नाटकाच्या आवडीने मुळ्येंचा एक पाय नाट्यक्षेत्रात सतत अडकलेला असतो. ऐंशीच्या दशकात, मोहन वाघांनी मुळ्येंना पहिली नाट्यव्यवस्थापनाची जबाबदारी दिली… ती टापटीप आणि शिस्तप्रिय व अत्यंत हिशेबी अशा मुळ्येंनी व्यवस्थित पार पाडली. पुढे ते ज्येष्ठ अभिनेत्री भावनाबाईंच्या नाट्यसुमन या संस्थेत गेले. ‘माझं काय चुकलं?’ या नाटकाची व्यवस्था ते पाहात. तिथून मग सुधीर भट पर्व सुरू झालं, त्यावेळी गिरगावातला म्हणून सुधीर भटनी मुळ्येंना ‘सुयोग’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. मुळ्येंची यात अट एकच, पैसे कमी चालतील, पण सन्मानात खोट नको.
– – –
‘छे छे… अरे मी त्याला स्पष्ट सांगितलं… जमणार नाही… तुला यावंच लागेल… कसा येत नाहीस तेच मी बघतो…’
…‘मग?’
‘मग काय?.. आला!… न येऊन काय करतो? अरे लोकांचं काही देणं लागता की नाही तुम्ही? असेच मोठे झालात काय? कोणाच्या जिवावर मोठे झालात?… खाड् खाड् चार प्रश्न विचारले, आणि निरुत्तर केलं त्याला…’
‘मग?’…
‘मग काय? अगदी वेळेत आला. समारंभ होईपर्यंत थांबला. अरे इतका खूष झाला, काही विचारू नकोस… मी सोडतो काय? अरे, मुलाखतीत मारे मिरवता ना- मी हे सामाजिक कार्य करतो, ते सामाजिक कार्य करतो, मग प्रत्यक्ष यायची वेळ झाली की शेपूट का घालता? मी असं काही निरुत्तर करतो की विचारून सोय नाही… (मग थोडे शांत होऊन) पण आल्यानंतर मात्र इतका भारावला, म्हणाला ‘मुळ्ये काका, तुम्ही म्हणालात ते खरं होतं… आज मी आलो नसतो, तर खरंच इतक्या चांगल्या सामाजिक कार्याला मुकलो असतो…’ आणि तुला सांगतो, झटकन एक लाखांचा चेक लिहून दिला. मी मागितला वगैरे नव्हता हां… स्वत:हून… अगदी न मागता… पैसा लागतोच ना रे सामाजिक कार्याला. तुला सांगतो, माझ्याकडे एक फुटकी कवडीसुद्धा नाही, माझ्या खिशात पैसा नाही, पण ज्यांच्याकडे पैसा आहे, आणि ज्यांची ऐपत आहे, असे लोक माझ्या खिशात आहेत…’
कुठेही क्षणाचीही उसंत न घेता मुळ्ये काका बोलत होते. फास्ट ट्रेन कुठेही न थांबता सगळी स्टेशनं सुसाट धावते, तसे मुळ्ये काका वेगाने बोलत होते. एका प्रश्नाची शंभर उत्तरे देण्याची क्षमता असलेले, मराठी रंगकर्मीना आपलेसे वाटणारे, सतत पांढरे स्वच्छ कपडे घालून अतिशय टवटवीत उत्साहात समोर येणारे अशोक मुळ्ये, अर्थात मुळ्ये काका अर्थात पांढरे मुळ्ये, हे मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत कर्तबगार, कर्तव्यदक्ष असे दहशतवादी समाजिक कार्य करणारे रंगकर्मी आहेत/नाहीत. (गिरगावातल्या कुठल्याही चाळींतल्या दरवाजावरच्या पाटीवरच्या बोर्डाप्रमाणे आहेत/नाहीत, कारण ते रंगकर्मी आहेतही आणि नाहीतही- ते अत्यंत तळमळीचे सामाजिक कार्यकर्तेही आहेत.)
‘पुरुषोत्तम, तुला सांगतो, मला नाटकं लहानपणापासूनच आवडायची आणि गिरगांवात लहानाचा मोठा झालो, जवळच साहित्य संघ, मग काय? ही नाटकं बघितली. नुसती बघितली नाहीत, त्यात कामही करायचो, म्हणजे वाडीतल्या नाटकांमध्ये. असाच एक हौशी ग्रूप जमवून पुढे बाबुराव गोखलेंचं ‘करायला गेलो एक’ हे विनोदी नाटक केलं. निर्माता मीच…’
‘काय सांगता?’
‘मग?… अरे काय कमी उद्योग केलेत?… जमवले इकडून तिकडून पैसे, चांगले काँट्रॅक्ट शो मिळायचे, ५०० रुपयात काँट्रॅक्ट शो द्यायचो. बाबुराव गोखले पुण्यात व्यावसायिकवर तेच नाटक करीत, त्यात राजा गोसावी होता. इकडे माझ्या नाटकातला पत्रकाराची भूमिका करणारा नट अमृते, अमिरिकेला गेला, मग काय? थेट बाबुरावांनाच बोलावलं काम करायला… आले… १६ प्रयोग केले. पुढे त्यांच्या नाटकात राजा गोसावींचा प्रॉब्लेम झाला. तर त्यांनी ते काम करायला मला बोलावलं, कारण इकडे ती मुख्य भूमिका मी करीत होतो ना?’
‘कोणती? राजा गोसावींची?’
‘मग? मुख्य भूमिका… आणि धमाल उडवून द्यायचो त्या भूमिकेत… बाबुरावांनी ती भूमिका पाहिली होती, राजाभाऊंचा
प्रॉब्लेम झाल्यावर बाबुरावांनी मला बोलावलं… गेलो… पुण्यामुंबईत २५ प्रयोग केले. आपल्या मागे कोणीतरी ती भूमिका करतोय आणि काही अडत नाही म्हटल्यावर राजाभाऊंना घाम फुटला. आले धावत, मग काय? मी पण दिली सोडून ती भूमिका… त्यानंतर स्टेजवर उभा राहिलो ते अभिनय करायला नाही, भाषण करायला…’
‘काय सांगता? खरंच?’
‘मग काय खोटं बोलतो की काय?… अरे, एंट्रीला टाळ्या घेतल्यात मी. तुला सांगतो, ज्या बाबुरावांनी माझ्याकडे आधी नट म्हणून काम केलं, त्यांच्याकडे पुढे मी सुद्धा व्यावसायिक नट म्हणून काम केलं… आहे की नाही गंमत? पण नंतर मात्र मी खरंच कधी अभिनयाच्या भानगडीत पडलो नाही हां… का विचारू नकोस, भीती, हे एकच कारण… हौस म्हणून ठीक आहे रे, शिवाय ती भूमिका माझ्या पठडीतली होती, मला काही रंगभूमीवरील डॉक्टर लागू बनून झेंडे गाडायचे नव्हते… पुढे जेव्हा मी सुधीर भटकडे मॅनेजर म्हणून काम करीत होतो, तिथे गिरगावातला एक जण त्याला भेटायला आला. मला तिथे बघून त्याने भटाला विचारले, अरे? हा काय करतो इथे? भटाने कौतुकाने सांगितलं, हे आमचे मॅनेजर अशोक मुळ्ये. तर तो म्हणाला, अरे मॅनेजर काय? याला नाटकात काम दे, भल्याभल्यांना झोपवेल हा अभिनयात… भट फिट येऊन पडायचा बाकी होता… मी म्हटलं छे हो… हल्ली मी सोडून दिलं काम करायचं… भीती वाटते आता स्टेजवर उभं राहायची. पण ज्यांनी ज्यांनी माझी भूमिका बघितली, त्यांच्या ती आजही लक्षात आहे. माणसाने काम करावं ते असं… आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे.
पहिला ब्रेक
मी १९७८ सालीच ठरवलं असं काहीतरी सामाजिक कार्य करू या की त्यातून एक आत्मिक समाधान मिळेल. एसएससीला बोर्डातून पहिला आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करायचं ठरवलं. साहित्य संघामध्ये तो आयोजित केला. ज्यांच्या हस्ते सत्कार, ती व्यक्ती मोठी असावी, म्हणून मी थेट पुण्याहून ग. वा. बेहेरेना आमंत्रित केलं. ओळख ना पाळख, सरळ गेलो आणि कल्पना सांगितली. काय आश्चर्य! ग. वा. बेहेरे चक्क आले. ओळख एवढीच, मी अशोक मुळ्ये आणि मी ग. वा. बेहेरे बस्स. विद्याधर गोखले चकित झाले. म्हणाले, मुळ्ये हे कसं काय जमवलंत?.. म्हटलं, जरा वेगळं काहीतरी. तुम्ही, न्यायमूर्ती धर्माधिकारी ही सगळी घरचीच माणसं, नेहमीचीच, म्हटलं जरा वेगळं काहीतरी. दणक्यात केला सोहोळा. बापूसाहेब रेगे, गोडबोले गुरुजी, सगळे आले. साडेचार हजाराला खड्ड्यात गेलो, म्हटलं काहीही होऊ दे, पण या हुशार मुलांच्या परिश्रमांची दखल घेतली गेली पाहिजे. गोडबोले गुरूजींनी पाच हजार दिले. म्हणाले, परत दिले नाहीत तरी चालतील, पण घ्या. मी कसला? पुढे साहित्य संघात वेगळा कार्यक्रम करून त्यातून मिळालेले पाच हजार गुरुजींना परत केले आणि पुढे तो सोहोळा बंद केला. अरे ज्यांच्या हातून सत्कार करावा अशी माणसं आता शिल्लक कुठायत?’
खरं बघायला गेलं तर मुळ्येंना हे समाजसेवेचं बीज त्यांच्या वडिलांकडून मिळालं असावं. वडील चित्रकार होते. पण
ड्रॉइंग टीचर.
‘जेजेचे सगळे डीन माझ्या वडिलांचे विद्यार्थी. मुळ्येगुरुजी म्हणून फेमस होते. अरे एकदा दामू केंकरेनी मला विचारलं, अरे तू मुळ्ये म्हणजे नक्की कोण रे? कुठचा? म्हटलं मी अशोक यशवंत मुळ्ये, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, चित्रकार यशवंत मुळ्येंचा मी मुलगा. तेव्हा दामू केंकरे म्हणाले, मग बरोबर, मुळ्ये गुरुजी म्हणजे चित्रकलेचा मोठा चाहता. आम्हाला सुपारी वगैरे देणारा. तुला सांगतो, माझे वडील सामाजिक कार्यकर्तेच होते. आमचं खरं तर ठाकुरद्वारला एक दुकान होतं स्टेशनरीचं, एके दिवशी वडिलांनी त्यातली स्टेशनरी घरी आणली आणि दुकान कोणाला तरी असंच देऊन टाकलं. नोकरीतला प्रॉविडंट फंड मिळाला तो दोन गरजूंना धंदा करण्यासाठी देऊन टाकला. रत्नागिरीत मोठी इमारत उभी करून तिथे कोकणातल्या चित्रकारांची अमूल्य चित्रे जतन करून एक मोठं कलादालन उभं करायची तीव्र इच्छा होती त्यांची. खूप मोठमोठ्या लोकांशी दोस्ती, अरे, नाथ पै, मधू दंडवते, स. का. पाटील ही मंडळी सहज म्हणून घरी यायची, एवढी लोकप्रियता. पण स्वत:साठी काहीही घेतलं नाही हां. आमचं कुटुंब आपलं चाळीत वाढलं आणि अजूनही तिथंच आहे. वडील रत्नागिरीला का गेले? तर त्यांचं म्हणणं काय? माणसं कोकणांत फक्त आंबे फणस खायला जातात. अरे, कोकणांतली कला किती समृद्ध आहे, विशेषत: चित्रकला, तिचं मोठं संग्रहालय व्हायला पाहिजे आणि ती बघायला लोकांनी कोकणात यायला पाहिजे असं त्यांचं मत, पुढे नारायण आठवलेंनी राष्ट्रपतींना पत्रही लिहिलं, ‘मुळ्ये गुरुजींची इच्छा पूर्ण करा… पण ते वर्तमानपत्रातच राहिलं… मी ठरवलं, नुसती स्वप्नं नाही बघायची, छोटी छोटी स्वप्नं हळुहळू पुरी करीत मोठ्या स्वप्नांकडे जायचं.’
वडिलांचा सामाजिक वारसा मुळ्येंच्या अंगात पुरता भिनला. या धकाधकीत तारुण्याचा सूर्य डोक्यावरून जाऊन मावळतीला लागला. पण मुळ्येंची अथक धडपड संपली नाही. बर्याच भेटीत बरेच जण आडून आडून मुळ्येंच्या ब्रह्मचर्यावरची उत्सुकता उत्तरांत ताडून पाहायचा प्रयत्न करतात. त्यांच्या नजरेतला रोख ओळखून मुळ्येच मग उत्तर देतात. ‘तुला माझ्या लग्नाचा प्रश्न सतावतोय काय रे? ओळखलं मी, अरे काही व्रतं ही पालीसारखी अंगावर पडतात, मग धड अंघोळही करता येत नाही आणि शुचिर्भूतही होता येत नाही. अखेर मग ती घेऊन मिरवायची… मग काय?… दरिद्र्याशी दोन हात करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं… मग छोटीमोठी कामं करीत बसलो. तो काळ होता मुलींना चांगल्या घरात, भरगच्च पगार असलेल्या नोकरदार मुलाला मुलगी देण्याचा… आम्हाला कोण देणार मुलगी? मग काय? दिला नाद सोडून… आणि आता तर अजिबात वेळच मिळत नाही त्या गोष्टींचा विचार करायला… अरे चाळीतून बाहेर पडलो की माझा संसार आणि संचार दोन्ही एकदम सुरू होतात.. दहा बाय दहाच्या संसारात अडकण्यापेक्षा हा मुक्त संसार आता चांगलाच अंगवळणी पडलाय… सख्ख्या नसल्या तरी, मुलामुलींना तोटा नाही.. भावंड खंडीभर आहेत, त्यामुळे मी सगळ्यांचा काका.’
दुसरा ब्रेक
नाटकाच्या आवडीने मुळ्येंचा एक पाय नाट्यक्षेत्रात सतत अडकलेला असतो. ऐंशीच्या दशकात, मोहन वाघांनी मुळ्येंना पहिली नाट्यव्यवस्थापनाची जबाबदारी दिली… ती टापटीप आणि शिस्तप्रिय व अत्यंत हिशेबी अशा मुळ्येंनी व्यवस्थित पार पाडली. पुढे ते ज्येष्ठ अभिनेत्री भावनाबाईंच्या नाट्यसुमन या संस्थेत गेले. ‘माझं काय चुकलं?’ या नाटकाची व्यवस्था ते पाहात. तिथून मग सुधीर भट पर्व सुरू झालं, त्यावेळी गिरगावातला म्हणून सुधीर भटनी मुळ्येंना ‘सुयोग’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. मुळ्येंची यात अट एकच, पैसे कमी चालतील, पण सन्मानात खोट नको. तो व्यवस्थित मिळाला पाहिजे. घरी मी चाळीतल्या व्हरांड्यातल्या पेटीवर झोपतो, म्हणून दौर्यात कुठेतरी कोपर्यात टाकाल, तर ते चालायचे नाही. वेगळी स्वतंत्र खोली पाहिजे. सुधीर भटांनी त्यांचं सगळं व्यवस्थित केलं. बारा वर्षे मॅनेजर म्हणून त्यांनी ‘सुयोग’ सांभाळले.
‘मग तुम्ही सुयोग का सोडली?’ बर्याच वेळाने मला प्रश्न विचारायची संधी मिळाली. तोपर्यंत मी ‘असं?’ ‘काय म्हणता?’ अरेच्च्या’, ‘वा छान’, एवढंच म्हणत होतो… मध्ये बोलायला चान्सच नव्हता.
‘अरे मतभेद कोणाच्यात होत नाहीत? आमच्यात पण झाले. पण विश्वासाला तडा नाही जाऊ दिला. सुधीरचा माझ्यावर प्रचंड विश्वास, पण त्याचा हात ढिला होता, खर्च अफाट करायचा, लोक त्याचा गैरफायदा घेताना दिसत होते. पण तो सांगून ऐकत नव्हता. नंतर नंतर तो माझ्याकडे व्यवस्थापनासाठी टुकार नाटकं देऊ लागला आणि चालणारी नाटकं दुसर्याकडे, मग मी कंटाळलो. तरी मी दर प्रयोगागणिक अगोदरच एक रक्कम निधी म्हणून बाजूला काढून ठेवत असे… त्यात रंगमंच कलाकार निधी, बस मेंटेनन्स, कंपनी सेविंग… त्याची रक्कम जवळ जवळ दीड लाख झाली.. सुयोग सोडल्यानंतर ती जशीच्या तशी सुधीरला सांगून पोस्टात बचत खात्यात ठेवली. त्याचे पुढे तीन लाख झाले. ते पुढे संकटकाळी उपयोगी पडले. त्यानंतर लताबाई नार्वेकरांकडे. ‘सही रे सही’ नाटकाची प्रसिद्धी आणि व्यवस्थापन.. ‘सही रे सही’च्या जाहिराती करायचो.. ‘परत परत भरत’ ही स्लोगन खूप गाजली… अरे काय काय क्लृप्त्या लढवल्यात… पण त्यात सुद्धा कुठे तरी समाजकार्य डोकावत असायचंच… ‘सही रे सही’ जोरात होतं. हाऊसफुल्ल प्रयोग होत होते. भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचमुळे थिएटरं रिकामी असायची. म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. मला आयडिया सुचली, दुपारच्या वेळात नाटकाचा प्रयोग लावू या, मी लताबाईंना कल्पना सांगितली, ‘स्पेशल महिला शो’ लावू या, दुपारच्या वेळात बायकांना १० बाय १० च्या खोलीत टीव्हीसमोर कोंडल्यासारखं व्हायचं, त्यांना क्रिकेट नको असायचं. मला पण नको होतं. भरत तयार नव्हता. म्हणाला, काका गालबोट लागेल हो! जोरात चाललंय नाटक, अशी रिस्क नको. पण बाई तयार झाल्या. आणि काय सांगू? तीन प्रयोग लावले, जाहिरात केली, भारत की भरत? स्पेशल महिला शो. तीनही प्रयोग हाऊसफुल. सगळे चाट पडले. नंतर मला त्याचं कोणी श्रेय दिलं नाही ते सोड, पण अशा सगळ्या गमती.’
हे सगळं करीत असताना सुरुवातीच्या काळात परिसंवाद घ्यायला सुरुवात केली. तेव्हा दूरदर्शनमुळे लोक वेडे झाले होते. ‘महाभारत’, ‘रामायण’ यांनी रसिकांची मनं काबीज केली होती. मी सरळ एक परिसंवाद लावला. ‘दूरचित्रवाणी की शापवाणी?’ त्यानंतर आणखी एक परिसंवाद घेतला, ‘साहित्यिकांनी सरकारचे दातृत्व स्वीकारावे का?’ वक्ते होते, माधव गडकरी, कुमार केतकर, निखिल वागळे, य. दि. फडके, पुण्याहून मंगला आठल्येकर… आणि साहित्य संघातही गर्दी जमवली. माधव गडकरी गंमतीत मला म्हणाले, मुळ्ये, अहो एवढी गर्दी जमवलीत? मी म्हटले, गर्दी जमवणे माझं काम, आता ती टिकवणे तुमचं काम.. मी त्यावेळी ‘सुयोग’च्या नाटकाचा पहिला प्रयोग, म्हणजे ‘झीरो’ नंबरचा शो साहित्य संघात लोकांना फुकट दाखवायचो. ठरलेले लोक होते, तुफान गर्दी व्हायची, एकेकाला धमकी देऊनच आणलेलं असायचं. आवडलं नाही तर उठून जा, पण आला नाहीत तर परत बोलवणार नाही. त्यामुळे सगळे यायचे. तीच गर्दी परिसंवादाला आणायचो. धमकीही तीच. इथे साहित्यिकांबरोबर हा परिसंवाद, पुढे कलाकारांसाठी वेगळा परिसंवाद. ‘राजकारण्यांनो, आता तरी नीट जगू द्या’… मोठमोठे कलावंत बोलावले, शन्ना नवरे, मधुकर तोरडमल वगैरे. मी अगदी बेधडक कोणाकडेही जाऊन त्यांना आमंत्रित करायचो. शिरीष कणेकरांच ‘गोतावळा’ पुस्तक, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन. पहिल्या रांगेत उद्धवजी आणि रश्मीवहिनी बसलेल्या. प्रत्यक्ष बाळसाहेबांसमोर मी जे भाषण ठोकले, त्यांच्यासकट हसून हसून सर्वांची पुरेवाट. अलीकडे मी ‘माझा पुरस्कार’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर आयोजित केला. त्यावेळी मी भाषणात प्रामाणिकपणे सर्वांचा गौरव केला. रात्री मला फोन.. मी उद्धव ठाकरे बोलतोय… म्हटलं, हो का? बोला बोला… उद्धव ठाकरे, रात्री साडे अकरा वाजता मीच भेटलो काय गंडवायला? .. मला वाटलं कोणीतरी त्यांचा आवाज काढून फसवतोय, पण अरे? खरंच उद्धव साहेब! म्हणाले, मुळ्येकाका मी खरंच उद्धव ठाकरे, आज तुम्ही भाषणात विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांची खिल्ली उडवलीत तशी माझी उडवली नाहीत म्हणून फोन केला… थांबा रश्मीला तुमच्याशी बोलायचंय… अरे, काय सांगू? स्वत: मुख्यमंत्री बोलले, सन्मान सोहळा आवडला, रश्मीवहिनींना पण ते विलासरावांच्या वेळचं भाषण आठवलं… अरे, त्याचं असं झालं… एका नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाला विलासरावांना बोलावलं… त्यांचा पीए तारीखच देईना… शेवटी डायरेक्ट त्यांनाच फोन केला, ते माझे फॅन होते बरं का… त्यांचा एक खास नंबर मला त्यांनी देऊन ठेवला होता… मी त्यावर फोन करून अडचण सांगितली. अरे तिथल्या तिथे तारीख दिली आणि प्रयोगाला आले सुद्धा. मी भाषणात सरळ घडलेला किस्सा सांगितला, त्यांचे आभार मानले, कारण ते नांदेडहून तडक आले होते. तरीही मी म्हटले, एकसारखं मी माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री असं निवेदक म्हणतात तसं म्हणणार नाही.. आपण मुख्यमंत्री आहात हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. सारखं सारखं काय ते माननीय मुख्यमंत्री? त्यापेक्षा विलासराव कसं आपुलकीचं वाटतं… अरे, काय सांगू?… टाळ्यांनी अख्खं थेटर डोक्यावर घेतलं. तेव्हापासून विलासराव मला कधी नाही म्हणाले नाहीत.. म्हणून मी कधीही अवास्तव काही मागितलं नाही बरं. तुला सांगतो, शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी जबरदस्तीने माझ्याकडून अर्ज लिहून घेतला आणि विलासरावांना दिला, १० पर्सेंटच्या घरासाठी… मी नको म्हणतच होतो… पण भारतकुमारनी त्यांना सांगितले की हे गिरगावात चाळीत रहातात, मोठं कुटुंब आहे, लाकडाच्या पेटीवर झोपतात, यांना घर द्या.. मी म्हटलं द्यायचं असेल तर द्या, फार धावपळ करणार नाही, सन्मानाने द्यायचं तर द्या, परत परत मागणार नाही. आणि दिलं त्यांनी घर… कांदिवलीला आहे… पण मी तिकडे फारसा जात नाही, भाड्यानेही दिलं नाही, स्वच्छ टापटीप ठेवलंय. काही समारंभ करतो तिथे मी पेईंग गेस्ट मुलांसाठी, जी मुलं गावातलं घरदार सोडून मुंबईत खानावळीत जेवतात. त्यांच्यासाठी गुढीपाडवा तिथे साजरा करतो, त्यांना गोडधोड खायला घालतो. असे अनेक सण काही निराधार लोकांसाठी त्या घरात साजरे करतो आणि निमूटपणे परत आपल्या गिरगावच्या चाळीत येऊन राहतो.’
ब्रेक के बाद
मुळ्येंनी असे मदतीचे अनेक उपक्रम केले. रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुलीसाठी त्यांनी उपचारांकरिता मदत मिळवून दिली. त्या मुलीचे शिक्षण पूर्ण करायला मदत केली. तिच्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. त्यासाठी भरत जाधवला तिच्याकडे घेऊन गेले, भरतबरोबर दोन तास गप्पा मारून तिला पुन्हा माणसांत आल्याचा आनंद दिला. एक शिवसेना शाखाप्रमुख त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट घेऊन आला. त्याला दम दिला, ‘तुझं गिफ्ट तुझ्याकडेच ठेव, त्यापेक्षा गुटखा खाणं सोड, तीच माझी भेट. अरे, तू गुटखा खातोस, त्यामुळे तुझी बायको तुझ्या तोंडी लागत नाही,’ असे त्याला बेधडक सांगून टाकले. त्याने खरंच गुटखा खाणं सोडलं… सहा महिन्यांनी त्याच्या बायकोने त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याच भाषेत त्यांना सांगितले, हल्ली मी त्यांच्या तोंडी लागते.’
मधल्या काळात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री भावनाबाई भेटल्या, त्या अगदी एकाकी होत्या, म्हणाल्या, एकेकाळी झाडून सगळी नाट्यसृष्टी घरी यायची, पार्ट्या व्हायच्या… आता कोणी फिरकतही नाही… मुळ्येंनी ताबडतोब ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यसंमेलन भरवले आणि झाडून सगळ्या ज्येष्ठांना सन्मानाने बोलवून त्यांचे आदरातिथ्य केले. तशाच पुढे एकदा काही वर्षांनी आशालता वाबगांवकर भेटल्या… त्याही असंच म्हणाल्या, अहो मुळ्ये, हल्ली कोण भेटत नाही… एकाकी वाटतं… पुन्हा त्यांनी दुसरे ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य संमेलन भरवले आणि तत्कालीन ज्येष्ठांचा सन्मान केला. मुळ्ये अशा अनेक योजना आखतात, लोक पुढे येतात. सोहोळे होतात. एका दुय्यम अभिनेत्रीला अतिशय सुंदर अभिनय करून सुद्धा कुठेच पुरस्कार मिळाला नाही… मुळ्येना ही गोष्ट खटकली. त्यांनी ताबडतोब ‘माझा पुरस्कार’ सुरू केले. त्याचे आयोजक तेच, परीक्षकही तेच आणि देणारेही तेच. त्यामुळे गेली सात वर्षे पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या कित्येकांना ‘माझा पुरस्कार’ मिळाला. आशा विजय सोनवणे यांनी त्याच्या ट्रॉफीजसुद्धा अतिशय सुंदर बनवून दिल्या आहेत. मुळ्येंच्या या सोहोळयात मुळ्ये दणकून भाषणं ठोकतात, मनांतल्या कित्येक गोष्टी बेधडक बोलून टाकतात. त्यामुळे कित्येकांचे अपमान होतात. त्यामुळे हा ‘सन्मान’ सोहोळा आहे की ‘अपमान’ सोहोळा आहे, असाही प्रश्न बरेच वेळा पडतो. पण सोहोळयाचे स्वरूप इतके अनौपचारिक आणि सामाजिक आशयाचे असते की सर्व जण त्यांचे सर्व अपमान सहन करून तृप्त मराठमोळं भोजन घेऊन घरी जातात.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकार्यांच्या कुटुंबाला त्यांनी सांस्कृतिक दत्तक म्हणून घेतलं. त्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी मुळ्येंनी घेतलीय. सन्मानाने त्यांना ते वेगवेगळ्या नाटकांना व सोहोळयाला बोलावतात. अलीकडे त्यांनी मराठी भाषा दिन ‘कॉन्वेंट’मधल्या मुलांना मराठी साहित्याची चुणूक दाखवून साजरा केला. शिवाजी मंदिरमध्ये मॅजेस्टिक बुक स्टॉलचे दालन सुरू करू देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णासाहेब सावंतांना त्यांनी म्हटले, अहो साहेब, तिकडे कपड्यांचे सेल लागतात, त्यातले हँगरला लावलेले परकर आणि सलवार जाणार्या येणार्यांच्या डोक्याला लागतात. त्यापेक्षा ग्रंथालय काढलंत तर या वास्तूला ते शोभेल तरी… शिवाजी मंदिर व्यवस्थापनाने लगेच ही कल्पना उचलून धरली, आणि मुळ्येंच्या मध्यस्थीने तिथे मॅजेस्टिक पुस्तकालय सुरू झाले. मोठमोठ्या नाट्य संमेलनात राजकीय मांदियाळी मोठ्या प्रमाणात असते म्हणून मुळ्यांनी छोटेखानी नाट्यसंमेलने भरवली. म्हातारपण येईपर्यंत अध्यक्ष करायची वाट न बघता त्यांनी ऐन भरातल्या तरुणांना अध्यक्षपद देऊन ती साजरी केली. मुक्ता बर्वे, संतोष पवार, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारख्या तरुणांना अध्यक्षपद देऊन त्यांचा गौरव केला. या संमेलनाला कुणाला बोलवायचं याची यादी करीत न बसता, कुणाला बोलवायचं नाही याची यादी मुळ्ये आधी करतात. त्यात मध्यंतरी मतिमंद मुलांसाठी मेळावा सादर करून त्यांच्या आयांचा सत्कार केला. ‘माझ्या खिशात पैसा नाही, पण ज्यांची ऐपत आहे, ते माझ्या खिशात आहेत’, हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांचा कोणताच समारंभ अडू देत नाहीत. पूर्वी विलास जाधव, आता चंदू लोकरे, प्रशांत दामले, भारत जाधव, विजू केंकरे यांच्यासारखे रंगकर्मी त्यांच्यामागे आर्थिक मदत घेऊन उभे असतातच; पण कधी कधी ‘व्हॅल्युएबल ग्रुपच्या’ नरेंद्र हेटे यांच्यासारखे उद्योगपतीही त्यांना स्वत:हून अर्थसहाय्य करतात. त्यांच्या प्रत्येक समारंभाला सनई चौघडा आणि रांगोळ्यांसह मराठमोळं भोजन असतंच. शिवाय गाण्याचा कार्यक्रमही असतोच, ‘अरे, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ म्हटल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम गर्दी खेचत नाही. गर्दीचा विचार नको का करायला?’ असं त्यांचं मत असतं. ते स्वत: मात्र कोणताच पुरस्कार स्वीकारत नाहीत. मात्र ‘झी मराठी’ने खूपच आग्रह केला म्हणून त्यांचा स्वीकारला. इतकं करूनही त्यांच्या वाढदिवसाला मोजून चार फोन येतात, पण त्यांना त्याचे काही वाटत नाही.
मुळ्येंची सकाळ सकाळी सहा वाजता सुरू होते. चाळीतल्या व्हरांड्यात अजूनही लाकडी पेटीवर झोपतात. १९८६पासून भाऊ दिवंगत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला राहती खोली दिली, स्वत:ला जेवणाचा डबा लावला. आन्हिकं आटपून ११ वाजेपर्यंत वाचन असतं. वैचारिक वाचन, वर्तमानपत्र वगैरे. मग दुपारी गिरगावच्या मॅजेस्टिक बुकस्टॉलमध्ये संध्याकाळपर्यंत बसणे, तिथेच डबाही येतो. मग संध्याकाळी घरी येतात. थोडा वेळ टीव्ही बघून मग शिवसेना शाखेची मुलं त्यांना न्यायला येतात. तिथून ते शाखेत जाऊन बसतात. तिथे त्यांना अनेक सामाजिक कार्याच्या कल्पना स्पर्शून जातात. रात्री ती मुलं त्यांना घरी सोडतात. घरी येऊन पुनः लाकडी पेटीवर नवीन चमकदार कल्पनांच्या साम्राज्यात फेरफटका मारीत निद्रेच्या आधीन होतात.
आता ऐंशीच्या आसपास असलेल्या वयात मुळ्येंची गेली ६० वर्षे साथ न सोडणार्या पांढर्या कपड्यांमुळे ‘मुळ्ये’ स्वयंप्रकाशीत असलेल्या शुभ्र तार्यासारखे मराठी जनमानसाभोवती रुंजी घालत असतात… मात्र त्यांच्या या भ्रमणामुळे ‘मंद वारा’सुद्धा ‘भन्नाट’ होऊन जातो, त्यांच्या चमकदार भन्नाट कल्पनांसारखा. त्यांच्या शतकमहोत्सवी वर्षाचे संमेलन साजरे करण्याची उमेद मुळ्येकाकांचे चाहते नक्कीच बाळगून असतील. कारण पांढरा रंग हा कुठच्याही आक्रमक रंगात मिसळला तरी त्याचं अस्तित्व ‘काव्यमय’ होऊन जातं, जसं मुळ्येंच्या संपर्कात येणार्या कोणत्याही व्यक्तीचं होतं तसं.