• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दिवाळी अंकांतील खिडक्यांचा चावट चित्रभ्रम!

- ज्ञानेश सोनार (मोठी माणसं)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 25, 2022
in मोठी माणसं
0

नंतर माझा खिडक्यांचा वारू बेफाम सुटला. नंतर पुण्यातून आणखी एक राजा शिंदे यांचा ‘आवाज’ सुरू झाला. नंतर सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथूनही खिडक्यांचे अंक निघू लागले… आणि या खिडक्या मी एकटा करी. प्रत्येकाचे आशय, विषय वेगळे खिडक्यांसाठी उत्तम रेखाटन देखण्या ललना, कल्पकता व बेमालूम मांडणी यामुळे आलेले खुदकन हसू आवश्यक असे.
– – –

जादुई खिडक्या ही दिवाळी अंकांना मिळालेली चावटपणाकडे झुकणार्‍या व्यंगचित्रांची अद्भुत देणगी. ६०च्या दशकात ‘आवाज’चे संपादक मधुकर पाटकर हे एकमेव या श्रेयाचे मानकरी. मुळात हा चित्रभ्रम अमेरिकेतल्या ‘मॅड’ मासिकातून आलेला. ती चित्र चाळवणारी, रंगीत नसायची. मात्र आवाजने ही चित्रे ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ इतकी छान मेन्टेन केली. या खिडक्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ‘आवाज’ कायम नंबर वन राहिला. यासाठी दोन पाने लागतात. वरच्या पानावर एखादी खिडकी वा की होलचा तुकडा कापलेला असतो. त्या खिडकीतून पान दोनवरचा काही विशिष्ट (बर्‍याचदा स्त्री अवयवाचा) भाग दिसतो. मात्र पान उलटले की, तेथे वेगळेच चित्र असते. भ्रमनिरास होतोच पण हसूही येते. साठ ते ऐंशी सालापर्यंत टीव्ही प्रगत नव्हता. परिणामी दिवाळी अंकांना प्रचंड मागणी असे. अनेक ऑफिसेसमधून दिवाळी अंकांच्या लायब्ररीज चालत. अंकात नामवंत लेखकांच्या कथा असायच्या. जयवंत दळवी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, मंगला गोडबोले, दुर्गा भागवत विद्या बाळ, ‘आनंदी गोपाळ’कार श्री. ज. जोशी, रणजित देसाई, सुभाष भेंडे, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी, ना. सी. फडके, पु. भा. भावे, व्यंकटेश आणि ग. दि. माडगूळकर यांच्या कादंबर्‍या, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट सारख्यांच्या कविता. त्यात दिवाळी अंकासारखे तगडे माध्यम, लिहिणारे सारे तरूण प्रतिभाशाली लेखक, कवी, साहित्याचा तो सुवर्णकाळ या अंकांनी दाखविला. त्यात ‘आवाज’, ‘दीपावली’, ‘मौज’, ‘वाङ्मयशोभा’, ‘ललित’, ‘सुगंध’, किर्लोस्करांची ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ तर अनंत अंतरकर यांची ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ मासिक तसेच पुरुषोत्तम बेहेरेंच्या मेनका प्रकाशनाची ‘जत्रा’, ‘मेनका’, ‘माहेर’, ही बेस्ट सेल असलेली मासिकं. यात महिलांचे, हेरकथांचे, आरोग्यविषयक मासिक हीच मंडळी दिवाळीत त्यांचा दिवाळी विशेषांक काढत. यात व्यंगचित्रांनाच वाहिलेला बाळासाहेबांचा ‘मार्मिक’ दणक्यात निघे. व्यंगचित्रांचा आता दिसतो तो महावृक्ष ‘मार्मिक’नेच जोपासला आहे. पोर्ट्रेट, लॅण्डस्केप्स, स्केचिंग, फिगरेटिव्ह पेंटिंग्जपेक्षा हे विश्व वेगळे होते. विनोदी चेहरे व विषय, मोजक्याच शब्दांमध्ये मांडण्याचे हे तंत्र आमच्या पिढीलाच नवीन होते. याशिवाय बरेच पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे दिवाळी अंक निघायचे. सगळेच छान धंदा करीत. विशेष म्हणजे त्या काळी कथाचित्रे (इलस्ट्रेशन्स) करणार्‍या चित्रकारांची मोठी फळी होती. दीनानाथ दलाल (दीपावली), रघुवीर मुळगावकर (रत्नदीप) यांचे स्वत:चे दिवाळी अंक होते. किर्लोस्करचे ग. न. जाधव, बसवंत, पुण्याचे सहस्त्रबुद्धे, प्रभा काटे, ज्ञानेश सोनार, सत्येन टण्णू, चंद्रशेखर पत्की, प्रभाशंकर कवडी, दत्तात्रय पाडेकर, सुभाष अवचट या मंडळींची फिगरेटिव्हपासून अ‍ॅब्स्ट्रॅक्टपर्यंत वेगवेगळी कथाचित्रे म्हणजे मेजवानी असे. वाचनाची अभिरुची घरातल्या सर्व मंडळींना, तरूणतरूणींना खूपच होती. मनोरंजनाची इतर साधने जवळपास नव्हतीच.
‘आवाज’ व ‘जत्रा’मध्ये या जादु-ई खिडक्या पाहणारा मोठा वर्ग होता. आताचा बोकाळलेला निर्लज्जपणा नसल्याने चारचौघात या खिडक्या संकोचाने पाहिल्या जात नसत. माझ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते की, ज्ञानेश सोनारांना दिवाळी अंकातले खिडक्यावाले म्हणून मीच काय, सगळेच ओळखतात. आम्ही मंत्री तंत्री झालो तरी त्यांच्या खिडक्याचे अंक रात्री गुपचूप पाहायचो.
सुरुवातीची काही वर्षे ‘आवाज’च्या खिडक्या दीनानाथ दलाल करीत. बाळासाहेबांनी एखाद दुसरी केल्याचे स्मरते. दीनानाथ दलालांचं १९७० साली अचानक निधन झाल्याने चंद्रशेखर पत्की, प्रभाशंकर कवडी करू लागले. दलाल व पत्कींच्या चित्रातल्या तरुणी अत्यंत मादक असत. ‘आवाज’साठी मीसुद्धा सुरुवातीस बर्‍याच खिडक्या केल्या. अंकात चारच खिडक्या व चितारणारे दोघे पाटकरांची कुचंबणा झाली. त्यात रंगीत छपाई खूप महाग असे. ऑफसेट प्रेस फारच कमी होते. आवाज तर नागपूरच्या शिवराज प्रेसमध्ये अनेक वर्षं छापला जाई. सत्तरच्या दशकात माझ्या व्यंगचित्रमालांना खूप मागणी असायची. ‘आवाज’मधल्या चित्रमाला तर दरवर्षी खूपच गाजायच्या. पोलीस प्रदर्शन, राम तेरी त्तो गंगा मैली, देहाची तिजोरी, तुझे गीत गाण्यासाठी, सेक्सी अल्फाबेटस्, ढगाला लागली कळं, इमर्जन्सीच्या काळातले इंदिराजीवरचे इंदूजाल. थोडक्यात त्या हंगामात जो विषय गाजत असेल त्यावर ही मल्लिनाथी असे. राज कपूरचा ‘राम तेरी गंगा मैली ‘उत्तानतेने परिपूर्ण होता. तो प्रचंड धंदा करीत होता. मी त्यावर आठ पेजेसचा राम तेरी ‘त्तो’ गंगा मैलीची विडंबनात्मक चित्तरकथा पात्रांसह रेखाटली. तीसुद्धा सुपरडुपर गाजत राहिली. इतकी की मोठा मनोरंजक किस्सा आहे.
त्या काळातच पुण्य्ााला माझे जाणे झाले. अलका टॉकिजजवळून मित्रांबरोबर चाललो होतो. रस्त्याच्या पलीकडे दिवाळी अंकांचा स्टॉल होता. ‘आवाज’ मी तोवर पाहिलेला नव्हता. मी विचारले, ‘आवाज आहे का?’
‘आवाज’चा शॉर्टेज आहे, चाळायला मिळणार नाही. विकत हवा असेल तर सांगा! पुणेकर ताडकन कडाडला.
अहो, ह्यांना ओळखलं का? मित्राने जरा चिडूनच विचारले. ‘कसा ओळखणार. त्यांच्या गळ्यात नावाचा बोर्ड कुठेय,’ त्याने त्रिफळा उडवला.
मित्राने माझे नाव सांगितले.
तो अवाक् होऊन चटकन उभा राहिला. हात जोडून म्हणाला, ‘सोनार साहेब माफ करा. इथं विकत घेण्यापेक्षा अंक चाळणारे जास्त. कडक बोलावेच लागते.
त्याने अंक दिला. आतले स्टूल बसायला पुढे केले.
सर चहा मागवू.. नाही मागवतोच, पुणेकर असलो म्हणून काय झाले.
मी व माझा मित्र त्याचे सौजन्य पाहून अचंबित झालो.
का हो काही विशेष? मीच न राहावून विचारले. सोनार साहेब, तुम्हाला कल्पना दिसत नाही… ‘आवाज’मधल्या ‘राम तेरी गंगा मैली’ने कहर केलाय. सिनेमा पाहिलेले लोक ही चित्रमाला पाहण्यासाठी अंक विकत घ्यायला येतात आणि चित्रमाला पाहिलेले सिनेमा पाहायला जातात. आतापावेतो दीडशे अंक विकून झालेत. रिपीट ऑर्डर देऊनही अंक मिळत नाहीत.
चौर्‍याऐंशीच्या दशकात ‘जत्रा’ मासिकाचे साप्ताहिक झाले. दर आठवडी माझे वा पत्कींचे मुखपृष्ठ असे. श्री. द. सरदेशमुख नावाचे बेहेरेंचे लेखक बत्तीसपैकी चोवीस पाने एकहाती लिहीत. पैकी चावट विनोदाचे ‘चिकन तंदुरी’ खूप फेमस होते. मलपृष्ठावर रंगीत चित्रकथा, आत व. बा. बोधे यांची धारावाहिक कादंबरी असायची. रामदास फुटाणे यांची वात्रटिकाही ‘जत्रा’तच एस्टॅब्लिश झाली. हा हा म्हणता महाराष्ट्रभर जत्रा पन्नास हजारांवर खपू लागला.
बेहेरे म्हणाले, ‘सोनार, आपल्याला दिवाळी अंकासाठी खिडक्या हव्यात.
मी भाऊसाहेब पाटकर यांना सांगितले. खिडकी त्यांची मोनापॉली होती. पुढे मीच म्हणालो, वर्षभर ते मला भरपूर पैसे देतात. शिवाय तुमच्या अंकात संधी नाही.
मोठ्या मनाने ते म्हणाले, ‘अवश्य करा!’
नंतर माझा खिडक्यांचा वारू बेफाम सुटला. नंतर पुण्यातून आणखी एक राजा शिंदे यांचा ‘आवाज’ सुरू झाला. नंतर सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथूनही खिडक्यांचे अंक निघू लागले आणि या खिडक्या मी एकटा करी. प्रत्येकाचे आशय, विषय वेगळे, खिडक्यांसाठी उत्तम रेखाटन, देखण्या ललना, कल्पकता व बेमालूम मांडणी यामुळे आलेले खुदकन हसू आवश्यक असे.
याचा बेहेरेंनी कधीच इश्यू केला नाही. ते म्हणत प्रत्येक अंकांचा वाचक वेगळा, अंकाची ताकद वेगळी.लेखक नाहीतरी दहा ठिकाणी लिहितातच ना? स्त्रियांच्या अंगोपांगांच्या जवळपास जाणार्‍या खिडक्यांचे विषय कधीतरी संपणे क्रमप्राप्त होते. दिवाळीच्या आसपासचा गाजणारा सामाजिक व राजकीय विषय घेऊन खिडक्या काढू लागलो, त्यात कुठेतरी मदनिका असायचीच. कारण खिडकी म्हटली की बाई हवीच. थोडक्यात शुगरकोटेड प्रबोधन. त्यात जळगावचे सेक्स स्कॅण्डल, मुंबईतली स्त्रियांची छेडछाड, छुपे कॅमेरे, बॉम्बस्फोट, एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांवर काढलेली चित्रे, त्यावरची बुद्धिवंतांची उलटसुलट चर्चा, मॉड पोरींचा तोकडा पेहराव, नटनट्या, त्यांची लफडी वगैरे. खिडकीचित्र रोमँटिक असावे, अश्लील नको. त्यात सूचकता असेल तर चित्र गुदगुल्या करते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत, माणसं नागडी उघडी काढा, चित्राची गरज असेल तर. मात्र स्त्रिया कधीही विवस्त्र काढू नका. विशेषत राजकीय कॅरिकेचर्स करताना. वृत्तीवर व्यंग करा, शारीरिक व्यंगावर नाही. तेथे व्यंगचित्रकारांची संस्कृती प्रतीत होत असते. यावर एक छान खिडकीचित्र मला सुचले. हुसेन यांच्यावरचा टीकेचा तो काळ. सरस्वती अनावृत रेखाटल्यामुळे उद्रेक उसळला होता. मी चित्र रेखाटलं. तत्पूर्वी एम. एफ. हुसेन यांची काही पेंटिंग्ज गुगलवर पाहिली. त्यात
मॅरिलिन मनरोचे एक न्यूड त्यांनी काढलेले होते.. यावर खिडकी रेखाटताना पहिल्या पानावर हुसेन मन्रोचे चित्र काढत आहेत. कमरेपर्यंत विवस्त्र असे.. पुढे काय असेल म्हणून वाचक पुढचे पान उघडतो. पुढच्या चित्रात ती पूर्ण विवस्त्र दाखवली (त्यांच्या पेटिंगप्रमाणे). इतक्यात चित्र पाहणारं तीन चार वर्षांचं मूल त्याची स्वत:ची निकर काढून हुसेन यांच्या हातात देत आहे. चित्रातल्या बाईला घालण्यासाठी. यातला संस्काराचा भाग, लहान मुलांनी अशी स्त्री पाहिलेलीच नसते. कलाकारांनी अवश्य स्वातंत्र्य घ्यावं. पण भाष्य, मांडणी कल्पकतेने करावी ही अपेक्षा असते.
जळगाव स्कँडल झालं (श्रीमंतांची, मंत्र्यांची, ऑफिसरची तरुण मुले मुलींना ब्लॅकमेल करून उच्चपदस्थांना तोहफा म्हणून भेट देऊ लागले). तिथल्या मुलींवर इतकी वेळ आली की, त्यांची लग्नच होईनात. तमाम मुलींकडे लोक संशयाने पाहू लागले. खिडकी अशी होती मन सुन्न करणारी. एका मंत्र्याला चार दोन पोरांनी सुंदर मुलगी भेट आणली आहे. तिच्या चेहर्‍यावर ओढणी आहे. मंत्री हातात गजरे माळून जिभल्या चाटतोय. ‘तू चीज बडी है मस्त मस्त’.. गाणे गुणगुणतोय. काही गंमत दिसेल म्हणून वाचक पुढचं पान उघडतो. मुलीने चेहर्‍यावरचा घुंगट दूर केला आहे. डोळ्यात पाणी आहे. ती मंत्र्याला म्हणतेय, ‘पप्पा मला वाचवा!’ मंत्री हतबुद्ध. मुलींच्या या बाजारात कधी तुमची मुलगी असेल, वहिनी असेल, बहीण असेल तीच भेट म्हणून गुंडांनी आणली असेल तर?
चोली के पिछे क्या है या गाण्याचे दिवस. कुठेही घरीदारी गाणं लागलं की बायकांच्या माना संकोचाने खाली जात. मुंबईसारख्या शहरात कधी मुलगी दिसली की छेडछाड होई, आताही अशा घटना ऐकू येतातच. त्यावर एक खिडकी. दोन तीन गुंड तरूण निर्जन रस्त्यावर मुलीस सुरा दाखवून म्हणतायत, ‘चोली के पिछे क्या है दिखाव… ‘ चित्रातील पाठमोरी तरूणी वरचं वस्त्र उघडून त्यांना दाखवतेय. कुतूहलाने आपण पुढचं पान उघडतो. मुलगी समोरुन दिसते. तिने वरचे विंडचिटर सताड उघडले आहे. तिच्या एका खिशात पिस्तोल तर एका खिशावर एसीपी क्राईमची पट्टी लिहिलेली. ते पाहून गुंड पोरांची उडालेली भंबेरी. पुछो नहीं…
मैं तो थी एक गुंगी गुडिया..
रोब बी क्या था उनका बढिया…
देखकर मेरी जादू की छडी..
सब की नौबत आ पडी..
या ओळींचा अर्थ सांगतो. ऐका एक मजेशीर किस्सा. नेहरू व शास्त्रींचे अकाली निधन झाल्याने पंतप्रधान करायचे कुणाला? काँग्रेस सिंडिकेटला म्हणजे कामराज, गुलझारीलाल नंदा, मोरारजी व इतर. इंदिराजी तशा तरुण व नवख्या होत्या. त्यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवले जाई. त्यावर ‘आवाज’मध्ये दुरंगी खिडकी केली. त्यात इंदिराजी जादूगारणीच्या ड्रेसात दाखविल्या होत्या. बहुदा इमर्जन्सीचे दिवस होते. कुठून तरी या चित्राची कुणकुण सचिवालयापर्यंत गेली. दोन दिवसांवर दिवाळी आलेली. अंकाचे गठ्ठे गावोगाव पाठविण्यासाठी तयार झालेले… भाऊ पाटकरांना बोलावणे आले व विचारणा केली गेली. तुमच्या अंकांत इंदिराजी आक्षेपार्ह वेषात दाखविल्या आहेत. भाऊंचे धाबे दणाणले. अंकासाठी खूप कर्ज काढावे लागे. त्यावेळी मधु मंगेश कर्णिकांसारखे लेखक सचिवालयात अधिकारी होते. भाऊंनी त्यांना गाठले. चित्रातले कपडे योग्य की अयोग्य ठरवणार कसे? कुणीतरी प्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचे नाव (बहुदा) सुचविले. कारण त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता. नाटककार, कादंबरीकार, लेखिका, नटी अशा अनेक अंगांनी त्या नामवंत होत्या. रेखाटलेली माझी चित्रे त्यांना दाखवल्यावर त्यांनी काही कपडे काढून दाखवले. सुदैवाने ते व रेखाटलेले कपडे मॅचिंग होते. तोवर भाऊंच्या माणसांनी अंक इकडे तिकडे लपविले होते. सचिवालयातील अधिकार्‍यांचे समाधान झाले आणि बाका संकट टळले. नाहीतर आमची दोघांची तुरुंगवारी अटळ होती.
गेल्या पंचवीस तीस वर्षांत मी जवळपास पाच सहाशे खिडक्या काढल्यात. ते थोडेफार भूतकाळाचे देणे आहे. या व अशा खिडक्या पुढे अंकातून येतील न येतील. पण त्या आता फेसबुकवरील रील्स शॉट्स, टिकटॉकमधून वेगळ्या स्वरूपात दिसत आहेत. चित्रांऐवजी खरी माणसेच आता खिडकीतल्या गमती करीत आहेत. संकोच, चोरून पाहण संपलंय आणि या टिकटॉक, रील्समधून स्त्रियांचं अनावृत विश्व जो पाहील त्याला उपलब्ध आहे. कोण कशाला दिवाळी अंकातील खिडक्या पाहण्यासाठी वर्षभर थांबेल.
जग झपाट्याने बदलत आहे. टोपली खाली झाकून ठेवलेलं संस्कारांचं कोंबडं आता चिकन तंदुरी, मुर्ग मुसल्लम, चिकन लॉलीपॉप होऊन घरबसल्या दाराशी येतंय. कसं ते त्यालाही अद्याप उमगलेल नाही. अस्तू!

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

वात्रटायन

Next Post

वात्रटायन

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.