश्यांतर करून आलेल्या रवीमुळे जनमानसात पतप्रतिष्ठा वाढेल. संततीकडून संस्मरणीय, अभिमानास्पद काम घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील, त्यातून चांगले आर्थिक लाभ होतील. अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचा काळ आहे.
वृषभ – कुटुंबासोबत प्रवासाचे बेत सफल होतील. व्ययातील रवीमुळे डोळ्याचे विकार उद्भवतील, काळजी घ्या. राजकारणी मंडळींनी कायद्याच्या चौकटीत काम करावे, अन्यथा एखादा बांका प्रसंग उभा राहू शकतो. उधार उसनवारी टाळा. सरकारी कर्मचार्यांना वरिष्ठांकडून त्रास होईल. स्वविचाराने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. व्यवसायात मोठी उलाढाल होईल. चांगले लाभ मिळतील. योगकारक शनीचे राश्यांतर यशस्वी ठरेल.
मिथुन – आगामी काळ अतिशय लाभदायक आहे. राश्यांतर करून आलेले रवि-राहू-केतू आणि गुरु यांच्यामुळे उत्तम ग्रहस्थिती आहे. रवि-राहूचे लाभातील राश्यांतर अनपेक्षित लाभाच्या संधी घेऊन येईल. कमिशन एजंट, ब्रोकर यांना शेअर बाजारातून अनपेक्षित लाभ मिळतील. हंसयोगातला गुरु गृहसौख्य देईल. नव्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. घरात नवीन वस्तूची खरेदी होईल. कर्ज मंजूर होईल. मनासारख्या घटना घडल्याने आनंदी राहाल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील, नव्या ऑर्डर मिळतील. संततीचे शिक्षणविषयक प्रश्न मार्गी लागतील.
कर्क – येत्या आठवड्यात वेगळे अनुभव येतील. काळजी घ्या. सुखस्थानातील केतूचे राश्यांतर कौटुंबिक कटकटी वाढवण्यास कारणीभूत ठरेल. दशमातील राहूचे राश्यांतर व्यवसायात जम बसवण्यासाठी पुरेशी ताकद देईल. जिद्दीने एखादे काम पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक हेवेदावे, निर्णय हे प्रश्न मार्गी लागतील. भाग्यातील गुरूमुळे भक्तीमार्गातून समाधान मिळेल. सत्कर्म घडेल. धार्मिक यात्रा होईल. दानधर्म कराल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह – आगामी काळ शिक्षण क्षेत्रातील मंडळींना प्रतिष्ठा मिळवून देईल. राशीस्वामी रवीचे भाग्यात उच्च राशीत राश्यांतर, सोबत राहू-बुध. कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींसाठी काळ उत्तम आहे. संरक्षण खाते, पोलीस दलातील लोकांना नावलौकिक मिळेल. परदेश दौर्याच्या संधी चालून येतील. सुखेश मंगळ आणि दशमेश शुक्र सप्तमात असल्याने विलासी वृत्ती वाढेल. मर्यादा पळून वागा. विकारांची इच्छा प्रबळ होईल. सत्यातून चांगले लाभ होतील.
कन्या – घरात शुभकार्ये पार पडतील. विवाहेच्छुकांसाठी काळ चांगला आहे. लग्नेश बुध अष्टमात, रवि-राहू षष्ठात, शुक्र-मंगळ त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कर्ज घेणे टाळा. डोक्यावरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थीवर्गाचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाचे योग्य नियोजन करा. प्रवासात महत्वाच्या वस्तू सांभाळा. महिलांना मातुल घराकडून लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी अचानक जबाबदारीची जागा मिळेल. वारसाहक्काने लाभ होतील.
तूळ – येणार्या काळात मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. राजकारणात व सरकारी सेवेत असणार्यांना कर्तृत्व सिद्ध करावे लागेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मात्र, भावना विकाराची असता कामा नये. अन्यथा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संततीसाठी पैसे खर्च होतील. विरोधकांवर वरचढ ठराल. खेळाडूंना स्पर्धांमध्ये चांगले यश मिळेल. मामाकडून चांगले सहकार्य लाभेल. नव्या घराच्या प्रयत्नांना चांगली गती मिळेल. नव्या गुंतवणुकीचा मोह होईल.
वृश्चिक – बदललेली ग्रहस्थिती जीवरक्षकाचे काम करणार आहे. नोकरदारांना अधिकारप्राप्तीचा योग जुळून आहे. कोर्टकचेरीच्या संदर्भात महत्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यात यश मिळेल. मेडिकल क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. पंचमात राश्यांतर करून आलेल्या गुरूमुळे शुभ फळे मिळतील. खिसा-पाकीट सांभाळा.
धनु – राशिस्वामी गुरुचे स्वराशीतील भ्रमण गृहसौख्याचा लाभ देईल. शुभ घटना घडतील. नवा व्यवसाय सुरु करण्याचे योग आहेत. पराक्रमस्थानातील मंगळामुळे कामाचा उत्साह वाढेल. पंचमातील रवि-राहू-बुध तसेच लाभातील केतूमुळे अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. गुंतवणुकीमधून अधिक लाभ मिळतील. कलाकारांचे कौतुक होईल. खेळाडूंना अनपेक्षित यश मिळेल. मन शांत ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर – या ना त्या कारणाने कटकटी वाढतील. पण शांत राहा. राशीपरिवर्तन केलेले राहू-केतू सुखस्थानात असल्याने नको ते शुक्लकाष्ठ मागे लागतील. भ्रमनिरास होतील. सल्लामसलत केल्याखेरीज कोणताही निर्णय नको, मनस्तापाचे प्रसंग घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. पण त्याचे सुख उपभोगण्यासाठी मानसिक स्थिती साथ देणार नाही. नोकरी करणार्यांना बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबातील अन्य लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. अमावस्येच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवा, अन्यथा रोषाला तोंड द्यावे लागेल.
कुंभ – थोडे खट्टे थोडे मोठे अनुभव आगामी काळात येतील. कुटुंबासोबत वादाचे प्रसंग निर्माण होतील. पण थोडे सबुरीने घ्या. आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी कुरबुरीचे प्रसंग होतील. त्याकडे दुर्लक्ष करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे खाणे टाळा. महत्वाचे पत्र हातात पडेल. व्यवसायाला चांगली गती मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील.
मीन – येणार्या काळात चांगले अनुभव येतील. शुभदायक घटना घडतील. गुरुचे स्वगृही आगमन झाले आहे, त्याचा चांगला लाभ मिळेल. धार्मिक क्षेत्रातील मंडळींसाठी खूप उत्तम काळ आहे. कुटुंबासाठी पैसे खर्च होतील. त्यातून आनंद मिळेल. परदेशप्रवासाच्या संधी चालून येतील. नोकरीच्या शोधातील मंडळींना नवीन नोकरी मिळेल. अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. धारदार वस्तूंपासून जपा.