सूर हरपलेले… पण आयुष्य व्यापून राहिलेले…
– घरातल्या देवांची पूजा करताना आजोबांच्या हातच्या घंटेची किणकिण आणि अथर्वशीर्षाच्या आवर्तनाचा धीरगंभीर सूर.
– रोज रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावरच बसून, हात जोडून आजीने म्हटलेल्या रामरक्षेचा कापरा-थरथरता, सश्रद्ध सूर.
– आमटीला दिलेल्या फोडणीच्या ‘चुर्र’ पाठोपाठ ‘चला, पानं घेतली बरं का…’ असा स्वयंपाकघरातून येणारा आईचा मायाळू सूर.
– वर्गातल्या वाह्यातपणाची शिक्षा म्हणून सरांनी कचकचीत कान पिळल्यावर आपल्या तोंडून आलेलं ‘आई गं..’ आणि त्याच सरांनी आपले बरे मार्क्स बघून हलकेच टप्पल मारत काढलेला ‘व्वा’ असा शाब्बासकीचा सूर.
– गल्लीत रात्री जरा सामसूम झाल्यावर एंट्री घेणार्या कुल्फीवाल्याचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि मग आपली मन की बात ओळखून कधीमधी हातावर पैसे ठेवणार्या बाबांचा कानावर आलेला ‘जा..’ असा जीव हरखून टाकणारा सूर.
– कॉलेजमित्रांवरोबर लेक्चर बुडवून फर्स्ट डे-फर्स्ट शोला गेल्यावर रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा आदी लावण्यवती पडद्यावर अवतरल्यावर स्वतःसह समस्त मित्रमंडळाच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडणार्या उसाश्याचा तारुण्यसुलभ सूर.
– हट्ट करणार्या आपल्या मुलाच्या पाठीत बायकोने घातलेला धपाटा, त्यानंतर त्याने पसरलेलं भोकाड आणि मग स्वतःही रडवेल्या झालेल्या बायकोने मुलाला जवळ घेत म्हटलेलं, ‘शहाणं गं माझं बाळ ते…’ वगैरे वगैरे वगैरे. आयुष्याच्या एका टप्प्यानंतर अलगदपणे नाहीसे झाले ते प्रापंचिक हळवे सूर.
– ‘ही लोकल त्या प्लॅटफॉर्मवर येईल, अमुक लोकल तमुक मिनिटं उशिराने येईल’… कधीही नजरेस न पडलेला पण अदृश्यपणे त्या सगळ्या धावपळीत कायम सोबत असलेला आणि रिटायरमेंटच्या दिवशी आयुष्याचा तिसरा अंक सुरू झाल्याची अनाऊन्समेंट.
फक्त आपल्या कानात करत निरोप घेणारा रेल्वे अनाऊन्समेंटचा सूर.
– आणि आज हरपलेला…
परमोच्च आनंदाच्या क्षणी मनमोराचा पिसारा फुलवणारा, आर्त दुःखाच्या क्षणी मनावर हळुवार फुंकर घालणारा, सुखाच्या क्षणी जगन्नियंत्याचे विस्मरण होऊ न देणारा, कठीण प्रसंगी पाठीवर हात ठेवून आश्वस्त करणारा लताजींचा सूर.
या सुराने मला काय दिलं आणि त्याच्या शांत होण्याने मी काय गमावलं हे मला नाही सांगता यायचं. या दैवी सुरापुढे मी फक्त नतमस्तक होऊ शकतो.
निःशब्द आणि नतमस्तक.