मराठी कलावंत गुणवान आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर त्या प्रमाणात ते चमकत नाहीत. असं का होत असेल?
– प्रिया मोरे, गांजेकर वस्ती
आमच्याकडे बुद्धी, हुशारी आहे पण तिला झेप नाही… काही गोष्टी वैश्विक असाव्या लागतात आत.
हिंदी सिनेमातला आजचा कोणता नायक तुम्हाला आवडतो? आणि नायिका?
– मिताली सोनाळकर, अंबरनाथ
गजराज/ तब्बू
रशिया आणि युक्रेन यांच्यात तुम्ही कोणत्या बाजूचे?
– अन्वय म्हात्रे, सुधागड
कोणाचीही बाजू घेण्याइतका माझा अभ्यास नाही.
तुम्ही लता मंगेशकर आणि किशोरी अमोणकर या दोघींचे चाहते आहात. शास्त्रीय संगीताचे अनेक चाहते सिनेसंगीताला आणि सुगम संगीताला कमी लेखतात. तुम्ही या दोन्हीमध्ये फरक मानता का? किशोरी ताई आणि लतादीदी यांच्यात तुम्ही कमीअधिक करू शकता का?
– नंदिनी शेळके, लातूर
दोन्ही संगीतप्रकारच असले तरी त्यात अभिरुचीचा फरक आहे… आवड आपली आपली… मला ज्या संगीतात लालित्य आहे ते फार आवडतं… लता बाई आणि किशोरी ताई दोघी त्यांच्या संगीतात लालित्य भरतात म्हणून मला त्या फार आवडतात.
अचानक मध्यरात्री तुम्हाला फोन आला आणि पलीकडचा माणूस म्हणाला, मी ईडीमधून बोलतोय, तर…
– बळवंत गोडखिंडीकर, भिलवडी
‘राँग नंबर’ म्हणून पुन्हा झोपी जाईन!
तिकडे पुतीनने युक्रेनवर हल्ला चढवला आहे आणि इकडे तुम्ही स्वस्थ कसे? एखादा फोन करून झाडायचात ना त्याला?
– दिवाकर शेवते, पन्हाळा
द्या त्यांचा नंबर, करतो लगेच फोन!
राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता. फोडणीत आधी पडणार, खाताना काढून फेकला जाणार, असं म्हणतात. तरी लोक कार्यकर्ते कसे बनतात?
– नारायणदास जाधव, सावंतवाडी
आपल्याकडे राजकारणात हौसे-नवसे-गवसे आहेत तोपर्यंत पक्षांना मरण नाही!
आजकाल ऐतिहासिक सिनेमे आपल्या मातीतले वाटत नाहीत, मार्व्हलच्या सुपरहीरो सिनेमांसारखे स्पेशल इफेक्ट्स आणि खोट्या भव्यतेने भरलेले असतात. याने इतिहासाचा अपलाप होत नाही का?
– सीमा सहस्रबुद्धे, नायगाव
आपल्याकडे आपलं असं काहीच राहिलं नाहीयेय… लोकानुनय करायचा असल्यामुळे कॉपी करणं हेच धोरण… आणि ते सोपंही आहे नाही का?
गाढवापुढे वाचली गीता, गाढव म्हणतं कालचा गोंधळ बरा होता, अशी एक म्हण आहे. गाढवाला गुळाची चव काय, अशी दुसरी म्हण आहे… मुळात गाढवापुढे गीता वाचणे किंवा त्याला गूळ चाखवायला जाणे, हाच गाढवपणा नाही का?
– लता मिरजकर, सातारा
बघा, तुम्हाला कळलं ना, आता इतरांना सांगा!
तुम्ही गब्बर सिंगच्या भूमिकेत असता आणि तेरा क्या होगा कालिया, या प्रश्नावर कालियाने मैंने आपका नमक खाया है सरदार, असं उत्तर दिलं असतं, तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली असती?
– वाहरू सोनाळे, भंडारदरा
अब शुगर की गोळी खा… असं म्हणून त्याला लिम्लेटची गोळी दिली असती आणि खूप हसलो असतो!
देव प्रसन्न झाला आणि त्याने वैभव मांग ले जो चाहिए वो मांग ले, असं म्हटलं तर काय मागाल?
– सुनंदा पांचाळ, हरचेरी
मला गोरगरीब, महिलांचं दुःख निवारण्याची शक्ती दे!