भारतीय
हाताची घडी नि तोंडावर बोट
बाता बड्या नि मुदलात खोट
युनोत सुद्धा आम्ही तटस्थ राहिलो
घाबरटपणाची बांधली मोट
माजोरड्या देशांचे संहार नाट्य
रशियन मैत्रीला चिन्यांची साथ
चीनचा कोरोना तर पुतिनचा गर्व
कशाला करतील ते जगाशी बात?
पाच विरुद्ध एकशे पंचेचाळीस
तीव्र विरोधाची त्यांना ना लाज
साम्राज्यविस्तार नि दबंगगिरीसाठी
चालले जिरवण्या युद्धाची खाज
—– —– —–
पुतिन
दाबून, चेपून, चिरडून टाकू
भरडून नेस्तनाबूत करू
इवला युक्रेन गमजा केवढ्या
एका चिमटीत मानगूट धरू
आधीच आमचा विस्तार केवढा
जगाची ना पर्वा करतो
नको कुणाची मदत नि दया
एकेकाला वेचून मारतो
कशाला करता युक्रेनवर माया
उसनी वीरश्री नाही कामाची
आम्ही म्हणू तोच अखेरचा शब्द
बघा झलक आमच्या हुकूमशाहीची
—– —– —–
सत्ताधारी
अन्यायाविरुद्ध उभे ठाकतो
पिचणार्यांना न्यायही देतो
रशियासारखे मित्र पाहता
गुपचूप कुठेतरी शेपूट घालतो
युक्रेनचा तर जीव हा केवढा
बलाढ्य रशियापुढे ना झुकला
आमच्यावर उपकारांचे ओझे
कसोटीच्या क्षणी राजा वाकला
पाकिस्तानने बांगला देशची
अशीच केली होती हालत
आज आठवतात इंदिरा गांधी
पाकला आणले गुडघे टेकत
—– —– —–
सामान्य नागरिक
रणरागिणी महिषासूर मर्दिनी
अटलजींनी तर केला गौरव
हे तर भेकडांचे पुजारी
करत बसले सारवासारव
सारे जग हे सत्य पाहते
नरसंहार नि भीषण तांडव
यांच्या डोळ्यावरती पट्टी
म्हणती सारे आपले बांधव
यांच्या गर्जना भारतापुरत्या
दुबळ्या पाकला देती दम दम
हिंमत असेल तर झापा पुतिनला
तेव्हा होते पॉवर कम कम
—– —– —–
राष्ट्रप्रेमी
मारतो गप्पा लोकशाहीच्या
सार्वभौमत्व आणि मानवतेच्या
युक्रेन विव्हळतोय डोळ्यांसमोर तरी
झाल्यात खाचा या डोळ्यांच्या
जागतिक इमेज जपताना सुटते
पायजम्याची प्लॅस्टिक नाडी
जगाने पाहिली धांदल फेक्यांची
जगावेगळी यांची पंक्चरलेली गाडी
एकवेळ परवडले हिटलर-मुसोलिनी
उघड तरी काढती माणसांचे काटे
यांचे चूप राहणे त्याहून भयंकर
शांततेचे ढोंग घालून मुखवटे