विकासाच्या बाता मारायच्या आणि विनाशाचं राजकारण करायचं, ही भाजपची राष्ट्रीय नीती एव्हाना देशात सगळ्यांच्या लक्षात आली आहे. याला मुंबईकर अपवाद असतील का? विक्रम-वेताळ नावाची मालिका एकेकाळी दूरदर्शनवर येत असे. त्या मालिकेत एक प्रसंग असा होता की विक्रमादित्य सिंहासनाकडे निघालेला असताना कोणीतरी त्याला रोखतं आणि सांगतं की सिंहासनावर आरूढ होण्याआधी त्याच्या लायक बना. महानगरपालिकेसाठी सुद्धा हेच लागू होतं. मुंबईतले सर्वभाषिक, सर्वधर्मीय मतदार वारंवार शिवसेनेलाच भरभरून का निवडून देतात आणि शिवसेनेवरच विश्वास का टाकतात, मुंबईच्या चाव्या शिवसेनेच्याच हाती का सोपवतात, मुंबई का किंग कौन, या प्रश्नाचं उत्तर ‘शिवसेना’च का येतं, याचा इतर पक्षांनी, खासकरून भाजपने विचार करायला हवा.
– – –
३९ हजार कोटी रुपयाचं बजेट, २२५पेक्षा अधिक नगरसेवकांच्या जागा आणि मुंबईचा गल्लीबोळातली ‘गटर, वॉटर आणि मीटर’ या समस्यांवरची उत्तरं असणारा ‘मुंबईचा किंग कौन’ या प्रश्नाचा निवाडा म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका. दोन दशकांपेक्षाही अधिक काळ शिवसेना-भाजप युतीची सत्ता मुंबई मनपावर होती. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. महाराष्ट्रात भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष असा प्रयोग वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये यशस्वी झाल्यानंतर मुंबईची महानगरपालिका जिंकणं हा भाजपसाठी उरलीसुरली इभ्रत वाचवण्याचा विषय झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व करोनाकाळात नावाजलं गेलं, अतिशय निर्णयक्षम, संयमी आणि जागरूक, वडीलधारे मुख्यमंत्री या स्वरूपात ते महाराष्ट्रीयनांच्या, खास करून मुंबईकरांच्या पाठी उभे राहिले आहेत, तसेच ते यापुढेही मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहतील, हे शिवसेनेने खणखणीतपणे दाखवून देण्याची ही वेळ आहे. केंद्रातील महाराष्ट्रद्वेष्ट्या आणि मुंबईद्वेष्ट्या मोदी सरकारने मुंबईच्या विकासात कोलदांडे घालून देशाची आर्थिक राजधानी हा या महानगराचा लौकिक संपुष्टात यावा, यासाठी फक्त राजकीय आकसापोटी मुंबईचा कसा वारंवार पाणउतारा केला, हेही शिवसेनेने दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. मोदी सरकारच्या काळात केंद्र-राज्य संबंध कधी नव्हते इतके ताणले गेले आहेत. राज्यांना दुय्यम भूमिका द्यायची, राज्य सरकारच्या अधिकारातल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपेतर राज्यांमधल्या राजकीय नेतृत्त्वाचा पाणउतारा करायचा, जीएसटीमधला वाटा वेळेवर न देऊन राज्यांची आर्थिक प्रकृती तोळामासा करायची, हे या सरकारचं संघराज्याच्या मूळ सांगाड्यालाच सुरुंग लावणारं धोरण आहे. त्यात मुंबईवर यांचं विशेष ‘प्रेम’. बुलेट ट्रेनचा प्रकल्प माथी मारणे, आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र मुंबईबाहेर नेणे, या देशात येणार्या विदेशी पाहुण्यांना मुंबईपासून दूर ठेवून सतत गुजरातला नेऊन ढोकळा-फाफडा खाऊ घालणे, हे सगळे उपद्व्याप केंद्र सरकारने मुंबईचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्यासाठीच केले आहेत. मध्यंतरी तर मुंबईचे भूषण असलेली चित्रपटसृष्टीच उचलून उत्तर प्रदेशात नेण्याच्या गमजाही मारल्या गेल्या.
भाजपने मुंबईसाठी काय केलं आहे, जे केलं ते चांगलं केलं आहे का, असा प्रश्न सर्व मुंबईकरांनी स्वत:ला विचारायला हवा. फक्त मराठी माणसापुरता हा विषय मर्यादित नाही. मुंबईचं मीठ खाणार्या आणि मुंबईला कर्मभूमी मानणार्या प्रत्येक भाषिक माणसाने हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला पाहिजे. या देशाच्या आर्थिक विकासात आणि सर्वसमावेशक सामाजिक जडणघडणीत या महानगराचा, इथे राहणार्या सगळ्याच मुंबईकरांचा फार मोलाचा वाटा आहे, असं जो मानतो, त्या प्रत्येकाने हा प्रश्न विचारला पाहिजे.
रुसलेल्या कमळीची स्वगते
आजवर शिवसेनेच्या आयत्या मतांवर मौज आणि माज करणार्या भाजपची कढी सध्या पातळ झाली आहे. शेठजींचा पक्ष असा बदलौकिक असलेला आपला पक्ष फक्त धनदांडग्यांचा पक्ष नाही, हे मुंबईकरांना पटवून देण्याचं महाकठीण काम त्यांना करायचं आहे. केंद्र सरकार मुंबईकडे थेट दुर्लक्ष करत असताना, मुंबईचं खच्चीकरण असताना आपला पक्ष मुंबईकरांचा हितरक्षक आहे, हे मुंबईकरांच्या गळी उतरवण्याचंही शिवधनुष्य त्यांना उचलायचं आहे. मुंबईकरांना असं मूर्ख बनवणं सोपं नाही, म्हणूनच उत्तर प्रदेशाप्रमाणे इथेही अखेर धर्माचंच कार्ड खेळण्याची नामुष्की या पक्षावर आलेली आहे. त्यामुळेच तर टिपू सुलतानचं नाव मैदानाला देण्याच्या निर्णयावरून मानभावी गदारोळ सुरू आहे. तुम्ही रस्त्यांना टिपूचं नाव दिलंत तेव्हा टिपू नायक होता? आता तो खलनायक झाला? किती दुटप्पीपणा कराल?
विकासाच्या बाता मारायच्या आणि विनाशाचं राजकारण करायचं, ही भाजपची राष्ट्रीय नीती एव्हाना देशात सगळ्यांच्या लक्षात आली आहे. याला मुंबईकर अपवाद असतील का? विक्रम-वेताळ नावाची मालिका एकेकाळी दूरदर्शनवर येत असे. त्या मालिकेत एक प्रसंग असा होता की विक्रमादित्य सिंहासनाकडे निघालेला असताना कोणीतरी त्याला रोखतं आणि सांगतं की सिंहासनावर आरूढ होण्याआधी त्याच्या लायक बना. महानगरपालिकेसाठी सुद्धा हेच लागू होतं. मुंबईतले सर्वभाषिक, सर्वधर्मीय मतदार वारंवार शिवसेनेलाच भरभरून का निवडून देतात आणि शिवसेनेवरच विश्वास का टाकतात, मुंबईच्या चाव्या शिवसेनेच्याच हाती का सोपवतात, मुंबई का किंग कौन, या प्रश्नाचं उत्तर ‘शिवसेना’च का येतं, याचा इतर पक्षांनी, खासकरून भाजपने विचार करायला हवा.
या पक्षाची पंचाईत अशी आहे की त्याला मुंबईत, महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागाच नाही. हे सीमाप्रश्नावर चूप, कारण बेळगावात यांचं सरकार आहे, तिथे जाऊन एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात निर्लज्जपणे प्रचार करणार. महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटी द्या असं आपल्याच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाला ठणकावण्याची हिंमत नाही. तिथे चिडीचुप्प. आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र मुंबईबाहेर गेलं तरी यांचं मौन सुटत नाही. मुंबईच्या विकासाचा मुद्दा आला की सगळी डबल इंजिनं भकभक करत चालण्याऐवजी परळ वर्कशॉपकडे निद्रिस्त व्हायला का कूच करतात, हे मुंबईकर ओळखत नसतील का? मुंबई नाट्यप्रेमी आहे, संगीत रंगभूमीवर तिने अनेक गाजलेली स्वगतं ऐकली आहेत. पण मुंबईच्या हिताचा शब्द न उच्चारता निव्वळ सत्ता गमावल्यामुळे होणारी फडफड व्यक्त करणारी कमळीची भंपक स्वगतं ऐकायला कोणाला वेळ आहे?
आघाडीच्या भविष्याची पायाभरणी
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने आधीच स्वबळावर लढायचा निश्चय केला आहे. राष्ट्रवादीने तसा निर्णय नसेल घेतला तरी मुंबईत पक्षाची जमीन अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. आणि त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महानगरातलं अस्तित्व टिकवण्यासाठी काही अपरिहार्य लढती होणार हे निश्चित असलं तरी त्यातून महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी होण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीमध्ये बिनीचा शिलेदार शिवसेना हाच पक्ष आहे आणि म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुखच आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुंबई हे शिवसेनेचं हृदय, धमनी वगैरे सगळं काही आहे. अनेक वर्षांनी राज्याला मुंबईचा मुख्यमंत्री मिळाला आहे तो शिवसेनेमुळेच. म्हणूनच सेनेची खमक, चमक आणि दमक मुंबई जिंकण्यानेच झळाळून उठणार आहे. तसं झालं की भाजपच्या आधीच सुरू झालेल्या घसरणीला वेग येईल, हे तो पक्ष ओळखून आहे.
मुंबईवरच्या अन्यायाने तुटलेल्या मराठी मतांची भरपाई करायला इतर समाजघटकांना चुचकारण्याची खेळी भाजप करणार, हे निश्चित आहे. त्यासाठी बिगरमराठी व्यक्तीला मुंबईचा महापौर म्हणून सादर करण्याचीही पाळी या पक्षावर येऊ शकते. पण, बिगरमराठी मते काही एकगठ्ठा भाजपच्या हक्काची नाहीत. काँग्रेसने चांगली कामगिरी केली बिगरमराठी मतांचा काही टक्का त्यांच्याकडे वळणार. या सगळ्याची कल्पना असल्याने मुंबईच्या हिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याऐवजी शिवसेनेला अपशकुन करणे, वारंवार सेनेला खिंडीत गाठणे, शिवसेनेने मुंबईचे वाटोळे केले, असा धादांत खोटा प्रचार करणे, अशी हत्यारं भाजपने परजली आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा चेहरा असणार आहेत. म्हणजे यांच्याकडे मुंबईचा चेहराही नाही, ते मोहरा कुठून बदलतील? गेली दोन वर्षं महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या माध्यमांमधून सतत हल्लाबोल करूनही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस घडू शकलेलं नाही. याची खंत आणि खदखद भाजपच्या गोटात आहे. शिवसेनेने दगाबाजी केली, बहुमताचा अवमान केला, हा अपप्रचार करताना पहाटेचा शपथविधी सहजगत्या विसरतात भाजपेयी. या कथित गद्दारीचा वचपा त्यांना मुंबई जिंकून काढायचा आहे.
पण मतदार कशाच्या बळावर मतं देणार आहेत? त्यांना मुंबईचा विकास हवा आहे, उत्तम भविष्य हवं आहे, राजकीय सुंदोपसुंदीत त्यांना का रस असेल? मुंबईला आणि राज्याला केंद्राकडून हक्काचा महसूल मिळत नाही हे ना राज्याच्या हिताचं आहे ना मुंबईच्या. केंद्रातल्या सरकारने असहकाराची नीती अशीच चालू ठेवली तर मुंबईला आणि पर्यायाने महानगरपालिकेने मुंबईचा विकासाचा स्वतंत्र, स्वायत्त आराखडा तयार करावाच लागेल. त्यामुळे, मुंबईच्या गरजा, शहराच्या वाढीचा अंदाज आणि शहराचं भविष्य या सगळ्याशी जवळून परिचय असणार्यांचीच सत्ता महानगरपालिकेत असणे आवश्यक आहे. कोस्टल रोडचा प्रकल्प, जमीनीखालून पाणीपुरवठ्याचे प्रकल्प, बेस्ट बसेसना इलेक्ट्रिक करणं, रस्तेबांधणीला गती, ही सगळी कामं महानगरपालिकेतर्फे होत आहेत आणि त्याचं सातत्य टिकून राहण्यासाठी पक्षहितापेक्षा मुंबईचं, मुंबईकरांचं हित जपणार्या पक्षाला जिंकवणं गरजेचं आहे. विद्वेषाने नाही त्वेषाने काम करणारे नगरसेवक मुंबईला हवे आहेत.
मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला महानगरपालिका निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. एरवी विधानसभेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका यांच्यातले मुद्दे वेगवेगळे असतात. परंतु मुंबईसारख्या अवाढव्य बजेट असलेल्या, कोट्यवधी लोकांचं हित जपणार्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय राजकारणाचा काहीच असर होणार नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल. सध्या पंजाब असो, उत्तर प्रदेश असो वा बंगाल असो- भाजपच्या विरोधात प्रचंड रागाचं आणि रोषाचं वातावरण सर्वदूर आहे. मुंबईकरांचे नातेसंबंध आणि भावनिक लागेबांधे या प्रदेशांशीही जोडलेले आहेत. राजकीय आकसाने राज्य करणारे र्हस्वदृष्टीचे राज्यकर्ते मुंबईला नको आहेत. मुंबईसाठी आपुलकीने, त्वेषाने काम करणारे राज्यकर्ते हवे आहेत. नवं रक्त, आधुनिक विचार आणि वैश्विक शहरांची घडण समजून तशी मुंबई घडवण्यासाठी प्रयत्नशील नगरसेवक हवे आहेत. करोनाच्या कितीही लाटा आल्या तरी शहराला विश्वासात घेऊन, आरोग्यसेवा देऊन त्या परतवण्याची हिंमत असणारे लोक हवे आहेत.
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे!