□ भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असे विधान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले.
■ शांतता प्रस्थापित होणार नाही, एवढेच म्हणा की!
□ पत्नीने आठ महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीवरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा- हायकोर्टानेच दिले आदेश
■ ‘धस’का घ्यावा असाच हा दरोडा!
□ मी पुन्हा येईन… डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू असे संकेत त्यांनी दिले
■ तिथल्याही शहाण्या लोकांच्या उरात धडकी भरली असणार या घोषणेने… आपल्याकडे भरते तशीच.
□ बहुरूपी कोरोना कधी परतेल नेम नाही, सावध राहा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
■ बहुरूप्यांबद्दल मोदींनी इशारा द्यावा!
□ राज्य हातात राहिले नाही म्हणून एक मोठा वर्ग अस्वस्थ- शरद पवार
■ डोळ्यांत तेल घालून रक्षण केलं नाही, तर अजूनही त्यांचे मनसुबे सिद्धीस जाऊ शकतात.
□ संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज- डॉ. अभय बंग यांची परखड टीका
■ उठा उठा ट्रोलहो, होळी आली; डॉ. बंग यांच्याविरोधात बोंब ठोकण्याची वेळ झाली.
□ हा महाराष्ट्र आहे की बंगाल? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
■ का हो, बंगालने काय घोडं मारलं? तुम्हाला गुजरात किंवा उत्तर प्रदेश बनवायचाय का? त्यापेक्षा बंगाल लाखपटीने बरा.
□ इम्रान खान यांच्या आतापर्यंत चार बायका तर भावी पंतप्रधान शाहबाज खान यांच्या आतापर्यंत पाच बायका
■ हिंमतवान खरे! इथे एक सांभाळताना फ्यॅ फ्यॅ उडते…
□ केंद्राच्या योजना शेतकर्यांना सशक्त बनवत आहेत- मोदी
■ तरी चालू आहेत? तुम्ही अख्ख्या देशात फक्त दोनच जणांना सशक्त करण्याचा ठेका घेतला आहे ना?
□ बाबा रामदेव यांची अशीही कमाल, एका झटक्यात फेडले रुची सोया कंपनीचे तीन हजार कोटीचे कर्ज
■ राष्ट्रीयीकृत बँका कफनीच्या पुढच्या खिशात आणि नियामक प्राधिकरणे मागच्या खिशात असल्यावर काय अवघड आहे हो!
□ देशात लवकरच रामराज्य येईल. राज्यपाल कोशारी यांचे वक्तव्य
■ आता रावण राज्य आहे का शकुनीमामा?
□ पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर पुरस्कार
■ अभिनंदन!… मंगेशकर कुटुंबीयांचे.
□ भाजपचे हिंदुत्व हे हायब्रीड हिंदुत्व- भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांचे टीकास्त्र
■ निव्वळ भोंदुत्व!
□ एकनाथ खडसे यांचे ६७ दिवस, तर संजय राऊत यांचा ६० दिवस फोन टॅप
■ कानातला मळ निघाला असेल ऐकणार्यांच्या.
□ भाजपचे पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत का? जयंत पाटील यांचा सवाल
■ ईश्वरा(प्पा)लाच ठाऊक!
□ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी संसदेत पहिल्याच भाषणात, चीन हा पाकिस्तानचा बेहतरीन, सच्चा दोस्त असल्याचे गोडवे गायले
■ आता भिकेचा कटोरा तिकडे फिरलेला असणार.
□ किराणासह सर्वच वस्तू महागणार, १२ ते १५ टक्के दरवाढीचे व्यापारी संघटनांचे संकेत
■ मोदीभक्त एकभुक्त राहतील, एकवस्त्र राहतील, तेही त्यागतील, पण मत मोदींनाच देतील.
□ महागाईने त्रस्त श्रीलंकावासीयांना अपेक्षा भारताकडूनच. जन्मजात असलेले बंधुत्व निभावण्याची मागणी
■ तामीळींवर अत्याचार करताना बंधुत्व खुंटीला टांगून ठेवले होते का?