हिंदू मिशनरी सोसायटीपासून दूर झाल्यानंतर तीन वर्षांनी प्रबोधनकारांनी मिरज तालुक्यातल्या काकडवाडी या आडगावात सत्यशोधक तुकाराम काकडे यांचं वैदिक पद्धतीने लग्न लावलं होतं. या गावामुळेच प्रबोधनकारांच्या साहित्याचा दुर्मीळ झालेला ठेवा नव्याने लोकांसमोर येऊ शकला.
– – –
चौबळ नावाच्या एका लेखकाने `हिंदू वैदिक विवाह पद्धतीचे परीक्षण` नावाचं टीका करणारं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याला `एक एम.ए., एल.एल.बी.` असं टोपणनाव धारण करणार्या लेखकाने `वैदिक विवाहविधीचा कायदेशीरपणा` या लेखातून उत्तर दिलं होतं. प्रबोधनकार संपादक, मुद्रक आणि प्रकाशकही असणार्या `वैदिक विवाह विधी` या पुस्तकात हा उत्तराचा सविस्तर लेख प्रकाशित झाला होता. या एमए एलएलबीने त्यात चौबळ यांच्या पुस्तकातला एक उतारा उद्धृत केलाय. तो असा,
`एखादे वेळेस प्रसंग यावयाचा व मग न्यायाच्या दरबारांत तुमचा विवाह बेकायदेशीर ठरेल, तुमच्या पत्नीचे पत्नित्व जाऊन तिला रखेलीचे पद प्राप्त होईल व मग तुमच्या पोराबाळांचे व इस्टेटीचे ते धिंडवडे कोण वर्णन करणार? तेव्हा संभाळा. एकादा ठाकरे, राजे किंवा वैद्य तुमचें मन वळविण्यास आलाच तर थोडा थोपवून धरा आणि एकदम वकीलाकडे धांव मारा. त्याचा नीट सल्ला घ्या. आणि मग ही अंधारांत उडी घ्या.`
ही टीका आणि त्याचं उत्तर गजाननराव वैद्य यांच्या निधनानंतरचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या उतार्यातला `ठाकरे, राजे किंवा वैद्य` हा संदर्भ अनुक्रमे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब राजे आणि सुंदरराव वैद्य यांचा आहे. हा क्रम लक्षात घेण्यासारखा आहे. गजाननरावांच्या नंतर त्यांचे भाऊ सुंदरराव यांनी त्यांचं काम पुढे नेलं. तरी टीकाकाराने वैदिक विवाह विधीच्या प्रचारकांची जी नावं लिहिली, त्यात प्रबोधनकारांचं नाव सगळ्यात पुढे आहे. प्रबोधनकार अत्यंत हिरीरीने या वैदिक विवाहांच्या प्रचारात गुंतलेले होतेच. ते स्वतः आचार्य म्हणजेच पुरोहित बनून वैदिक विवाह लावत होतेच. पण वक्ता आणि लेखक म्हणून वैदिक विवाह विधीची गरज लोकांना समजावत होते. त्यामुळे त्यांचं नाव वैदिक विवाहाच्या प्रचारकांमध्ये अग्रक्रमाने येणं स्वाभाविकच म्हणायला हवं.
असं असलं तरी १९२मध्येच हिंदू मिशनरी सोसायटीपासून प्रबोधनकारांचा दुरावा त्यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसून येतो. वादाचा मुद्दा व्यवहाराचा असला तरी परस्परांत खूपच कटुता निर्माण झाली असावी, असा अंदाज प्रबोधनकारांच्या भाषेवरून बांधता येतो. पण त्यांनी १९२मध्ये वैदिक पद्धतीने एक लग्न, तेही सांगली जिल्ह्यातल्या काकडवाडी नावाच्या एका छोट्या गावात जावून लावलं होतं, असे संदर्भ सापडतात. विटा इथे राहणारे प्रबोधनकारांचे अभ्यासक प्रा. महावीर मुळे यांनी `सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर` हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात बेळगावहून प्रसिद्ध होणार्या `दैनिक राष्ट्रवीर`च्या १८ जून १९२९च्या अंकातल्या बातमीचा मजकूर प्रसिद्ध केलाय. या लेखवजा बातमीची सुरवात अशी आहे,
स्वाभिमान जागृति
(एका खास बातमीदाराकडून)
काकडवाडी, संस्थान सांगली येथे श्रीयुत तुकाराम रघुनाथराव काकडे यांचा विवाह ५/६/१९२९ रोजी शुद्ध वैदिक पद्धतीने झाला. पौरोहित्य आचार्य प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी स्वीकारले होते. अनिष्ट व परंपरागत असलेल्या रूढीस फाटा देऊन पाणीग्रहण, लज्जाहोम, सप्तपदी वगैरे शुद्ध वैदिक विधी करण्यात आले. त्यावेळी म्हणण्यात आलेल्या मंत्रांचे अर्थ जमलेल्या सर्वांस समजावून देण्यात आले व त्याचे हेतू विशद करून सांगण्यात आले. विवाह विधीनंतर लगेचच समारंभास आलेल्या स्त्रीपुरुष समुदायापुढे श्री. ठाकरे व श्री. भाऊराव पायगोंडा पाटील यांची आत्मोन्नतीपर भाषणे झाली. या सर्वांचा अत्यंत इष्ट परिणाम झाला व ब्राम्हणभट साम्राज्यातील गडबडगुंडा सर्वांस कळून चुकला. या लग्नाशिवाय येथे आणखी दोन लग्ने समाजमताने झाली. गावाच्या भटाने लोकास बरीच भीती घातली होती व सांगली संस्थानास इकडील भागात अशा तर्हेने हेच प्राथमिक समारंभ असल्यामुळे समारंभ कसे पार पडतात याबद्दल लोक बरेच साशंक होते. परंतु समारंभ उत्तमपणे पार पडल्यामुळे काहीजण तर आश्चर्यचकित झाले.`
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असणारे समाजसुधारक आणि मराठी पत्रकारितेतील मानदंड असणारे विचारवंत संपादक `राष्ट्रवीर`कार शामराव देसाई देखील या लग्नाला उपस्थित होते. त्यांनीच खास बातमीदार म्हणून ही बातमी दिली असल्याची शक्यता आहे. यातून प्रबोधनकार वैदिक लग्नं नेमकं कशा प्रकारे लावत, याचाही अंदाज लावता येतो. हे लग्न झालं त्या काळात म्हणजे १९२९च्या जून महिन्याच्या दरम्यान प्रबोधनकारांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. नोव्हेंबर १९२७नंतर प्रबोधनचा अंक निघू शकलेला नव्हता. कारण प्रबोधनकारांची तब्येत बिघडलेली होतीच. शिवाय आर्थिकदृष्ट्याही ते अडचणीत होते. प्रबोधन पुन्हा सुरू करण्याची खटपट सुरू होती. अशा काळात ते आवर्जून काकडवाडी या आजही मुंबईहून पोचण्यासाठी अडचणीच्या असलेल्या आडगावात जातात. तिथे तीन लग्नं लावतात आणि भाषणंही करतात. तेव्हा असा प्रश्न पडतो की ज्यांचं लग्न लावण्यासाठी प्रबोधनकार आवर्जून गेले, ते तुकाराम काकडे होते तरी कोण?
त्यासाठी महावीर मुळेंनी त्यांच्या पुस्तकात आणखी एक संदर्भ दिलाय. मुंबईच्या श्री शिवाजी विजय मराठा मंडळाने इंदूप्रकाश प्रेसमध्ये छापलेली एक जाहिरात दिलीय. त्यातला मजकूर असा,
श्री शिवाजी विजय मराठा मंडळातर्फे मराठा पुरोहित
अलिकडे ब्राम्हणेतर चळवळीमुळे ब्राम्हणेतर लोकांचे मनात बराच स्वाभिमान जागृत होऊन, आपल्यावरचे ब्राम्हणांचे गुलामगिरीचे पाश तोडून टाकावे म्हणून स्वतःचे विधी स्वतः किंवा स्वजातीय पुरोहिताकडून करवून घ्यावेत, अशी पुष्कळ लोकांची इच्छा असते. परंतु स्वतःला विधी येत नसल्यामुळे किंवा येथे चांगला वेदोक्त व सशास्त्र शिकलेला मराठा पुरोहित नसल्यामुळे आपली इच्छा तशीच राहून जाते, अशी पुष्कळशी उदाहरणे श्री शिवाजी विजय मराठा मंडळाच्या नजरेस आली, करिता लोकांची ही समस्या दूर करावी या हेतूने कोल्हापूर येथील श्रीमंत छात्र जगद्गुरू यांचे आश्रयाखाली चाललेल्या श्री शाहू वैदिक विद्यालयामध्ये ३ वर्षे राहून सर्व वेदोक्त विधी शिकून झालेले मराठा पुरोहित श्री. तुकाराम रघुनाथ काकडे यांना येथे मुद्दाम सर्व विधी करण्याकरिता मंडळाकरिता बोलाविले आहे. तरी स्वाभिमानी ब्राम्हणेतर बंधूंनी आपले कोणतेही धार्मिक विधी यांच्याकडून करवून घ्यावेत अशी विनंती आहे.`
मराठा पुरोहित म्हणून मुंबईत काम करणार्या याच तुकाराम काकडे यांचं लग्न लावण्यासाठी प्रबोधनकार काकडवाडीला गेले होते. विस्मृतीत गेलेल्या या तरुण सत्यशोधकाच्या शोधाची कहाणी नवलाचीच आहे. रयत शिक्षण संस्थेत मानसशास्त्राचे प्राध्यापक असणारे महावीर मुळे आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या काकडवाडी गावात वाचनालय सुरू करण्याचं ठरवलं. त्यासाठी घरोघर मदत मागायला गेले. दिनकरराव आणि शहाणीबाई पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या घरातल्या माळ्यावर लोखंडी पेटी भरून पुस्तकं आहेत, ती घेऊन जा. पेटी उघडताच जवळपास ७० वर्षांपूर्वीची सत्यशोधक चळवळीविषयीची पुस्तकं सापडली. त्यात १५० पुस्तकं, ५० अहवाल पुस्तिका, अनेक मासिकं, वर्तमानपत्रं, कात्रणं, डायरी, हस्तलिखितं असा ऐवज सापडला. त्यात प्रबोधनकारांची १५ पुस्तकं आणि प्रबोधनचे चार वर्षांचे अंक होते.
त्यातून तुकाराम काकडे यांचं चरित्रच समोर आलं. १९०७ साली जन्मलेले काकडे व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिक्षण घेऊन तलाठी बनण्यासाठी कोल्हापूरला गेले. तिथे तलाठ्याचा अभ्यासक्रम शिकताना ते सत्यशोधक विचारांनी भारले गेले. छत्रपती शाहूंनी ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालयात तीन वर्षं रीतसर शिक्षण घेतलं. नंतर त्यांना मुंबईच्या विजयी मराठा संस्थेने बोलवून घेतलं. मुंबईसह बडोदे, देवासपर्यंत त्यांनी पौरोहित्य केलं. याच काळात त्यांचा प्रबोधनकारांसह मुंबई पुण्यातल्या बिनीच्या सत्यशोधक पुढार्यांशी परिचय झाला. आपल्या पौरोहित्याचा वापर करून त्यांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या धडाडीच्या तरुण मित्राचं लग्न लावण्यासाठी प्रबोधनकार काकडवाडीला आले होते. लग्नानंतर वर्षभरातच तुकाराम काकडे यांचं निधन झालं. त्यांनी गावात उभारलेल्या शाहू वाचनालयात प्रबोधनकारांचं साहित्य आणि प्रबोधनचे अंक असणं सहाजिक होतं. त्यामुळे ७० वर्षांनी काळाच्या उदरात गडप झालेली प्रबोधनकारांची १५ पुस्तकं आणि चार वर्षांचे प्रबोधनचे अंक अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले. यामुळे प्रबोधनकारांचं साहित्य नव्या पिढीसमोर आलं.
आज काकडवाडी हे सत्यशोधक अभ्यासकांसाठी महत्त्वाचं संशोधन केंद्र झालं आहे. गावात प्रबोधनकारांचं स्मारक उभं राहावं, अशी गावकर्यांची इच्छा आहे. तसं आश्वासन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गावकर्यांना दिलं होतं. त्यानुसार स्मारकाचं भूमीपूजनही झालं. पण अडीच दशकं उलटली तरी तिथे स्मारकाची अजून एकही वीट उभी राहिली नाही. आता ठाकरे सरकार सत्तेत असल्यामुळे गावकर्यांच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्यात.