एक अक्षय कुमार असतंय.
ते कामाला युक्रेनला असतंय.
मेडिकल कॉलेजला शिकवायच्या कामाला असतंय.
काम कमी आचरटपणा जास्त आणि फावल्या वेळात डान्स करत असतंय.
लारा दत्ता तेची बायको असत्या.
ती घरवाईफ असत्या.
वाटत नसत्या खरं असत्या.
एक दिवस उडती खबर येत्या की रशियाचं अध्यक्ष कसाबी कुतीन तिकडनं रशियातनं विमानानं उडत येणाराय आणि तेच्या देशातला समदा ओला आणि सुका कचरा विमानातनं खाली युक्रेनात ढकलून देणाराय.
आणि उडत्या खबरीपाठोपाठ घंटागाडी घेऊन कुतीन येतंय बी आणि समदा कचरा फेकून पसार होतंय बी.
कचर्याचा ह्ये मोठ्ठ्या ढिगार्यामुळं समदं विद्यार्थी कॉलेजातच अडकूनशानी बसत्यात.
त्यात दिडशे विद्यार्थी भारतीय असत्यात.
झालं…
अक्षय कुमारचं तळपायाचं मस्तक आगीत जातंय..
ते तिकडनं तडक पेशल रिक्षा करून इंडियन एंबसीत जातंय.
तिथं बाहेर परेश रावल गुरखा असतंय.
ते अक्षय कुमारची नुसती चिंताक्रांत मुद्रा बघूनच काय न विचारता तेला रांग मोडून पयला आत सोडतंय.
आत मिथुन चक्रवर्ती क्लार्क असतंय ते जेवायचा टायम झाला, म्हणून घरला जेवाय गेलेलं असतंय.
झालं…
ते ऐकून अक्षय कुमारचं तळपायाचं मस्तक पुन्यांदा आगीत जातंय.
ते तिकडनं तडक परत पेशल रिक्षा करून मिथुन चक्रवर्तीच्या घरला जातंय आणि तेला उचलून एंबसीत घेऊन येतंय.
घाबरलेलं मिथुनदा भारताला पंतप्रधान कार्यालयाला फोन जोडतंय आणि तिकडनं अनुपम खेर पंतप्रधान फोन उचिलत्यात.
अक्षय कुमार पंप्रस्नी समदी कहानी सांगतंय.. कसं समद्या रशियन घंटागाड्या युक्रेनमधे घुसून समदीकडं कचराच कचरा कराल्यात आणि कसे भारतीय विद्यार्थी अडकून पडल्यात ते सांगतंय.
ते समदं ऐकून अनुपम खेरच्या चष्म्यातनं पण पाणी येतंय.
आणि ते तिकडनं पोरास्नी एअरलिफ्ट कराय अंबानीचं विमान धाडतंय.
मग ते विमान कसं जेएनयूमधे शिकून अतिरेकी झालेलं नसीरूद्दीन शहा मधीच हायजॅक करतंय आणि कसं अजून कचरा गोळा करायला रशियालाच घेऊन जातंय हे जाणण्यासाठी बघा…
‘युक्रेन फाईल्स…’
– पृथ्वीराज नलवडे