बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्यांच्याबद्दल काहीही ऐकायला, पाहायला मिळालं तरी ते वेगळंच असतं. त्यामुळे त्यांच्यावरील सिनेमा करायला मिळाला तेव्हा त्यांचे आणखी काही विशेष पैलू कळतील असे वाटले होते, पण वेगळे पैलू समजण्याची अशी वेळ आली नाही… कारण बाळासाहेबांविषयी सर्वच गोष्टी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. त्यांची भाषणे, त्यांचा स्वभाव, प्रत्येक बाब लोकांसमोर होती. पण बाळासाहेबांबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या प्रेमाची तीव्रता हा सिनेमा केल्यावर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आली.
– – –
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आदर असलेल्या नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश होतो, हे मी सांगायची गरज नाही. मराठी माणसाच्या मनात त्यांनी जो अभिमान जागवला आहे, ते पाहता त्यांच्याविषयीच्या आदराची बरोबरी या शतकात तरी आणखी कुणी करू शकेल, असं वाटत नाही. हा आदर बाळासाहेबांनी कमावलेला आहे. बाळासाहेब ठाकरे हे नुसतं नाव जरी आठवलं तरी मराठी माणसाची छाती फुलून येते. त्यांच्यावर, त्यांच्या विचारांवर ‘बाळकडू’सारखा सिनेमा मला करता आला त्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो…
आत्तापर्यंत आपण बातम्यांमधून किंवा साहेबांच्या भाषणांमधून त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या, पाहिल्या; पण त्यांच्याविषयीचा सिनेमा करताना तळागाळातील कितीतरी लोक त्यांच्यासाठी भरभरून पुढे येतात, त्या सिनेमासाठी काम करायला उत्सुक असतात, त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असतात, हे मी प्रत्यक्ष जवळून पाहिलंय. तो अनुभव मी घेतलाय. बाळासाहेबांबद्दल प्रेम असणार्या शिवसैनिकांजवळ गेल्यावर मला त्याची तीव्रता जाणवली. हा सिनेमा करताना स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन प्रत्यक्षात तळागाळात त्यांचं महत्त्व किती मोठे आहे ते मला अजून जास्त कळले.
‘बाळकडू’ सिनेमा करण्याआधी दडपण फारसं वाटलं नाही. खरं तर मला अभिमान वाटला आणि खूप आनंद झाला. बाळासाहेबांचे विचार असलेल्या सिनेमात भूमिका करायची संधी मिळाली, एका शिवसैनिकाची भूमिका करायला मिळाली, याचा आनंद वाटला. म्हणून दडपणापेक्षा मला प्रेम जास्त वाटलं. आजूबाजूची टीमही खूप चांगली होती. प्रत्येकालाच बाळासाहेबांबद्दल प्रेम होतं. प्रत्येकजण हा सिनेमा चांगलाच करायचा या ध्येयाने झपाटलेला होता. चांगला चित्रपट करून चांगल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या ही एकमेव गोष्ट प्रत्येकाच्या मनात होती. त्याच दृष्टीने सगळे मन ओतून काम करत होते. त्याचा रिझल्ट अर्थातच चांगलाच झाला. हा सिनेमा खूपच चांगला झाला. लोकांनीही तो डोक्यावर घेतला होता. त्यामुळेही बरं वाटलं.
बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्यांच्याबद्दल काहीही ऐकायला, पाहायला मिळालं तरी ते वेगळंच असतं. त्यामुळे त्यांच्यावरील सिनेमा करायला मिळाला तेव्हा त्यांचे आणखी काही विशेष पैलू कळतील असे वाटले होते, पण वेगळे पैलू समजण्याची अशी वेळ आली नाही… कारण बाळासाहेबांविषयी सर्वच गोष्टी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. त्यांची भाषणे, त्यांचा स्वभाव, प्रत्येक बाब लोकांसमोर होती. पण बाळासाहेबांबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या प्रेमाची तीव्रता हा सिनेमा केल्यावर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आली. बाळासाहेबांबद्दल सगळ्यांनाच माहिती होतं. त्यांच्या आयुष्याबद्दल म्हणा, एक व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब काय आहेत हे प्रत्येक शिवसैनिकाला माहीत आहे. प्रत्येक माणसाला माहिती आहे. मी तर म्हणेन कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला त्यांच्याबद्दल आदर आहे. हा बाळासाहेबांचा मोठेपणा आहे.
‘बाळकडू’ सिनेमामुळे त्याच बाळासाहेबांच्या अजून जास्त जवळ जाऊ शकलो ते त्यांच्याभोवती असलेल्या शिवसैनिकांमुळेच. ‘बाळकडू’मधली माझी भूमिका आवडली असं सांगणारे भरपूर शिवसैनिक मला भेटले. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सगळीकडे, गावागावात, कुठेही गेलो तरी ‘बाळकडू’ सिनेमाचा, त्यातल्या पोवाड्याचा लोक आवर्जून उल्लेख करत होते. फक्त हा सिनेमा बघणारा ऑडियन्सच नाही, तर सगळ्या प्रकारच्या ऑडियन्सपर्यंत हा सिनेमा पोहोचला होता. प्रत्येकाला त्या सिनेमाबद्दल अभिमान वाटला होता हे मी जेथे जेथे जात होतो तेथे तेथे मला अनुभवायला मिळाले.
कोणत्याही भूमिकेसाठी आधी अभ्यास करावा लागतो. पण ‘बाळकडू’मधील भूमिकेचा अभ्यास असा फारसा करावा लागला नाही. कारण या सिनेमात माझी भूमिका ही फक्त एका सर्वसामान्य माणसाची होती. ती कुठली एखादी खास व्यक्तिरेखा साकारायची नव्हती. कॉमन मॅनचंच कॅरेक्टर होतं. दिग्दर्शक अतुल काळे, निर्माते संजय राऊत आणि आमची संपूर्ण टीमच या सगळ्यांची मदत मला ही भूमिका करताना झाली. त्यामुळेच मी ती खूप चांगल्या पद्धतीने करू शकलो.
माझी पत्नी प्रिया हिलाही मी ‘बाळकडू’ सिनेमा केल्याचा खूपच अभिमान वाटला. या सिनेमाचा प्रिमियर होता तेव्हा माझ्यासोबत तीदेखील होती. तिलाही खूप आवडला. मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला हा सिनेमा आवडला होता. मराठीच काय, अमराठी लोकांनीही हा सिनेमा पाहिला आहे. मला आठवतंय, माझ्या भावाच्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी हा सिनेमा एकत्र तिकीट काढून पाहिला होता. त्याच्या ऑफिसच्या त्या गँगमध्ये मराठी माणसं होतीच, पण काही अमराठी माणसंही होती. सगळेचजण हा सिनेमा पाहून भारावून गेले होते, असं भाऊच बोलला होता. बाळासाहेबांचा पूर्वीचा लढा आजच्या काळातील ज्या लोकांनी पाहिलाच नाहीये त्यांच्यापर्यंत या सिनेमाच्या माध्यमातून तो पोहोचलाय, असं मला वाटतं.