एक दिवस नेहमीप्रमाणे नकार घेऊन माघारी परतत असताना दुकानमालकांचे शब्द कानावर पडले, ‘हा झिपर्या काय मला माल विकणार आहे? त्याची लायकी तरी आहे का?’ हे शब्द माझ्या फार जिव्हारी लागले. त्या क्षणी असं वाटलं की सोडून द्यावा हा धंदा, गपगुमान नोकरी धरावी. पण तो विचार झटकला आणि आपली पण वेळ कधीतरी येईल, असं मनाला समजावलं. हीच चिकाटी एक दिवस नशीब उजळणार होती.
– – –
हिवाळा संपता संपता घरातल्या लोणच्याच्या बरण्यासुद्धा तळ गाठायला लागतात. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात लोणचं अधिक खाल्लं जातं. निगुतीने ‘लोणचं घालण्याचा’ काळ जरा मागे पडल्याने, चविष्ट घरगुती लोणच्याची शोधमोहीम सुरूच असते. अलीकडेच घरातील वाणसामान खरेदीला डी-मार्टमध्ये गेलो असताना प्रवीण, राम बंधू आदी देशातील नामांकित कंपन्यांच्या जोडीला ‘श्री सिद्धिविनायक’ या नावाचं लोणचं दिसलं आणि खरं तर थोडा धक्काच बसला; कारण ‘डी-मार्ट‘ ज्या धर्तीवर काम करतं, ती ‘वॉलमार्ट’ ही अमेरिकन सुपर मार्केट साखळी केवळ तोच माल विक्रीसाठी ठेवते, जो जलदगतीने, तीस दिवसांच्या आत विकला जातो. त्यांचा यूएसपी तोच आहे. त्यामुळेच डी-मार्टमध्ये माल विक्रीस ठेवला जाण्याला ‘एफएमसीजी’ क्षेत्रात फार मानाचे स्थान आहे. कोणत्याही चोखंदळ ग्राहकाप्रमाणे सर्व लोणच्याच्या ब्रँडचे दर तपासून पाहिले तर आश्चर्याचा धक्काच बसला; कारण विख्यात कंपन्यांच्या तुलनेत श्री सिद्धिविनायक लोणच्याच्या बरणीचे दर जास्त होते. ज्या प्रमाणात माल विक्रीला ठेवला होता ते पाहता या मालाची विक्री चांगलीच होत असणार, असं वाटलं. थोडी माहिती घेतल्यावर कळलं की या ब्रँडच्या मालकांचे नाव रवींद्र मर्ये असे असून ते आणि त्यांचा मुलगा रोहन हे दोघेही मराठी उद्योजक आहेत. साहजिकच त्यांना भेटून त्यांचा प्रवास जाणून घ्यायचं ठरवलं.
लालबाग येथील त्यांच्या ऑफिसमध्ये गप्पाष्टक जमलं. ते म्हणाले, आमचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कट्टा, माझ्या आजीने मुंबईत बकरी अड्डा, भायखळा इथे लोणचं विकायचा घरगुती व्यवसाय सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भायखळा, लालबाग या गिरणगावातील कामगार आमच्याकडे लोणचं खरेदी करायला येत असत. आमचं एकत्र मोठं कुटुंब होतं. काकांना चार मुलं तर आम्ही नऊ भावंडं. काका मॅट्रिक पास झाले होते. ते लोणच्याच्या व्यवसायाचा हिशेब पाहायचे. माझे वडील पाचवी पास होते, ते कुर्ला येथे वेल्डरची नोकरी करून लोणची बनवणे व विक्री करणे हे काम पाहत असत. घरगुती स्वरूपात सुरू झालेला हा धंदा बाबा आणि काकांनी वार्षिक ‘पाच टन’ माल खपवण्याइतका मोठा केला. त्यानंतर काकांच्या मनात आलं की सर्व धंदा माझ्यामुळेच वाढतो आहे. उद्या भावाच्या मुलांनी हिस्सा मागितला तर आपल्या चार मुलांचा वाटा लहान होईल, त्यापेक्षा आताच हा धंदा वेगळा करावा. त्यांनी बाबांना धंद्यातून वेगळं केलं. या धक्क्याने बाबांना अर्धांगवायूचा झटका आला.
मी तेव्हा दहावीला होतो, भावंडांमध्ये माझा नंबर सातवा होता, मोठ्या भावांना लोणच्याच्या धंद्यात जराही रस नव्हता. मी लहान असलो तरी धडपड्या वृत्तीचा होतो. त्यामुळे धंद्याची संपूर्ण जबाबदारी वडिलांनी माझ्या अंगावर टाकली. आईच्या मदतीनं मी सर्वात प्रथम धंद्यातील बारकावे समजून घेतले. धंदा बरा चालला होता. पण त्यातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. भाऊ कामाला लागून घरासाठी हातभार लावू लागले. मलाही वाटू लागलं की आपणही एखादी नोकरी करून धंदा सांभाळावा. मी नोकरी शोधली देखील; पण कामावर रुजू व्हायला नवीन कपडे घालून घरातून निघणार, इतक्यात वडिलांनी विचारलं, कुठे चालला आहेस? मी म्हणालो, मला नोकरी लागली आहे, तिथेच चाललो होतो. बाबा म्हणाले, जी चूक मी केली ती तू करू नकोस. नोकरी करून अर्ध्या वेळात केलेल्या धंद्याला चांगली बरकत येत नाही. तुझ्यात धंदा करायला लागणारे सारे गुण आहेत, तेव्हा नोकरीचा विचार कायमचा मनातून काढून टाक. बाबांचं ते बोलणं काळजाला असं काही भिडलं की नोकरीसाठी केलेले नवीन कपडे काढून, हाफ पॅन्ट घालून पुन्हा लोणच्याच्या पॅकिंगला लागलो. मग पुन्हा कधीही नोकरीचा मार्ग स्वीकारला नाही.
अर्धांगवायूच्या आजारातून वडील बाहेर आले. ते पुन्हा धंद्यात लक्ष घालू लागले. आम्ही कोकणात मालवणातच लोणचं बनवण्याची फॅक्टरी टाकली. धंदा पुन्हा रुळावर येत होता. याच काळात एक वाईट घटना घडली. वडिलांनी जुनी सेकंड हॅन्ड स्कूटर विकत घेतली होती. एक दिवस वरळी सी-फेस येथे स्कूटरवर असताना भरधाव वेगाने मागून येणार्या कारने बाबांना उडवलं. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. आम्ही सर्वजण कोलमडून गेलो. व्यवसाय करताना अंगावर दुःखाचा पहाड कोसळला असला तरी ग्राहकांच्या शुभकार्यासाठी सामान वेळेवर पोहोचवावं लागतं, नाट्यसृष्टीत जसं ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे वडील गेल्याचे दुःख पाठीशी टाकून मी पुन्हा व्यवसायाकडे वळलो. यावेळी माझ्या मोठ्या बहिणीने व्यवसायासाठी आर्थिक मदत केली.
दरवेळी येणार्या अडचणींनी व्यवसाय कोलमडू द्यायचा नसेल, तर आपल्याला वडिलांपेक्षा काहीतरी वेगळं करायला हवं, असा विचार रवींद्र यांनी केला. त्यांनी एक सायकल विकत घेतली. त्यावर लोणच्याच्या पिशव्या लावून आजूबाजूच्या किराणा माल दुकानदारांकडे लोणचं विकण्यासाठी ते फिरू लागले. तुम्ही व्यवसायात नवीन असाल व तुमच्या उत्पादनाच्या ग्राहकांकडे इतर अनेक पर्याय आधीपासून उपलब्ध असतील, तर तुमचं स्वागत कुणी पायघड्या घालून करत नाही. कडू, वाईट अनुभवांना तोंड लागतं, अनेकदा अपमान सहन करावा लागतो. या सुरुवातीच्या काळातील प्रसंगांबद्दल रवींद्र म्हणाले, गिर्हाईक माझ्याकडे येईल तेव्हा मी त्याला माल विकेन ही आमची जुनी परंपरा मोडून मी घाऊक प्रमाणात लोणची विकत घेणारे ग्राहक शोधायला, वेगळी वाट धुंडाळायला लागलो. पाहिले काही दिवस तर वाट फुटेल तिथं फिरत होतो. उच्चभ्रू वस्तीतल्या दुकानदारांनी, आम्ही सुटी लोणची विकत नाही असं सांगून इथे पुन्हा कधीही येऊ नकोस, अशा स्पष्ट शब्दात माल विकत घ्यायला नकार दिला. मग मी वरळी, लालबाग, परळ या गिरणगावातील भाजी मंडई, मासे मंडईकडे मोर्चा वळवला. गिरणी कामगारांच्या वस्तीत दर महिन्याला पगाराची दहा तारीख म्हणजे दिवाळी असायची. पगार झाला की महिन्याभराचं सामान घरी भरलं जाई. पगारानंतरच्या पहिल्या रविवारी मासे, मटण घ्यायला सकाळी सहा वाजल्यापासूनच मंडईमधे अशी झुंबड उडायची की विचारायला सोय नाही. ‘डोक्याची मंडई करू नकोस’ हा वाक्प्रचार देखील इथेच प्रसवला असावा! नॉनव्हेजची मोठी खरेदी झाली की बायका मसाल्यांच्या दुकानात शिरून तेल, लाल तिखट, गरम मसाले याचबरोबर, घरातील पगार संपत असताना महिनाअखेरीस पानात चवीची साथ देणारे लोणचं खरेदी करायच्या. भोजन शाकाहारी असो की मांसाहारी- चटकदार लोणचं सर्वांना आवडतंच. पानात लोणचं वाढण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे भाजी मंडईतील सर्व मसाल्यांच्या दुकानात लोणच्याच्या खप प्रचंड होता. मी ठरवलं की हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या मंडईत जाण्यासाठी राखून ठेवला, सायकलवर वेगवेगळ्या लोणच्याची सॅम्पल्स लादून मी फिरू लागलो. एक दुकानदार शंभर किलो लोणचे विकत असेल, तर मी त्याला किमान पाच किलो तरी माझा माल घे अशी विनंती करायचो. पण या दुकानात वर्षानुवर्ष कुणीतरी त्याचा माल विकत असतो, काही वेळा तर त्यांच्या तीन चार पिढ्यांचा व्यावसायिक ऋणानुबंध असतो, तो तोडणे फार कठीण असतं. आपल्याला वाटतं, मी जगातील सर्वोत्तम चवीचे व उत्तम क्वालिटीचे जिन्नस बनविले आहेत तर दुकानदाराने पूर्वीचा माल बंद करून आपला माल घेतला पाहिजे; पण असं होत नाही. मी विक्री करायला जात असे तेव्हा काही दुकानात गर्दी असायची. त्यामुळे माझा नंबर यायला कधी कधी एक तासाहून जास्त वेळ देखील लागायचा. तुम्ही कधी डॉक्टरकडे गेला असाल, तर तिथे गळ्यात टाय घातलेली, हातात मोठी लेदरची
बॅग घेतलेली, अनेक तरूण मुलं डॉक्टरला भेटायला थांबलेली दिसतात. ती तुमच्याआधी आलेली असतात, पण त्यांना तुमच्यानंतर, सर्व पेशंट संपल्यावर आत घेतलं जातं. कारण ते डॉक्टरांचे ग्राहक नसतात, डॉक्टर त्यांचे ग्राहक असतात. अगदी असंच, कुठल्याही सेल्समनला रांगेत शेवटचं स्थान दिलं जातं. सेल्समनला दुकानातील ग्राहक जायची वाट पाहावी लागते. इतकंच काय, तर दुकान मालकाचा आज मूड कसा आहे यावर देखील लक्ष ठेऊन विक्रीकौशल्य पणाला लावावं लागतं.
मी दर सोमवारी वरळीच्या मंडईत जायचो. तिथे थोरात मसाले हे प्रख्यात दुकान होतं. त्या मालकाने अनेक महिने मला आल्या पावली परत पाठवलं होतं. तरीही मी चिकाटीने दर आठवड्याला त्यांना भेटून माझा थोडा माल विकत घेऊन मला एकदा तरी संधी द्या, अशी विनंती करीत असे. त्यांच्या दुकानाची उलाढाल मार्केटमध्ये सर्वात जास्त होती. थोरात यांचा व मसाला दुकानाचा व्यवसाय पिढीजात होता. त्यांचे नातलगही याच व्यवसायात होते. त्यामुळे यांनी माझा माल घेतला तर संपूर्ण मुंबईतील मसाल्यांच्या दुकानात मला डायरेक्ट एन्ट्री मिळेल, हा प्रामाणिक हेतू होता. मी सहा महिने प्रयत्न करत होतो. एक दिवस नेहमीप्रमाणे नकार घेऊन माघारी परतत असताना दुकानमालकांचे शब्द कानावर पडले, ‘हा झिपर्या काय मला माल विकणार आहे? त्याची लायकी तरी आहे का?’ हे शब्द माझ्या फार जिव्हारी लागले. त्या क्षणी असं वाटलं की सोडून द्यावा हा धंदा, गपगुमान नोकरी धरावी. पण तो विचार झटकला आणि आपली पण वेळ कधीतरी येईल, असं मनाला समजावलं. हीच चिकाटी एक दिवस नशीब उजळणार होती.
या घटनेला महिना उलटून गेला. एक दिवस घरातील टेलिफोनची रिंग वाजली, फोन उचलला तर त्या थोरात मसाला दुकानाचे मालक आज १०० किलो आंब्याचं लोणचं मिळेल का, असं विचारत होते. त्यांची मोठी लग्नाची ऑर्डर होती आणि त्यांचा जुना सप्लायर वेळेवर पोहचू शकत नव्हता. मी फोनवर हो म्हटलं. किरकोळ आणि घाऊक विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आमचं लोणचं एकत्र केलं. सायकलला टांग मारली आणि अवघ्या दोन तासांत त्यांना १०० किलो लोणचं नेऊन दिलं. मालक खूपच खूष होऊन म्हणाले, मला वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर ही ऑर्डर पूर्ण करशील असं. त्या रात्री आनंदाने मला झोप लागली नाही. आपल्याला हवी होती तिथं एन्ट्री मिळाली याचा आनंद गगनात मावत नव्हता. मी दुसर्या दिवशी त्या दुकानात पुन्हा गेलो. ते मालाचे पैसे देताना म्हणाले, तुझा माल चांगला आहे, त्यामुळे आता तू नेहमी माल टाकत जा.
तुम्हाला सांगतो, त्या दिवसानंतर मी कधी मागे वळून पाहिलं नाही.
दोन चाकी सायकल आणि स्वतःच्या पायांना आराम देत मी आता, तीन चाकी रिक्षा चालवायला लागलो. हळूहळू मुंबईतील सर्व मंडयांमध्ये माझं लोणचं जायला लागलं होतं. थोडे पैसे गाठीशी आले, तसं मी दादर भाजी मंडईमध्ये माझं पाहिलं दुकान विकत घेतलं. व्यवसाय चांगला वाढत होता. मालवणमधली फॅक्टरीची जागा आता कमी पडत होती. तसंच लोणचं बनवायला लागणारं रॉ मटेरियल मालवणमध्ये नेणं जास्तच खर्चिक होऊ लागलं होतं. त्यामुळे नवीन जागेची पाहणी सुरू केली. कोल्हापूरच्या शिरगाव एमआयडीसीमध्ये १९९६ साली, सात हजार स्क्वेअर फूटची जागा घेतली.
जागा तर विकत घेतली पण त्या जागेवर बांधकाम करायला पैसे नव्हते. कारण व्यवसाय करताना तुमचे पैसे ग्राहकांना दिलेल्या उधारीमुळे रोलिंगमध्ये फिरत असतात. जसा धंदा वाढतो-ग्राहक वाढतात, तशी उधारी देखील वाढत जाते. तेव्हा पैसे कागदावर दिसतात पण ते काढता येत नाहीत. त्यावेळी किशोर ठाकूर या मित्राने मला मदत केली. त्यामुळे मी नवीन फॅक्टरी वेळेत बांधू शकलो.
जागा कोल्हापूरला घेण्याचं कारण काय? तर कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये चांगल्या प्रतीचे रॉ मटेरियल नियमित मिळणे याला धंद्याच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. बेळगाव मार्वेâट, कर्नाटक मार्वेâट आमच्या कोल्हापूर फॅक्टरीपासून जवळ आहे,
फॅक्टरी सुरू झाल्यावर बेळगावहून कैरी, हुबळीहून मसाला, तर पुण्यावरून मिरची यायला लागली. लोणचं चांगलं टिकवायचं असेल तर पॅकिंग करताना त्याची एखाद्या लहान बाळासारखी जपणूक करावी लागते. मी सायकलवरून लोणचं पोहोचवत असतानाचा हा किस्सा आहे. एका दुकानदाराकडे गेलो होतो, तेव्हा त्याने मला त्याच्या लोणच्याच्या बरण्या धुवून, त्यात लोणचं भरायला सागितलं. मी बरण्या साबणाने चांगल्या धुतल्या आणि स्वच्छ कापडाने बरणी पुसून मग त्या बरणीत लोणचं भरलं. इतका वेळ माझं निरीक्षण केल्यावर तो दुकानदार मला म्हणाला, मी तुझी परीक्षा घेत होतो, बरणीत थोडं जरी पाणी राहिलं असतं तर लोणचं लवकर खराब झालं असतं. खाण्याचे पदार्थ पॅकिंग करताना केली घेतली जाणारी काळजी हा खरं तर कॉमन सेन्स आहे, पण काही वेळा तो नवीन उद्योजकात कमी पडतो. हाच कॉमन सेन्स वापरून आम्ही नवीन फॅक्टरीत लूज पॅकिंग कमी केलं आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरत पेट जारमध्ये पॅकिंग सुरू केलं. मालवण फॅक्टरीच्या तुलनेत कोल्हापूरहून होणारा अव्याहत मालाचा पुरवठा सुरू झाला.
धंदा वाढला आहे म्हणून शेटसारखं ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन ग्राहकांच्या आमच्या लोणच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घ्यायला मला नेहमीच आवडतं. एक दिवस मी दादरच्या दुकानात गेलो असता, एक ग्राहक दुकानदाराला म्हणत होता, काल तुम्ही कोणतं लोणचं दिलं? ते नेहमी देता ते लोणचं देत जा, वेगळं कोणतंही लोणचं देऊ नका, आम्हाला कसं कळणार तुमचं लोणचं कोणतं आहे ते? तुम्ही याला काही नाव का देत नाही? हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला, पुढे अनेक दिवस आपल्या लोणच्याला कोणतं नाव द्यायचं यावर माझा विचार सुरू होता. माझी सिद्धिविनायक गणपतीवर श्रद्धा आहे. दर मंगळवारी मी बाप्पाच्या दर्शनाला जातो. संकष्टी, अंगारकी चतुर्थीला मी सहा-सहा तास दर्शन रांगेत उभा राहिलो आहे. त्यामुळे ब्रँडचं नाव देताना पहिला चॉईस ‘श्री सिद्धीविनायक लोणचं’ हाच होता.
‘श्री सिद्धीविनायक लोणचं’ हे नाव आणि लोणच्याची चव आज खवय्यांच्या तोंडात पक्की बसली आहे. ही चव पन्नास वर्षांपासून कशी काय टिकली? व्यवसायवाढीचा असा कोणता फॉर्म्युला तुम्हाला गवसला आहे? असा प्रश्न विचारला असता रवींद्र म्हणाले, कच्चा माल पुरवणार्या व्यापार्यांना माझं एकच सांगणं असतं की मालाची गुणवत्ता मला हवी तशी आणि त्याची किंमत तुम्ही सांगाल ती. उदाहरणार्थ, बाजारात ‘हिंग‘ पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहे. पण आम्ही लोणचं बनवताना हिंग सत्तावीसशे रुपयांचे वापरतो. तीच गोष्ट तेलाची, मसाल्यांची आणि मिरचीची… क्वालिटीमध्ये कधीच तडजोड नाही. धंदा नवीन असताना आम्ही मसाला पिसायला माजगावच्या विष्णू मिल या डंकीणीत द्यायचो. इतर काही डंकीणीचे मालक आम्ही दिलेल्या मसाल्यांच्या पदार्थातून चोरी करून इतर गोष्टी मिक्स करायचे. हे प्रकार विष्णू शेट यांनी कधीच केले नाहीत. ते रेट घ्यायचे, पण क्वालिटीत तडजोड कधीच करायचे नाहीत. त्यांची डंकीण बंद झाल्यावर मात्र इतर कोणावर विसंबून राहण्यापेक्षा, मी कोल्हापूर फॅक्टरीत मसाला पिसण्याची मशिनरी बसवून घेतली.
कच्च्या मालाचे दररोज वरखाली होत असतात, महागाई वाढत असते, पण आम्हाला छापील विक्री किंमतीत बदल करता येत नाही. नुकसान झालं तरी चालेल पण लोणच्याचा दर्जा आपण कमी करायचा नाही, ही ग्राहकांना वाहिलेली निष्ठा आहे. माझे लग्न झाले तेव्हा बायकोचा असा समज होता की लोणच्याचा व्यवसाय असून असून तो किती असणार, कोण इतकं लोणचं खातं? पण जसजसा पत्नी गीताचा व्यवसायातील सहभाग वाढू लागला तसतशी तिला या व्यवसायाची व्याप्ती लक्षात आली. तिचं पाऊल घरात पडलं आणि माझी खर्या अर्थानं भरभराट सुरू झाली, भायखळा, परळ ते शिवाजी पार्क, असा चाळ ते टॉवर आणि सायकल, रिक्षा, जीप, मारुती ते मर्सिडीज कार असा आमचा संसार फिरत व फुलत गेला. माझं शिक्षण बारावी असलं तरी मला बायको उच्चशिक्षित हवी होती. मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देता येतील, हा विचार त्यामागे होता. पत्नीने ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, आज माझी मुलगी रुचिताने वकिलीचे शिक्षण घेतले आहे, तर मुलगा रोहन याने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून एमबीए केलं आहे.
आजघडीला आम्ही चौदा प्रकारची लोणची बनवून विकतो. त्या श्री सिद्धिविनायक लोणच्याचा प्रसार, विक्री अधिकाधिक कशी वाढवता येईल, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून योजना आखत असतो. रवींद्र आज सत्तरीजवळ आले आहेत. त्यांच्या जोडीने आज रोहन कंपनीतील महत्वाच्या जबाबदार्या नेटाने पार पाडतो आहे. रोहन सांगतो, ‘‘बाबांनी त्यांची मार्वेâट स्पेस तयार केली… महागडं लोणचं खाणारे ते सुटं लोणचं परवडणारे, यांच्या मधला ग्राहकवर्ग त्यांनी आपलासा केला. आता यापुढे जाऊन, आमचं लोणचं जगभरात जावं हा माझा प्रयत्न असेल. आजघडीला मुंबईतील ३७ ‘डी-मार्ट’मध्ये आमचा माल विकला जातो. मुंबईतील सर्व प्रमुख मॉलमध्ये व बिग बास्केट या ऑनलाइन शॉपिंग साइटवर देखील आमचा माल उपलब्ध आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही ‘श्री सिद्धिविनायक मसाले’ या नवीन व्यवसायात उतरलो आहोत. त्यांचीही विक्री चांगली सुरू आहे. व्यवसाय वाढत असताना मागील वर्षी कागल एमआयडीसीत आम्ही एक लाख स्क्वेअर फूट जागेवर नवीन फॅक्टरी उभारली आहे. कोणत्याही मालाची विक्री वाढवण्याकरिता व ब्रँडचे लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्याकरिता प्रभावी जाहिरात हा उत्तम मार्ग आहे. त्यासाठी मी टेलिव्हिजन व इतर खर्चिक माध्यमाकडे न जाता, ओला कॅबवर जाहिरात करण्यासाठी त्यांच्यासोबत करार केला. आज ओलाच्या शंभर कार मुंबईतील रस्त्यांवर आमची जाहिरात करत असतात. एकाच जागी उभ्या असणार्या कोणत्याही जाहिरात फलकापेक्षा मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये मंद गतीने धावणारी कार आमच्या मालाची जाहिरात फार वेगानं करते. लोणची बनविताना पर्यावरणाच्या दृष्टीने व उत्पादनखर्चात कपात करण्यासाठी आम्ही नवीन फॅक्टरी संपूर्णपणे सोलार एनर्जीवर चालविण्याचे ठरविले आहे.
भारतात पाचशे करोडपेक्षा जास्त रुपयांची आज होणारी उलाढाल पाहता, या क्षेत्रात अजूनही व्यवसायवाढीला खूप संधी आहे. कारण कोणत्याही ब्रँडेड कंपनीपेक्षा घरगुती स्वरूपात आजूबाजूला, ओळखीत बनवले जाणारे मसाल्यांचे पदार्थ आजही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. म्हणूनच व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या महिला उद्योजक जेव्हा कोणता व्यवसाय करावा हा विचार करतात, तेव्हा किचनशी संबंधित कमी भांडवलात सुरू होणारा, तुमच्या नातेवाईक, मित्रपरिवारात, विकला जाईल अशा मालाचा व्यवसाय सुरू करणे हा एक हुकुमी पर्याय आहे.
भारतातील कोणत्याही राज्यात जेवणाच्या पानात दोन गोष्टी अविभाज्य घटक आहेत, पाहिलं मीठ आणि दुसरं लोणचं. घरापासून अगदी पंचतारांकित हॉटेलपर्यंत लोणच्याशिवाय पान उठत नाही. भारतीय खाद्यसंस्कृतीत मीठ, साखर यांच्या वापराने पदार्थ दीर्घकाळ टिकवण्याची पद्धत फार प्राचीन आहे. पाहिलं लोणचं बनलं ते काकडीचं. ख्रिस्तपूर्व २०३० सालामध्ये मेसोपोटेमियामधील रहिवासी काकडीचं लोणचं वापरत असल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ऐतिहासिक लेखांमध्ये सापडतो. हिमालयाच्या पायथ्याशी पिकणार्या काकड्याचे बियाणे घेऊन टिगरिस व्हॅलीमध्ये नेऊन तिथे काकडीची लागवड सुरू झाली. तिथे काकडी हा दुर्मीळ प्रकार असल्याने त्या जास्त दिवस टिकण्यासाठी खारवल्या जात असत. रोमन सम्राट टिबेरिअस हा तर या काकड्यांचा फार मोठा चाहता होता. त्यातून ही खारवण्याची कला वाढत गेली आणि लोणच्याचा जन्म झाला. लोणचे बनवताना मिठाचा केलेला जास्त वापर आणि मिठाचे ‘लवण’ हे संस्कृत नाव यातूनच लवणयुक्त अन्न म्हणजे लोणचं हा शब्दप्रयोग रूढ झाला! ‘पिकल’ हा शब्द डच भाषेतील ‘पेकेल’ या शब्दापासून आला तर ‘अचार’ हा शब्द पर्शियन आहे. भारतात चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रातही लोणच्याचा उल्लेख सापडतो. महाराष्ट्रीयन कैरीचं लोणचं, गुजराथी छुंदा, गोव्याचं कोळंबी लोणचं, दाक्षिणात्य उरूगाई, हिमाचलमधील लिंगरी का अचार, राजस्थानमधील कैर का अचार, आसाममधील भूत जोलोकिया अचार… भारताच्या प्रत्येक प्रांतात आढळणारं लोणच्याचं वैविध्य थक्क करणारं आहे. भारतात लोणचं घालणं ही फक्त पाककृती नाही तर तो सोहळा आहे. लग्नकार्याच्या आधी हमखास लोणचं घातलं जातं. पूर्वीच्या काळी तर पंचांग पाहून लोणचं घातलं जाई. अगदी आपल्या मागच्या पिढीपर्यंत उन्हाळा सुरू झाला की वाळवणाची लगबग सुरु होई. परंतु, जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीय पाकिटात पैसा खुळखुळला आणि हे खटपटीचे पदार्थ घरी बनवणं कमी झालं. मात्र यातून अनेक महिलांना उद्योग मिळाला. चार महिलांनी सुरू केलेला ‘लिज्जत पापड‘ आज जगभरात विकला जातोय आणि मर्ये आजींनी घरी सुरू केलेलं ‘श्री सिद्धिविनायक लोणचं’ पिढी दर पिढी मुरतंच चाललंय.