मनुक्षस्वभाव मोठा अप्पलपोटा आहे… जर दिवसभरात खूप फोन आले… आणि त्यातकरून ते दीर्घ असले… आणि त्यातकरून ते निरर्थक असले- म्हणजे त्यात वैतागून पण आपण एकदाही हसलो नाही- तर आपण उरलेल्या वेळात खेद प्रगट करण्यात दिवस संपवून टाकतो… आणि दिवसभरात एकही फोन आला नाही तरी आपणाला वाटतं की आपली कुणालाच आठवण नाही… मग आपुन मनातल्या मनात ०.०००१ टक्का नाराज असतो.
काहीजणं आपल्या दैनंदिन कामात एवढी बिझी असतात की फोन लावायला त्यांना पाच मिनीटं सवड नसते. मग अशावेळी ती माणसं जेवताना फोन लावतात आणि तो घास चावण्याचा वेळ, त्यांच्या मते सार्थकी लावायचा प्रयत्न करतात. (अजून आठ दिवसांनी फोन लाव पण तोंड स्वच्छ असताना लाव!)
माझी एक लांबची मैत्रीण आहे. एकेकाळी ती शेजारीण होती!… ती वर्षातून एखाद वेळी फोन लावते आणि तोही जेवताना… मग अॅगं कॅय झॅलं… अशी सुरुवात असते. मग मध्ये पचॅक पचॅक असा चपाती आणि पालेभाजी खाल्ल्याचा आवाज येतो. मग पापडाचा करॅव करॅव असा… मग कोशिंबीरीचा करकरीत… गुलाबजाम तुटल्याचा कडॅक असा आवाज मग आमटीभाताचा रसभरीत आणि कढीचा भुरका… आणि मध्ये मध्ये तिचं बोलणं… जेवताना इकडेतिकडे चहुकडे फवारे उडत असतील असं डोळ्यासमोर चित्र उभं राहतं… एखादं भाताचं शीत फोनमधून इकडे पण येवू शकतं अशा भीतीने मी फोन जो आहे तो लांब धरते!
शेवटी असह्य होवून मी म्हणते, आपण मग बोलूया का? तू जेवून घे आधी! मी सोता लावते फोन!
नाही नाही.. बोल तू आरामात..! जेवण कॅय होतच रॅहतं (शिरा रे पडो).
आता काय बोलनार तरी काय? गंभीर विषयावर बोललं तर जेवणामुळे विषयाचं पुरेसं गांभीर्य राहात नाही. मध्ये मध्ये ती पाणी पिते त्यामुळे विषय पचपचीत होतो. एकच हे आहे? बरं, विनोदी बोललं तर तिकडे फव्वारे उडणार! मी मनातल्या मनात चूळ भरण्याच्या आवाजाची वाट बघत असते. तो काही येत नाही. चुळीचं पाणी पिऊन टाकतात की ह्यांच्यात? नाहीतर एकदम बडीशेप चावल्याचा आवाज ऐकू येईल… मी श्वास रोखते… आणि अचानक फोनच बंद होतो… (शप्पत मी नाही करत…) चला… मी उत्साहाने कामाला लागते… म्हणजे पोळ्या वगैरे लाटायला घेते.
आपण फोन केला आणि ती व्यक्ती जेवत वगैरे असली तर ठीक आहे. पण आपण जेवताना दुसर्याला फोन करणे म्हणजे… देवा… ताई हा लेख वाचूदेत नको. तिने हा लेख वाचला तर मी जेवताना पण ती कधी फोन करणार नाही!
काहीजण फोनवर एवढं घाईघाईने बोलतात… की… म्हणजे ओके… चालेल… पुढे बोल… बरं… बरं पुढे बोल… म्हणजे फोन झाला की लगेचच लांबलचक उडी मारून ते ट्रेनमध्ये बसणार आहेत…
(अॅक्चुअली विमानात) किंवा मॅरेथॉन धावायला सुरू करणार आहेत. पुढचं वाक्य बोलायची भीतीच वाटते.
तर काहीजण मात्र खूप आरामशीर बोलत राहतात. म्हणजे बोलताना ते स्वल्पविराम, पूर्णविराम, इतर अवतरणे पण बोलतात. पूर्णविराम देवून झाला की तीन मिनिटं रेस्ट घेतात. माझी एक मैत्रीण आहे. ती असं बोलण्याचं मटेरियल पुरवून पुरवून ना असं वा प र ते. आता बोलताना पण मोबाईल वर नाव दिसत असलं तरी… मी गं, अमुक तमुक! अशी ती संथपणे सुरुवात करते.
ओके… काय म्हणतेस?
काय नाय सहजच लावलेला फोन. म्हटलं खुशाली विचारुया… बरी आहेस ना?
होय…
परवा ती ही आली होती गं..
कोण?
ही गं ती… वळणावर आंब्याचं झाड होतं… तिथे राहायची बघ… ती!
ढोलीत?
खॅ खॅ… तिथे घर होतं ना गं तिचं… कौलारू होतं बघ…! नाकावर तीळ होता…
घराच्या?
हॅ हॅ.. खि खी… तिच्या गं..
हा… हा… ते झाड वाकडं होतं… ती ना?
हां, ती पण तुला ना गं विचारीत होती. मग मी तिला म्हटलं काय… की तू बरी आहेस म्हणून! मी म्हटलं तिला… की आम्ही दोघी फोनवर खूप गप्पा मारत असतो… मजा करतो म्हणून! मी ना मुद्दामच जळवलं तिला!… समजलं तुला? तिला गं… खि खु… खै खै..
होय… अरे वा… मस्तच…
आणि काय गं… तू चपाती दोन्ही वेळ करतेस काय गं? कारण काय… आमच्याकडे यांना दोन्ही वेळ गरम गरम चपाती लागते. हे म्हणतात काय… चपाती तव्यावरचीच हवी. आपण बघ पोळपाटावर चपाती करतो आणि मग तव्यावर टाकतो. गरम तव्यावर गं!
होय… आलं लक्षात!… मी एकदा करते आणि दुसर्यांदा गरम करते… गरम तव्यावर!
साधारण अशा तर्हेने अर्धा तास गि ळं कृ त करून हा फोन संपतो.
कोण कोण माणसं अत्यंत मजेदार फोन करतात. फोन ती करतात. संवादाचं गाडं आपणालाच ढकलावं लागतं! काय करनार तरी काय… विलाज नाही.
असाच एकदा एका जुन्या मैत्रिणीचा (पुराण्या नव्हे) फोन आला.
हॅलो..
हॅलो..
अगं मी अयाई बोलतेय गं..
अरे वा… बरी आहेस ना?
होय.
मुलं काय म्हणतायत? बरी आहेत?
होय!
भावजी कसे आहेत? ऑफीस बिफीस?
बरे आहेत!
जेवलीस काय गं?
नाही.
थंडी पडतेय तिकडे?
होय.
पाऊस गेला का?
होय.
तुझी डोकेदुखी थांबली काय गं?
होय.
आणि सासुबाई बर्या आहेत?
होय..
बरं ठेवू मी फोन?
होय!
मी फोन बंद करते आणि पित्तशमनासाठी लिंबू सरबत करुन दोन पेग ढोसते.
परवा नवीन पिढीवर मनसोक्त बोलण्याचं तोंडसुख घेणार्या आजी म्हणाल्या, ‘हालीची मुलं दिवसभर फोनवर असतात… आणि तोंडातल्या तोंडात कायते पुटपुटतात. जास्ती करुन हां आणि हुं! आणि मग
खॅखॅ खॅखॅ करून जोरात हसतात. कशाला हसतायत काय बोलतायत… कायैक कळत नाही! आमचे हे बोलायचे तेव्हा अख्ख्या वाडीला कळायचं विषय काय आहे तो… आणि पलिकडच्या माणसाचं नायतर माणसीचं बोलणं पण ठसठशीत आयकू यायचं! विचारायची गरजच नव्हती कोणाचा फोन तो..! नायतर आताची पोरं. निस्ती पुटपुटत… बरं विचारलं तरी राग येतो!’ आजी हातवारे करत म्हणाल्या.
‘जावूदे ओ आजी… त्यांचं त्यांना कळतंय ना… मग झालं तर!’ मी तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हटलं!