काही गाजलेल्या नाटकांवर नजर फिरवली तर वस्त्रहरण, यदाकदाचित, ऑल द बेस्ट, टुरटुर, सही रे सही. अशा नाटकांनी नवी समीकरणे रंगभूमीवर सिद्ध केलीत. जरी ‘नाववाले’ ग्लॅमरस कलाकार नसतील आणि नाटकाची निर्मिती सर्व दालनात खणखणीत असेल तर रसिकांचा उदंड प्रतिसाद हा हमखास मिळतोच. हा इतिहास आहे. याच वाटेवरली ही नवी ‘सुंदरा’ आहे.
– – –
नाटककार दत्तात्रय वासुदेव जोगळेकर यांनी १८६७च्या सुमारास काही नाटके दिली. त्यात ‘चित्रसेन गंधर्व’ आणि ‘गुलाबछकडीचा फार्स’ ही दोन नाटके आजही रंगभूमी अभ्यासकांना खुणावतात. १५५ वर्षे लोटली तरी त्यातील विषय हा नव्या चष्म्यातून बघण्यासाठी नाटककार, दिग्दर्शक प्रयत्न करतात. यातील ‘सुस्त्रीचातुर्यदर्शन प्रहसन उर्फ गुलाबछकडीचा फार्स’ हे भलेमोठे शीर्षक असलेले नाट्य. जो एक फार्सशैलीतला प्रकार. त्यातील विषयाच्या वनलाइनवर कल्पक दिग्दर्शक नाटककार संतोष पवार यांनी साज चढवून ‘सुंदरा मनात भरली!’ या नाट्याला २०२२ या वर्षात जन्म दिलाय. १८६७ ते २०२२ अशा प्रदीर्घ मध्यंतरानंतरही यातील नाट्य नव्या पिढीलाही गुंतवून ठेवतेय.
वयोवृद्ध पतीच्या मनातील ‘संशयकल्लोळ’ निवारणासाठी एक हुशार व सुंदर तरुणी मारवाड्याची दागिन्यांची पेटी गडप करते, लपवून ठेवते आणि मग राज्याचा फौजदार, न्यायाधीश, प्रधान आणि महाराजा या सार्यांना आपल्या घरी येण्यास भाग पाडते. त्यांची त्यातून फटफजिती उडते. ती स्वार्थही जपते, अशा कथानकावरले हे मूळ नाट्य. नाट्यशिक्षक डॉ. कृ. रा. सावंत यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या नाट्यशिक्षण केंद्रातर्फे एक अभ्यासपूर्ण नाट्यकृती म्हणून ते सादर केले होते. त्या नाट्यनिर्मितीमागे नाट्यशिक्षण हे उद्दिष्ट होते, पण आता हे नाट्य नव्या संकल्पनेत मांडून व्यावसायिक रंगभूमीवर पेश केलंय. नाट्यसंहितेचा दस्तऐवज म्हणून या दोन्ही संहिता नाट्य अभ्यासकांसाठी रंगप्रवासातील बदलांच्या साक्षीदार ठरतील. दोघांचा तुलनात्मक विचार करता रंगभूमीची स्थित्यंतरेही नजरेत भरू शकतात.
नव्या कथानकात ‘संतोष टच’ आहेच. राजदरबारात नाट्य बहरतं. राजा, प्रधान, कोतवाल, न्यायाधीश ही मंडळी लोकनाट्यातून इथे आलीत. राज्यकारभार चालविणारे तिघे जबाबदार अधिकारी पुरते स्त्रीलंपट. कसंही करून पद सांभाळणं हे त्यांचं एकमेव काम. राजदरबारातील नर्तकी नोकरी सोडून गेलेली. राज्यावर जणू आभाळ कोसळलेलं. अखेर गुलाबबाई या राजनर्तकीला निमंत्रित केले जाते. या राजकारभारातील सावळ्या गोंधळात गंगाराम हा शिपाई हजर आहे. नव्या नर्तकीला हे तिघेजण त्रास देतात. पण गंगाराम आणि गुलाब यांची जवळीक निर्माण होते आणि ते बेत आखतात. स्वार्थी अधिकार्यांविरुद्ध डाव रचतात. आणि तिघा प्रशासकीय प्रमुखांना रंगेहाथ पकडण्यात येते. राजाला धडा शिकविला जातो. यात एक ‘सुंदरी’ही प्रगटते…
एकूणच लोकनाट्याचा बाज, तो ‘विच्छा माझी पुरी करा’ या शाहीर दादा कोंडके यांच्या शैलीशी पक्कं नातं सांगणारा आणि शेवटी ‘अन्यायाला लाथ अन् सुंदराची साथ’ असे सांगणारा! ‘गुलाबछकडीचा फार्स’ अशा प्रकारे नव्या बदलात उभा करता येतो, याची प्रचिती एकूणच सादरीकरणात येते. पण नाटकाचा आस्वाद घेताना कुठेही तर्कशास्त्र, युक्तिवाद याची जुळवाजुळव न करता निव्वळ शंभर टक्के मनोरंजन, विरंगुळा म्हणून या नाट्याकडे बघावे लागेल. ‘यदाकदाचित’चा फॉर्म इथल्या ‘सुंदरा’तही पुढे कायम आहे. रामायण-महाभारत यातल्या व्यक्तिरेखांऐवजी लोकनाट्यातील ‘राजा-प्रधान-शिपाई’ इथे प्रगटलेत. लेखक-दिग्दर्शक म्हणून कुठेही संभ्रम मनात न ठेवता, नाटक सज्ज केलंय. त्यामागे असलेले परिश्रम हे प्रयोगातून नजरेत भरतात. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक एका उंचीवर पोहोचतो. वेषांतर, रूपांतर नाट्यही ‘पवारपॉवर’चा करिष्मा दाखविते. विनोदी नाटक बघण्यास आलेल्या रसिकांची नेमकी नस पकडण्यात दिग्दर्शकासह सारेजण यशस्वी ठरतात.
नमुनेदार ठळक व्यक्तिरेखा हे या नाट्यातले एक वैशिष्ट्यच. एकेक भन्नाट नकलाच. अगदी रंगभूषा-वेशभूषा इथपासून ते देहबोलीपर्यंत त्यातलं वेगळेपण पटकन् हसविणारं. स्वतःला ‘हिज हायनेस’ असं वदवून घेणार्या प्रशासकीय प्रमुखांमध्ये प्रधानजी हा ‘व्हाइसरॉय’ समजतो. त्यात हृषिकेश शिंदे यांची चाल हसें वसूल करते. कोतवाल उर्फ लेफ्टनंटच्या भूमिकेत रामदास मुंजाळ शोभून दिसतो. न्यायाधीश बनलेला प्रशांत शेटे जणू ब्रिटीश काळातल्या जज्जच्या गेटअपमध्ये वावरतो. हे तिघेजण स्त्रीलंपट म्हणूनही नजरेत भरतात. लावण्यांनी हा खेळ रंगविणारी नृत्यांगणा उर्फ राजनर्तकी गुलाबच्या भूमिकेत स्मृती बडदे हिने जोरदार नृत्याविष्काराने लावण्यांच्या दर्दींकडून हक्काचे ‘वन्समोअर’ वसूल केलेत आणि सर्वात कळस म्हणजे गंगाराम शिपाई आणि ‘गुपित’ म्हणजे एक ‘वेषांतर’ असलेले संतोष पवार! याने कुठेही जराही उसंत व मोकळी जागा न ठेवता नाट्य वेगवान नेण्यास मदत केलीय. त्यांच्यासोबत एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा विकास समुद्रे याने महाराजाचा मुखवटा चढविला आहे. ‘विकास आणि संतोष’ या दोघांत असलेला अभिनयातील लवचिकपणा तसेच उत्स्फूर्तपणा यामुळे नाट्य रंगतदार बनलंय. या नाट्यात दोन ‘सुंदरी’ आहेत. दुसर्या अंकात दुसरी सुंदरी कशी? कोण? का? सारा संतोष फॉर्म्युला. याचं सिक्रेट प्रत्यक्ष बघणंच उत्तम. नाहीतर उत्कंठा संपण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रसंगापासून जो काही धुमाकूळ या ‘टीम’ने घातलाय तो दे धम्मालच!
पडद्यामागेही निर्मितीला पुरेपूर न्याय देणारी तयारीची आघाडी आहे. ‘राजा-प्रधान’ असूनही ब्रिटीश काळात घेऊन जाणारी वेशभूषा ही मंगल केंकरे याने जुळवली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना देखील अनुकूल दिसते. राजदरबार आणि वाडा हे नेपथ्यबदल कल्पकतेने उभे करण्यास नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी कमाल केलीय. रंगसंगतीही उत्तम. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिलेले संगीत तसेच नंदेश उमप यांची एक लावणी या देखील यातील सादरीकरणात नोंद घेण्याजोगा बाजू ठरतात.
काही गाजलेल्या नाटकांवर नजर फिरवली तर- वस्त्रहरण, यदाकदाचित, ऑल द बेस्ट, टुरटुर, सही रे सही, अशा नाटकांनी नवी समीकरणे रंगभूमीवर सिद्ध केलीत. जरी ‘नाववाले’ ग्लॅमरस कलाकार नसतील आणि नाटकाची निर्मिती सर्व दालनात खणखणीत असेल तर रसिकांचा उदंड प्रतिसाद हा हमखास मिळतोच. हा इतिहास आहे. याच वाटेवरली ही नवी ‘सुंदरा’ आहे.
संतोष पवार यांची नाटके म्हणजे अजब रसायनांनी जशी गच्च भरलेली. कोरोनाच्या मध्यंतरानंतर सध्या त्याची तीन नवी नाटके रंगभूमीवर आलीत. त्यात ‘फॅमिलीची गंमत आहे’ यात त्याचे लेखन-दिग्दर्शन असून ‘हौस माझी पुरवा’ आणि ही ‘सुंदरा’ यात भूमिकेसह हजर आहे. प्रत्येक नाटक म्हणजे हसविण्याचा त्यांचा एक कलमी कार्यक्रमच जसा. अॅक्शन ड्रामाच. रसिकांना विचार करायला जराही उसंत तो देत नाही. करमणूक प्रधान नाटकाचे नवे ‘क्रेडिट कार्ड’ ‘सुंदरा’च्या रूपाने रंगभूमीवर आलंय. ज्यातील सोंगाढोंगाने खळाळून हसविणारी ही सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस निश्चितच ठरेल!
सुंदरा मनात भरली
लेखक/दिग्दर्शक – संतोष पवार
नेपथ्य – सुनील देवळेकर
प्रकाश – शीतल तळपदे
शीर्षक संगीत – अशोक पत्की
वेशभूषा – मंगल केंकरे
निर्माते – विनोद नाखवा
सूत्रधार – शेखर दाते
निर्मिती – एकविरा देवी प्रोडक्शन / महाराष्ट्र रंगभूमी