कर्नाटकातील उडुपी येथील ज्युनियर कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याने त्यांनी निदर्शन केले आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून निदर्शने करू लागले. कर्नाटकातील शाळा-कॉलेजमध्ये निदर्शनाचे लोण फार वेगाने पसरल्याने कर्नाटक राज्यातील सर्व शिक्षणसंस्था काही दिवस बंद कराव्या लागल्या. एकूणच घटनाक्रम बघता हे प्रकरण अतिशय किरकोळ आणि त्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या पातळीवर हाताळणे सहज शक्य होते. हा किरकोळ स्वरूपाचा वाद शाळा प्रशासन आणि पाच सहा मुलींच्या मधला होता (बहुतांश मुस्लिम मुलींनी प्रशासनाचे ऐकले अशी माहिती आहे), असे असताना त्या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना काही हिंदू विद्यार्थ्यांना भगवे उपरणे घालून धार्मिक उन्माद माजवायची इतकी घाई कोणाला आणि का झाली होती? अशी एकसारखी उपरणी लगेच पुरवली कोणी? एका प्राचार्याच्या पातळीवरचे किरकोळ प्रकरण या चिथावणीने राज्यभर चिघळले, नंतर देशभर पसरले. असेच एक टोळके मंड्या येथे एका मुलीवर झुंडीने चालून गेले असे दाखवणारा व्हिडिओ प्रसारित झाला. बेळगावच्या सीमाभागातील मराठी बांधवांवर कारवाई करताना तत्परता दाखवणारे बोम्मई सरकार या प्रकरणात मात्र स्वतःचेच लोक गुंतले असल्याने मूग गिळून गप्प आहे.
बुरखा, नकाब, हिजाब हे धार्मिक भावनेतून मुस्लिम स्त्रिया परिधान करतात. पण या तिन्हीमध्ये फरक आहे. नकाबमध्ये चेहरेपट्टीतील डोळ्यांच्या भाग खुला असतो, बुरखा डोक्यापासून तळपायापर्यंत सर्व अंग झाकतो. हिजाब हा एक प्रकारचा स्कार्फ. तो फक्त केस, मान आणि कान झाकतो. पुण्यासारख्या शहरांतल्या जवळपास सगळ्या महिला-मुली स्कुटरवरून प्रवास करताना धुळीपासून, उन्हापासून संरक्षण म्हणून असा स्कार्फ वापरतातच. याव्यतिरिक्त देश बदलतील तसे थोड्याफार फरकाचे अल् अमिरा, शायला, खिमार असे उपप्रकार आहेत. यांतील हिजाब हा शब्द सोडला तर इतर शब्दांचा कुराण या पवित्र धर्मग्रंथामध्ये साधा उल्लेख देखील नाही आणि हिजाब हा एकमात्र शब्द कुराणमध्ये सात वेळा विभाजन, अडसर, पडदा अशा वेगवेगळ्या अर्थांनी आला आहे. पण कोठेही तो पोषाख या अर्थाने आलेला नाही. पवित्र कुराणमध्ये महिला आणि पुरूष दोघांचा पोषाख नीटनेटका आणि सभ्य असावा असे म्हटले आहे. त्या धार्मिक तत्वाला पूरक असा हा हिजाब आहे. तशा प्रकारचा स्कार्फ, ओढणी, दुपट्टा, घुंघट, पदर अन्यधर्मीय महिलाही वापरतात. ख्रिस्ती मिशनरी शाळेतील महिला शिक्षिकांच्या पोषाखातही हिजाबशी साधर्म्य दाखवणार्या स्कार्फचा समावेश असतो. पण धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावून डोक्यापासून तळपायापर्यंत स्त्रियांना काळ्या कपड्याच्या आत झाकून टाकणारा नकाब आणि बुरखा हे प्रकार मात्र योग्य आहेत असे अजिबात म्हणता येणार नाहीत.
एकतर कर्नाटकातील दहावीनंतरची गणवेष सक्ती हे सरकारी मूर्खपणाचे उदाहरण आहे. सत्तरीपार प्रधानमंत्र्यांची दिवसातून चार वेळा कपडे बदलून जर हौस फिटत नसेल तर तरुणांवर कॉलेजमध्ये देखील एकच गणवेष घालायची सक्ती कशासाठी? काही संघटना गणवेषाचे स्तोम फार माजवतात आणि समानतेचे तत्व फक्त त्याबाबतीतच पाळतात.
आज जग जवळ आले आहे आणि त्यामुळेच संस्कृती, चालीरीती ह्यांची देवाणघेवाण वेगाने होत आहे. खाद्यपदार्थ आणि पोषाखांची एकमेकांच्या संस्कृतींमधली घुसखोरी थांबवणे जागतिकीकरणानंतर अशक्य आहे. चायनीज पदार्थ आताच आपल्याला आपलेच वाटू लागले आहेत (ते चीनमध्ये बनत नाहीतच, हा भाग सोडा). जीन्स, स्कर्ट, टी शर्ट हे आपल्या महिलांच्या रोजच्या पोशाखाचा अविभाज्य भाग झाले आहेत. या जगात मुस्लिम महिलाही स्वतःहूनच या पोषाखाच्या धार्मिक अवडंबरातून मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहेत. पण असल्या विवादामुळे त्याला अकारण खीळ बसेल. स्त्रीला झाकून ठेवण्याच्या पुरूषसत्ताक मानसिकतेतून आलेल्या पोषाखाला आणि स्त्रियांवरील गुलामीच्या सर्व प्रतीकांना ‘धार्मिक स्वातंत्र्य’ ठरवणे जेवढे चूक आहे, तेवढेच असली वृत्ती फक्त मुस्लिम धर्मात आहेत आमच्या धर्मात मात्र नाही, असले वेड पांघरून पेडगावलाही जाऊ नये.
या प्रकरणानंतर मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. या धर्मातील मुली शिकण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्या आता कुठे मोठ्या प्रमाणावर शिकायला लागल्या आहेत. हिजाबबंदीचा गैरफायदा त्यांच्या धर्मातल्या पुरुष वर्चस्वसत्ताक प्रवृत्तीच घेणार आहेत आणि या मुलींना हिजाब घालून जे शिक्षण मिळते, तेच त्यांच्यापासून हिरावले जाणार आहे. सामाजिक आणि धार्मिक दबावामुळे शिक्षण सोडून घरी बसायची वेळ त्यांच्यावर आली तर त्या प्रत्येक मुलीच्या पालकांचे समुपदेशन कर्नाटक सरकार त्यांच्या घरोघरी जाउन करणार आहे का? बेटी पढाओच्या पोकळ घोषणा देऊन बेटी शिकत नसते तर ती संकटाचे पर्वत ओलांडून ते शिक्षण मिळवते. शाळेत जाऊन ह्या मुलींनी शिकणे महत्वपूर्ण आहे का गणवेष सक्ती जास्त महत्वपूर्ण आहे?
त्याचबरोबर गणवेषात हिजाब नको म्हणणारे सरकार यापुढे संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचे कारभाराचे निधर्मीकरण करण्याची हिंमत दाखवणार आहे का? सरस्वती वंदना, गणेशोत्सवासारखे उत्सव हिंदूंनीही बंद करायचे का? आधीच करोनाकाळात शिक्षणाची संपूर्ण वाट लागली असताना नको तो वाद उकरून कुरापत करण्याची भाजपाशासीत राज्याला गरज का पडली? भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशाची निवडणूक हरणार असं चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे असले गलिच्छ वाद उकरून काढून काहीही करून ध्रुवीकरणाचा खेळ करण्याची भाजपची ही वृत्ती पाहता या सत्तेत भावी पिढीच्या आशाआकांक्षांचं काय होणार, असा प्रश्न पडतो.
जगातील प्रत्येक धर्मात अनेक चालीरीती असतात आणि त्यातील काही अनिष्ट अथवा कालबाह्य असतात. म्हणूनच सर्व धर्मात सुधारणा व्हाव्याच लागतात आणि त्यासाठी गरज पडेल तर कायदे देखील करावे लागतात. सतीबंदीचा कायदा, हुंडाबंदी, अस्पृश्यता बंदी, मंदिर प्रवेश, स्त्रीभृणहत्या, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, बालविवाहबंदी, तिहेरी तलाक बंदी यांच्यासारखे कायदे बनले म्हणून तर समाजात काही सुधारणा दिसतात. पण या सुधारणा करण्यासाठी जी नैतिकता, प्रामाणिकपणा, समन्यायी वृत्ती, खरोखरचा सुधारकी बाणा आणि विशुद्ध हेतू हवा तो भाजपाकडे आहे असे मात्र म्हणता येत नाही. मुस्लिम समाजाच्या हिताचे कायदे करताना त्या समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा हेतू प्रामाणिक असेल तर देशातील वातावरण त्या समाजासाठी भयमुक्त करणे ही भाजपा सरकारची परमोच्च जबाबदारी आहे. मात्र या सत्तालालसी टोळीवर मुस्लिमच काय पण सच्चे हिंदू देखील तसूभरही विश्वास ठेवणार नाहीत.
पंतप्रधान मोदीनी एकदा फोटोसाठी चरखा चालवायची पोझ घेतली होती पण निव्वळ तशी पोझ घेऊन गांधी होता येत नाही तर त्यासाठी गांधींसारखी स्पष्ट आणि ठाम पोझिशन घ्यावी लागते. ‘साध्य’ चांगले असले आणि ‘साधन’ चांगले असले तरी गांधींचा कटाक्ष ‘साधकाने’ चांगले असण्यावर देखील होता. मुस्लिम समाजाची सुधारणा हे साध्य चांगले आहे, त्यासाठी प्रभावी कायदा करणे हे साधन देखील योग्य आहे पण ज्यांना या कथित सुधारणांची अतिघाई झाली आहे, ते आपल्या धर्मातल्या गैरप्रथांना पायबंद घालताना दिसत नाही, उलट उत्तेजन देऊन देशाला मध्ययुगात नेताना दिसतात. त्यामुळे उगाच दोन्ही बाजूंनी निवडणुकीपुरता पेटवलेला वाद चघळत बसण्यापेक्षा त्या वादावर सध्यातरी ‘पडदा’ घालणेच शहाणपणाचे ठरेल.
लोकशाहीचा शिमगा!
निवडणुका भारतीय लोकशाहीत मोठ्या सणांप्रमाणे असतात. मुद्देसूद विकासात्मक रूपरेखा सांगणार्या भाषणांची आतषबाजी करत निवडणुकीला दिवाळीच्या उत्साही सणाचे स्वरूप देशातील राजकारणी नक्कीच देऊ शकतात पण राजकारण्यांना व विशेषकरून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याना बहुतेक दिवाळीपेक्षा शिमगा सण जास्त प्रिय असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आजकाल होत आहेत. त्या भाषणातील त्यांची वक्तव्ये सार्वजनिक भाषणांच्या मर्यादा ओलांडणारी आहेत. शिमग्यात जी आरकाटी खरकाटी होते त्याला देखील लाजवेल अशी वक्तव्ये जर बेजबाबदार नेते करत असतील तर ह्यातून अशा नेत्यांना समाजातील शांतता व सलोखा ह्याची होळी करून स्वतःची सत्तेची पुरणपोळी भाजायची आहे इतकेच सिद्ध होते.
अमित शहा ह्यांनी नुकतेच उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत ह्यांच्याविषयी जे उद्गार काढले ते त्यांच्या मातृसंस्थेच्या संस्कारात बसतात का? हरीष रावत ह्यांची अवस्था ‘धोबी का — न घर का ना घाट का’ अशी झाली आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हणणे हे अशोभनीय आहे. त्या म्हणीतल्या ‘कुत्ता’ ह्या शब्दाच्या जागी त्यांनी डॅश म्हणत पॉझ घेतला त्यामुळे ते विधान चुकून केलेले नसून जाणीवपूर्वक एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा केलेला तो अपमान होता. हरीष रावत ह्यांनी १९८० साली भाजपाच्या मुरली मनोहर जोशी ह्यांचा पराभव करून समोरच्या दाराने संसदेत सन्मानाने प्रवेश केला तेव्हा अमित शहा सोळा वर्षाचे होते आणि त्यांना राजकारणातील गमभन देखील येत नव्हते. ज्यांनी स्वपक्षातल्या मुरली मनोहर जोशी आणि अडवाणीजी ह्यांचा सन्मान राखला नाही ते हरीष रावत ह्यांच्या राजकीय ज्येष्ठतेचा काय मान राखणार? वाव्âप्रचार व बोली भाषेतील म्हणी तोंडपाठ असल्याने जनता त्यातल्या रिकाम्या जागा ओळखते म्हणून चलाखी वापरणार्यांनी बाळासाहेबांची रोखठोक भाषणे कधीतरी ऐकावीत आणि नथीतून तीर मारायचे धंदे बंद करावेत. हरीष रावत हे स्वतः वकीलीची पदवी घेतलेले सुशिक्षित राजकारणीच आहेत, सुसंस्कारी आहेत. कुत्रा हा भैरवाचा अंश आहे व तो देवस्वरूप असल्याने मला त्याची उपमा दिली तर तो मी माझा अपमान समजणार नाही असे म्हणत हरीष रावत ह्यानी भाजपाच्या शाब्दिक गलिच्छतेला प्रतिउत्तर ही तशी गलिच्छता नसून त्याचे उत्तर शाब्दिक सुसंस्कृतपणा आहे हेच दाखवून दिले आहे.
जर अमित शहांच्या भाषणाचा असा तोल परत परत जाणार असेल तर त्यानी चांगल्या कंपनीचा, बंद न पडणारा एक टेलिप्रॉम्प्टर घ्यायला काहीच हरकत नाही, मोदीजीं त्याना तो कसा वापरायचा शिकवतील. अमित शहांचेच गुरू व विश्वाचे स्वयंघोषित गुरू मोदीजी हे बोलताना फारसा तोल घसरू देत नाहीत पण पाच राज्यातील निवडणुकांतून भाजपाची वाटच इतकी निसरडी झाली आहे की त्यांनादेखील आता तोल सांभाळत भाषण करणे अवघड झाले आहे. मोदीजीनी संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतीच केलेली भाषणे ऐकली तर रटाळपणा कशाला म्हणायचे ह्याची ती व्याख्या ठरतील. गांधी आणि नेहरूं नावाच्या कर्तृत्वान अश्या अभेद्य भिंतीवर रोज डोके आपटून काय होणार? देशाच्या सर्वोच्च पदी असणार्या व्यक्तीच्या संसदीय भाषणांची पातळी फार वरची असायला हवी. ‘तुझ्यामुळे करोना झाला आणि माझ्यामुळे लोक वाचले’ असली बिनबुडाची विधाने करायला संसद म्हणजे सार्वजनिक नळ नव्हे, विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदींनी सडकून टीका करावी पण दोषारोप देखील कसे करावेत ह्याची एक सीमारेषा असते. भारताची संसदीय परंपरा थोर आहे आणि त्यात नाथ पै नावाचे एक मानाचे कोंदण महाराष्ट्राने बसवलेले आहे. बॅ. नाथ पै हे नेहरूंच्या धोरणांवर, सरकारवर टीकेचा भडिमार करत पण तो ते कशा पद्धतीने करत ह्यावर ज्येष्ठ पत्रकार द्वा. भ. कर्णिक ह्यानी लिहून ठेवले आहे. बॅरिस्टर नाथ पै ह्यांच्या लोकसभेतील चर्चेविषयी ते म्हणतात की, ‘नाथ पैंच्या ताब्यात एकदा का संसदेचे सदन आले की ते विरोधकांना आणि खासकरून सत्ताधारी काँग्रेस पक्षाला नामोहरम करायची एकही संधी दवडत नसत. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेतील सुभाषितांचा मग तीथे खळाळता प्रवाह वाहू लागायचा. कथा, अख्यायिका त्यात मग ओघवतेपणाने यायच्या, कायद्यावर सखोल टिप्पणी व्हायची आणि हे सारे अत्यंत भावनाप्रधान देखील असायचे. भाषेच्या अनोख्या सौंदर्याची, त्यातील भावमुद्रांसोबत मुक्त उधळण त्या सभागृहात व्हायची.’
नाथ पै ह्यांच्या तोडीचे संसदीय भाषण आजच्या टेलिप्रॉम्प्टरवादी नेत्यांकडून करवून घेण्यासाठी रेड्यामुखी वेद वदवून घेणार्या संत ज्ञानेश्वरानी पुनर्जन्म घेतला तरी ते अशक्य आहे.. जनतेनेच आता आपल्या कानावर हात ठेवून बसावे.