आदित्य हॅज अराइव्ह्ड!
‘खून खून में क्या फरक है? सबका खून तो लाल है…’ उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांनी हिंदीत अत्यंत उत्तम व मर्मभेदक भाषण केले. शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य या प्रश्नांवर उत्तम मांडणी केली. कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखालील जो शेतकरी मोर्चा मुंबईत आला होता, त्याचेही त्यांनी बोलता बोलता कौतुक केले. योगी सरकारवर हल्लाबोल केला. नुसती तथाकथित आक्रमकता नव्हे, तर अभ्यासपूर्ण आणि वेधक मांडणी, ओघवती भाषा आणि विषयावरची पकड, भाषणातील आत्मविश्वास … हे म्याँव म्याँव नव्हते, तर ढिश्याँव ढिश्याँव होते! अॅट लास्ट आदित्य हॅज अराइव्हड! चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे…
– हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
कानून, पुलिस सब झुकताय इधर…
हाती सत्ता आणि पैसा असेल तर या देशातील प्रशासन, न्याय आणि पोलीस यंत्रणा हवी तशी झुकवता येते, वापरून घेता येते. दोन उदाहरणं अगदीच ताजी आहेत. त्या डेरा सच्चा सौदाच्या बाबा रामरहिमला बलात्कार आणि खून प्रकरणात जन्मठेप झालीय. परंतु ऐन पंजाब निवडणुकीच्या धामधुमीत त्याला पॅरोल दिला गेला. कारण काय तर म्हणे तो आजारी होता आणि त्याला उपचारांसाठी बाहेर यायचं होतं! बाबा बाहेर आला आणि त्वरित चक्क बरा झाला की हो! मग मतदानाआधी आपल्या भक्तांपर्यंत मतदानासंदर्भात काय मेसेज पोहोचवायचा होता तोही त्याने व्यवस्थित पोहचवला. आता २७ ला त्याला परत जेलमध्ये हजर व्हायचंय. पण तो कदाचित रजा वाढवून मिळण्यासाठी अर्ज करेल आणि त्याला ती मिळेलही बहुदा. गंमत म्हणजे अशा या बलात्कार आणि खुनाचे आरोप सिद्ध होऊन सजा झालेल्या गुन्हेगाराला सरकारने झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवलीय… आता बोला!
मागच्या ऑक्टोबरमध्ये लखीमपूरला आंदोलन करीत असलेल्या शेतकर्यांवर केंद्रीय मंत्री अजय मिश्राचा पोरगा आशिष मिश्राने गाडी चढवली. फायरिंगही केली. अनेक शेतकरी चिरडून मेले तर काहीजण गोळीबारात दगावले. या आशिष मिश्राला अटक करायला आधी पोलिसांनी बराच वेळकाढूपणा केला आणि मग कसाबसा जनरेट्याच्या प्रेशरमुळे त्याला नाईलाजाने अटक करावी लागल्यावर कोर्टाने इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या तीन महिन्यात आणि तेही यूपीत निवडणूक सुरु असताना जामीन मंजूर करून सोडलेही!
कानून, पुलिस सब झुकताय इधर.. सिर्फ हात में सत्ता और पैसा मंगताय.. बस..!
– रवींद्र पोखरकर
वैविध्यपूर्ण माहिती देणार्या ‘मार्मिक’चे कौतुक
मी ‘मार्मिक’चा कित्येक वर्षे चोखंदळ वाचक आहे. वाचून झालेले अंक वरंध व कापडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना देत असे. पाच रुपये किंमतीपासून पंधरा रूपये किमतीचे अंक वाचतो आहे. अनेक अंक संग्रह केले आहेत. सध्या महाडमध्ये मोजकेच ‘मार्मिक’ येताहेत. असो. पुरूषोत्तम बेर्डे सरांचे व कवी अशोक नायगावकर सरांचे लेख आनंद देतात. ते लेख आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांना व्हॉट्सअपवर पाठवून आनंद वाटतो. अनंत अपराधी नाव. हास्यानंदासोबत वास्तवाची जाणीव करून देतात. शहरी व ग्रामीण, श्रीमंत व सामान्यांची सुखदुःखे हसवत मांडणारे अपराधी. म्हणी, वाक्प्रचार, बोलिभाषांची ओळख अनंत पद्धतीने करून देतात.
प्रासंगिक, वास्तववादी विनोदांसोबत कल्पनेने भरार्या घेणारे विनोद. डुलकी लागणे, मोहोळ फुटावं, जीभ चाचरणे, लटपट्या, बेगमी, ढेकूण अशा शब्दांची ओळख सवोदितांना होत असते. बेर्डे सरांची शीर्षके, आंब्रे सरांच्या प्रासंगिका, वात्रटिका, मिस्किली, नायगावकर सरांची मिशीतील, डोळे मिटून असलेली छबी.
तिळगुळ, फटकारे, व्यंगचित्रे नातवंडांना समजवून सांगतानाचा आनंद. १९६९ साली बहुदा मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महाडमधील भेट. ज्येष्ठ शिवसैनिक शं. बा. तथा दादासाहेब सावंत यांचे घरासमोरील प्रसंग. सारे ‘मार्मिक’मुळे आठवतात. पंधरा रूपयांत वैविध्यपूर्ण माहिती देणार्या ‘मार्मिक’चे कौतुक!
– अ. वि. जंगम, महाड