कमी भांडवलात जास्त नफा मिळवून देणारा ‘ब्रॉयलर कोंबडी‘ हा व्यवसाय त्यांनी निवडला. अडीअडचणीच्या प्रसंगी अरूणा आणि राजाराम रेडिज हे सासू-सासरे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले होते, इथे पुन्हा त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांची अलिबागला पाच एकर जमीन होती. ते म्हणाले, ‘जावईबापू, तुम्ही धंदा सुरू करा, व्यवहाराचे आपण नंतर पाहू.’ पाचपैकी एक एकर जागेत तात्पुरती शेड उभारली. राणी हॅचरीजमधून कोंबडीची चारशे पिल्लं विकत आणली आणि जयराज या मित्रासोबत व्यवसाय सुरू केला.
– – –
कोंबडी आणि त्यांची अंडी हे नॉन व्हेज खाणार्या मंडळींच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. हजारो लाखो वर्षांपूर्वी गुहेत राहणारे आपले पूर्वज मिळेल त्या प्राण्याची शिकार करून भूक भागवत असत. शेतीचा शोध लागल्यावर मात्र अन्नधान्याचा पुरवठा होऊन काही लोक शाकाहारी झाले, पण जगातील ९० टक्के लोक आजही मांसाहार करतात. कुक्कुटासंबंधीच्या नोंदीमध्ये सर्वात जुनी नोंद भारतातच आहे. चीनमधील एका विश्वकोशामध्ये हा पश्चिमेकडील पक्षी आहे, असा उल्लेख आहे. गंगेच्या काठावर आर्य पोहोचले, तेव्हाचा कुक्कुटासंबंधीचा उल्लेखही आयुर्वेदात आहे. कोंबडीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य (‘बलस्थान’ म्हणणं जरा क्रूरपणाचं ठरेल) म्हणजे कोणत्याही जाती धर्मातील लोकांना चिकन वर्ज्य नाही. इतर अनेक प्राणी यांना प्रिय त्यांना वर्ज्य असे आहेत. कोंबडी कुणाला प्रिय असो नसो, कुणालाच वर्ज्य नाही. याचाच परिपाक म्हणजे कोबड्यांची होणारी तडाखेबंद विक्री. अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अंड्यांचे आणि मांसासाठीच्या कोंबड्यांचे उत्पादन वेगवेगळे करण्याची प्रथा पडत चालली आहे. एका सर्व्हेनुसार भारतात वर्षाला पंच्याऐशी कोटी कोंबड्या आणि ११ हजार कोटी अंडी विकली जातात. या शेतीपूरक व्यवसायात शेतकरी नसलेला एक सरकारी कर्मचारी उतरतो आणि देशातील नामवंत पोल्ट्री फार्ममधे त्याची गणना होते, हे एक आश्चर्यच. हे आहेत दिलीप पाथरे…
…१९६९ साली जुनी मॅट्रिक पास झाल्यावर दिलीप पाथरेंनी ज्या दिवशी कॉलेजला प्रवेश घेतला, त्या दिवशी पायात चप्पल नव्हती, इतकी परिस्थिती बेताची होती. काही दिवसांनी काकांनी त्यांची जुनी चप्पल दिला पण ती साईजने लहान होती. त्याच्यासारखाच अजून एक विद्यार्थी मोठी चप्पल घालत होता. मग हे दोघे मित्र कॉलेजबाहेर भेटून चपलांची अदलाबदल करून कॉलेजला जायचे. कॉलेजला इतर मुलं फुल पँट घालत होते. त्या उमलत्या वयात हाफ पँट घालायला दिलीपला लाज वाटायची, तेव्हा मावशीने मुंबईहून फुल पँट पाठवली. गावापासून कॉलेज दूर होतं. रस्त्याने जाताना एकाने दिलीपला ओरडून सांगितलं, ‘अरे सायकलवरून पँट घालून जातोस? अशाने पँट फाटेल ना’. मग दिलीप त्याची एकुलती एक फुल पँट डोक्याला गुंडाळायचा आणि कॉलेजजवळ गेल्यावर झाडाच्या आडोशाला पँट बदलायचा…
या गोष्टीला अनेक वर्षं लोटली… आज परिस्थिती बदलली आहे… दिलीप २०१३ साली नोकरीतून निवृत्त झाले. मुलानातवंडांनी घर भरलंय, गरिबीचे चटके सोसलेल्या अनवाणी पायांना आराम मिळालाय. सत्तरीकडे वय झुकलंय तरी कामाचा उत्साह तरुणाला लाजवेल असा, राहणीमान अगदी साधं सरळ, कसलाही ताम झाम नाही की आत्मप्रौढी नाही, बोलायला अगदी तुमच्या माझ्यासारखा साधा माणूस. फरक आहे तो आकड्यांच्या जगात… त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर शंभर कोटी रुपये आहे.
पाथरे यांचा जन्म ७ डिसेंबर १९५३ रोजी रायगड जिल्ह्यातील नाते गावात झाला. घरची श्रीमंती, वडिलांचे सुपर मार्केट म्हणावं असं दुकान. लुगडी, धोतर, भांडी, किराणा अशा त्या काळातील सर्व वस्तू मिळण्याचं हक्काचं ठिकाण. इतक्या वस्तू विकायला ठेवायच्या, त्याचा व्यापही तितकाच मोठा असणार. पण हे सगळं दिलीप यांचे बाबा एकटेच पाहायचे, अगदी चोवीस तास कमी पडतील अशी मेहनत. डोक्यात, मनात, कागदावर पै पै चा हिशेब मांडलेला. शेवटी मेंदू थकला आणि बाबांच्या मनावर परिणाम झाला. चांगलं चालणारं दुकान बंद झालं. घरावर हलाखीची परिस्थिती ओढवली. दिलीप तेव्हा शाळेत शिकत होते. त्याच्या काकांनी जमेल तशी मदत केली. आईच्या प्रबळ इच्छेमुळे मॅट्रिक पास केली, महाड या तालुक्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधून बी.कॉम. डिग्री मिळवली. या दिवसांबद्दल दिलीप सांगतात, ‘‘मी दरवर्षी पास होणं भाग होतं, कारण नापास झालो असतो तर शिक्षण कायमचं थांबलं असतं. लहान भावंडांची जबाबदारी अंगावर होती. चार पैसे कमावून घरी हातभार लावण्यासाठी अनेक उद्योग केले. महाडला वाचनालय होतं. तिथून जुनी पुस्तके आणून गावात स्वामी विवेकानंद लायब्ररी सुरु केली. एका मित्राच्या वडिलांकडे गोटी सोडा बनवायची मशीन पडून होती. ती आणून घराबाहेर ‘तृप्ती कोल्ड्रिंक्स‘ सुरु केलं. असे अनेक व्यवसाय करत होतो. त्यातून जुजबी पैसे मिळत होते. पण मोठी यशप्राप्ती मात्र होत नव्हती, कारण कोणताही धंदा लांबून पाहताना त्यात भरपूर फायदा दिसतो पण तो धंदा करायला लागल्यावर मात्र त्यातील खड्डे दिसायला लागतात. निरनिराळ्या धंद्यातील अनुभव गाठीशी बांधत शिक्षण पूर्ण केलं आणि उज्ज्वल भवितव्यासाठी मुंबई गाठली.
शिवडीला मावशीकडे उतरलो. मुंबईला आल्यावर धंदा करावा अशी इच्छा होती, पण राहण्या-खाण्याचं पक्कं ठिकाण नाही, भांडवलाचा पत्ता नाही; त्यामुळे आधी नोकरी मिळविण्याच्या खटपटीला लागलो. शशी मामांच्या ओळखीने पहिली नोकरी ‘ईसी टीव्ही‘मध्ये मिळाली, गेट वे ऑफ इंडियाजवळ ऑफिस होतं. कामावर दिवस भरला तर आठ रुपये मिळायचे. त्यात एक गंमत होती, सोमवार ते शनिवार कामावर आलो, तरच रविवार भरून मिळायचा. एक दिवस सुट्टी म्हणजे सोळा रुपये नुकसान. काय बिशाद होती माझी एकही दिवस खाडा करायची! पगार झाला की मुंबईचा खर्च भागवून पैसे गावी पाठवायचो. नोकरी सुरू असताना सरकारी नोकर्यांच्याही परीक्षा देत होतो. अभ्यासात फार हुशार नव्हतो पण मेहनतीला कधीही कमी पडलो नाही.
जवळपास शंभर परीक्षा दिल्यानंतर १९७५ साली आयकर विभागात नोकरी मिळाली. पहिली पोस्टिंग चर्चगेटला आयकर भवनात मिळाली. गावी शिकून आलेल्या मुलात शहरी स्मार्टनेस थोडा कमी असतो. आमच्या विभागात दाक्षिणात्य ऑफिसर्सचा भरणा अधिक होता. त्यातील काही जुना स्टाफ माझी गावंढळ म्हणून खिल्ली उडवत होता. ते पाहून स्पोर्ट्स कोट्यातील विकी गोरक्ष, काशिनाथ जाधव या आमच्या मराठी स्टाफने माझी बाजू घेतली. या सर्व खेळाडू मंडळींचा ऑफिसमधे दरारा होता. त्या दिवसापासून माझ्या वाटेला कुणी गेलं नाही.
नोकरी मिळाल्यावर अनेक ठिकाणाहून स्थळं यायला लागली. लग्न जुळविताना बायको नोकरी करणारी हवी ही माझी एकमेव अट होती. दोघांच्या पगारात संसार सांभाळून काहीतरी धंदा करता येईल हा उद्देश होता. १४ डिसेंबर १९७८ रोजी भारती राजाराम रेडीज या मुंबई महानगरपालिकेतील शिक्षिकेसोबत माझं लग्न ठरलं. मुंबईत लग्नाचा खर्च अधिक होईल म्हणून लग्न गावी लावलं, सर्व मिळून नऊशे रुपये खर्च आला. सासर्यांनी लग्नाच्या कोटाला पैसे दिले होते. पण एक दिवस घातल्यावर तो पडून राहतो, म्हणून नुकतंच लग्न झालेल्या मोहन शिंदे या मित्राचा कोट घेतला, त्या रंगाची पँट शिवून घेतली आणि लग्नाला उभा राहिलो. ‘इन्कम वाढत नसेल तर खर्च कमी करावा’ हा माझा व्यावहारिक जीवनमंत्र आहे.
लग्न लागलं, काही दिवस सासुरवाडीला राहिलो. कुणी घरजावई म्हणून हिणवलं तरी लक्ष दिलं नाही. मला माहित होतं की मला काही इथं कायमचं राहायचं नाही, फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. सासर्यांनी पाहिलं की या जावयाचे काही नखरे, मानपान नाही. त्यांनी माझ्यावर मुलासारखी माया केली. त्यांच्याकडे असलेली टॅक्सी त्यांनी मला चालवायला शिकवली,
कामावरून परतल्यावर मी ती टॅक्सी चालवायचो. दीडशे रुपये धंदा व्हायचा, शंभर रुपये खर्च काढून मला पन्नास रुपये मिळायचे. असेच काही दिवस गेले. माझ्या मोठ्या बहिणीने नवीन फ्लॅट घेतला तेव्हा तिच्या माझगाव चाळीतील घरात आमचा संसार शिफ्ट झाला.
नोकरीसोबत काहीतरी जोडधंदा हवाच या निर्धाराने मी रोज नवनवीन व्यवसायाची माहिती घ्यायचो, असंच कोणाकडून तरी पेनातील रिफिलच्या व्यवसायाबद्दल कळलं. त्या कंपनीच्या ठाणे फॅक्टरीमधून चार हजार रुपये देऊन मशीन आणि रॉ मटेरियल विकत आणलं. हाताने रिफिलची निब बसवत होतो. कोणतीही निवडणूक नसताना बोटांना शाई लागायला लागली. सुरुवातीला माल विकला गेला, पण रिपीट ऑर्डर घ्यायला गेल्यावर रिफिलमधून शाई लीक होतेय अशा कंप्लेंट्स
यायला लागल्या. ऑटोमॅटिक मशीनची क्वालिटी या मशिनला येणार नाही हे कळलं. धंदा बुडाला आणि मशीन कोपर्यात जाऊन पडली. नंतर छोटे मोठे उद्योग सुरूच होते. १९८७च्या सुमारास आयुष्याला कलाटणी मिळाली. माझा मित्र जयराज खामकर मला अरविंद बने या त्याच्या मेव्हण्याचा पोल्ट्री फार्म दाखवायला पनवेलला घेऊन गेला. हा धंदा पाहून वाटलं, हे काम कोणतीही वस्तूनिर्मिती करण्यापेक्षा सोपं आहे. या कोंबड्या तर माणसासारख्या स्वतःहून दोन पायावर चालणार्या आहेत, निसर्ग त्यांना मोठं करतोय, आपल्याला फक्त त्यांची देखभाल करावी लागते.”
कोंबडी पालन व्यवसाय करण्यापूर्वी दिलीप यांनी या धंद्याचा संपूर्ण अभ्यास केला. मांसासाठी ब्रॉयलर कोंबडी आणि अंड्यांसाठी लेयर कोंबडी पाळली जाते. कोंबड्यांचं वास्तविक आयुर्मान पाच ते दहा वर्ष असतं, पण व्यावसायिक मागणीप्रमाणे कोंबड्यांच्या जाती संकरित केल्या आहेत. सहा महिन्यानंतर कोंबडी वयात आल्यावर सरासरी दीड दिवसाला एक अशा प्रमाणात अंडी घालायला सुरुवात करते. तिने ही अंडी देण्यासाठी नराची गरज नसते. फलन न झालेली अंडी असल्यामुळेच अनेक लोक अंडी शाकाहारी समजावीत असं म्हणतात. नरासोबत मेटिंग झाल्यावर कोंबडी जेव्हा फलित अंडं देते, तेव्हा त्यातून पिल्लू जन्माला येतं. अंडं घातल्यावर अंड्यावर बसणार्या कोंबडीला खुडुक कोंबडी म्हणतात. अशी ‘वात्सल्यसिंधू‘ कोंबडाई व्यवसायाच्या दृष्टीने बिनकामाची ठरते. एक अंडं घालून दुसर्या अंड्याच्या तयारीला लागणारी चंचल स्वभावाची, भटक भवानी कोंबडी अंड्यांच्या धंद्यासाठी सर्वोत्तम ठरते. अंड्याचा आकार आणि टणकपणा अंड्यास चांगला भाव मिळवून देतो. लेयर कोंबडी दीड वर्षात साधारण तीनशे अंडी देते. त्यांनतर तिला मांसासाठी विकलं जातं.
९०च्या दशकात कोंबडीविक्रीच्या दुकानात, गावठी, ब्रॉयलर आणि इंग्लिश असा उतरत्या क्रमाने बोर्ड लावलेला असायचा. भाकड झालेल्या व चिवट मांसाच्या सर्वात स्वस्त विकल्या जाणार्या लेयर कोंबड्या म्हणजेच इंग्लिश कोंबड्या होत. मध्यमवर्गाने साथ सोडल्यामुळे इंग्लिश कोंबडी आज गरीब वस्त्यांमध्ये विकली जाते. भारतीय घरात अंडी ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सर्व समयी खाल्ली जातात. त्यामुळे त्यांचा खप प्रचंड मोठा आहे. त्यातच अंड्यांचे दर स्थिर असल्यामुळे या धंद्यात रिस्क कमी आहे. अंडी व्यवसाय खरं तर चांगला आहे, पण अंड्यांसाठी कोंबड्या पाळण्याला जास्त भांडवल लागतं आणि यात गुंतवणुकीचा परतावा देखील कमी आहे.
नोकरी करून बचत केलेल्या पैशात दिलीपना धंदा उभारायचा होता. त्यामुळे कमी भांडवलात जास्त नफा मिळवून देणारा ‘ब्रॉयलर कोंबडी‘ हा व्यवसाय त्यांनी निवडला. ते सांगतात, ‘या धंद्यात नशीब आजमावायचं ठरवलं, पण जागेचा प्रश्न होता. प्रत्येक अडीअडचणीच्या प्रसंगी अरूणा आणि राजाराम रेडिज हे सासू-सासरे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले होते, इथे पुन्हा त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांची अलिबागला पाच एकर जमीन होती. ते म्हणाले, ‘जावईबापू, तुम्ही धंदा सुरू करा, व्यवहाराचे आपण नंतर पाहू.‘ पाचपैकी एक एकर जागेत तात्पुरती शेड उभारली. राणी हॅचरीजमधून कोंबडीची चारशे पिल्लं विकत आणली आणि जयराज या मित्रासोबत व्यवसाय सुरू केला. ‘पिल्लांची देखभाल करण्याकरता मी कामावर काही दिवस रजा टाकली. मदतीला लहान भाऊ प्रशांत पाथरे आणि मेहुणी राधिका नारकर हे दोघे फार्महाऊसवर होते. पिल्ले विकत आणली, त्यांचे लसीकरण, योग्य प्रमाणात खाद्य, शेडचे तापमान, व्हेंटिलेशन, आर्द्रता, उजेड या सर्व बाबींची काळजी घेतली. पंचेचाळीस दिवसात पहिली बॅच तयार झाली. एक किलोचे पिल्लू वाढवायला तेरा रुपये खर्च आला होता आणि विकताना कोंबडीचा दर किलोला वीस रुपये मिळाला. सुरुवातीलाच गुंतवणुकीच्या पन्नास टक्के नफा मिळाला, यामुळे आत्मविश्वास वाढला.
अडचणी आल्याच नाहीत असं नाही. पोल्ट्रीची जागा जंगलात होती, त्यामुळे तरस, रानडुक्कर, साप, विंचू, या वन्यप्राण्यांचा खूप त्रास होता. तसंच वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब असल्यामुळे लहान पिल्लांना ऊब मिळणं कठीण होऊन बसायचं. हवामानात बदल, साथीचे आजार अशा अनेक अडचणींमुळे कोंबड्या मरण्याचे प्रमाण तेव्हा जास्त होतं. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आलं की पोल्ट्रीकडे जाण्याचा मार्ग बंद होत असे. फार्मवर फोनलाइन नव्हती, त्यामुळे संपर्क होत नसे. धंद्यात कधी नुकसान व्हायचं तर कधी फायदा, पण शून्यातून विश्व निर्माण करणार्या माणसाला अडचणींची भीती वाटत नाही. लहानपणापासून मी अनेक बिकट प्रसंगांना तोंड दिलं होतं, त्यामुळे धंद्यात माघार घेण्याचा तर प्रश्नच नव्हता.
काही वैयक्तिक कारणांमुळे जयराज भागीदारी सोडून बाजूला झाला. त्यावेळी नोकरी सोडून या धंद्याला संपूर्ण वेळ द्यावा असं माझ्या मनात नेहमी येत असे, पण कौटुंबिक जबाबदारीमुळे माझी मानसिक तयारी होत नव्हती. कधी धंद्यात तोटा सहन करावा लागला तर नोकरीतून मिळणारे खात्रीशीर उत्पन्न ही एक जमेची बाजू असावी म्हणून तूर्तास नोकरी सोडण्याचा विचार सोडून दिला. नोकरीत मिळणार्या सर्व सुट्ट्यांमध्ये फार्मवर येऊन राहात होतो. याचदरम्यान माझ्यासाठी एक चांगली गोष्ट घडली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना पाच दिवस कामाचा आठवडा जाहीर केला. याचा लाभ घेऊन मी पोल्ट्री फार्मला जास्तीचा वेळ देऊ लागलो. इंडसुझुकी ही मोटरबाइक विकत घेतली. शुक्रवारी कामावरून अलिबागला जायचो, तिथे पोल्ट्रीचे काम पाहायचो आणि सोमवारी परत कामावर रुजू. ऊन, वारा, पाऊस यांना न घाबरता हा सिलसिला अनेक वर्ष चालला. धंदा करताना मेहनतीला पर्याय नसतो. मी नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असताना संसाराची सर्व जबाबदारी माझी बायको माधवीने उत्तम प्रकारे पेलली. धंदा चांगला वाढत होता. चारशे कोंबड्यांपासून सुरु केलेला व्यवसाय आता १५ हजार कोंबड्यांवर आला होता. दोन्ही मुले चांगली शिकून मोठी झाली. मोठा मुलगा ओंकार याने लंडनला मास्टर्स केलं व तिथेच आय टी क्षेत्रात उच्चपदावर नोकरीला लागला, लहान मुलगा कुणाल याला जिमची आवड होती, शिक्षण पूर्ण करून तो नवीन जिम सुरु करायचं म्हणत होता. मी त्याला विरोध केला नाही, आताची तरुण पिढी खूप हुशार आहे, त्यांना कुणी विरोध केलेला आवडत नाही. मी प्रेमाने त्याला सांगितले, तू जिम व्यवसायाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनव. मग आपण चर्चा करूया. त्याने अभ्यास करून सर्व माहिती जमा केली आणि तो माझ्याकडे आला. आमच्या चर्चेतून काही मुद्दे समोर आले, या धंद्याला जितकी गुंतवणूक करावी लागते त्या तुलनेत नफा फारच कमी आहे. या क्षेत्रातील अनेक नामवंत ब्रँड आज कर्जात बुडाले आहेत. यात दिखावा आहे, पण प्रॉफिट नाही, साधी व्यायामशाळा कमी खर्चात चालू शकते. परंतु त्यातून चांगला नफा कमावता येत नाही. हे सर्व मुद्दे पटल्यावर त्याने हा नाद सोडला. मला आज अनेक तरुण विचारतात, धंदा कोणता करू? मी त्यांना सांगतो, हा प्रश्नच चुकीचा आहे. तुला काय करायचं आहे, याचा सल्ला दुसरा माणूस देऊच शकत नाही. तुला जो धंदा चांगला वाटताे त्याचा आधी अभ्यास कर, अनुभव घे, मगच त्या धंद्यात उतर. धंदा करताना तुमच्यामधल्या विशेष कौशल्यांचा, तुमच्या बलस्थानांचा आणि क्षमतांचा शोध घ्या. या तिन्ही गोष्टींची जाणीव झाली की तुमच्या कार्यक्षेत्रात अत्युच्च यशाच्या दिशेने झेपावण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जो तुमच्यासोबत काम करत आहे, त्यालाही दोन पैसे मिळायला हवेत. व्यवसाय करताना विन विन पोझिशन हवी. आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे, ‘डील विथ अस, प्रोग्रेस विथ अस’.
पोल्ट्री धंदा उभारताना, दिलीप चुकत माकत, अनुभव गाठीशी जमा करत इथवर येऊन पोहचले होते, पण धंद्यातील नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी, नवी झेप घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी होती. हा उद्देश साध्य करण्याकरिता त्यांचा मुलगा कुणाल पुण्यातील वेंकीजच्या आयपीएमटी सेंटरमध्ये गेला. २००५ साली तांत्रिक शिक्षण घेऊन परतल्यावर त्याच्या नवीन विचारांना संधी देत त्याच्यावर धंद्याची जबाबदारी टाकून दिलीप मार्गदर्शकाच्या भूमिकेकडे वळले. व्यापारी कुटुंबात धंदा पुढील पिढीकडे सोपवताना होणारे पराकोटीचे संघर्ष धंद्याला मारक असतात. तरुण पिढीवर मोठ्यांनी दाखविलेला अविश्वास, त्यातून येणारी कटुता यामुळे चालू धंद्याचं नुकसान होतं. नवीन व्यवसाय सुरू करताना नवीन कल्पनांनी, मेहनतीने धंदा वाढतो, पण काही वर्षांनी त्यात साचलेपण येतं, आज प्रत्येक व्यवसायातील स्पर्धा इतकी वाढली आहे की पूर्वी दर दहा वर्षांनी येणारी धंद्यातील आव्हाने आता दर दहा महिन्यांनी येतात, त्यांना तोंड देताना सर्व प्रकारचे हातखंडे वापरावे लागतात.
एक बरं होतं की कुणालला पोल्ट्री धंदा हा काही नवीन नव्हता. शाळेला सुट्टी पडली की अलिबाग फार्म हाऊसवर पाथरे कुटुंबीय राहायला जात असत. लहानपणी फार्ममधे खेळताना कुणाल कुतूहलाने, अंड्यातून पिल्लू बाहेर कसं येतं, त्याला खायला काय देतात, ते मोठं कसं होतं हे पाहत होता, वडिलांना प्रश्न विचारत होता. पुढे जाऊन हा धंदा आपण करू, हा विचार त्याच्या मनात तेव्हा कधी आला नाही, पण आयुष्याच्या एका वळणावर त्याने शहरी सुखसोयीचं मुंबई शहर सोडून अलिबागमधील एका गावात राहण्याचा निर्णय घेतला. आज कित्येक माणसं, गावाकडून शहराकडे नोकरी धंदा मिळवायला जात असताना, शहर ते गाव हा उलटा प्रवास कुणालने कसा केला असेल?
त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना कुणाल म्हणाला, ‘दुसरा कोणताही व्यवसाय करताना मला त्या धंद्याची मुळाक्षरे गिरवावी लागली असती. पोल्ट्री व्यवसायाची बेसिक माहिती मला अवगत होती आणि पुण्याहून तांत्रिक शिक्षण घेऊन आल्यावर तर धंद्यातील असंख्य नव्या वाटा दिसू लागल्या होत्या. बाबांनीही माझ्यावर विश्वास टाकून आता तूच हा धंदा वाढवायचा आहेस असं सांगितलं. धंदा वाढवायचा असेल तर तिथेच जाऊन स्थायिक होण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है‘ असं म्हणून कामाला लागलो. काम सुरू केलं आणि पहिल्या चार महिन्यातच फेब्रुवारी २००६ला भारतात प्रथमच महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू‘ हा रोग पसरल्याची बातमी आली. हा पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. या व्हायरसच्या आठ प्रजाती आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे या आजाराचा संसर्ग होतो. याला एव्हियन एनफ्लूएन्झा म्हणतात. शासकीय प्रोटोकॉलनुसार एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट करावी लागतात. साथ इतक्या झपाट्याने वाढत होती की तेव्हा महाराष्ट्रातील १० लाख कोंबड्या आणि ६० लाख अंडी नष्ट करावी लागली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी, शासनाकडून काही प्रमाणात आर्थिक भरपाई मिळविण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भीती जाऊन कोंबड्यांची मागणी वाढण्यासाठी सहा महिने गेले. पुन्हा शून्यातून धंदा उभा केला.
पोल्ट्री फार्ममधे सर्वात जास्त खर्च कोंबड्यांच्या खाद्याचा असतो. आम्ही बाहेरून खाद्य विकत आणणे बंद करून फार्ममध्येच ‘फीड’ मिल उभारली. कोंबड्यांच्या प्रजननासाठी ब्रीडर फार्म सुरु केला. अंडं घातल्यावर कोंबडी पंख पसरून अंड्यावर बसते, तिच्या शरीराच्या उष्णतेने सुमारे २१ दिवसांत अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. ही झाली पारंपरिक नैसर्गिक पद्धत. अनेक वर्षांच्या संशोधनातून शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबडीच्या अंड्यांना कृत्रिम उष्णता देऊन इनक्युबेटर मशीनच्या साहाय्याने पिल्लं जन्माला घातली जातात, ती हॅचरी सुरू केली. फार्ममध्ये केल्या जाणार्या बदलांना माझे काका, वडील यांचाही पाठिंबा मिळाला. काही बाबतीत वैचारिक मतभेद निर्माण झाले की आम्ही चर्चेने मार्ग काढायचो. फार्म सुरु केला तेव्हापासून बाबांनी स्थानिक लोकांना रोजगार मिळावा याकरिता अलिबाग परिसरातील माणसं कामाला ठेवली होती. आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून काम सुरू असताना देखील ९० टक्के स्टाफ स्थानिक आहे. पिल्ले विकत आणून त्यांना मोठे करून बाजारात विकणे, अशा प्रकारचा ओपन फार्मिंग व्यवसाय आम्ही आधी करायचो. नुकतेच जन्मलेले पिल्लू आणल्यापासून त्याला खाऊ पिऊ घालून मोठे करण्यात पंचेचाळीस दिवस लागतात, त्या दिवशी जो भाव मिळेल तो आपला असतो. दरम्यानच्या काळात नैसर्गिक आपत्ती किंवा काही कारणांनी बाजारभाव घटला तर होणारे नुकसान मोठे असते.
अनेक वर्षांच्या अनुभवाने नफ्यातोटाचं गणित जमवायला आम्ही शिकलो आहोत. परंतु छोट्या प्रमाणात कोंबडी पालन करणारे शेतकरी मोठा तोटा सहन करू शकत नाहीत, मग ते व्यवसाय बंद करण्याचा मार्ग अवलंबतात. अशा शेतकर्यांसाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरु केलं. आम्ही शेतकर्यांना पिल्लं, त्यांचं खाद्य, वैद्यकीय सेवा देतो व ते त्यांच्या फार्मवर पिल्लं मोठी करून आम्हाला विकतात. या कामाची फिक्स रक्कम त्यांना मिळते. आज साडेचारशे शेतकरी आमच्यासोबत काम करत आहेत. कोरोनाकाळात धंद्याला मोठा सेटबॅक मिळाला. लॉकडाऊन सुरु व्हायच्या दोन महिने आधीच कोंबड्यांची मागणी हळूहळू कमी होऊ लागली होती. लॉकडाऊनमधे तर सर्व व्यवसाय ठप्प पडला. आता निर्बंध उठल्यावर पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली आहे. चारशे कोंबड्यांपासून सुरू झालेला हा धंदा आज सहा लाख कोंबड्यांपर्यंत पोहोचला आहे. कोविडनंतर ग्राहकांची फूड हायजिनची वाढती मागणी लक्षात घेऊन, ‘डायरेक्ट टू कस्टमर‘ या विक्रीपद्धतीचा अवलंब करत, ‘कू कुच कू‘ या ब्रँडनेमने ऑनलाइन चिकन विकत आहोत.’
आईने मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती, एका माणसाला रस्त्यात एक अंडं मिळतं. तो विचार करतो, या अंड्यातून एक कोंबडी बाहेर येईल, मग ती भरपूर अंडी देईल, त्यातून पुन्हा कोंबड्या…पुन्हा अंडी…पुन्हा कोंबड्या… ती विकून गाडी, बंगला, नोकर चाकर… याच विचारात तो रमलेला असताना अंडं फुटतं आणि स्वप्नांचा चक्काचूर होतो. अशा स्वप्नात रमणारी अनेक मुलं आपल्याला आजूबाजूला दिसतात. दिलीप पाथरे यांनी नुसतं स्वप्नं पाहिलं नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले. शहरात नोकरी करून देखील गावात व्यवसायाची उभारणी करता येते, हे दाखवून दिलं आणि वडिलांनी सुरू केलेल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेचा साज चढवीत, चिकन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यशस्वीपणे राबवून कुणालने, आत्महत्येचा विचार करणार्या शेतकर्यांना फिक्स इन्कम मिळवून देणारा आशेचा एक किरण दाखवला आहे. तसेच त्याने मामुली दिसणार्या या मुर्गीच्या धंद्यातून चांगलं प्रॉफिट कमविण्याचा फंडा मराठी मुलांना शिकवला आहे.