शिवसेनाप्रमुखांच्या धारदार कुंचल्यातून उतरलेले हे व्यंगचित्र आहे १९७३ सालातले. शिवसेना मुंबईपासून तोडण्याचे, इथला मराठी टक्का न जुमानता त्यावर परप्रांतीयांचे आणि त्या माध्यमातून दिल्लीतील केंद्रसत्ताधीशांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे मनसुबे शिवसेना उधळून लावत होती. शिवसेनेचे सळसळत्या रक्ताचे सैनिक अरे ला कारे करायला सज्ज होत होते, सर्व प्रकारच्या स्थानिक समस्यांची तड शिवसेनेच्या शाखेत लागते, हा लौकिक प्रस्थापित व्हायला लागला होता आणि परिणामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा पराभव व्हायला लागला. तेव्हा शिवसेनेविरोधात जशास तसे उत्तर देणारी एक संघटना उभी करून त्या शिखंडीच्या आडून शिवसेनेवर शरसंधान करण्याचा घाट घातला गेला. बाळासाहेबांनी त्यांच्या खास शैलीत या संघटनेचे नामकरण ‘बाटगा फोर्स’ असे केले आणि शिवसेनेसमोर तिची औकात काय आहे, हे सणसणीत फटकार्यांमधून दाखवून दिले… आताही शिवसेनेच्या विरोधात उभ्या केल्या जात असलेल्या भाडोत्री बाटग्या फोर्सला बाळासाहेबांनी कसे फटकारे लगावले असते, त्याची कल्पना या व्यंगचित्रातून करता येईल.