जगात दुसरी लता मंगेशकर निर्माण होणं शक्य आहे काय?
– पद्माकर सहस्रबुद्धे, शिरगाव
एकवेळ पृथ्वी पुन्हा निर्माण करता येईल, पण ती नाही!
लतादीदींचं सगळ्यात सुयोग्य स्मारक काय ठरेल असं तुम्हाला वाटतं?
– नयन गोगावले, पंढरपूर
तिला कान देऊन ऐकणं!
सायकल, स्कूटर, मोटार यांच्यातलं तुमच्या आवडीचं वाहन कोणतं? आणि का?
– निखिल तापकीर, जयसिंगपूर
मोटार… मला कार चालवणं फार आवडतं.
पुष्पा सिनेमा तुम्ही पाहिलात का? तुम्हाला कसा वाटला?
– राधा मारणे, सोनगाव
मी नाही पाहिला…
पुढार्यांच्या थापांवर कर बसवला तर?
– श्रीपाद गोरे, भडगाव
गरिबीचा प्रश्नच उरणार नाही!
काही हजार रुपये, दारू, साडी, दागिने असल्या गोष्टींसाठी मत विकून आपण आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेत आहोत, हे जनतेच्या लक्षात कधी येईल का?
– सोनम दवणे, कल्याण
कधीच नाही. कारण या वर्गाकडे वरील गोष्टी कधीच येऊ नयेत, यासाठी ते लोक काळजी घेतात.
भारतात इतक्या पार्श्वगायिका झाल्या, पण भारतवर्षाचा आवाज बनण्याचे भाग्य लतादीदींनाच लाभले. तुम्ही संगीताचे जाणकार आहात. असे होण्याचे सांगितिक कारण काय असावे?
– निनाद मोरे, पोलादपूर
त्यांचा दैवी आवाज, त्यातला दमसास आणि स्वतःला शिकवत ठेवण्याची त्याची वृत्ती.
तुम्ही अभिनेते वेगवेगळ्या भूमिका करता. त्यांची वेगवेगळी विचारधारा असते, स्वभाव असतात, त्या सगळ्याचा तुमच्या वास्तव आयुष्यावर काही परिणाम होतो का? व्यक्तिरेखेतील काही तुमच्या व्यक्तिमत्त्वात मुरते का?
– विश्वास पोळ, पुणे
नाही… असं झालं तर कलाकार वेडा होईल.
नाटक ही सांघिक कला आहे. सहकलाकाराला सूर गवसत नसेल, तर मग ऐनवेळी मंचावर काय करता?
– भावना राजोपाध्ये, घाटकोपर
काही नाही, आपलं काम पडताना पाहात राहायचं…
जुने जाऊ द्या मरणालागुनि असं आपण म्हणतो आणि जुनं ते सोनं, असंही म्हणतो, यातलं काय खरं?
– मिलिंद गुळवे, मुरबाड
त्यातला मथितार्थ लक्षात घ्या… शब्दश: अर्थ घेऊ नका.
समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता, असं म्हणतात. तुमचा अनुभव काय? वेळ यावीच लागते का?
– तौसिफ शेख, महाड
जे काही मिळतं त्यात सुख वाटावं म्हणून हे वाक्य रचलेलं आहे.
अमिताभ बच्चन म्हणाले होते की कॅमेर्यासमोर जाताना इतक्या वर्षांनंतर आजही छातीत धडधड होते, पोटात गोळा येतो. रंगभूमीवर जाताना तुम्हाला असं काही होतं का?
– स्वाती शेट्ये, मलकापूर
मलाही अगदी तसेच वाटते.
तुम्ही किनई फार क्यूट दिसता, फार सुंदर काम करता, असं सांगून एखाद्या चाहतीने तुमच्या बायकोसमोर तुमचा गालगुच्चा घेतला तर?
– रूपाली नेवाळकर, चंद्रपूर
हे भाग्य माझ्या वाट्याला कधीच नाही आलंय…
तुमचा सिनेमा बंडल होता, तुमच्या नाटकातली भूमिका काही खास वठली नाही, असं कोणी तोंडावर सांगितलं, तर काय करता?
– नितीन सावंत, जोगेश्वरी
मला अजिबात वाईट वाटत नाही, फक्त त्याने हे अभ्यासाने पटवून द्यायला हवे.