‘युवर ऑनर, आज आरोपीच्या पिंजर्यात उभा असलेला हा तिशीतला युवक पाहून कदाचित कोणाला दया येईल, कोणाला हळहळ वाटेल; पण विश्वास ठेवा, आपल्यासमोर एक अत्यंत निर्दयी, निर्ढावलेला आणि कामपिसाट असा गुन्हेगार उभा आहे. पैशाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो आणि कायदा गुंडाळू शकतो ह्या भ्रमात वावरणारा एक माजोरी पैसेवाला आपल्यासमोर उभा आहे. एखादी गोष्ट पैशाने खरेदी करता येत नसेल, तर ब्लॅकमेलच्या पातळीवर देखील उतरण्याची तयारी ठेवणारा असा हा एक विषारी मनोवृत्तीचा तरुण आहे.
– – –
आता ह्या क्षणी जर त्या दोघांना कोणी ओळखीच्याने दात काढून हसताना आणि एकमेकांच्या पाठीत प्रेमाने गुद्दे मारताना पाहिले असते तर तो नक्की चक्कर येऊन पडला असता. कोर्टात एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे भांडणारे आणि एकमेकांच्या चुका दाखवायची एक देखील संधी न शोधणारे दोघेही आता प्रेमाने गळ्यात गळे घालून खिदळत बसले होते… ते दोघे होतेही तसेच.. कामाच्या वेळी काम आणि मैत्रीच्या वेळी मैत्री यातले अंतर ओळखणारे. कसेही असले, तरी कायद्यासाठी प्राण पणाला लावणारे दोघे.. बॅरिस्टर धवल राजहंस आणि सीनियर इस्न्पेक्टर राणा.
धवल अत्यंत उद्वेगाने काहीतरी सांगत असतानाच अचानक राणाचा फोन वाजला आणि तो गप्प झाला.
‘राणा हिअर..’
‘काय? कधी? कुठे? निघतोय लगेच..’
‘काय रे कसली केस?’
‘धवल, मे बी तुला ह्यात इंटरेस्ट वाटेल. प्रसिद्ध अभिनेता विक्रम भटनागरच्या बायकोचा खून झाला आहे आणि पोलिसांना घटनास्थळावर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय गणात्रा ह्यांचे वॉलेट सापडले आहे.’
‘कॅन आय जॉइन?’ धवलने उत्साहाने उठत विचारले. का कोणास ठाऊक, पण त्याला ह्यात भाग घेण्याची फार इच्छा होत होती.
‘शुअर’ राणाने वाक्य पूर्ण करता करता बिल पेड केले आणि दोघेही आपापल्या गाड्यांकडे धावले.
’महाकाली आईस फॅक्टरी’ला वळसा घालत गाडी वळली आणि समोर विक्रम भटनागरचा भव्य बंगला उभा होता. दोघेही लगबगीने बंगल्यात शिरले. एका हवालदाराने हातानेच इशारा केला आणि दोघेही त्या दिशेला वळले. बेडरूमच्या बाथरूममध्ये विक्रम भटनागरची बायको क्रांतीचे प्रेत पडलेले होते. फोरेन्सिक आपले काम करत असतानाच त्यांना अडथळा येऊ नये अशा रितीने दोघेही सावकाश आत शिरले. आत शिरताच धवल एकदम दचकला. पटकन बाहेर येऊन त्याने पायातले बूट काढले आणि तो पुन्हा एकदा आत शिरला. राणाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. धवल फक्त मंद हसला आणि प्रेताचे निरीक्षण करायला लागला. तेवढ्यात धवलचा मोबाइल वाजला आणि तो बाहेर आला.
‘धवल सर कुठे आहात?’ पलीकडून धवलला त्याच्या सेक्रेटरीचा अनुपमाचा वैतागलेला स्वर ऐकायला आला.
‘एका मित्राबरोबर आहे.. का काय झाले?’
‘सर, तुम्हाला भेटण्यासाठी एक माणूस गेला. पाऊण तास माझ्या डोक्याला ताप देत होता. तो स्वत:चे नाव देखील सांगायला तयार नव्हता. फक्त धवलना बोलवा धवलना बोलवा इतकाच घोषा लावला होता. मी काही ऐकायलाच तयार नाही, हे पाहून शेवटी त्याने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड माझ्यासमोर फेकले.’
‘इंटरेस्टिंग..’
‘त्यावर ’अजय गणात्रा’ असे नाव आहे सर..’ अनुपमा धाडकन म्हणाली आणि धवलच्या तोंडातून नकळत शीळ बाहेर पडली.
‘राणा विल मीट अगेन,’ घाईघाईने बूट घालत धवल ओरडला.
‘एकदम कसली गडबड?’ राणाला काही सुचेना.
‘क्लायंट. गेस हू..’
‘डोंट टेल मी..’ डोक्याला हात लावत राणा म्हणाला आणि धवल हसत हसत बाहेर पडला.
—-
धवल शांतपणे समोर बसलेल्या अजय गणात्राकडे पाहत होता. नो डाऊट, अजय गणात्रा रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा होता. त्याची श्रीमंती बुटापासून ते त्याने मारलेल्या परफ्यूमपर्यंत सगळीकडे जाणवत होती.
‘मिस्टर धवल, पोलिस मला कोणत्याही क्षणी अटक करतील.’
‘भटनागर केस?’ मंदपणे हसत धवल म्हणाला आणि अजय भूत पाहावे तसे त्याच्याकडे पाहत राहिला.
‘ते सगळे नंतर सांगतो मिस्टर गणात्रा.. तुम्ही काय घडले आहे ते मला काही न लपवता थोडक्यात सांगा.’
‘मिस्टर धवल, मी आज मिसेस भटनागरना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. त्यांचा नोकर रमण तेव्हा नेमका बाहेर निघाला होता. त्यानेच मला ’बाईसाहेब वरती आहेत’ असे सांगितले. त्यामुळंं मी थेट वरच्या मजल्यावर गेलो. क्रांतीला हाका मारत मी सरळ आत शिरलो, पण ती बेडरूममध्ये नव्हती. मी बाथरूममध्ये डोकावलो तर…’ अजयने खिशात हात घातला आणि रुमालाने संपूर्ण चेहरा खसखस पुसला. त्याने ’क्रांती’ असा एकेरी उल्लेख केल्याने धवल जरा सावध झाला.
‘तर काय मिस्टर गणात्रा?’
‘आत.. आत क्रांती वेडीवाकडी पडली होती आणि कितीही हलवले तरी उठत नव्हती. ती मृतावस्थेत होती. मी घाबरलो आणि धावत बाहेर पडलो. काही वेळाने सिगारेटसाठी मी खिशात हात घातला तेव्हा लक्षात आले की माझे वॉलेट बंगल्यात कुठेतरी पडले आहे. मला क्षणात काय होणार ह्याचा अंदाज आला आणि मी तुमच्याकडे धावलो.’
‘हे सगळे तुम्ही सांगताय अगदी तसेच घडले?’ धवलने त्याच्या डोळ्यात डोळे रोखत विचारले.
‘अगदी शब्द अन शब्द..’
‘तुम्ही मिसेस भटनागरना कसे ओळखत होतात?’
‘त्यांनी आमच्या जुहूच्या नव्या स्कीममध्ये ’ट्विन बंगलो’ घेतला होता. पण तो आता त्यांना नको होता. त्यासंदर्भातच आमची भेट झाली होती. त्यातूनच ओळख वाढली आणि…’
‘…इतकी वाढली की तुम्ही थेट त्यांचा एकेरी उल्लेख करत थेट त्यांच्या बेडरूममध्ये जाईपर्यंत प्रगती केलीत.’ धवल खोचकपणे म्हणाला आणि अजय हडबडला.
‘आम्ही दोघेही परस्परसंमतीने..’ दार उघडून इन्स्पेक्टर राणा खाडकन आत शिरला आणि अजयचे वाक्य अर्धवट राहिले.
‘मिसेस क्रांती भटनागरांच्या खुनासाठी आरोपी म्हणून आम्ही तुम्हाला अटक करतो आहोत मिस्टर गणात्रा,’ धवलकडे रोखून पाहत राणा म्हणाला आणि धवल मंद हसला.
‘मिस्टर गणात्रा, पोलिसांना सहकार्य करा. फक्त मी तुमचा वकील आहे आणि माझ्या उपस्थितीशिवाय तुम्ही पोलिसांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही हे लक्षात ठेवा’
‘ओह यू शट अप!’ राणा चिडक्या आवाजात म्हणाला. ‘तुला कल्पना नाही धवल, ह्यावेळी तू एका अत्यंत निर्दयी गुन्हेगाराची केस हातात घेतली आहेस. तुझ्या ह्या अशिलाला मी फक्त खून नाही तर ब्लॅकमेलसाठी देखील कोर्टात उभे करणार आहे!’ ठामपणे राणा म्हणाला आणि दरवाज्याकडे वळला. धवलचा चेहरा आता मात्र चिंताग्रस्त झाला होता. ’हा
ब्लॅकमेलचा काय अँगल आला मध्येच?’
—
’द स्टेट व्हर्सेस अजय गणात्रा’ केस म्हणाल्यावर आधीच मीडिया आणि ’पेज थ्री’वाल्यांची कोर्टात तोबा गर्दी झालेली; त्यात अजय गणात्राची केस धवल लढवतो आहे म्हणाल्यावर तर गर्दीने उच्चांक गाठला. त्यात नवल काही नव्हते. ह्यावेळी सरकारी पक्षाने देखील जोरदार तयारी केलेली दिसत होती. बॅ. नाथ आज कधी नाही ते लोणी गटकावलेल्या बोक्यासारखे खट्याळ भाव चेहर्यावर घेऊन बसले होते. आज धवलची परीक्षा होती हे नक्की!
‘तो कोर्टात कबूल करेल ना की, मी ब्लॅकमेल करत होतो म्हणून?’ नाथांच्या जवळून जाता जाता धवलने उगाचच फोनवर कोणाला तरी दबक्या आवाजात विचारले आणि नाथ एकदम बावचळले. ’ह्याला ब्लॅकमेलचा कोणातही धागा सापडला आता?’ ह्या विचाराने ते एकदम अस्वस्थ झाले. धवलला कोणताच धागा काय, एक सूत देखील सापडले नव्हते; पण नाथांना अस्वस्थ करण्यासाठी त्याने उगाचच एक पिलू सोडून दिले होते. धवल होता शेवटी तो..
‘युवर ऑनर’ बॅ. नाथांनी गंभीर आवाजात प्रास्ताविकाला हात घातला आणि धवलसकट सगळ्यांचे कान टवकारले.
‘युवर ऑनर, आज आरोपीच्या पिंजर्यात उभा असलेला हा तिशीतला युवक पाहून कदाचित कोणाला दया येईल, कोणाला हळहळ वाटेल; पण विश्वास ठेवा, आपल्यासमोर एक अत्यंत निर्दयी, निर्ढावलेला आणि कामपिसाट असा गुन्हेगार उभा आहे. पैशाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो आणि कायदा गुंडाळू शकतो ह्या भ्रमात वावरणारा एक माजोरी पैसेवाला आपल्यासमोर उभा आहे. एखादी गोष्ट पैशाने खरेदी करता येत नसेल, तर ब्लॅकमेलच्या पातळीवर देखील उतरण्याची तयारी ठेवणारा असा हा एक विषारी मनोवृत्तीचा तरुण आहे. ह्याने क्रांती भटनागरांना फक्त ब्लॅकमेल करण्याचाच प्रयत्न केला नाही, तर आपल्याला हवे ते, म्हणजे क्रांती भटनागरांचे शरीर मिळत नाही म्हणाल्यावर त्यांच्या खून करण्यापर्यंत खालच्या पातळीला उतरणारा असा हा गुन्हेगार आहे. माझे पुरावे सर्व सत्यकथा समोर आणतीलच, पण एका सुशिक्षित समाजात अशा गुन्हेगाराला पाहणे हे माझ्यासाठी जास्त वेदनादायी आहे!’ नाथांनी भाषण संपवले तेव्हा कोर्टातील बर्याच जणांची अजयकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे काळवंडली होती.
‘मी पुराव्यांची वाट बघतोय..’ धवलने चार शब्दात आपले प्रास्ताविक संपवले आणि न्या. बेहरे देखील आश्चर्यचकित झाले.
‘राम दुबे…’ पहिल्या साक्षीदाराला आवाज दिला गेला आणि तो पिंजर्यात हजर झाला.
‘राम दुबे, आपण कुठे काम करता?’
‘साहेब, मी विक्रम साहेबांच्या बंगल्यावर चौकीदार आहे.’
‘दुबे मला सांगा, तुम्ही त्या समोरच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या माणसाला ओळखता?’
‘अजय साहेब आहेत ते. भला माणूस आहे साहेब. कितीही वेळा नको म्हणालो, तरी पन्नास, शंभर रुपये हातात देऊन जातातच.’ दुबेनी तिथूनच अजयला एक सॅल्यूट मारला आणि कोर्टात एकच हशा पिकला.
‘दुबे, ज्या दिवशी मॅडमचा खून झाला त्या दिवशी अजय साहेब तिकडे आले होते?’
‘आले होते ना साहेब. आले आणि दहा मिनिटात पळत पळत बाहेर आले. त्यांनी गाडी काढली आणि मी संपूर्ण दार उघडेपर्यंत अर्ध्या उघडलेल्या दारातून गाडी काढून निघून पण गेले. पैसे पण नाही दिले..’ दुबे पुटपुटला आणि कोर्टात पुन्हा हशा पिकला.
‘ते आले तेव्हा कसे दिसत होते? त्यांच्या चेहर्यावर घाबरल्याचे भाव होते?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर!
सजेस्टिव क्वेश्चन,’ खाडकन धवल म्हणाला आणि कोर्ट पुन्हा एकदा सावरून बसले. केसमधले पहिले ऑब्जेक्शन आणि पहिल्याच साक्षीला. अब आयेगा मजा..
‘सस्टेन्ड..’
नाथांनी खांदे पाडले आणि धवलला उलटतपासणीसाठी इशारा केला.
‘नो क्वेश्चन्स,’ धवल म्हणाला आणि पुन्हा एकदा कोर्टाला धक्का बसला.
‘रमण सुराणा…’ नाव पुकारले गेले आणि एक साठीतल्या शांत माणसाने पिंजर्यात जागा घेतली.
‘सुराणा, कोर्टाला तुमचा परिचय द्या.’
‘साहेब, मी रमण सुराणा. माझ्या वडिलांपासून आम्ही भटनागरांकडे चाकरीला आहोत.’
‘पिंजर्यातल्या मनुष्याला तुम्ही ओळखता?’
‘त्यांचे नाव अजय आहे येवढेच माहिती. पण खरे सांगू का, हा माणूस मला कधीच आवडला नाही. हा कायम साहेब नसताना यायचा आणि हा येऊन गेला की ताईसाहेब कायम घाबरलेल्या आणि दु:खी दिस्ाायच्या. मी आडून आडून विचारायचा प्रयत्न केला, पण ताईसाहेब काही बोलल्या नाहीत.’
‘तुम्ही विक्रम साहेबांच्या कानावर हे घातले नाहीत?’
‘मी एकदोनदा प्रयत्न केला पण बाईसाहेबांनी मलाच खोटे ठरवले.’
‘त्या दिवशी नक्की काय घडले सांगू शकाल?’
‘साहेब, विक्रम साहेबांना भेंडी फार आवडते. त्या दिवशी रात्री ते खूप दिवसांनी घरी जेवायला असणार होते; त्यामुळे मी भेंडी आणण्यासाठी बाजारात निघालो होतो. नेमके त्याच वेळेला हे अजय साहेब आले. मी त्यांना ताईसाहेब वर असल्याचे जरा रागातच सांगितले आणि बाजारात गेलो. परत आलो तेव्हा दरवाजा उघडाच होता आणि अजय साहेबांची कार देखील दिसत नव्हती. मी खालती स्वयंपाकघरात सगळे सामान ठेवले आणि मग ताईसाहेबांसाठी दुपारचा चहा घेऊन वर गेलो तर त्या बेडरूममध्ये नव्हत्या. मी त्यांना शोधत बाथरूमपाशी गेलो तर…’ रमणकाका एकदम ओंजळीत चेहरा लपवून गदगदायला लागले आणि कोर्ट देखील हेलावले.
धवल उलट तपासणीला उभा राहिला आणि कोर्ट एकदम दक्ष मोडमध्ये गेले.
‘रमणकाका, हा अजय काही फारसा चांगला माणूस नाही. बरोबर ना?’
‘अगदी बरोबर बोललात साहेब!’ आनंदाने मान डोलवत रमणकाका म्हणाले.
‘मग अशा नालायक माणसासोबत तुमच्या ताईसाहेबांना एकटेच सोडून तुम्ही बाजारात निघून गेलात?’ धवलने खाडकन प्रश्न टाकला आणि अर्ध्याच्या वर प्रेक्षक खुर्चीत उभे झाले.
—-
केसचा पहिला दिवस धवलसाठी काही फारसा चांगला गेला नव्हता. नाही म्हणायला रमणचाचाच्या साक्षीला त्याने एका प्रश्नात लावलेला सुरुंग चांगलाच धमाका करून गेला होता. ‘धवल, सरकारी पक्षाने अजयवरती
ब्लॅकमेलचा देखील गुन्हा लावला आहे. त्याच्या गाडीमध्ये क्रांतीचे नको त्या अवस्थेतले फोटो देखील पोलिसांना मिळाले आहेत.’
‘अनुपमा, मी काल अजयची पुन्हा भेट घेतली होती. माझे सगळे अंदाज बरोबर आले, तर मी उद्याच गुन्हेगाराला कोर्टासमोर आणतो का नाही बघ!’ धवल ठामपणे म्हणाला आणि अनुपमा त्याच्या तोंडाकडे पाहत राहिली.
—-
डॉ. खान साक्षीला आले आणि कोर्ट पुन्हा एकदा अॅलर्ट झाले.
‘डॉ. खान खुनाबद्दल सविस्तर माहिती द्याल?’
‘क्रांती भटनागर ह्यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. साधारण दुपारी दोन ते चार दरम्यान हा खून करण्यात आला आहे.
नाथांनी धवलकडे पाहिले आणि तो उभा झाला.
‘डॉक, खुनाची वेळ काय म्हणालात?’
‘दुपारी दोन ते चार दरम्यान’ धवलने मान डोलावली आणि खान साहेब बाहेर पडले.
इन्स्पेक्टर राणा साक्षीला आला आणि स्वत: न्यायमूर्ती देखील सावरून बसले.
‘राणा साहेब, ह्या केस संदर्भात कोर्टाला सविस्तर माहिती द्याल का?’
‘सर, क्रांती भटनागर ह्यांनी जुहूच्या गणात्रांच्या स्कीममध्ये ’ट्विन बंगलो’ खरेदी केला होता. पण काही कारणाने त्यांनी निर्णय बदलला आणि ही प्रॉपर्टी परत करण्याचा निर्णय घेतला. ह्या संदर्भात एक दोनदा त्यांची आणि मिस्टर गणात्रांची गाठभेट झाली. पहिल्यापासूनच आशिकाना स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या गणात्रांची नजर मिसेस भटनागरांवर खिळली ती खिळलीच. पैशाने काही त्यांना मिळवता येत नाही हे लक्षात येताच त्याने कोणत्यातरी मार्गाने मिसेस भटनागरांचे काही नको त्या अवस्थेतले फोटो काढले आणि तो त्यांना ब्लॅकमेल करायला लागला. फोटोंनी देखील काही साध्य होत नाही आणि आता बहुदा मिसेस भटनागर पोलिसांची मदत घेणार हे लक्षात येताच त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि त्यांचा गळा दाबून खून केला.’
‘तुम्ही हे जे काही सांगितले त्याला काही आधार?’
‘आम्हाला आरोपीच्या गाडीत मिसेस भटनागरांचे फोटो मिळालेत. तसेच सकाळी अकरा वाजता मिस्टर भटनागर बाहेर पडल्यानंतर फक्त मिस्टर अजय आल्याचे आणि वीस मिनिटासाठी रमणकाका बाहेर गेल्याचे दुबेनी देखील साक्षीत सांगितले आहे!’
राणाची साक्ष चालू असतानाच अनुपमाने धवलला ’थम्प्स अप’ची खूण केली आणि धवल शांतपणे उठला.
‘युवर ऑनर, मला मिस्टर रमणना काही प्रश्न विचारायचे आहेत.’
‘असे डायरेक्ट कसे?’ नाथांनी आता कुरबूर सुरू केली.
‘माझ्या हातात आताच अशी काही माहिती लागली आहे की, मला ही साक्ष खूप महत्त्वाची वाटते आहे. कोर्टाने मला प्लीज ह्याची परवानगी द्यावी.’ धवलचे एकूण रेप्युटेशन पाहता त्याला परवानगी मिळाली हे सांगायला नकोच.
‘मिस्टर रमण, तुम्हाला जेव्हा खुनाची बातमी समजली तेव्हा तुमचे साहेब कुठे होते?’
‘साहेब सकाळी साडे अकरापासूनच ’जनम जनम’चे शूटिंग करत होते आणि ते एक मिनिट देखील स्टुडिओ सोडून गेलेले नाही हे कोणीही सांगेल!’ रमणकाका रागाने बोलले.
‘मी तुम्हाला बातमी कळली तेव्हा कुठे होते ते फक्त विचारले, कधीपासून होते ते विचारले का? उगाच ओरडून वेळ सांगायची काय गरज आहे मिस्टर रमण?’
‘मी ते असेच बोलून गेलो..’
‘तुम्हाला गाडी चालवता येते?’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर! हा काय प्रश्न आहे?’
‘विश्वास ठेवा युवर ऑनर, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे!’
‘ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड!’
‘रमणकाका तुम्हाला गाडी चालवता येते?’ रमणकाकांनी फक्त रागारागाने धवलकडे पाहिले आणि ते गप्प राहिले.
‘तुम्हाला प्रश्न आवडला नाही का? आपण दुसरा प्रश्न विचारू. विक्रम आणि क्रांतीचे संबंध कसे होते? त्यांच्यात कधी भांडणे व्हायची?’
‘ताईसाहेब जरा रागीट होत्या, पण साहेब कायम त्यांच्याशी प्रेमानेच वागायचे..’
‘प्रेमाने? इतके प्रेमाने की त्यांनी तुमच्या ताईसाहेबांचा पार मुडदा पाडला?’ पिंजर्यावर हात आपटत धवल विचारता झाला आणि दचकून रमणकाका चार पावले मागे सरकले आणि पडता पडता वाचले. कोर्टात एकच हलकल्लोळ उडाला. कोर्टाबाहेर पळण्याचा प्रयत्न करणार्या विक्रमला पोलिसांनी तिथेच जेरबंद केले. सगळे शांत होऊन कोर्टाचे काम सुरू व्हायला तब्बल अर्धा तास गेला.
‘युवर ऑनर हा सगळा काय मामला आहे ते मी कोर्टासमोर आणतो. विक्रम आणि क्रांती हे जगासमोर कितीही आदर्श जोडपे असले, तरी विक्रमच्या बाहेरख्यालीपणामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत. अशातच विक्रमचे नवे लफडे क्रांतीला कळले आणि तिचा तोल सुटला. तिने विक्रमला घटस्फोट देण्याचे नक्की केले. आता मात्र विक्रमचे धाबे दणाणले; कारण क्रांतीवर किती प्रेम आहे हे दाखवण्याची लटपट करण्याच्या प्रयत्नात, त्याने बहुतांश कमाई क्रांतीच्या नावाने गुंतवलेली होती. त्यातच क्रांतीने मुंबईतली तिच्या नावावरची सर्व मालमत्ता विकून माहेरी, म्हणजे उटीला जाण्याचा निर्णय घेतला. ह्याच संदर्भात तिची आणि अजय गणात्राची भेट झाली. अजयने तिला तिच्या इतर मालमत्ता देखील विकण्यात मदत केली आणि ह्याच काळात त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. विक्रमच्या रागात आता तेल ओतले गेले. खुनाच्या दिवशी देखील अजयचा दुपारी तिला भेटायला येत असल्याचा फोन आला आणि त्यांच्यात सकाळी असेच वाद झाले आणि रागाच्या भरात विक्रमने क्रांतीचा गळा आवळला. अनावर रागात आपण काय करून बसलो हे त्याच्या क्रांतीचे प्राण गेल्यावर लक्षात आले. हादरलेल्या विक्रमला आता एकच आसरा होता, तो म्हणजे रमणचाचा. नशिबाने विक्रमची बुद्धी चालली आणि दोन वर्षापूर्वी केलेला एक गुन्हेगारी चित्रपट त्याला आठवला. त्याने तातडीने रमणकाकाला पाठवून त्याच्या जुन्या व्हॅनमधून शेजारच्या आइस फॅक्टरीमधून बर्फाच्या लाद्या मागवल्या. क्रांतीचे प्रेत बाथरूममध्ये टाकून त्याने प्रेताभोवती बर्फाच्या लाद्या रचल्या आणि तो शूटिंगला रवाना झाला. अजयची गाडी दुपारी बंगल्यात शिरली आणि ठरल्याप्रमाणे हातात पिशवी घेत रमणकाका बाहेर पडले. जजसाहेब बर्फ शरीराचे तापमान नियंत्रित करतो हे आपण सगळे जाणतोच. बर्फाच्या लाद्या दोन एक तासात वितळल्या आणि पाणी बाथरूममध्ये वाहून गेले, पण त्यामुळे पोस्टमॉर्टेममध्ये खुनाची वेळ तीन चार तास पुढे गेली आणि सगळा संशय अजयवर गेला. त्या काळात विक्रम स्टुडिओमध्ये असल्याने त्याच्यावर कोणाचा संशय जाणे शक्यच नव्हते.’ धवलने आपले वाक्य पूर्ण केले आणि मीडियाच्या फ्लॅश कॅमेर्याने कोर्ट लखलखले.
—-
‘च्यायला धवल्या, ते बर्फाचे तुझ्या लक्षात कसे आले पण?’ राणा पोह्याचा मोठा बकणा भरता भरता विचारता झाला.
‘प्रेत बघायला आपण बाथरूममध्ये शिरलो बघ, तेव्हाच मला प्रचंड थंडावा जाणवला होता. सगळा बंगला नॉर्मल असताना, फक्त बाथरूम कसे गारेगार? म्हणून मी बूट काढून फरशी देखील तपासली, तर ती देखील एकदम थंड होतील ’आइस कोल्ड’..’ डोळे मिचकावत धवल म्हणाला आणि राणाने त्याच्यासमोर हातच जोडले.