• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बेपत्ता मुलाचं गूढ…

- अभिजित पेंढारकर (पंचनामा)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 24, 2022
in पंचनामा
0

अखेर रात्री घरच्या लँडलाइनवर फोन आला. फोन करणार्‍या माणसानं अगदी नेमका निरोप दिला. मुलगा आमच्या ताब्यात आहे, पोलिसांची मदत घेऊ नका. सुखरूप हवा असेल, तर उद्या रक्कम कळवतो. ती द्या, मग मुलगा तुम्हाला परत मिळेल. विश्वनाथ सातवांनीच फोन घेतला होता. त्यांनी लगेच बिराजदारांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी या फोनचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. सातवांच्या जवळच्या माणसांकडे एका बाजूला चौकशीची मोहीम सुरू होती. त्याच दिवशी संध्याकाळी खबर्‍याने एक महत्त्वाची टिप दिली.
– – –

`एवढा वेळ मोबाईलवर काय करताय, लांजेकर?` इन्स्पेक्टर बिराजदारांनी विचारलं आणि पीएसआय लांजेकर एकदम अलर्ट झाले.
`साहेब, ही पोस्ट वाचलीत का तुम्ही?` त्यांनी लगेच बिराजदारांसमोर मोबाईल धरला.
`विश्वनाथ सातव आणि मंजिरी सातव या दांपत्याने पोस्ट टाकलेय फेसबुकवर. त्यांचा मुलगा सापडत नाहीये. त्याचं अपहरण झालं असावं, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय आणि तो लवकर सापडावा, म्हणून शुभेच्छा द्यायचं आवाहन केलंय लोकांना.`
`अपहरण? कधी? कुठे?` बिराजदार एकदम ओरडले आणि त्यांनी फोन हातात घेऊन ती पोस्ट वाचून काढली.
सातव दांपत्यानं त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आदल्या दिवसापासून गायब असल्याचं लिहिलं होतं. ग्राउंडवर म्हणून गेला आणि तो आलाच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
`इथेच सातपाटी चौकाजवळच्या मंगलधाम सोसायटीत राहतात साहेब. मागे एकदा एका केसमध्ये त्यांच्याशी संबंध आला होता. दोघांचा बिझनेस आहे. बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत दोघं. चांगल्या आणि वाईट, दोन्ही कामांसाठी.`
`म्हणजे?`
`म्हणजे दुसर्‍या शहरातून इथे आले चारपाच वर्षांपूर्वी. इथे स्वतःचा बिझनेस सुरू केला. काही जणांना त्यांच्यामुळे काम मिळालं. बर्‍यापैकी नाव झालं. नंतर बिझनेसबरोबरच पैशांच्या देवघेवीचे व्यवहार पण सुरू केले त्यांनी. त्यात नुकसान झालं, अनेक लोकांनी पैसे बुडवल्याचे आरोप केले. नंतर अटक झाली, जामीन झाला आणि थोडे दिवस प्रकरण शांत झालं. आता परत हे काहीतरी नवीनच ऐकतोय त्यांच्याबद्दल.`
बिराजदार या पोलीस स्टेशनला नवीन असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सगळी माहिती नवीन होती. त्यांनी थेट सातवांचं घर गाठलं.
अचानक पोलीस दारात आलेले बघून सातवांना थोडं आश्चर्य वाटलं, पण त्यांना हे अपेक्षितही असावं.
`तुमच्या मुलाबद्दलची तुमची पोस्ट वाचली. तुम्ही सगळ्यात आधी पोलिसांकडे यायला हवं होतं, मिस्टर सातव.`
`होय साहेब, पोस्ट बायकोने लिहिली आहे. पोलिसांकडे जावं, हे आम्हालाही कळत होतं. पण आधीच फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये बदनाम झालो होतो. पोलिसांकडे तक्रारी होत्या, अटकही झाली होती. एका प्रकरणात मोठी चूक झाली आणि मग एकेक करून त्यात अडकतच गेलो. आता त्या सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित्त घ्यावं, असं वाटत होतं. आम्ही हळूहळू मार्गावर येत होतो, तेवढ्यात ही घटना घडली. आम्ही खचून गेलोय साहेब, आता तुमच्या मदतीची गरज आहे.` सातव एवढे गयावया करत होते, की बिराजदारांना पुढे काही बोलता आलं नाही. अर्थात, त्यांनी रीतसर तक्रार द्यावी, हा त्यांचा आग्रह कायम राहिला. त्यांनी एकीकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आणि सातवांचा मुलगा यश याला शोधण्यासाठी मोहीमही सुरू केली. सगळ्या पोलीस स्टेशन्सना वायरलेसवर मेसेज देण्यात आला. सगळी यंत्रणा कामाला लागली.
`नक्की कुठला बिझनेस करत होते हे सातव? आणि लोकांना फसवण्याचे उद्योग कधी सुरू केले?` बिराजदारांनी आता सहकार्‍यांकडे चौकशी केली.
`साहेब, प्लॅस्टिकच्या प्रॉडक्ट्सचा बिझनेस सुरू केला होता, पण तो काही फार चालत नव्हता. म्हणून मग बिनभांडवली धंदा सुरू केला त्यांनी. लोकांकडून पैसे घ्यायचे आणि ते कुठे कुठे गुंतवायचे. त्याचे डबल पैसे द्यायचं आमिष दाखवायचं. सुरुवातीला हा धंदा जोरात चालला. बर्‍याच लोकांना पैसेही दिले त्यांनी. पण नंतर सरकारनं मुसक्या आवळल्यावर त्यांना पुढे व्यवहार करणं अवघड गेलं. मग लोकांकडून घेतलेले पैसे अडकले. धंद्यात बरंच नुकसानही झालं आणि लोकांना पैसे परत देण्याचं प्रमाण कमी होत गेलं. मग काही दिवस दोघं गायब झाले होते. लोकांनी तक्रारी केल्या, पकडण्यासाठी प्रेशर आलं, मोठी चर्चा झाली आणि शेवटी दोघांच्या मुसक्या आवळल्या गेल्या.` बिराजदारांच्या सहकार्‍यांनी त्यांना माहिती दिली.
एकूणच हे सातव दांपत्य बर्‍याच गावचं पाणी प्यायलेलं आहे, बर्‍याच भानगडीही पचवून आलेलं आहे, हे बिराजदारांच्या लक्षात आलं. या वेळची परिस्थिती मात्र वेगळी होती. छोट्या मुलाचं बेपत्ता होणं त्यांच्या जिव्हारी लागल्याचं जाणवत होतं. कोठडीची हवा खाऊन आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या वागण्याबोलण्यात खूप फरक पडला होता. आधीचा आक्रमकपणा, बेफिकीर वृत्ती जाऊन दोघं बरेच नरम झाले होते.
यश ज्या ग्राउंडवर खेळायला जायचा, तिथे जाऊन माहिती घेणं गरजेचं होतं. बिराजदारांनी पथकासह आधी तिकडे भेट दिली.
`काल जरा आमचे संस्थेच्या चालकांबरोबर वाद झाले होते. त्यांनी इथे येऊन ग्राउंड चालवण्यावरून गोंधळ घातला. तेव्हा जरा भांडणं झाली आणि मुलं इकडेतिकडे विखुरली गेली. बहुधा त्या गोंधळातच यश कुठेतरी गायब झाला. आम्हाला वाटलं, तो आई किंवा कुणा ओळखीच्या माणसाबरोबर घरी गेला असेल. पण तो घरी गेलेला नाही, हे रात्री उशिरा कळलं आणि आम्ही सगळे काळजीत पडलो. साहेब, काहीही करून त्याला शोधा. तो सापडेपर्यंत आम्हाला कुणालाच चैन पडणार नाही.` व्यवस्थापक अगदी काकुळतीला येऊन सांगत होते.
बिराजदारांच्या मनातला गोंधळ वाढत चालला होता. एकतर २४ तास उलटून गेल्यानंतरही सातव दांपत्यानं मुलाच्या बेपत्ता होण्याची माहिती पोलिसांना न देता परस्पर सोशल मीडियावर टाकली होती. संध्याकाळी त्याला ग्राउंडवर न्यायला कोण आलं, हे तिथल्या व्यवस्थापकांना माहीत नव्हतं. तो लगेच घरी आला नाही, तरी उशिरापर्यंत आईवडिलांनी व्यवस्थापकांकडे चौकशी कशी केली नाही, असाही प्रश्न बिराजदारांना पडला.
`या केसमध्ये बरेच घोळ आहेत, लांजेकर!` बिराजदार थोडेसे वैतागलेच. एकतर सातव दांपत्य काही माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होतं किंवा सगळं नीट समजण्यात काहीतरी गोंधळ होत होता. कच्चे दुवे राहत होते.
ग्राउंडवरून यश लवकर घरी न आल्याबद्दल तेव्हाच चौकशी का केली नाही, असा प्रश्न विचारल्यावर मंजिरी सातव म्हणाल्या, “तो कधीकधी मित्राबरोबर त्याच्या घरी खेळायला जायचा. कालही तो तिकडेच गेला असेल, असं वाटलं. मीसुद्धा एका कामात अडकले होते. आता वाटतंय, तेव्हाच विचारलं असतं, तर माझा मुलगा आज माझ्याबरोबर असता!`
रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले होते. त्यांची अवस्था बघवत नव्हती. मुलगा लांब गेल्याचा धक्का त्यांना सहनच होत नव्हता. आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करू, लवकरच तुमचा मुलगा सापडेल, असं आश्वासन देऊन पोलिसांनी त्यांची कशीबशी समजूत काढली.
ग्राउंडजवळच्या सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली असता यश गेटमधून बाहेर पडल्याचं दिसत होतं. तिथे त्याला कुणीतरी ओळखीचं भेटलं होतं. सीसीटीव्हीत या माणसाचा चेहरा दिसत नव्हता, पण यश त्याच्याबरोबर आनंदानं गेला आणि गाडीत बसला, हेही लक्षात येत होतं. याच माणसानं ओळखीचा फायदा घेऊन यशला कुठेतरी नेलं, हे उघड होतं. हा माणूस कोण, हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर होतं.
यश आत्तापर्यंत असा कधी कुणा दुसर्‍याच माणसाबरोबर घरी गेलाय का, याची चौकशी केली असता, तसं कधी झालं नसल्याचं समजलं. नेमका त्याच दिवशी तो कसा गेला आणि आईवडिलांना न सांगता त्याला ग्राउंडवर कुणी आणायला कसं गेलं, हाही प्रश्न समोर होताच.
सातवांनी ज्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली, अशात त्यांचा एक जवळचा मित्र प्रभाकर खाडे हाही होता. पैसे गेल्यामुळे खाडे पिसाळला होता. त्यानं विश्वनाथ सातवांना मारहाणही केली होती. त्याचे पैसे परत मिळाले नव्हतेच. दोघांची मैत्री मात्र कायमची तुटली होती. पोलिसांना शेजारीपाजारी, इतर नातेवाईक, ओळखीच्या माणसांकडून ही सगळी माहिती मिळत गेली. सध्या यशचा शोध लागणं पोलिसांसाठी महत्त्वाचं होतं आणि त्यात काहीच प्रगती होत नव्हती. अपहरण झालं असेल, तर खंडणीसाठी फोन किंवा निरोप तरी यायला हवा होता, पण तसंही काही न घडल्यामुळे गूढ वाढत होतं.
अखेर रात्री घरच्या लँडलाइनवर फोन आला. फोन करणार्‍या माणसानं अगदी नेमका निरोप दिला. मुलगा आमच्या ताब्यात आहे, पोलिसांची मदत घेऊ नका. सुखरूप हवा असेल, तर उद्या रक्कम कळवतो. ती द्या, मग मुलगा तुम्हाला परत मिळेल. विश्वनाथ सातवांनीच फोन घेतला होता. त्यांनी लगेच बिराजदारांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी या फोनचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावली.
सातवांच्या जवळच्या माणसांकडे एका बाजूला चौकशीची मोहीम सुरू होती. त्याच दिवशी संध्याकाळी खबर्‍याने एक महत्त्वाची टिप दिली.
गावाबाहेरच्या वस्तीच्याही पलीकडे एका पडीक असलेल्या घरात आदल्या दिवसापासून थोडी हालचाल जाणवायला लागली होती. एक दोन गाडयांची ये जा सुरू होती. आठ दिवसांपूर्वीही या ठिकाणी काही गाड्या आल्या होत्या, पण त्यावेळी स्थानिकांनी दुर्लक्ष केलं होतं. यावेळी मात्र त्यांची चर्चा सुरू झाली होती आणि पोलिसांपर्यंत ती पोहोचली होती.
बिराजदारांनी लगेच यंत्रणेला अलर्ट केलं. एक छोटी टीम घेऊन या ठिकाणी अंधार पडल्यावर छापा घालायचं ठरवलं. पोलिसांची टीम तिथे पोहोचली, तेव्हा ते पडीक घर सोडून तीनजण पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडलं, तेव्हा त्यांच्याबरोबर असलेला यशसुद्धा त्यांच्या ताब्यात आला. रडून रडून त्याचा चेहरा सुकला होता. दोन दिवस त्याला नीट खायलाही मिळालं नव्हतं. पोलिसांनी त्याला जवळ घेतलं, गोंजारलं, धीर दिला. आईवडिलांना लवकरच भेटू, असं सांगून त्याला समजावलं.
जे तिघं पोलिसांच्या तावडीत सापडले, त्यांना फक्त त्याला सांभाळण्याचं काम देण्यात आलं होतं. खरा सूत्रधार वेगळाच आहे, हे पोलिसांच्या लक्षात आलं. हा सूत्रधारच यशला ग्राउंडवरून घेऊन आला होता. त्याला शोधणं फारसं अवघड गेलं नाही. तिघांना कोठडीत पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी काही वेळातच त्याचा फोन नंबर दिला आणि पोलिसांनी त्यालाही जेरबंद केलं.
अटक केलेल्या तिघांकडून पोलिसांना आणखी एक धक्कादायक बातमी समजली होती, ती म्हणजे त्यांना यशला मारून टाकायची सूचना मिळाली होती. दोन दिवस त्याला डांबून ठेवल्यावर त्याला संपवायचं ठरलं होतं. या तिघांना नाचवणारा सूत्रधार होता, यशचाच लांबचा शेखरमामा. तो ताब्यात आल्यावर पोलिसांना सगळ्याच प्रकरणाचा उलगडा झाला.
यश आता थोडा सावरला होता. त्याला आईवडिलांना कधी एकदा भेटतो, असं झालं होतं. पोलिस त्याला घरी घेऊन गेले, तेव्हा त्यानं धावत जाऊन आईला मिठी मारली. आईच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. विश्वनाथ सातवांचेही डोळे पाणावले. त्यांनी प्रेमानं यशला घट्ट मिठी मारली.
`सातव साहेब, यशला पळवून नेण्याचा प्लॅन त्याच्या जवळच्याच कुणीतरी आखला असेल, असं वाटलं नव्हतं. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण त्याला मारून टाकायचीही तयारी चालली होती.` बिराजदारांनी धक्कादायक माहिती सांगितली आणि सातव दांपत्य हबकलं.
`जवळची माणसं असं करू शकतील, याच्यावर आमचा विश्वासच नव्हता.` सातव म्हणाले.
`हो. जवळच्या माणसांपासून तुम्ही आधीच सावध राहायला हवं होतं. काय मंजिरी मॅडम?` बिराजदारांनी सातवांच्या पत्नीकडे नजर वळवली.
`सातव साहेब, कटाचा प्लॅन शेखरमामाने नाही, तुमची बायको मंजिरी यांनी केला आहे!` बिराजदारांच्या या वाक्याने मात्र सातवांना खरंच धक्का बसला.
`मंजिरी? काय बोलताय तुम्ही? ती कशाला असं करेल?`
`पैसा आणि प्रतिष्ठेसाठी. आणि तसाही तो त्यांचा सावत्र मुलगा आहे. तुमच्या पहिल्या बायकोपासून झालेला.` बिराजदार म्हणाले. सातव वरमले.
`तुमच्याबरोबर पैशांच्या प्रकरणात अडकल्यानंतर तुमची बायको वैतागून गेली. तिनं ठरवलं, की यातून सुटलो, तर तुमच्याशी संबंध तोडायचे. नवीन आयुष्य सुरू करायचं. त्यासाठी तिनं एक पार्टनरही शोधला होता. तुमचाच मित्र आणि आता शत्रू असलेला प्रभाकर खाडे. फक्त तिला आधी बदनाम झालेलं नाव सुधारायचं होतं. खाडेंचं नुकसान झाल्यामुळे त्यांनाही तुमच्यावर सूड घ्यायचा होता. लोकांमध्ये आपली इमेज सुधारण्यासाठी तुमच्या बायकोने सावत्र मुलाच्या अपहरणाचा डाव रचला. त्यातून लोकांची सहानुभूती मिळेल, आपल्या मागची कटकट जाईल आणि मग सहज सातवांपासून वेगळं होऊन खाडेंबरोबर नवीन आयुष्य सुरू करता येईल, असा त्यांचा विचार होता. पण शेखरने त्याला आणायला आपल्या माणसाला न पाठवता तो स्वतः गेला आणि यशने त्याला ओळखलं. मामाचं नाव घेतलं तर सगळंच बिंब फुटेल, अशी भीती सातव बाईंना वाटली आणि त्यांनी त्याला मारून टाकायचा आदेश दिला. तसाही यश त्यांच्या रक्ताचा नव्हताच. सातव मॅडम त्याच्याबद्दल दाखवत असलेली काळजी, माया सगळं खोटं होतं.` बिराजदारांनी पुराव्यानिशी सगळं ऐकवल्यावर मंजिरीपुढे बोलण्यासारखं काही राहिलं नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एका निष्पाप मुलाचा जीव वाचला. सातवांची उरलीसुरली प्रतिष्ठा मात्र धुळीला मिळाली.

Previous Post

चलो पकाते हैं खिचडी

Next Post

इतना आसां नहीं कमाल खान होना

Next Post

इतना आसां नहीं कमाल खान होना

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.