• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लॉकेटने काढला खुनाचा माग

- अभिजित पेंढारकर (पंचनामा)

अभिजित पेंढारकर by अभिजित पेंढारकर
February 19, 2022
in पंचनामा
0

बंगल्यात शिरल्यावर बिराजदारांना पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती ही, की घरात चोरीही झाली होती. कपाटाची उचकापाचक करण्यात आली होती, बहुधा काही पैसे आणि दागिनेही चोरीला गेले होते. शुभांगीताई एकट्याच राहत असल्यामुळे आणि आता त्या मरण पावल्याने चोरीचा नेमका तपशील कळायला काही मार्ग नव्हता. गळा दाबल्यानंतर त्यांची जीभ बाहेर आली होती. त्यांचा मृतदेहसुद्धा जमिनीवर पडलेला होता.
– – –

फॉरेन्सिक टीमने घरातल्या सगळ्या वस्तूंची तपासणी करून ठसे गोळा केले. शुभांगीताई, राजू आणि काही ठिकाणी वॉचमन सखा यांचे ठसे आढळून आले. अधूनमधून सखा मदतीसाठी घरात येत असे. शुभांगीताईच त्याला बोलावून घेत. राजू तर घरातलाच होता. त्याचे ठसे सगळ्या वस्तूंवर सापडण्यात काहीच नवीन नव्हतं. आणखी एका अनोळखी व्यक्तीचे ठसे मात्र संशयाला वाव देणारे होते.
“विशाल, हे ठसे ज्याचे आहेत, त्याच व्यक्तीने खून केलेला असू शकतो,“ इन्स्पेक्टर बिराजदारांनी शक्यता व्यक्त केली.
—
शहराच्या मध्यवर्ती भागात एका बंगल्यात राहणार्‍या शुभांगी पोतदार यांच्या खुनाने शहरात खळबळ उडाली होती. गळा दाबून त्यांना मारण्यात आलं होतं. शुभांगीताई बंगल्यात एकट्याच राहत होत्या. त्यांच्याकडे एक तरुण नोकर होता, त्याचं नाव राजू. हा मुलगा अनेक वर्षं त्यांच्याकडे होता. खरंतर तो दहा वर्षांचा असताना शुभांगीताईंनीच त्याला आश्रय दिला होता. घरातली आवराआवर, लागेल त्या कामात मदत, बागकाम, बंगल्याची राखण आणि आल्यागेल्याचा पाहुणचार, अशी सगळी कामं राजू करायचा.
राजू आता सतरा-अठरा वर्षांचा झाला होता. बाईंकडे चांगला सरावलाही होता. मात्र, गेल्या काही दिवसांत त्याचं बाईंशी काहीतरी बिनसलं होतं. बाईंचा स्वभाव विचित्र होता. नवरा गेल्यानंतर एकटं राहत असल्यामुळे त्यांचा विचित्रपणा आणखी वाढला होता. राजूला त्यांनीच आश्रय दिला असला, तरी विक्षिप्तपणामुळे त्याला काहीबाही बोलत, त्याचा अपमान करत. त्याला सांगितलेलं एखादं काम मनासारखं झालं नाही, तर त्याला भरपूर बोलणी खावी लागत. कधी निमूटपणे, तर कधी चिडचिड करत तो दिवस ढकलत होता. आता तो लहान राहिला नव्हता, त्यालाही स्वतःच्या पुढच्या आयुष्याचे विचार येत असावेत. त्यामुळे त्याचेही ऊठसूट बाईंशी खटके उडत असत. कपडे वाळत घालण्यावरून आठवडाभरापूर्वी असाच काहीतरी वादाचा विषय निघाला आणि ताईंनी त्याला भरपूर झापलं. त्याच दिवशी राजू घर सोडून गेला. त्यामुळे आता बाई बंगल्यात एकट्याच राहत होत्या. बहुधा तीच संधी साधून कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला होता.
शुभांगीताईंच्या बंगल्यावर रोज सकाळी दूध पोचवायला येणार्‍या गवळ्याला पहिल्यांदा ही खबर लागली. बराच वेळ बेल वाजवूनही कुणी दार उघडलं नाही, तेव्हा त्यानं सखा वॉचमनला गाठलं.
वॉचमननेही दार वाजवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच आतून प्रतिसाद देईना. काळजीने त्याने मागच्या जिन्याने गच्चीत जाऊन तिथून बंगल्यात प्रवेश केला. तर बेडरूममध्ये शुभांगीताई निश्चेष्ट अवस्थेत पडलेल्या सापडल्या. तिथलं दृश्य बघूनच सखाला घाम फुटला आणि त्यानं ताबडतोब शेजार्‍यांच्या मदतीनं पोलिसांना कळवलं. परिसरात एकच चर्चा सुरू होती, बंगल्याभोवती गर्दीही झाली होती. इन्स्पेक्टर बिराजदारांनी गर्दी हटवून बंगल्यात प्रवेश केला. पुरावे नष्ट होऊ नयेत, यासाठी गर्दीला लांबच ठेवणं आणि सगळ्या गोष्टींची कसून तपासणी करून ठसे जमवणं महत्त्वाचं होतं.
बंगल्यात शिरल्यावर बिराजदारांना पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती ही, की घरात चोरीही झाली होती. कपाटाची उचकापाचक करण्यात आली होती, बहुधा काही पैसे आणि दागिनेही चोरीला गेले होते. शुभांगीताई एकट्याच राहत असल्यामुळे आणि आता त्या मरण पावल्याने चोरीचा नेमका तपशील कळायला काही मार्ग नव्हता. गळा दाबल्यानंतर त्यांची जीभ बाहेर आली होती. त्यांचा मृतदेहसुद्धा जमिनीवर पडलेला होता.
“हा राजू कुठे असतो आता? काय धंदा करतो?“ बिराजरादांनी सखाकडे चौकशी केली.
“साहेब, स्टेशनजवळच्या एका लाँड्रीच्या दुकानात काम करतो, असं ऐकलं होतं. प्रत्यक्षात काय पाहायला गेलेलो नाही.“ त्यानं माहिती दिली. बिराजदारांनी लगेच एका हवालदाराला तिकडे रवाना केलं.
“काय रे, तुझ्या मालकिणीला का मारलंस? असं काय वैर होतं तिच्याशी?“ राजूला पकडून आणल्यावर बिराजदारांनी त्याला पहिलाच प्रश्न केला.
“साहेब, काय बोलताय? मी कशाला बाईंना मारेन? मला तर आत्ता एक तासापूर्वी त्या गेल्याचं समजलं साहेब.“
“सगळे गुन्हेगार असंच सांगतात. स्वतःचा गुन्हा कोण कबूल करतंय? पण तुझ्या पावलांचे आणि हातांचे ठसे सापडलेत त्यांच्या बेडरूममध्ये.“ बिराजदारांनी आरोपीला गोंधळवून टाकण्याची नेहमीची ट्रिक वापरली.
“साहेब, आता तिथंच कामाला होतो, तर ठसे भेटणारच ना!“ राजूसुद्धा उत्तरं देण्यात तरबेज होता.
“मग काम का सोडलंस? तेसुद्धा एवढ्या वर्षांनी?“
“साहेब, लहान असल्यापासून काम करतोय त्यांच्याकडे. तेव्हा माझ्याकडे दुसरा विलाज बी नव्हता. बाई लईच कटकटी होती साहेब. प्रत्येक कामात खोट काढायची. मग माझं बी डोकं फिरायचं.“
“कालही असंच डोकं फिरलं, म्हणून तू त्यांना मारून टाकलंस. हो ना?“
“नाही साहेब…! मारेन कशाला? राग यायचा. निघून जावंसं वाटायचं. कधीकधी तर त्यांच्या डोसक्यात कायतरी घालावं, असं बी वाटायचं. खोटं नाय बोलत. पण तसं काय केलंच नाय साहेब कधी. तसा इचार बी मनातनं काढून टाकला. त्यापरीस नोकरी सोडून दुसरीकडे कायतरी पोटापाण्याचा उद्योग सुरू करावासा वाटला.“
पुन्हा चौकशीसाठी यावं लागेल, असा दम देऊन पोलिसांनी त्याला पाठवून दिलं. नेमका सखा वॉचमनही आदल्या रात्री काही कामासाठी सवलत घेऊन बाहेर गेला होता.
चोरीच्या उद्देशाने खून झाला म्हणावा. तर चोरांनी फक्त कपाटच उचकल्याचं दिसत होतं. घरातल्या इतर गोष्टींना त्यांनी हात लावला नव्हता.
“सर, कदाचित कुठल्यातरी आवाजाने चोर घाबरून लवकर तिथून सटकले असतील. त्यामुळे कपाटाशिवाय दुसरीकडे कुठे डल्ला मारायला त्यांना जमलं नसेल.“ सबइन्स्पेक्टर विशालने सुचवलं, ते बिराजदारांना पटलं.
फॉरेन्सिक टीमने घरातल्या सगळ्या वस्तूंची तपासणी करून ठसे गोळा केले. शुभांगीताई, राजू आणि काही ठिकाणी वॉचमन सखा यांचे ठसे आढळून आले. अधूनमधून सखा मदतीसाठी घरात येत असे. शुभांगीताईच त्याला बोलावून घेत. राजू तर घरातलाच होता. त्याचे ठसे सगळ्या वस्तूंवर सापडण्यात काहीच नवीन नव्हतं. आणखी एका अनोळखी व्यक्तीचे ठसे मात्र संशयाला वाव देणारे होते.
“विशाल, हे ठसे ज्याचे आहेत, त्याच व्यक्तीने खून केलेला असू शकतो.“ बिराजदारांनी शक्यता व्यक्त केली.
शुभांगीताईंशी संबंधित सगळ्यांचे जबाब नोंदवून झाले, मात्र तपासाच्या दृष्टीने ठोस असं काहीच हाती लागत नव्हतं. पोस्ट मार्टेमच्या अहवालातही मृत्यूच्या वेळेशिवाय फारसं काही महत्त्वाचं हाती लागलं नव्हतं.
चार पाच दिवस झाले, तरी तपास पुढे जात नव्हता. अशातच एके दिवशी दरोडे घालणारी एक टोळी गस्तीपथकाच्या तावडीत सापडली. गस्तीपथक रात्रीच्या राउंडवर असताना शहराबाहेर एका आडरस्त्याला या टोळीतले काहीजण फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकलं आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यावर ते पोलिसांच्या तावडीत सापडले. अलीकडच्या काळात केलेले दरोड्याचे काही गुन्हेही त्यांनी कबूल केले. खरंतर हे दुसर्‍या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं होतं, पण बिराजदारांना त्याची कुणकुण लागल्यावर त्यांनी ताबडतोब तिकडे धाव घेतली.
“बरेच गुन्हे केलेली टोळी आहे साहेब. हे कटरने गज वाकवून घरात प्रवेश करतात आणि जे हाताला लागेल ते पळवून पसार होतात.“ त्या पोलीस ठाण्याची जबाबदारी असलेले इन्स्पेक्टर माने हे बिराजदारांना सांगत होते.
“कुठल्या खुनाबिनाची कबुली दिली का त्यांनी? त्याबद्दल काही विचारलं का?“ बिराजदारांचा उतावीळपणा लपत नव्हता.
“सगळी खोदून चौकशी करून झालेय. त्यांनी आधी एकच गुन्हा कबूल केला, मग आमच्या पद्धतीनं आणखी बर्‍याच गोष्टी विचारल्यावर त्यांनी आणखी तीन गुन्हेही सांगून टाकले. पण त्यांच्या बोलण्यात कधी कुणाचा खून केल्याचं, कुणाला मारहाण केल्याचंही आलं नाही. फारतर घरातलं कुणी उठलं, तर ते बांधून ठेवायचे. पण खून कधीच नाही.“ माने म्हणाले.
बिराजदारांना हे पचवायला जरासं जड गेलं. एकतर दरोडा घालणारी टोळी सापडल्याचं समजल्यावर ते तातडीने अतिशय उत्साहाने त्या पोलीस स्टेशनला गेले होते. एव्हाना या टोळीने खुनाच्या गुन्हयाची कबुली दिलीच असेल, असं त्यांना वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र तस काही घडलं नव्हतं. बिराजदार थोडे निराश झाले, मात्र इलाज नव्हता. स्वतःचं समाधान करण्यासाठी त्यांनी स्वतः त्या टोळीतल्या गुंडांना काही प्रश्न विचारले, पण त्यांना हवीशी उत्तरं मिळालीच नाहीत.
हताश होऊन बिराजदार आपल्या पोलीस स्टेशनला परतले.
“काय झालं साहेब, काही लीड?“ सबइन्स्पेक्टर कदमांनी विचारलं.
“नाही मिळाला काही लीड. आता यात वेगळं काही घडले, असं वाटत नाही.“ बिराजदारांनी डोक्यावरची टोपी काढत उत्तर दिलं. काही क्षण ते शांत बसले आणि एकदम डोक्यात काहीतरी लक्कन चमकल्यासारखं त्यांना झालं. कदम, जरा त्या टोळीतल्या माणसांचे काही फोटो आहेत का बघा बरं. नाहीतर मागवून घ्या, ताबडतोब!“ त्यांनी आदेश दिला.
कदमांनी तशी कार्यवाही केली. टोळीतल्या सदस्यांचे फोटो बिराजदारांच्या मोबाईलवर पाठवण्यात आले. त्यातल्या एकाचा फोटो बघून त्यांचे डोळे विस्फारले. त्यांनी आता शुभांगीताई पोतदारांच्या केसची फाइल काढली आणि त्यातला त्यांचा फोटो बघितला. शुभांगीताईंचा काही महिन्यांपूर्वी काढलेला फोटो फाइलमध्ये होता. त्या फोटोमध्ये ताईंच्या गळ्यात जे लॉकेट दिसत होतं, तेच नेमकं त्या गुंडाच्या गळ्यात होतं. हिर्‍याचं लॉकेट! म्हणजे दरोडा घालणार्‍या या टोळीनं त्या दिवशी शुभांगीताईंच्या बंगल्यात घुसखोरी केली होती आणि त्यांनी विरोध केल्यावर त्यांचा खून केला होता तर!
बिराजदारांनी स्वतःच या गुंडांकडे पुन्हा चौकशी करायचं ठरवलं. दुसर्‍या पोलीस स्टेशनने त्यांना अर्थातच त्यासाठी सहकार्य केलं. त्या टोळीतला टग्या दिसणारा चंदू हा त्या टोळीचा प्रमुख होता. साधारण पंचविशीतलेच सगळे सदस्य होते. त्यांचा आत्तापर्यंत पुरेसा मार खाऊन झाला होता.
“शपथ घेऊन सांगतो, साहेब. आपण कुणाचाबी खून केलेला नाही. हे लॉकेट आपण एका पोराकडून घेतलं.“ चंदूनं खुलासा केला.
“कुठल्या पोराकडून?“ बिराजदारांनी दरडावलं. आता चंदू घडाघडा बोलायला लागला. त्याची टोळी असाच कुठलातरी दरोडा घालून एका मोकळ्या जागेत आलेली असताना त्यांना तिथे एक तरुण मुलगा भेटला. आधी तोही त्यांना बघून घाबरला, पण ते आपल्याला काही इजा करणार नाहीत, याचा अंदाज आल्यावर त्यांच्याशी बोलायला लागला. त्याच्याकडे एक लॉकेट होतं. ते देऊन त्याला पैसे मिळवायचे होते. हा धाडसी पोरगा थेट दरोडेखोरांनाच लॉकेट विकायला निघाला होता! चंदूला त्याची गंमत वाटली आणि ते लॉकेटही आवडलं. त्यानं पैसे देऊन ते विकत घेतलं आणि त्या पोराला पाठवून दिलं.
“मालकिणीनं घरातून हाकलून दिलं, तिच्यावर सूड घ्यायचाय, असं काहीतरी बडबडत होता साहेब तो!“ चंदूनं सांगून टाकलं. बिराजदारांना संशय आला. त्यांनी त्याला राजूचा फोटो दाखवल्यावर त्यानं लगेच ओळखलं.
राजूने हा खून केला असेल, असं बिराजदारांना अजूनही वाटत नव्हतं. मात्र, त्याच्याकडे बाईंचं लॉकेट होतं, त्यावरून त्याच्यावरच संशय बळावला होता. त्याची कसून चौकशी केल्यावर त्यानं आत्तापर्यंत न सांगितलेली माहिती उघड झाली.
“बाईंचे एक भाऊ नेहमी बंगल्यावर यायचे साहेब. त्यांचे आणि बाईंचे पैशांवरनं कायतरी वाद होते. बाईंना दुसरं कुणी नातेवाईक बी नव्हतं. पण भावावर बाई लई जीव टाकायच्या. त्याचं नाव बी लाकेटमध्ये कोरलेलं होतं. त्या दिवशी भाऊ आला आनं त्यानं बाईंशी भांडण केलं. त्यांच्या गळ्यातलं लाकेट हिसकावून काढलं असनार. नंतर बाहेर जाऊन ते फेकून दिलं. मला ते गावलं. बाईंवर माझा बी राग होताच. मी ते लाकेट परत द्यायचंच नाही, असं मनाशी ठरवलं आन् ते माझ्याकडेच ठेवलं.“ राजूनं सांगितलं.
नंतर संधी मिळाल्यावर त्यानं ते विकून त्यातून मिळतील तेवढे पैसे वसूल केले होते. पोलिसांना आता दिशा सापडली होती. प्रश्न एवढाच होता, की फक्त त्या एका घटनेवरून शुभांगीताईंच्या भावावर संशय घेता येणार नव्हता. तसे काही ठोस पुरावे नव्हते. मात्र, तेही लवकरच मिळाले. शुभांगीताईंच्या बंगल्याला सीसीटीव्ही नसला, तरी शेजारच्याच एका घरात राहणार्‍या माणसाने प्रयोग म्हणून लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा भाऊ म्हणजे सुहास याचं बंगल्यावर येणं आणि बाहेर पडणं आपसूक शूट झालं होतं. त्याच्या मोबाईलवरूनही त्याचं लोकेशन सापडलं आणि गुन्हा नाकारण्यासारखं त्याच्याकडे काही राहिलं नाही.
प्रॉपर्टीवरून त्यांच्यात वाद होते. शुभांगीताईंना कुणी वारस नव्हता, पण त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीतला छोटासा हिस्साही भावाला द्यायची इच्छा नव्हती. भावाचा इगो दुखावला गेला होता. खरंतर त्यालाही पैशांची गरज नव्हती, पण फुकटच्या संपत्तीची हाव मात्र सुटली नाही. त्या रात्रीही त्यांचे वाद असेच विकोपाला गेले आणि रागाच्या भरात त्याने शुभांगीताईंचा गळा आवळून खून केला.
“पैशांचा मोह माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. इथेतर दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं!“ बिराजदारांनी त्यांची अस्वस्थता व्यक्त केली आणि ते पुढच्या कामाच्या व्यापात बुडून गेले.

Previous Post

हॅलो हॅलो…

Next Post

या प्राण्याला मेंदू असेल का?

Next Post

या प्राण्याला मेंदू असेल का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.