ज्यांनी पायाभूत सुविधा उभारायच्या ते सरकार धर्मस्थळे उभारणे हाच आपला एकमेव अजेंडा समजू लागलं, ज्यांनी उद्योगधंदे वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यायचं ते सरकार लोकांच्या घरात शिरून ते काय खातात, कोणते कपडे घालतात यात लुडबुड करू लागलं आणि ज्यांनी भांडवली बाजारातील गैरप्रकारावर लक्ष ठेवून तेथील तेथील व्यवहारात पारदर्शकता आणायची, संभाव्य गैरप्रकाराचे नियमन करयचं ती यंत्रणाच कुणा अदृश्य भोंदू बाबाच्या सल्ल्याने वागू लागली तर व्यवस्थेचा सर्वनाश अटळ आहे!
– – –
एकदा काही कारणाने अकबराची बिरबलावरील मर्जी खप्पा झाली आणि त्याने बिरबलाला नोकरीवरून काढून टाकले. आपल्याला असे तडकाफडकी नोकरीवरून काढू नये, निदान ९० दिवसांचा नोटीस पिरियड द्यावा किंवा तितक्या दिवसांचा बेसिक पगार आणि डीए मिळावा अशी बिरबलाची मागणी होती. पण अपॉइंटमेंट लेटरमधे तसं काही कलम नसल्याचे सांगून अकबराने ती मागणी धुडकावून लावली. अकबर एकदा रागावला की ‘वो खुद की भी नहीं सुनता’ हे ठाऊक असल्याने आणि अकबराचा राग शांत होण्याची काही शक्यता दिसत नसल्याने बिरबल तडक दरबाराबाहेर पडला.
या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लेबर कोर्टात दावा ठोकावा असा सल्ला बिरबलाच्या बायकोने बिरबलाला दिला. पण बिरबलाला अकबराचा खुनशी स्वभाव आणि लेबर कोर्टाच्या जजचा लाळघोटेपणाचा स्वभाव ठाऊक होता. लेबर कोर्टाच्या जजची सेवानिवृत्ती जवळ आलेली असल्याने तो राजाविरुद्ध निर्णय देऊन आपल्या सेवानिवृत्तीपश्चात कारकिर्दीवर पाणी सोडणार नाही याची बिरबलाला खात्री होती. म्हणून त्याने लेबर कोर्टात जाणे टाळले. निवृत्त झालेल्या किंवा अन्य कारणाने सरदारकी गेलेल्या अकबराच्या कित्येक सरदारांनी सरकारी बंगले सोडले नव्हते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, जोवर अकबराकडून पीएफ आणि ग्रॅच्युइटी मिळून आपलं फुल अँड फायनल सेटलमेंट होत नाही तोवर आपल्याला मिळालेला सरकारी बंगला न सोडण्याचा निश्चय करून बिरबल सरकारी बंगल्यात खात-पीत, टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ या सिरीयल बघत, युट्यूबवर तानसेनाची जुनी गाणी ऐकत आराम करू लागला.
तिथे अकबराच्या नवरत्न दरबारात रिकामी झालेली बिरबलाची म्हणजे मुख्य सल्लागाराची जागा भरण्याची लगबग सुरु झाली. मुघल पब्लिक सर्व्हिस कमिशनला (एमपीएससी) भरती करण्याचा आदेश देण्यात आला. एमपीएससीने राज्यभर दवंडी पिटली. आधी चाळणी परीक्षा मग अकबराच्या नवरत्नांद्वारे मुख्य परीक्षा आणि सर्वात शेवटी अकबर बादशाहद्वारे व्हायवा म्हणजे तोंडी मुलाखत असं भरती प्रक्रियेचं स्वरूप ठरलं.
राज्यभरातून हजारो लोकांनी बिरबलाच्या पदासाठी अर्ज केले. आतील जुना मजकूर तसाच ठेऊन केवळ नवीन कव्हर छापलेली स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन पुस्तके आणि २१ अपेक्षित प्रश्नसंच बाजारात आले. अकबराच्या दरबारातील एका माजी सेनापतीने मावळ प्रांतात एमपीएससीच्या परीक्षेत हमखास यश मिळवून देणारं ज्ञानदानाचं अविनाशी अग्निहोत्र म्हणजेच कोचिंग क्लासेस सुरु केले.
मुख्य सल्लागार पद आपल्यालाच मिळावे अशी अबुल फजल आणि मुल्ला दो प्याजा या अकबराच्या नवरत्नांतील दोन सल्लागारांची इच्छा होती. त्यामुळे, ‘मुख्य सल्लागार पदासाठी बाहेरून उमेदवार न आणता अंतर्गत पदोन्नतीने हे पद भरले जावे अशी जनतेची इच्छा आहे,’ अशा वावड्या त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात आणि मीडियात पेरल्या होत्या. पण दिल्लीच्या सिंहासनाधिश्वरासमोर स्पष्ट मत मांडण्याची पद्धत आणि हिम्मत त्या काळच्या मंत्रिगणांत देखील नव्हती म्हणून त्यांनी बादशहाच्या हो ला हो मिळवत स्पर्धा परीक्षेच्या कामात स्वतःला झोकून दिले.
प्रवेश पत्रे गहाळ होणे, शहराच्या एका टोकाला राहणार्या उमेदवारांना दुसर्या टोकाचे परीक्षा केंद्र मिळणे, उत्तरेकडील प्रदेशात उमेदवारांनी परीक्षा केंद्रे ताब्यात घेणे, चुकीची प्रश्नपत्रिका येणे, गाईबैलांनी उत्तरपत्रिका खाणे, एका विशिष्ट विभागातील जास्त उमेदवार चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होणे आणि उत्तीर्ण झालेले उमेदवार आमच्याच कोचिंग क्लासचे विद्यार्थी असल्याचा एकाहून अधिक कोचिंग क्लासेसनी दावा करणे, या सगळ्या गोष्टी साग्रसंगीत आपल्या परंपरेला साजेशा पार पडल्या. पन्नास उत्तीर्ण उमेदवारांची यादी मुघल पब्लिक सर्व्हिस कमिशनने नवरत्न मंडळाकडे सोपवली.
बादशहा अकबराचा सल्लागार आणि सचिव असलेल्या अबुल फजल यांनी उमेदवारांना महसूल आणि प्रशासनासंबंधित प्रश्न विचारले. एखादा प्रकल्प उभा करताना त्यात बादशहाची, मंत्रिगणांची, प्रकल्प अधिकार्यांची, बाबू लोकांची आणि कंत्राटदारांची किती टक्केवारी असावी? एखाद्या भूखंडावर आरक्षण टाकावे कसे? टाकलेले आरक्षण उठवावे कसे? आपल्या माणसांना मोक्याच्या जागेवर बसवावे कसे? आपल्याला त्रासदायक ठरणार्या सरदारांच्या पाठी तपास यंत्रणा कशा लावाव्यात? आपल्या बाजूने उभे राहणार्यांना क्लीन चिट कशी आणि कधी द्यावी याविषयी प्रश्न विचारून त्यावरून त्यांचे गुणांकन करण्यात आले.
बादशहाचा वित्तमंत्री असलेल्या तोडरमल यांनी उमेदवारांना बजेट कसे बनवावे? राज्याच्या जीडीपीचे आकडे फिरवून राज्यात सगळे आलबेल असल्याचा भास कसा निर्माण करावा? मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करून दहशतवाद्यांचे कंबरडे कसे मोडावे? मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने कशी पुसावीत? गरिबांसाठी प्रत्यक्ष काहीच न करता मोठमोठ्या रकमेच्या योजना कशा जाहीर कराव्यात? पाणीयुक्त शिवारसारख्या योजना कागदावरच कशा यशस्वी कराव्यात? आपल्याला सर्वोत्तम ठरविणारे सर्व्हे आणि वेगवेगळ्या आर्थिक पाहण्या कशा मॅनेज कराव्यात याविषयी प्रश्न विचारून त्यावरून त्यांचे गुणांकन करण्यात आले.
बादशहाचा कलामंत्री असलेल्या तानसेन यांनी उमेदवारांना संगीत, नृत्य इत्यादी कलांची किती जाण आहे, राज्याच्या कानाकोपर्यातील विविध कलाकारांना आपले अंकित करून त्यांच्याद्वारे बादशहाचे गुणगान वदविण्याचे कसब त्यांच्याकडे आहे का? बादशाहविरुद्ध बोलणार्या कलाकारांची विविध प्रकारे मुस्कटदाबी करून किंवा आपल्या चेल्यांद्वारे ट्रोल करून त्यांना आयुष्यातून उठविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का ह्याची चाचपणी केली.
बादशहाचा सेनापती असलेल्या मानसिंग यांनी उमेदवारांना युद्धनीतीची किती जाण आहे? निवडणुकीच्या तोंडावर शेजारी राज्याशी युद्धाची भाषा करून जनमत बादशहाला अनुकूल असे करून घेण्याची धमक त्यांच्यात आहे का? बादशहाच्या राजकारणासाठी शेजारी राज्यात लुटुपुटुचा सर्जिकल स्ट्राइक ते करू शकतील का? आपल्या राज्यात बादशाहच्या सोयीनुसार अतिरेकी हल्ले, नक्षली आंदोलने घडवता आणि चिरडता येतील का? या दृष्टीने उमेदवारांची पारख केली.
बादशाहच्या नवरत्नांपैकी कवी असलेले दोघे म्हणजे अब्दुल रहीम खान आणि फैजी या दोघांनी उमेदवारांना साहित्याची किती जाण आहे? साहित्य संमेलनाचे ठिकाण, अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष ह्यांची निवड करताना जनतेला दाखविण्याचे आणि जनतेपासून लपविण्याचे कोणकोणते निकष असतात ह्याची तोंडओळख आहे का? पुरस्कार कसे मॅनेज केले जातात. खेळ प्राधिकरण, क्रिकेट बोर्ड, शिक्षण संस्था, सहकारी संस्था, ऊस कारखाने इत्यादी ठिकाणी आपली माणसे पेरून या संस्था आपल्या बटीक कशा बनवाव्यात याबाबत उमेदवारांची तयारी जोखली.
बादशहाच्या नवरत्नांमधील शेवटचे रत्न म्हणजे शाही स्वयंपाकी असलेल्या हकीम हुमाम यांनी, बादशहाला पैसे आणि भाव याव्यतिरिक्त आणखी काय खायला आवडते याविषयी उमेदवारांना किती माहिती आहे याची चाचपणी केली. खाकर्यावरील जीएसटी कमी केल्याने अर्थव्यवस्थेच्या आणि मतपेटीच्या तब्येतीत होणार्या सुधारणेवर चर्चा केली. जाता जाता, तैवानी अळंबीच्या बाजारभावाविषयी उमेदवारांचे ज्ञान तपासले.
सर्व नवरत्नांनी दिलेल्या गुणांची बेरीज करून पन्नास उमेदवारांपैकी चतुरसेन नावाच्या केवळ एका उमेदवाराची एकमताने बादशहाकडे शिफारस करण्यात आली. तो जख्ख म्हातारा, लांब पिकलेल्या दाढीमिशाधारी उमेदवार अंतिम मुलाखतीच्या औपचारिकतेसाठी बादशहाला भेटायला गेला.
बादशहाने त्या चतुरसेनला नमस्कार केला. हिमालयाशी आपला कसा रिश्ता आहे, आपण नियमितपणे तेथील गुहेत
कॅमेरामॅनचा ताफा घेऊन एकांतात मनन-चिंतन करावयास कसे जातो हे तिखट-मीठ लावून सांगितले. मग, बादशहाने त्या चतुरसेनसमोर आधीच्या बादशाहांच्या नाकर्तेपणाचा खोटानाटा पाढा वाचला. आपल्या कर्तृत्वाच्या, राज्याच्या विकासाच्या खोट्यानाट्या बाता मारल्या. मनातले फॉर्मुले विज्ञानात घुसवले. स्वच्छ चारित्र्याच्या आणि निःसंगपणाच्या बढाया मारल्या. कधीच पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने दिली. आपल्या चुकांचे खापर राज्यातील विरोधकांवर फोडले.
चतुरसेनने कुठलाही प्रतिवाद न करता बादशहाचे हे सारे चर्हाट मंद स्मित करीत ऐकून घेतले. अशा प्रकारे बादशाहने घेतलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत उमेदवार उत्तीर्ण झाला. त्याला पाठीचा कणा नसल्याची बादशहाला खात्री झाली.
चतुरसेन बादशहाला लवून कुर्निसात करून म्हणाला, ‘सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि। गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते।।‘ बादशाहच्या चेहर्यावर अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद झाल्यासारखे भाव पाहून तसेच त्यांच्या शिक्षणाची आणि पदव्यांच्या स्रोताची कल्पना असल्याने चतुरसेनाने तात्काळ या सुभाषितांचे मराठी भाषांतर ऐकवले. ते म्हणाले, तुम्ही संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत, तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात, तुम्हाला नमस्कार असो.
बादशाहने चतुरसेनचा लाळघोटेपणा जाणला आणि तो त्याला म्हणाला, तू आजपासून माझा मुख्य सल्लागार आहेस. मी जे काही विचारीन त्याबद्दल तुला जे काही वाटते ते निःसंकोचपणे बोल. मी तुला अभय देत आहे.
बादशाह : चतुरसेन, माझ्या परराष्ट्र-नीतीविषयी तुझे काय मत आहे?
चतुरसेन : अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते! अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः !! अर्थात जी व्यक्ती आमंत्रणाशिवाय एखाद्या देशाच्या राजाच्या वाढदिवसाला केक आणि बिर्याणी खायला जात असेल, एखाद्या देशात जाऊन तिथल्या नेत्यांना बळेबळे मिठ्या मारीत असेल, कुणी न विचारता बोलत राहत असेल आणि बेभरवशाच्या लोकांवरही विश्वास ठेवीत असेल तर तो मूर्ख आहे.
बादशाह : मित्रा चतुरसेन, राज्यातील माझ्या विश्वासार्हतेविषयी तुझे काय मत आहे?
चतुरसेन : यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियाः! चित्ते वाचि क्रियायांच साधुनामेक्रूपता!! अर्थात, जे मनात आहे तेच वाणीने प्रगट व्हायला हवे आणि जे वाणीने प्रगट होतेय त्याप्रमाणेच कृती व्हायला हवी. ज्याचे अंतर्मन, उक्ती आणि कृती यात समन्वय असेल त्यालाच स्वतःला साधू किंवा सज्जन बोलण्याचा अधिकार आहे.
बादशाह : चतुरसेन जी, परदेशात जाऊन मी इतके मोठे इव्हेन्ट करतो तरी तेथील राज्यकर्ते मला आधीच्या राज्यकर्त्याइतके गंभीरपणे का घेत नाहीत?
चतुरसेन : स्वगृहे पूज्यते मूर्खः स्वग्रामे पूज्यते प्रभुः। स्वदेशे पूज्यते राजा विद्वान्सर्वत्र पूज्यते।। अर्थात, मूर्खांची आपल्या घरात पूजा होते, सरपंचाची आपल्या गावात पूजा होते, राजाची देशात पूजा होते मात्र विद्वानांची पूजा जगभर सर्वत्र होते!
बादशाह : चतुरसेन, काही उद्योगपतींशी माझा दोस्ताना आहे म्हणून लोक टीका करतात. याबद्दल तुला काय वाटते?
चतुरसेन : न कश्चित कस्यचित मित्रं न कश्चित कस्यचित रिपु:। व्यवहारेण जायन्ते, मित्राणि रिप्वस्तथा।। अर्थात, उद्योगपती कुणाचे मित्र नसतात किंवा कुणाचे शत्रूही नसतात. त्यांना ज्यांच्यापासून फायदा आहे त्यांचे ते मित्र असतात आणि ज्यांच्यापासून फायदा नाही त्यांचे दुश्मन! आज तुम्ही ज्यांना मित्र समजता ते तुमचे नव्हे तर तुमच्या खुर्चीचे मित्र आहेत.
बादशाह : चतुरसेन, शेवटचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला एका वाक्यात हवं आहे. प्रश्न असा आहे… विकास का अडखळला? जीडीपी का मंदावला? बाजार का कोसळला?
चतुरसेन : हुजूर, ह्याचं कारण एकच… मर्कटस्य हस्ते अग्निकाष्ठम् अर्थात, माकडाच्या हाती कोलीत!
बादशाह : म्हणजे?
चतुरसेन : खाविंद, ज्यांनी पायाभूत सुविधा उभारायच्या ते सरकार धर्मस्थळे उभारणे हाच आपला एकमेव अजेंडा समजू लागलं, ज्यांनी उद्योगधंदे वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यायचं ते सरकार लोकांच्या घरात शिरून ते काय खातात, कोणते कपडे घालतात यात लुडबुड करू लागलं आणि ज्यांनी भांडवली बाजारातील गैरप्रकारावर लक्ष ठेवून तेथील तेथील व्यवहारात पारदर्शकता आणायची, संभाव्य गैरप्रकाराचे नियमन करयचं ती यंत्रणाच कुणा अदृश्य भोंदू बाबाच्या सल्ल्याने वागू लागली तर व्यवस्थेचा सर्वनाश अटळ आहे!
बादशाह : आता माझी खात्री पटली. माझी मुख्य सल्लागाराची निवड सार्थ आहे. तू निश्चितच बिरबलापेक्षा हुशार आहेस.
चतुरसेन : माफी असावी खाविंद, मी हुशार जरूर आहे, पण बिरबलापेक्षा नक्कीच हुशार नाही. बिरबलच बिरबलापेक्षा हुशार कसा असेल (असे म्हणून चतुरसेनच्या वेषातील बिरबलाने आपल्या सफेद दाढीचा आणि केसांचा विग उतरवून बादशाहच्या पायाशी ठेवला).