• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्माईल प्लीज

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 7, 2022
in कहीं पे निगाहें...
0

हल्लीच एका केंद्रीय मंत्र्याने आणि एका सत्ताधारी खासदाराने द्वेषमूलक भाषण केल्याबद्दलच्या खटल्याचा निकाल देताना तुम्ही म्हणजे न्यायालयाने म्हटले आहे की जर तुम्ही हसर्‍या चेहर्‍याने असं काही बोलत असाल, तर त्याला गुन्हा मानता येणार नाही. हसत हसत केलेलं द्वेषमूलक विधान हा गुन्हा ठरत नाही.’ युअर ऑनर तमाम हसमुख गुन्हेगारांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.
– – –

माय लॉर्ड, चेहर्‍यावरील स्मितहास्याची एक वक्र रेषा आयुष्यातील कित्येक वाकड्या रेषांना सरळ करते, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. हसणार्‍या माणसाच्या भोवती सकारात्मक ऊर्जा तयार होते हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. पण एखादा गुन्हा करतेवेळीसुद्धा आपण हसत असू तर आपला गुन्हा हा गुन्हा मानलाच जाणार नाही अशा अमृतकाळात आपण सर्वांनी नुकताच प्रवेश केला आहे. याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन!
द्वेषपूर्ण वक्तव्य केल्यामुळे समाजा-समाजांत तेढ निर्माण होते आणि त्यातून दंगली किंवा मोठे गुन्हे होण्याची शक्यता बळावते. असा आजवर आमचा समज होता. माय लॉर्ड, हल्लीच एका केंद्रीय मंत्र्याने आणि एका सत्ताधारी खासदाराने द्वेषमूलक भाषण केल्याबद्दलच्या खटल्याचा निकाल देताना तुम्ही म्हणजे न्यायालयाने म्हटले आहे की, ‘तुम्ही एखाद्या समाजाच्या भावना दुखविणारं, समाजात तेढ माजविणारं किंवा आक्षेपार्ह बोलत असाल, तर तो गुन्हा ठरू शकतो. पण जर तुम्ही हसर्‍या चेहर्‍याने असं काही बोलत असाल, तर त्याला गुन्हा मानता येणार नाही. हसत हसत केलेलं द्वेषमूलक विधान हा गुन्हा ठरत नाही.’ युअर ऑनर, गुन्हा करताना हसल्यामुळे अपराधमुक्त ठरलेल्या आणि भविष्यात अपराधमुक्त ठरणार्‍या तमाम हसमुख गुन्हेगारांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. हसत हसत गुन्हा करूनही कोर्टकचेरी कराव्या लागलेल्या किंवा शिक्षा भोगाव्या लागलेल्या गुन्हेगारांनाही तुमचा हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा अशी मी माननीय न्यायालयाला विनंती करतो आणि यापुढे मी एकच सांगू इच्छितो की, कायद्याच्या बरगड्या सगळ्याच न्यायाधीशांकडे असतात, पण न्यायाची कूस असलेले तुमच्यासारखे न्यायाधीश फार थोडे असतात!
माय लॉर्ड, आम्हाला ठाऊक आहे की, कोर्टाचा कारभार जरा अजबच असतो. ज्यांना पूर्ण सत्य ठाऊक असतं, ते वादी-प्रतिवादी बनून खोटेनाटे दावे करीत राहतात. खर्‍याखोट्याची पर्वा न करता, जो कोणी पैसे देतो त्याच्या बाजूने बोलणारे स्वतःला वकील म्हणवतात आणि ज्याला काहीच माहिती नसतं, त्या बिचार्‍या न्यायाधीशाला न्याय करायला सांगतात! उपरोक्त निर्णय तुम्ही या न्यायालयीन कारभाराला वैतागून दिलेला नसून पूर्ण विचारांती, दूरदृष्टीने दिला असावा असा माझा विश्वास आहे.
हसल्याने माणसाचे रक्ताभिसरण चांगले होते, रोग प्रतिकारक शक्ती सुधारते, शांत झोप लागते, शरीरात इंडोर्फिन हार्मोन स्त्रवते, त्यामुळे आपल्याला सकारात्मक वाटू लागते. हसल्याने चेहर्‍याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि अँटी-एजिंगला मदत होते. कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे स्थूलता कमी होते. श्वसनक्षमता सुधारते. शरीराची एनर्जी लेव्हल चांगली राहते. हे सगळे हसण्याचे फायदे आम्ही थोडेफार शाळेत आणि बरेचसे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत शिकलो आहोत. पण युअर ऑनर, एखादा गुन्हा करताना हसल्यामुळे त्या गुन्ह्याची आणि त्यासाठी होणार्‍या शिक्षेची तीव्रता कमी होऊ शकते हे नवीन ज्ञान आमच्यासाठी पथदर्शक आहे. हसत हसत गुन्हा करून त्याची तीव्रता कमी करण्याचं हे ज्ञान, ही माहिती गेली सत्तर वर्षे आमच्यापासून दडवून ठेवण्यात आली होती. वास्तविक अशी वर्षानुवर्षे दडवून ठेवलेली माहिती बॉलीवूडी सिनेमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याची चालू रीत मोडून तुम्ही हा ज्ञानाचा चेंडू थेट तुमच्या कोर्टातून जनतेच्या कोर्टात टाकल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.
युअर ऑनर, तुम्ही पुढे असंही म्हणालात की, ‘निवडणुकांच्या काळात दिलेलं भाषण हे सामान्य परिस्थितीत केलेल्या भाषणापेक्षा फार वेगळं असतं. कधीकधी तसा हेतू नसला, तरी फक्त वातावरण निर्माण करण्यासाठी देखील विधानं केली जातात’. निवडणूककाळात दिलेली भाषणे आणि त्याद्वारे केलेली अच्छे दिनांची वातावरणनिर्मिती हा चुनावी जुमला असतो, असा पंधरा लाखमोलाचा धडा आम्ही ऑलरेडी शिकलो आहोतच. आता न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केल्याने पारदर्शक कारभाराच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलेले आहे. माय लॉर्ड, आम्ही आजवर आंधळ्या न्यायदेवतेने हातात धरलेला एकच तराजू पाहिला होता. पण निवडणुकीचा काळ आणि इतर काळ अशा सेटिंग्ज बदलता येणारा भंगारवाला टाईप काटाही न्यायदेवतेच्या कमरेला खोवलेला असतो, हे तुमच्या कृपेनेच आमच्या लक्षात आलेले आहे.
युअर ऑनर, प्रत्यक्ष आयुष्यात आमचा सराईत गुन्हेगारांशी फारसा संबंध आलेला नसला तरी सिनेमातल्या गब्बरसिंग,
मोगॅम्बो या गुंडांना, गुन्हा करते वेळी खळखळून हसताना आम्ही पाहिले आहे. शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर यांच्यासारख्या सराईत वासू लोकांना बलात्कार करतेवेळी छद्मी हसतानाही आम्ही पाहिले आहे. गुन्हा करताना हसण्याची दक्षता घेऊनही सिनेमाच्या शेवटी त्यांना मार खावा लागला किंवा शिक्षा भोगावी लागली, त्याबद्दल, तसेच नायकाकडून खलनायकाला चोपण्याच्या त्या सीनला आम्ही टाळ्या वाजविल्या याबद्दल आज आमच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली आहे.
‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एकाही निर्दोषाला शिक्षा व्हायला नको’, हे न्यायदानाचं तत्व आऊटडेटेड ठरवून, ‘गंभीर चेहर्‍याने गुन्हा करणारे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण हसत हसत गुन्हा करणार्‍या एकाही गुन्हेगाराला शिक्षा व्हायला नको’, या नवीन न्यायतत्वाची प्रतिष्ठापना केल्याबद्दल तुमचे नाव न्यायालयीन इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. गुन्हेगार हे न्यायालयाचे ग्राहक आहेत. त्यामुळे आजच्या ग्राहक-केंद्रित व्यवस्थेत, तुमच्यासारख्या ग्राहकांच्या (म्हणजे गुन्हेगारांच्या) हिताची काळजी घेणार्‍या न्यायाधीशांची देशाला गरज आहे. भारतीय न्यायालयांना ग्राहकाभिमुख करण्यात तुमचे योगदान, सोफ्यात बसलेल्या पोराने तंगड्या उचलून घराच्या साफसफाईत दिलेल्या योगदानाइतके महत्वाचे आहे.
माय लॉर्ड, माझ्या आजच्या या लिहिण्या-बोलण्यामुळे न्यायालयाची बेअदबी झाली असण्याची आणि त्यामुळे मी शिक्षेस पात्र ठरण्याचीही शक्यता आहे. पण एक महत्वाची बाब मी माननीय न्यायालयाच्या लक्षात आणू देऊ इच्छितो की, आज अगदी ठरवून न्यायालयाची बेअदबी करीत असताना देखील माझ्या चेहर्‍यावर सतत स्मितहास्य होते, अजूनही मी हसत आहे आणि युअर ऑनर, तुम्हीच दिलेल्या निकालानुसार हसत हसत केलेला गुन्हा हा गुन्हा मानला जाऊ नये!
आय रेस्ट माय केस युअर ऑनर!

[email protected]

Previous Post

कलेजी-पेठा-खिम्याची बहार

Next Post

आइस कोल्ड

Next Post
आइस कोल्ड

आइस कोल्ड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.