सर्व तयारी झाल्यावर नणंदांनी बेसावध भावजयांना दोन खोलीच्या खिंडीतच घेरले. प्रथम दोघींच्या डोक्यावर काठीने, बाटलीने जोरदार प्रहार केला. भावजया जीव वाचवण्याचा अखेरचा आटापिटा करीत असतानाच एका दगडी वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा आघात झाला. त्या बेशुद्ध होऊन पडल्यावर त्यांच्यावर घासलेट ओतून त्यांना जिवंत जाळण्यात आले.
– – –
घरगुती भांडणातून दोघा नणंदांनी दोन भावजयींच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून त्यांना जाळून मारले. एका सधन गुजराथी कुटुंबात घडलेल्या या दुर्घटनेने मुंबईत खळबळ उडाली. घरोघरी लोकल ट्रेनमध्ये एकच विषय- नणंदा अशाच असतात. पण त्या इतक्या वाईट नसतात. भावजया नाहक गेल्या… या दुहेरी हत्याकांडाची बातमी सर्व वृत्तपत्रांनी ठळक छापली. पण त्यात कुणाचे फोटो नव्हते. संपादक म्हणाले फोटो मिळत असतील तर बघ आणि अधिक तपशील मिळत असेल तर आपण `स्पेशल रिपोर्ट’ म्हणून छापू.
मी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी लक्ष्मण कदमांना भेटलो. ते म्हणाले, तपास चालू आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहेत. प्रकरण नाजूक आहे. अजून ओळख परेड झाली नसल्यामुळे तुम्हाला अधिक काही सांगू शकत नाही.
मी कदमांकडून पत्ता घेतला आणि ग्रँट रोड येथील शालीमार टॉकीजसमोरील कांता बिल्डिंगच्या दुसर्या मजल्यावर गेलो. मनजी ठक्कर नावाची पाटी असलेल्या दरवाजाची बेल वाजवली. आतून एकाने दार अर्धवट उघडून चौकशी केली व म्हणाला, घरी बोलण्याच्या मन:स्थितीत कुणी नाही, तुम्ही तेरावे झाल्यानंतर येऊन बघा. असे म्हणून त्याने दरवाजा लावून घेतला.
मी दाराशीच घुटमळत राहिलो. तेरा दिवस कोण थांबणार? या घरात प्रवेश मिळवायचा कसा? याचे नातलग, मित्रमंडळी जवळपास आहेत का, याची चौकशी केली तेव्हा समजले की ज्यांचा खून झाला त्या भावजयींपैकी एकीचा नवरा फोटोग्राफर आहे आणि दुसरीच्या नवर्याची स्कुटर आहे. म्हणजे कुणी स्कुटर मेकॅनिक त्यांचा मित्र असू शकतो. परंतु त्यांची स्कुटर नवीनच असल्यामुळे अलीकडे रिपेरिंग करण्याची वेळ आली नव्हती, अशी माहिती मिळाली.
कांता बिल्डिंगच्या खाली फोटो स्टुडिओ होता. ठक्कर कुटुंबाने तेथे फॅमिली फोटो काढला असावा. दोघा भावजयींच्या लग्नाचे फोटोही या मालकाने काढले असावेत. कुटुंबात एकूण सात महिला होत्या आणि त्या बर्यापैकी दिसायला होत्या. स्टुडिओ मालकांना एक सवय असते. त्यांच्या परिचयाच्या आणि आसपास राहणार्या सुंदर महिलांचे फोटो मोठे करून ते शोकेसमध्ये दर्शनी भागी लावून ठेवतात. म्हणून मी त्यातील अनेक फोटो बारकाईने पाहिले. मालकाशी ओळख काढली. मीसुद्धा एक फार मोठा फोटोग्राफर असून मला काही वस्तू लागल्या तर नक्कीच आपल्या स्टुडिओत येईन असे बोलून त्याचे व्हिजिटिंग कार्ड घेतले व माझे दिले. याच्याकडे हमखास फोटो असणार असे वाटल्याने मी खूप बोलबच्चनगिरी केली. शेवटी वैतागून तो म्हणाला, नाही हो, फोटो नाहीत आणि असले तरी देणार नाही.
याचा अर्थ काय, तर फोटो आहेत; पण देण्याची मनाची तयारी नाही.
यालाही कुणी मित्र असावा या विचाराने इतर स्टुडिओ शोधले. पाववाला स्ट्रीटशेजारी नूतन फोटो स्टुडिओचा मालक नीळकंठ केळुस्कर याला भेटलो. मराठी माणूस म्हणून तो सहकार्य करेल अशी भाबडी आशा. पण तो तत्वाशी एकनिष्ठ. त्याच्याकडे फोटो होते, परंतु लोकांच्या बायकांचे फोटो वृत्तपत्राला कसे देता येतील म्हणून त्याने नकार दिला. आता करायचं काय?
ज्यांनी खून केला त्या दोघी पोलीस कस्टडीत आहेत आणि ज्यांचा खून झाला त्या जग सोडून गेल्या. मनजी ठक्करांचे माझगावला साई ट्रेडिंग नावाचे तेव्हाचे दुकान होते. एक प्रतिष्ठित घाऊक मालाचा व्यापारी म्हणून बाजारात त्यांची उठबस होती. घरातील प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ते कुणाशी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. मला चलाखीने काम करावे लागणार होते.
आरोपींचे नाव शोभना आणि अरुणा मनजी ठक्कर. त्यांना रिमांडसाठी शिरगांव कोर्टात पोलीस घेऊन येणार आहेत अशी नवी माहिती मिळाली. मी कोर्ट सुरू होण्यापूर्वी पोहोचलो. आरोपींना पाहण्यासाठी लोकांनी, वकिलांनीही गर्दी केली होती. अशा वेळी सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस आरोपींना कोर्टाच्या मागील दरवाजाने घेऊन येतात हा माझा पूर्वानुभव. मी मित्राला घेवून गेलो होतो. त्याला म्हटले, तू कोर्टाच्या बाहेर रस्त्यावर उभा राहा. मी मागच्या बाजूला किल्ला लढवतो.
सूचनेप्रमाणे मित्राच्या शिट्ट्या ऐकू येत. तेव्हा मी धावत जाऊन पाहत असे. पण पोलीस दुसर्याच आरोपींना घेऊन येत. त्यात महिलाही असायच्या, पण बहिणींसारख्या दिसणार्या आणि जोडीने येणार्या त्यात नव्हत्या. अर्थात मी आणि माझा मित्र तरी त्यांना कुठे ओळखत होतो.
थोड्या वेळाने पुन्हा मित्राने इशारा करणार्या शिट्ट्या वाजवल्या. पुन्हा धावून गेलो. पोलीस गाडीतून दोन महिला उतरल्या आणि त्या रस्ता ओलांडून कोर्टाच्या दिशेने येत होत्या. त्या कुणी का असेनात पटापट चार पाच फोटो टिपले. पंजाबी पोषाखावर दुपट्टा घातला नव्हता. पायात चपला नव्हत्या. पण आश्चर्य मात्र वाटले की दोन खून करणार्या आरोपींना पोलिसांनी मोकाट कसे सोडले. भरधाव येणार्या मोटारीखाली त्या आत्महत्या करतील अशी शक्यता होती. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना पकडले की त्यांच्या हाताला दोरखंड बांधून पोलीस घेऊन जाताना मी अनेकदा पाहिलेले. मग यांना मोकळे रान कसे?
आरोपींच्या मागोमाग मीही कोर्टात गेलो. कॅमेरा बॅगेत ठेवला. कारण कोर्टात कॅमेरा नेता येतो पण फोटो काढता येत नाही. आरोपी ज्या बाकड्यावर बसल्या, त्यांच्या मागच्या बाकड्यावर बसून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्या शोभना, अरुणा असल्याची खात्री पटल्यानंतर काढता पाय घेतला.
एक काम फत्ते झाले. हर… हर… महादेव!
आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्यांचा खून झाला, त्या भावजयांचे फोटो फारच महत्त्वाचे होते.
नशिबाने एका कॅमेरा रिपेअर करणार्यांशी गाठ पडली. त्याने मृत मंजुळा ठक्करच्या नवर्याशी ओळख करून दिली. तो व्यावसायिक फोटोग्राफर आहे. सुरुवातीला मी त्याच्याशी फोटोग्राफीच्या तांत्रिक मुद्दयावर चर्चा केली. मी आजपर्यंत कसे कुठे फोटो काढले तेही त्याला सांगितले. त्यामुळे जवळीक निर्माण झाली. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर तो मला चक्क घरी घेऊन गेला.
प्रयत्नांती परमेश्वर भेटतो म्हणतात त्याप्रमाणे घरी मला सर्वच भेटले. अनेक नातलग त्यांना भेटायला आले होते. एकमेकांचे सांत्वन करत होते, ते पाहून मलाही गहिवरून आले. मी मनजीभाईंच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला.
मनजीभाई म्हणाले, तुम्ही पत्रकार असल्याचे इथे कुणाला बोलू नका. तुमचे पेन कागद आणि कॅमेर्याची बॅग बाजूला ठेवा. कुणी विचारले तर माझ्या मुलाचे मित्र आहात असे सांगा. असे बोलून त्यांनी खोलीचे दार ओढून घेतले व ते पहिल्या खोलीत निघून गेले. पाच खोल्यांचा प्रशस्त प्लॅट, पण इथं मी एकटाच.
याच खोलीत दोघींना जिवंत जाळले होते. त्याच्या खुणा दिसत होत्या. भिंतीवर रक्ताचे डाग आणि आगीच्या ज्वाळांनी करपटलेल्या भिंतीवरील खुणा बघवत नव्हत्या. आगीचा ऊग्र वास अजूनही येत होता. मृत पासल आणि मंजुळाच्या फोटोला हळदी कुंकू लावून हार घातलेला. मी ज्या पलंगावर बसलो होतो तो मंजुळाचा, हे समजल्यावर शॉक बसला.
इथे येण्यास मी किती उत्सुक होतो पण आता क्षणभरही थांबू नये असे वाटू लागले. मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी काढता पाय घेण्याच्या पवित्र्यात असताना मनजी भाई आत आले. ते मला दुसर्या खोलीत घेऊन गेले. तिथे बातचीत सुरू झाल्यावर मी हळूच कॅमेरा काढला. तसे ते जागेवरून उठले, म्हणाले, कृपा करून या घराचा व माझा फोटो घेऊ नका. तुम्हाला हवे तर पासल आणि मंजुळाचा फोटो देतो. पण कॅमेरा बॅगेत ठेवा आणि बॅग लांब ठेवा.
मी सॉरी म्हटले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे केले. त्यांनी कपाटातून फोटो अल्बम काढला आणि मला दोघीचे फोटो देताना रडू लागले. फोटो मिळाल्याचा मला केवढा आनंद झाला. पण तो दर्शवला नाही. सांत्वनपर भाव आणून मी त्यांना धीर देत म्हटले, काय करणार? काही गोष्टी आपल्या हातात नसतात (माझ्या हातात दोघींचे फोटो घट्ट पकडून ठेवले), जे विधिलिखित असतं तसं घडतं. पण मला सांगा, हे असं विपरीत घडलं कसं?
मनजीभाई बोलू लागले…. देवाने काही कमी दिलं नाही सर्व सुखसोयी असताना एक एक म्हणताना घरातल्या सात महिला निघून गेल्या. आता सर्व पुरुष मंडळी राहिली…
मनजीभाईंना चार मुली आणि दोन मुलगे. दोनही मुलांची लग्न झाली. सुना लक्ष्मीसारख्या अतिशय प्रेमळ आणि संसारी पण घरातील लहान सहान गोष्टीवरून सारखे खटके उडायचे. त्यात मनजीभाई भयंकर तापट स्वभावाचे. सततच्या भांडणामुळे मोठी मुलगी नयनाने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. दुसरी मुलगी माधुरीने वडिलांचा विरोध असताना प्रेमविवाह केला. ती विरारला राहायची. केलेल्या लग्नाचा पश्चाताप होऊन तिने जाळून घेतले व जीवनाचा अंत केला. मनजीभाईंच्या विचित्र स्वभावामुळे त्यांची बायको त्यांना सोडून माहेरी निघून गेली.
राहिल्या अरुणा, शोभना या दोन मुली. त्यांच्या लग्नासाठी मनजीभाईंनी अनेक स्थळे आणली. पण मुलींना एकही स्थळ पसंत पडेना. घरातील सर्व कामे दोन सुना व्यवस्थित करत होत्या. पण मुली कामचोर. काम न करता त्यांना वेळच्या वेळी जेवण, खाणं पिणं पुढ्यात हवं असायचं.
क्षुल्लक कारणांवरून दोन नणंदा आणि दोन सुनांमध्ये रोज आदळआपट व्हायची. यावरून घरात दोन गट पडले. शोभना अरुणा एका गटात तर मनजीभाई त्यांच्या दोन सुना आणि त्यांचे नवरे असे पाचजण दुसर्या गटाचे.
दिवसेंदिवस दोन मुलींची आबाळ होऊ लागली. कमावते भाऊ आणि वडील घरखर्चाला पैसे देत नव्हते. ज्यांना सिनेमा बघायला, बाहेर फिरायला, खरेदीला पैसे हवे असायचे, पण एक दमडी कुणी देईना.
याउलट दोघी भावजयींचे लाड वाढू लागले. हवे नको ते सर्व मिळत होते, याचा राग ठेवून त्यांचा काटा काढायचे ठरले.
दिनांक ११ एप्रिल १९८३ रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटं झाली असतील. मनजी व त्यांची दोन मुले दुकानात गेली होती. पासल व मंजुळा जेवण आटपून गाढ झोपी गेल्या. पण नणंदाना झोप येईना त्यांच्या डोक्यात भीषण हत्याकांडाची योजना धुमसत होती.
वस्तूंची जमवाजमव चालू होती. मद्रासी पद्धतीचा दगडी वरवंटा, सहा फुटाचा जाडा बांबू, काचेच्या बाटल्या, घासलेट भरलेला डबा व कुणी आरडाओरडा करू नये म्हणून तोंडाला चिकटविण्यासाठी कापून ठेवलेले चिकटपट्टीचे तुकडे.
सर्व तयारी झाल्यावर नणंदांनी बेसावध भावजयांना दोन खोलीच्या खिंडीतच घेरले. प्रथम दोघींच्या डोक्यावर काठीने, बाटलीने जोरदार प्रहार केला. भावजया जीव वाचवण्याचा अखेरचा आटापिटा करीत असतानाच एका दगडी वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा आघात झाला. त्या बेशुद्ध होऊन पडल्यावर त्यांच्यावर घासलेट ओतून त्यांना जिवंत जाळण्यात आले.
भडकलेल्या आगीतून निघणार्या ज्वाळा पाहून आरोपी नणंदांना आपल्या भीषण कृत्याची जाणीव झाली. तेव्हा केलेल्या पापाची कबुली देण्यासाठी त्या पोलीस ठाण्याकडे वळल्या. निघतेवेळी ब्लॉकच्या दाराचे लॅच लॉक त्यांनी बाहेरून लावून घेतले.
घरात मृत भावजयांची दोन मुले ओक्साबोक्सी रडत होती. दैवाने इथं क्रूर चेष्टा केली. ज्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्या कोट्याधीशाचे घर आज स्मशान झालं होतं. दोन प्रेतं तिथे एकाचवेळी जळत होती. आईचं मरण डोळ्यादेखत पाहणारी ती निष्पाप पोरं त्या जळत्या चितेकडून बघून काय म्हणाली असतील?
एका सधन कुटुंबातील सात महिलांना क्षुल्लक कारणावरून कसे घराबाहेर पडावे लागले यावर फोटोसहित इत्यंभूत माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट मी ‘श्री’ साप्ताहिकात लिहिला. माझ्या बातमीतील सत्यता पडताळून पोलिसांनी माझा रिपोर्ट कोर्टासमोर सादर केला आणि साक्ष देण्यासाठी मला आमंत्रित केले.
पुढे रीतसर खटला चालून दोघा आरोपींना कोर्टाने फाशीची सजा सुनावली. आरोपींच्या वकिलांनी सदर शिक्षेविरोधात वरील कोर्टात अपील केले तेव्हा फाशीची शिक्षा रद्द होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.