इम्रान खान
जनता म्हणते क्लीन बोल्ड होणार
मी म्हणतो, पुन्हा येणार
देवेंद्रांसारखी जिद्द माझी
एक रात्र तरी पीएम होणार
माझी विकेट घेण्यासाठी
टपले होते विदेशी हात
मतदानातही गडबड करून
करू पाहिला माझा घात
इथला पंतप्रधान कधीच
सन्मानाने जात नाही
इथे फाशी जाण्यापेक्षा
देश सोडण्याची मला घाई
—– —– —–
पुतीन
माझ्याबद्दल काहीही अफवा
उठवतात हे आमचेच लोक
मौजमजेचा आहेच शौकीन
युद्धाचा तर आहेच शौक
दुबळे सावज समजून मी तर
करू पाहिली त्याची शिकार
त्यानेच घेतला जोरात चावा
अनपेक्षित तो होता प्रकार
आमचेच लोक आहेत बदमाश
माझा सर्वांवरती संशय
फक्त भारताने लाज राखली
आणि सत्याचा केला पराजय
—– —– —–
भगवंतसिंग मान
नका म्हणू पंजाबदा सीएम
मी आहे कॉमेडियन
हसवत ठेवील सभागृहाला
सरदारजींच्या जोक्सचे कथन
मोफत वीज, पाणी देणार
केजरीवालांचा पेटंट स्टंट
मोदींकडे का मागतात पैसे
खाजवतो दाढीचे खुंट
लोक पर्याय होते शोधत
म्हणून दिला पंजाब हाती
सिद्दूसारख्या येड्याने तर
आपल्याच पक्षाची केली माती
—– —– —–
भाजपा
निवडणुकीसाठी आम्ही
कशाचेही भांडवल करतो
फायलींचीही धग देऊन
आमची मते शेकवत बसतो
त्यांनाही दुखवून चालत नाही
त्यांच्या दाढ्या चोळत बसतो
त्यांचे रमझान-इफतार पार्ट्या
आमच्या समजून तावही मारतो
जनतेलाच बनवतो उल्लू
धोरण आमचे आहे दुटप्पी
गाल दोन्हीकडेच प्यारे
आलटून पालटून घेतो पप्पी
—– —– —–
मायावती
जरी बसपा झाली उताणी
मतदारांनी पाजले पाणी
भाजपा जिंकून आल्यानंतर
मी तर गायली खुशीने गाणी
अखिलेश हरण्यासाठी मी किती
कमळालाही केली मदत
माझीच मते आली कामी
अखिलेश गेला गाळात सतत
केवढी माझी ताकद महान
मोदी-शहांना माझी कदर
दिली ना त्यानी उपकार स्मरून
राष्ट्रपतीपदाची ऑफर