‘बकुळीची फुले’ हा कवयित्री सुनंदा खानोलकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह. वयाच्या नव्वदीकडे झुकताना तो प्रकाशित व्हावा हे तर अधिक कौतुकास्पद. जीवनाची एवढी प्रदीर्घ वाटचाल करताना आजही त्यांचे प्रसन्न आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारं मन त्यांच्या कवितेतून जाणवतं. निसर्गाकडे त्या जितक्या संवेदनशील दृष्टीने पाहतात, तितक्याच दैनंदिन व्यवहारातील घडामोडींकडेसुद्धा. त्या देवाकडे जितक्या आपुलकीने पाहतात, तितक्याच कोकणच्या माणसांकडेही. वर्तमानकाळात जगताना मागे वळून पाहायचे नाही, नात्यागोत्यांच्या फसव्या पाशात सापडायचे नाही ही त्यांची धारणा त्यांच्या कवितेतून दिसते. तरीही नातवावर त्याच्या बालपणी केलेला केलेला लडिवाळपणा त्यांच्या मनात रुंजी घालतो. ‘पावसात चिंब भिजू’ या कवितेत पडणार्या पावसाचं आणि स्वत:च्या मन:स्थितीचं त्यांनी केलेलं वर्णन म्हणजे त्यांच्या दृष्टीने देहभान विसरून गाण्याचा, नाचण्याचा, आनंदाचा क्षण त्यांना वाटतो. भक्तिगीतांपासून निसर्गकवितांपर्यंत आणि बालपणापासून संध्याछाया दिसेपर्यंत जे जे अनुभव त्यांच्या वाट्याला आले ते ते त्यांनी कवितेत शब्दबद्ध केले. आजवर त्यांच्या आयुष्यात अनेक विषय समोर आले. त्यामधून ज्यावर त्यांना लिहावंसं वाटलं त्यावर त्या लिहीत गेल्या. आपल्या भावनांना त्यांनी वाट करून दिली. साध्या साध्या विषयांतून त्यांनी अर्थपूर्ण आशय शोधला. दुसर्याच्या आनंदात व वेदनेत त्यांनी जीवनाचा अर्थ पाहिला आणि तो वेगवेगळ्या ४४ कवितांतून या काव्यसंग्रहात मांडला.
यासाठी जगाकडे डोळसपणे पाहण्याची संवेदनक्षम दृष्टी लागते. कवितेत आपले विचार नेमकेपणाने मांडणारी प्रतिभा आणि तरल सौंदर्यदृष्टी लागते. कवयित्री सुनंदा खानोलकर यांच्या ठायी हे सारे असल्यामुळेच त्यांची कविता काळजाला भिडते. शिशिर ऋतूत पाने गळतात. त्यावेळी त्या गळून गेलेल्या पानांची वेदना काय असते ते सृष्टीला कसे कळणार, असा प्रश्न त्या विचारतात. संत साहित्याचे त्यांच्यावर असलेले संस्कार त्यांच्या कवितेमधून जाणवतात. त्यातूनच त्यांच्या विचारांची बैठक पक्की होत जाते. सुख, संसार, निसर्ग, विश्वास म्हणजे काय हे सांगताना त्यांच्या संवेदना जाग्या होतात. ‘बकुळीची फुले’ या कवितेत त्यांनी या फुलांचे इतके सुंदर वर्णन केलं आहे की तो दरवळ रसिकांच्या मनातही दरवळत राहावा. त्यांची कविता शब्दबंबाळ नसून अल्पाक्षरी आहे. त्यातच कवितेचे सौंदर्य साठवलेले आहे. जीवनातील वाट्याला येणार्या विविध विषयांवरील या सहजसोप्या भाषेतील कविता रसिकांनी वाचायलाच हव्या.
बकुळीची फुले (काव्यसंग्रह)
कवयित्री : सुनंदा खानोलकर
प्रकाशक : सुरेश कृ. साखळकर, पुणे
पृष्ठे : ४२
मूल्य : रु. २५/-