‘ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणार्याचं महिमा मंडन करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,’ असं देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले.
मैदान तर क्षुल्लक बाब. चक्क संविधानाच्या मूळ प्रतीत झाशीच्या राणीच्या शेजारी टिपू सुलतानचे चित्र आहे. ते कसे?
बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, विक्रमादित्य, राम, अकबर, शिवाजी महाराज अशी अनेकांची चित्रे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा म्हणून घटनेत आहेत. शांतिनिकेतनचे मोठे कलावंत नंदलाल बोस यांनी आपल्या महनीय राष्ट्रीय नेत्यांच्या विनंतीवरुन ही संविधानाच्या मूळ प्रतीची सजावट केली आहे. ही मूळ प्रत हस्तलिखित आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हे लिखाण केले आहे. संसदेच्या ग्रंथालयात हेलियम वायूने भरलेल्या काचपेटीत संविधानाची ही मूळ प्रत दिमाखाने प्रदर्शित केलेली आहे. ही बाब फडणवीसांचे पूर्वसुरी श्यामाप्रसाद मुखर्जी संविधानसभेत असताना त्यांच्या कशी लक्षात आली नाही? त्यांनी विरोध केला होता का त्यावेळी?
या मूळ प्रतीतले रामाचे चित्र असलेले पान भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रविशंकर प्रसाद अभिमानाने जाहीर सभेत, टीव्ही चॅनेलवरुन लोकांना सतत दाखवत असतात. त्यांनीही टिपूच्या चित्राला आक्षेप घेतल्याचे किंवा हे चित्र घटनेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे का?
फडणवीसांनी याबद्दल जनतेला माहिती दिल्यास बरे होईल.
सेंट्रल व्हिस्टात जुन्याची फेररचना सुरु आहे. अशावेळी संविधानाची मूळ प्रत काचपेटीतून काढून तिचीही नव्याने सजावट होण्याची शक्यता अर्थातच नाकारता येत नाही. २०२४ च्या आधी खूप सार्या ऐतिहासिक चुकांचे परिमार्जन करायचे आहे.
– सुरेश सावंत
इतिहासाला काळा गोरा रंगवून
टिपू सुलतानच्या नावाचा
विरोध करणार्या भाजपासाठी
१. पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उध्वस्त केला, तेव्हा देवस्थानाचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे.
२. कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी ७:३० वाजता ‘सलाम मंगलरथी’ करतात.
३. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे.
४. नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केले त्याच नेताजींनी टिपूचा शहीद म्हणून उल्लेख केला व टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता.
५. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का?
ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व निवडणूकांसाठी ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. निवडणूक असली की विकास आठवत नाही तर धर्मांधता आठवते. ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणार्या प्रत्येकाने भाजपा व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे.