गेल्यावेळी माझा मानलेला परममित्र पोक्याचा फोन खाली ठेवला आणि माझा ईडीतला तेव्हाचा एक शाळासोबती दारात दत्त म्हणून उभा राहिला. माझा प्रथम डोळ्यांवरच विश्वास बसला नाही. कारण बर्याच वर्षांनी तो भेटला होता.
`मला काय चौकशीला न्यायला आला की काय डोमकावळ्या.’ कारण त्याचं आडनाव कावळे होतं. शाळेत माझ्याइतकाच तोही मस्ती करण्यात पटाईत होता. आम्ही दोघे मिळून सर्व सरांची आणि बाईंची हुबेहूब नक्कल करायचो. वर्गात काहीही भानगड झाली की पहिल्यांदा संशायित म्हणून आम्हाला चोप देऊन वर्गाबाहेर काढायचे. तेव्हापासून त्याच्या आणि माझ्या मनात खुन्नसची भावना निर्माण झाली ती शाळेतून बाहेर पडल्यानंतर आणखी तीव्र होत गेली. हा कावळे पोलीस खात्यात गेला आणि तिथेही गाजला. त्या दरम्यान मला पोक्या अगदी मला हवा तसा सवंगडी मिळाला आणि आमची फुटपाथवरची भाईगिरी सुरू झाली. तिकडे हा कावळ्या कर्तबगारी दाखवत प्रमोशन मिळवत पुढे गेला. इन्स्पेक्टर झाला. कसल्या कसल्या परीक्षा दिल्या आणि आता ईडीच्या कार्यालयात सहाय्यक अधिकारी आहे. आमच्या दृष्टीने ती एक चांगली सोय आहे.
चहापाणी झाल्यावर मी त्याला कुतूहलाने विचारलं, इथे काय कोटा पूर्ण करायला आलास काय! पोक्या फॉरेन टूरला जायच्या तयारीत आहे. त्याची लग्नाची गडबडही सुरू आहे. त्यामुळे त्याला तू चौकशीसाठी म्हणजे चौकशीच्या नाटकासाठी नेऊ शकत नाहीस. मी मोकळा आहे. मला तू घेऊन जाच. रात्रीपर्यंत तुझ्या बाजूला बसवून ठेव. तिथे चौकशीसाठी आणलेल्या नेत्यांची कशी चौकशी करतात ते मला पाहायचेय. पोक्या परत येईपर्यंत दररोज मला घेऊन गेलास तरी चालेल. तिथे नेमकं काय काय करतात ते जवळून न्याहाळायचंय़ किरीटय्या तिथे येऊन काय धुमाकूळ घालतो ते बघायचंय. पण गुपचूप, कारण तो मला ओळखतो. माझ्याकडे आठ दहा रबराच्या चेहर्याचे अप्रतिम मास्क आहेत. दहा वेगवेगळे चेहरे आहेत. दर दिवशी वेगळा मास्क घालून येतो आणि तुमच्या इथे काय मजा चालते ते पाहत बसतो.
कावळे तयार झाला. मी त्याला विचारलं, आतापर्यंत किती बकरे चौकशीसाठी आणले?
त्यावर कावळे म्हणाला, दिल्लीवरून ऑर्डर येते मग किरीटभाई येऊन खबर देतो. त्याच्याकडे कधी कधी पुढच्या बकर्यांची लिस्टही असते. सगळा कोटा पूर्ण करायचाय अशी वरून ऑर्डर असल्यावर आम्ही काय बी करू शकत नाय. आम्ही फक्त एकेकाला उचलून आणायचं काम करतो. समन्स वगैरे देतोच असं नाही. कधी रात्री, कधी पहाटे, कधी दिवसा एकेकाला उचलतो. त्या आधी दोन-चार दिवस किरीटभाई कोणाला उचलणार याच्या पुड्या सोडतो. किरीटभाईचा ज्यांच्यावर खुन्नस आहे त्याला तो अजिबात सोडत नाही. त्याला दोन-चार दिवस तरी ईडीच्या कोठडीची हवा खायला लावतोच.
– पण मला सांग कावळे, घोटाळे काय फक्त भाजप सोडून इतर पक्षांच्याच नेत्यांनीच केले. भाजपमधील घोटाळेबाजांची किती नावे तुला सांगू? तो दक्षिण मुंबईतला धनाढ्य भाजपवाला. त्याला जर तुम्ही चौकशीसाठी बोलावले असते तर तुमचीही चांदी झाली असती आणि ईडी किती नि:पक्षपातीपणे काम करते यावर लोकांचाही विश्वास बसला असता. त्या तावड्यांच्या विनोदालाही बोलवायचे होते. चणे फुटाणे खात आला असता आणि गेला असता. फडणवीसांनाही बरं वाटलं असतं. आणखी दोन चार निरुपद्रवी भाजपवाल्यांना ईडीने नेलं असतं आणि त्यांची खणानारळांनी ओटी भरून परत पाठवलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे कसं, सर्वांना समान न्याय दिल्यासारखं झालं असतं. पण असं करायला डोकं लागतं ना! ती डोकी या भाजपवाल्यांकडे एक तर कमी तरी आहेत किंवा प्रमाणापेक्षा जास्त तरी आहेत. त्यामुळे कुठे अतिरेक करावा आणि कुठे नमतं घ्यावं याचा सारासार विवेक त्यांना नसतोच. हे अगदी दिल्लीच्या नेत्यापासून गल्लीतल्या पुढार्यांपर्यंत दिसून येतं. `ईडी’ची बिडी किती फुंकायची आणि त्यातून किती धूर काढायचा याची यांना काही पडलेलीच नाही. अनिर्बंध सत्ता असतानाही उन्माद आणि हातून सारे निसटल्यावरही वड्याचे तेल वांग्यावर काढण्याची धांदल यातून या लोकाचं आणि पक्षाचं काय भवितव्य वाटतं तुला?
मी `ईडी’चा नोकर आहे. ते सांगतील ते मला करावंच लागतं. पण त्यांच्या कार्यालयात किरीटची किरकिर सुरू झाली की मजा येते. अरे तुरे केलेलं त्याला आवडतं. मी त्याला सुरुवातीला साहेब म्हणालो, तर म्हणाला, मी साधा खासदारही नाही. पण जनतेचा प्रमाणिक सेवक आहे. मला साहेब म्हणून घ्यायला आवडत नाही. कावळे, तुला म्हणून सांगतो, आयुष्यात मला दिल्लीकडून इतका मानसन्मान मिळेल, असं स्वप्नातसुद्धा खरं वाटलं नसतं. इव्हन खासदार आणि मंत्रीपदापेक्षा हा माझा मोठा सन्मान मी समजतो. हे बघायला माझ्यावर सदैव जळणारे माझ्याच पक्षातले आणि आता स्वर्गात गेलेले माझे प्रतिस्पर्धी हवे होते. त्यांचा जळून जळून कोळसा झाला असता. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री नेहमीच मोबाइलवर माझ्या संपर्कात असतात हे माझं केवढं भाग्य. मोदीसाहेब तर मला नेहमी म्हणतात, तुझ्याकडे एवढं टॅलंट आहे की तुझा उपयोग पक्षात कशासाठी करून घ्यावा, असा मला प्रश्न पडतो. शेवटी सन्माननीय अमित शहांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मोदीसाहेबांनी मला `ईडी’च्या शोधमोहिमेचा मुख्य सूत्रधार म्हणून जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी दिवसरात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून `ईडी’साठी माझा जीव कणाकणाने झिजवतोय. थोडीशी बोलण्यात अडचण होते. तरीही एखादी गोष्ट सगळी ताकद लावून मोठ्या आवाजात ठासून सांगितल्यास ती खरी वाटते. याच तंत्राचा उपयोग करून मी भल्याभल्यांना जेरीस आणलं. हिटलर आणि गोबेल्सच्या पुस्तकांचा अभ्यास केला. आता मलाही या तंत्रावर पुस्तक लिहावसं वाटू लागलं आहे. हिटलर-गोबेल्सपेक्षाही थरारक. मोदी साहेबांनी मला ही पुस्तकं वाचण्याची शिफारस केली होती. आज त्यामुळेच गंडवागंडवीच्या नवनवीन युत्तäयांचा खच माझ्या डोक्यात खुळखुळतोय. आता बघा, यापुढे एकेकाला कसं सरळ करतो ते…
एवढं बोलून कावळे थांबला व म्हणाला, निघतो मी. पुन्हा कधीतरी येईन `ईडी’तल्या आणखी गमती-जमती सांगायला.