माझा मानलेला परममित्र पोक्या आणि त्याच्या भावी पत्नीच्या डोक्यात राजकीय मनोरुग्णांसाठी मेंटल हॉस्पिटल बांधण्याची आयडिया आल्याचे त्यांनी मला सांगितले, तेव्हापासून मी अशा मनोरुग्णांची यादी बनविण्याच्या कामाला लागलो आहे. कारण मित्राच्या चांगल्या कामाला सर्वतोपरी मदत करणे हे माझे कर्तव्य समजतो. पोक्या आणि त्याची भावी पत्नी पाकळी सध्या त्यांच्या विवाहपूर्व प्रेमाच्या गडबडीत असतील याची मला जाण आहे. त्यामुळे त्या दोघांवर इतर कामांचा जास्त ताण पडू नये यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमीजीवांना प्रेम करण्यास विरंगुळा मिळावा म्हणून सध्या मी त्याला पाकळीबरोबर उंडारण्यासाठी मोकळा सोडला आहे.
त्याला परवा म्हटले की लग्न होण्याआधी तुम्ही दोघांनी जेवढी दुनिया पाहून घ्यायची असेल तेवढी पाहून घ्या. वाटल्यास लग्न आपण नोव्हेंबरमध्ये करू. तोपर्यंत तुम्ही वर्ल्ड टूर करून या. लग्नानंतर सगळेच हनिमूनला जातात. पण लग्नाआधी वर्ल्ड टूर करणं फारच रोमँटिक असतं. खर्चाबाबत अजिबात चिंता करू नकोस. तुम्हा दोघांच्या वर्ल्ड टूरचा खर्च करण्यास दिल्लीच्या कृपेने मी समर्थ आहे. जग फार सुंदर आहे. त्याचा मनापासून आणि पुरेपूर आस्वाद कसा घ्यायचा हे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून शीक. प्रत्येक देशात जाताना त्या त्या देशाचा पेहराव शिवून घे. पाकिस्तानात गेलास तर तिथल्या नेत्यांसारखा पेहराव कर. पाकळीसाठी सुद्धा भेंडीबाजारात जाऊन बुरखा विकत घे. जपानला तर तुम्हा दोघांना खूप शिकता येईल. दुसर्याचा सन्मान कसा करावा, पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करावं, शिस्त कशी पाळावी आणि तंत्रज्ञानात अधिकाधिक आधुनिकता कशी आणावी हे ज्ञान देणारी जपान म्हणजे आदर्श शाळा आहे. चीनला गेलास तर मात्र त्यांच्यासारखं खाद्यपदार्थ खाण्याचं अनुकरण करू नकोस. ते लोक झुरळाचं लोणचं, पालींची कोशिंबीर, गांडुळांच्या शेवया आणि असे आपल्याला शिसारी येणारे पदार्थ कसे आवडीने खातात ते हॉटेलात गेलात तर डोकावूनही पाहू नकोस. तिथल्या मुक्कामात ब्रेड बटर खाऊन दिवस काढलेस तरी चालतील. नाहीतर इथून जातानाच एक लोणच्याची बरणी आणि खोबरं, मसाल्याची सुकी चटणी घेऊन जा. सुके बोंबील ने. ते कुठेही भाजून उपयोगात येतील. हल्ली तिथल्या हॉटेलात म्हणे विष गायब केलेल्या कोविडचं सूप मिळतं. ते मात्र खाऊ नकोस. मात्र चिन्यांनी त्यांचा देश किती मॉडर्न केला आहे ते पाहून आल्यावर मोदींना सांगून तसं काही आपल्याकडे करता येईल का हे विचारू आपण.
सध्या तर मोदी देशातील अग्रगण्य नावाजलेल्या संस्था विकायच्या मार्गाला लागले आहेत. एअर इंडिया विकली, आता एलआयसीवर डोळा आहे. ते सत्तेवर आल्यापासून त्यांनी देशच विकायला काढला आहे असं काही लोक म्हणतात. अनेक प्रमुख उद्योग गुजरातला नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ते सत्तेवर आल्यापासून भारतीय बँकांकडून पैसे लुटणार्या देशभक्त व्यावसायिकांची यादी तर पाहा आणि वैशिष्ट्य म्हणजे विजय मल्ल्या वगळता सर्वजण गुजरातचे आहेत. चमत्कार नाही तर काय? या २७ जणांची नावं पाहून मला तर धक्काच बसला. त्यात मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विशान मोदी, पुष्पेश वैद्य, आशिष जीवनपुत्र, सनी कालरा, आरती कालरा, संजय कालरा, वर्षा कालरा, सुधीर कालरा, जतीन मेहरा, उमेश पारीख, कमलेश पारीख, निलेश पारीख, विनय मित्तल, एकलव्य गर्ग, चेतन जयंतीलाल, नितीन जयंतीलाल, दिप्तीबेन, चेतन, सविता वैद्य, राजीव सैथ, राजीव गोयल, अलका गोयल, ललित मोदी, रितेश जैन, हितेश नांगेदर भाई पटेल, मयुरीबेन पटेल, आशिष सुरेशभाई विशेष म्हणजे यांनी एकूण लुटलेली रक्कम फक्त दहा ट्रिलियन रुपये म्हणजे एकावर १२ शून्य. यात एकही मराठी नाही. मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या मागून आलेले हे खरे लुटारू गुजरातचे भले करणारे चोर. थोड्याच दिवसात त्यांची नावे जाहीर होतील.
सगळे उंची दारूचे व्यवहार गुजरातेतून होतात. गांजाचे, विदेशी दारूचे स्मगलिंग होतं. आपल्या माणसांना परदेशात पळून जाऊ देण्यास मदत करण्याच्या मागे सत्तेचा मोठा हात कोणाचा होता हे तुझ्या साग्रसंगीत लक्षात आलंच असेल. देशाचा विकास नव्हे तर विकासाची शोबाजी करून देश खड्ड्यात घालण्याची ही तयारी आहे. असो. निवडणुकीत फटके पडतील तेव्हा कळेल. तोपर्यंत आपणही मजा करून घेऊ.
विदेशात बाकी देशही पाहण्यासारखे आहेत. दुबई, थायलंड, मलाया, बँकॉक, पटाया म्हणजे मौजमजेचा स्वर्गच. भरपूर मजा करा. अमेरिका पाहून हुरळून जाऊ नकोस. फक्त उंच उंच इमारती आणि स्वच्छ रस्ते पाहून घे. तिथली रसातळाला गेलेली संस्कृती आणि स्वैराचार, हिंसाचार गुंडगिरी आणि राज्यकर्त्यांचे तमाशे पाहून नाव मोठं लक्षण खोटं अशी स्थिती होईल. अमेरिकेत भारतीयांनी चांगले बस्तान बसवलं आहे. आपल्या संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचं अनुकरण काही अमेरिकन लोक करतात. `हरे राम हरे कृष्ण पंथ’ अमेरिकेतच घट्ट मूळं रोवतोय. तिथल्या जीवनात कंटाळलेले लोक अध्यात्माच्या मार्गाला लागलेत.
बाकी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड बऱ्यापैकी देश आहेत. दक्षिण आप्रिâकेत जोहान्सबर्ग येथे नक्की जा. तिथली शॅटी टाऊनची वस्ती पहा. पूर्वी तर धारावीच्या झोपडपट्टीसारखी ही वस्ती वाटायची, आता सुधारली असेल. मात्र काम्पुचियाला जाऊ नकोस, होनोलुलूला जाण्याचेही टाळ. कारण तुला आल्यावर सांगेन. पाकळीच्या तब्येतीची काळजी घे. इथे राजकीय अराजक माजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सावकाश ये. आर्थिक गुन्हे करून परदेशात गेलेल्या मल्ल्यासकट देशभक्त भारतीय नागरिकांचे पत्ते तू जाण्यापूर्वी तुला मेल करतो. तिथे गेल्यावर जमल्यास पत्र पाठव. तुमच्या उड्डाणाला शुभेच्छा…
एवढं बोलून मी फोन ठेवला आणि दाराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर माझा ईडीतला मित्र दारात उभा!