अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शुक्र (वक्री), मंगळ धनू राशीत, रवी-बुध (अस्त आणि वक्री), प्लूटो, शनी मकरेत, गुरू-नेपच्युन कुंभेत, हर्षल-मेषेत, चंद्र धनू राशीत, त्यानंतर मकर आणि कुंभेत.
दिनविशेष – १ फेब्रुवारी रोजी पौष अमावस्या, ४ फेब्रुवारी गणेश जयंती.
मेष – येत्या आठवड्यात व्यापारी मंडळींच्या पदरात चांगले लाभ पडणार आहेत. मंगळ भाग्यात आहे. चंद्र-मंगळ-शुक्र यांची युती असल्यामुळे सुरुवातीचे तीन दिवस काही मंडळींसाठी शुभदायक जाणार आहेत. खास करून कलाप्रेमी, खेळाडू, वादक, संगीत कलाकार याबरोबरच उंची वस्तूंचा व्यापार करणार्या मंडळींना चांगले लाभ मिळाल्याचे दिसेल. दशम भावातील रवी-शनी-प्लूटो यांच्यामुळे मोठ्या संस्था, राजकीय क्षेत्र यांच्यामध्ये नेतृत्व करणार्या मंडळींना ऐनवेळी एखाद्या बदलाला सामोरे जावे लागू शकते. आयत्या वेळी जबाबदारी दुसर्याकडे दिली जाऊ शकते. अमावस्येच्या दिवशी मानसिक स्थिती तणावग्रस्त राहील. कौटुंबिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.
वृषभ – घरात, कामाच्या ठिकाणी डोके थंड ठेवून कार्यरत राहा. एक तारखेची अमावस्या थोडी त्रासदायक ठरू शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर मतभेद होऊ शकतात. घरात देखील आईवडिलांबरोबर वादाचे प्रसंग घडतील. विद्यार्थीवर्गाला महत्वाचा निर्णय घेताना काहीशी कसरत करावी लागेल. काहीजणांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते. एखादा महत्वाचा निर्णय लांबणीवर पडेल. प्रवासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वस्तूंची काळजी घ्या. गुरूकृपेमुळे आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याच्या समस्यांमधून मार्ग सापडेल.
मिथुन – हा आठवडा दगदगीचा जाणार आहे. बुध (वक्री) अष्टम भावात आहे. खूप धावपळ झाल्यामुळे कमालीचा थकवा जाणवेल. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, याचे भान ठेवा. सप्तम स्थानात शुक्र-मंगळ युती असल्यामुळे चुकीच्या कामापासून लांबच राहणे शहाणपणाचे ठरेल. व्यवसायात संघर्ष आणि नुकसानीचे प्रसंग घडू शकतात. कामगारांकडून मनस्तापाच्या घटना घडतील, प्रवासात त्रास होईल. घरात पत्नीच्या आग्रहाखातर धार्मिक कार्य पार पडेल. सोशल मीडियातून झालेल्या नव्या ओळखींच्या ठिकाणी फसगत होण्याची शक्यता आहे.
कर्क – प्रतिस्पर्ध्यासोबत बोलताना सावध राहा. स्पर्धा करताना यश मिळेल. पण, वाईटपणा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायातील भागीदाराकडून सहकार्य मिळेल. काही मंडळींना कलाकौशल्याच्या माध्यमातून चांगले आर्थिक लाभ होतील. दलाली, ब्रोकरेज, जमीन या क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. सप्तमात शनी-रवी-प्लूटो आणि बुध असल्यामुळे जोडीदारसोबत वादाचे प्रसंग होऊ शकतात. डॉक्टरी व्यवसायातील मंडळींना शुभदायक काळ आहे. काही मंडळींना सार्वजनिक जीवनात अपयशाला तोंड द्यावे लागू शकते.
सिंह – महिलांना या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकारी नोकरदारांनी अवैध कामापासून लांब राहावे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचे धाडस टाळाल तर बरे राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात चांगला काळ राहणार आहे. शिक्षणक्षेत्रात कार्यरत मंडळींना बहुमान मिळण्याचे योग आहेत. आकर्षक लाभाच्या मोहाला बळी पडून गुंतवणूक करू नका. पूर्ण शहानिशा करून मगच पैसे ठेवण्याचा निर्णय घ्या. खर्च करताना काळजी घ्या. एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल, पण पैसे जरा जपूनच खर्च करा.
कन्या – बुधाच्या पंचमातील मकरेत होणार्या राश्यांतरामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील. संशोधन, प्रिंटिंग प्रेसमधील लोक या मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. काही व्यवसायांत मरगळ जाणवू शकते. झटपट पैसे कमवण्याच्या नादात फसवणूक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक गाठीभेटींमधून आनंदोत्सव साजरा कराल. जमिनीच्या व्यवहारातून चांगली धनप्राप्ती होईल. शेतीव्यवसायाशी संबंधितांना चांगले लाभ मिळतील. आईकडून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तूळ – येत्या आठवड्यात मित्रमंडळींकडून आर्थिक लाभ होतील. नियमबाह्य काम टाळा. रंगेलपणा, स्वछंदीपणावर आवर घाला. चुकून एखादी गोष्ट चव्हाट्यावर आली, तर मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. साहित्य, कला, गायन वादन, अभिनय असे कलागुण असणार्या मंडळींना आर्थिक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी डोके शांत ठेवून काम करा. कोणतेही कारण असो, त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. भविष्यात फायदा होईल. धारदार वस्तूंपासून जपा. व्यावसायिक मंडळींना आर्थिक आवक समाधानकारक राहील.
वृश्चिक – नवीन कोणती योजना सुरू करण्याचे डोक्यात असेल तर तूर्तात तो प्लॅन पुढे ढकला. चुकीच्या कामात सहभागी होऊ नका, अंगलट येऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींनी पतप्रतिष्ठेचा विचार करून वागावे. कामाच्या ठिकाणी फाजील आत्मविश्वास अंगाशी येऊ शकतो. त्यामुळे ताकही फुंकून प्या, म्हणजे झाले. काही मंडळींना भावंडाना आर्थिक मदत करावी लागेल. कोर्टात दावा सुरू असेल तर त्याचा निर्णय विरोधात जाऊ शकतो. एखाद्या कामात विलंब होईल त्यामधून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवास लांबणीवर पडू शकतो.
धनू – गुरू पराक्रमात, लग्नी मंगळ-शुक्र असल्यामुळे या आठवड्यात मनासारखी कामे पार पडतील. घरात भावाकडून सहकार्य मिळेल. खेळाडूंना स्पर्धांमध्ये नावलौकिक प्राप्त होईल. पोलीस, संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्या मंडळींना अधिकारप्राप्तीचे संकेत आहेत. व्यावसायिकांना धनप्राप्तीसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थकीत येणी वेळेत मिळणार नाहीत. नवीन कर्ज काढण्याच्या विचारात असाल तर त्याला काही ना काही कारणामुळे विलंब होऊ शकतो.
मकर – येणार्या आठवड्यात जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. लग्नी शनी, रवी, बुध, प्लूटो एकत्र आहेत, त्यामुळे सरकारी ठिकाणी अपेक्षित असणारी कामे काही कारणामुळे बिघडतील. वरिष्ठांबरोबर हेवेदावे होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाराचा दुरुपयोग टाळा. नियमबाह्य कामासाठी अवैध मार्गाने पैसे कमावणे टाळा. विदेशात नोकरी मिळवण्याचे प्रयत्न दृष्टिपथात येतील. नवीन गुंतवणूक कराल. वाहन घेण्याची योजना मार्गी लागू शकते.
कुंभ – येत्या आठवड्यात अनपेक्षित लाभ मिळतील. नवीन वास्तू घेण्याची योजना सफल होईल. ईश्वरी चिंतनात मन रमवाल, त्यामुळे मनःशांतीचा अनुभव येईल. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ आहे. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्लॅन सफल होतील. कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात चांगले यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य पार पडेल, त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन – दानधर्माच्या माध्यमातून समाजात काम कराल, त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. स्वपराक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात याल. मोठ्या उद्योगक्षेत्रात ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून चांगले यश मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर मानसन्मानाची जागा मिळू शकते. कर्तृत्व सिद्ध करणायचा हा काळ आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होईल. अधिकाराचा गैरवापर करू नका, अन्यथा नैतिक अधःपतन होऊ शकते.