‘मार्मिक’च्या खजिन्याचा संग्राहक!
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत. पण काहीजण साहेबांवरील प्रेम आगळ्या पद्धतीने दाखवून देतात. ठाण्याच्या लुईसवाडी येथील तृणपुष्प सोसायटीत राहणारे ज्येष्ठ शिवसैनिक अजित गणपत डफळे यांनी तर साहेबांवर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांची कार्टून्स असलेले ‘मार्मिक’ अंक जतन करायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे ३००हून अधिक ‘मार्मिक’ जमा आहेत. या सर्व अंकांची ते तान्ह्या मुलासारखी जपणूक करतात. ‘मार्मिक’ अंकांचा संग्रह करायला कशी सुरुवात केलीत, असे विचारले तेव्हा ते म्हणाले, लहानपणी वाचनाची आवड होती. त्यावेळी वयानुसार ‘चांदोबा’ आणि ‘किशोर’ वगैरे अंक वाचण्याचा छंद होता. त्यावेळी दिवाळीत वेगवेगळ्या अंकांमधली व्यंगचित्रे पाहण्याची आवड लागली. थोडा मोठा झालो तेव्हा ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर मा. बाळासाहेबांची भाषणे ऐकली, तेव्हापासून साहेबांची व्यंगचित्रे देणाऱ्या ‘मार्मिक’कडे ओढला गेलो. मला आठवते, बाळासाहेबांचे ‘कुंचला आणि पलिते’ हे व्यंगचित्रांचं पुस्तक हातात पडलं आणि त्यानंतर दर आठवड्याला ‘मार्मिक’ आवर्जून घ्यायला लागलो. आता अंक जतन करायचे म्हटले की त्यांची देखभाल करणे ओघाने आलेच. अजित यांनी आधी नुसतेच अंक साठवले होते. पण त्यांचा संग्रह करावा ही कल्पना त्यांना २०१० साली सुचली. तेव्हापासून ते ‘मार्मिक’चे अंक सलग साठवू लागले. पाहता पाहता हा संग्रह आता खूप मोठा झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. कार्टून पाहून वाचक मनोमन हसतो. त्या चित्रातली खरं भाष्य त्यांना कळालेलं असतं. मोठमोठे मजकूर लिहूनही लोकांना जे कळत नाही, ते एका छोट्याशा कार्टूनने कळू शकते ही वस्तुस्थिती आपल्याला ‘मार्मिक’मधूनच समजली असे डफळे सांगतात. व्यंगचित्रे काढणे ही एक कला आहे. त्यावर योग्य कॅप्शन टाकणेही महत्त्वाचे असते. तेही बाळासाहेबांना छान जमत होते. आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचे ते या कार्टूनद्वारे ते व्यक्त करत होते, असेही डफळे म्हणाले. आता ‘मार्मिक’ अंक आमूलाग्र बदलला आहे. हा बदललेला ‘मार्मिक’ही खूपच आवडतो असेही ते स्पष्ट करतात. आताच्या ‘मार्मिक‘मध्ये केवळ कार्टून्सच नव्हे, तर सद्यस्थितीवरील अनेक लेखही असतात हे खूप छान वाटते असेही डफळे म्हणाले. आपल्याकडील ‘मार्मिक’ अंकांचे प्रदर्शन त्यांनी अलीकडेच म्हणजे २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत ठेवले होते. या प्रदर्शनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. हे प्रदर्शन पाहायला शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक बोरीटकर आले होते. माजी न्यायमूर्ती एस. ए. द्विवेदी यांनीही या प्रदर्शनाला भेट दिल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
– चित्रसेन चित्रे
कोणते विदेशी मद्य स्वस्त झाले?
गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या आधी विदेशी मद्यावरील अबकारी शुल्क कमी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. विदेशी मद्य स्वस्त झाले तर त्याची विक्री वाढून महसूल वाढेल आणि मद्यप्रेमींना चांगल्या दर्जाचे मद्य अकारण महागड्या दराने घ्यावे लागणार नाही, असा होरा त्यामागे होता. ३१ डिसेंबरच्या आसपास मद्यखरेदी अनेकपटींनी वाढते, तेव्हा ग्राहकांना हा लाभ मिळेल, असे वाटले होते. पण आता जानेवारी महिना उलटत आला तरी निदान मुंबई परिसरात तरी कोणतेही विदेश मद्य स्वस्त झालेले दिसत नाही. फक्त रेड लेबल या एकमेव मद्याची किंमत कमी झालेली आहे. वाइन शॉपवाल्यांना विचारले तर आमच्याकडील जुना स्टॉक संपेपर्यंत जुन्याच दराने विकावे लागणार, असे ते सांगतात.
सर्वसामान्य ग्राहकाला स्टॉक जुना आहे की नवा आहे आणि नवा स्टॉक अबकारी कर कमी भरून ग्राहकाच्या गळ्यात जुन्याच दराने मारला जात आहे का, याची तपासणी कोण करणार? यातून सरकारच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे, ते वेगळेच.
– अशोक मोरे, मिरा रोड
महाड तालुक्यावर आजही शिवसेनेचा प्रभाव
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. त्यांची जवळून भेट होण्याएवढा वयाने, मानाने मी मोठा नव्हतो. परंतु निवडणुकीच्या प्रचारासाठी व पक्षवाढीसाठी, पक्षबांधणीसाठी बाळासाहेब झंझावाती दौरे काढीत असत आणि त्यानिमित्त महाड शहरात दोन वेळा बाळासाहेब येऊन गेले आहेत. महाडमधील बाळासाहेबांची पहिली जंगी सभा चांदे क्रीडांगणावर झाली होती. मुंगी शिरायला जागा नव्हती एवढी अलोट गर्दी या सभेला झाली होती. बाळासाहेबांच्या भाषणाचा, विचारांचा महाड तालुक्यातील जनसामान्याच्या मनावर इतका जबरदस्त प्रभाव पडला की आजतागायत एक-दोन अपवाद सोडल्यास कायम शिवसेनेच्या विचारांचा, मराठी बाण्याचा, हिंदुत्वाचा पगडा जनमानसावर कायम आहे. त्यांच्या विचारांच्या वादळासमोर बाकी पक्ष निष्प्रभ ठरले आहेत. शिवसेना लोकांच्या मनात कायम घर करून राहिली आहे. बाळासाहेबांचे विचार, जनमानसावर ताबा मिळविणारी त्यांची भाषणशैली मोठी ओघवती होती. महाडच्या भाषणातून त्यांनी महाडचे ऐतिहासिक महत्त्व जनतेसमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नानासाहेब पुरोहित, सुरबानाना टिपणीस, दादासाहेब सावंत यासारख्या लोकांच्या मनावर ठाण मांडून बसलेल्या थोर व्यक्तींचा उल्लेख मोठ्या आदराने केला होता. गावातील काही मंडळींचा नामोल्लेख करून या मंडळींना व्यासपीठावर बोलावून बाळासाहेबांनी त्यांचा सत्कार केला होता. या सगळ्याचा परिणाम होऊन महाड शहर व तालुका १९७१ सालापासून शिवसेनामय झाला. आजही त्याचा प्रभाव आहे.
– श्रीकांत संसारे