मी कॅम्लिनच्या शाईतील उणीवेमुळे बारीक रेषा काढणे भाग कसे पडले, हे सांगताच त्यांनी भारतातल्या अग्रगण्य कंपनीच्या मालकाशी थेट फोनवरून भेट घालून दिली! केवढी ही पराकोटीची तत्परता. हा अनुभव तेव्हा येतो ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या कामात काळजाच्या बुडापासून बुडालेली असते त्याच वेळी. त्या-त्या क्षणी ते-ते काम झालेच पाहिजे यावर बाळासाहेबांचा कटाक्ष असायचा. या व्यंगचित्राच्या माध्यमातून हाच धडा आयुष्यभरापुरता मला बाळासाहेबांकडून शिकता आला आणि सहज त्या पाच पाकळ्यांच्या पटकळणीच्या फुलांची आठवण झाली.
– – –
गावात शाळकरी असताना एक मैलावर असलेल्या माळावर रोज जित्राबं चारायला घेऊन जावी लागत होती. थोरा-मोठ्यांनी कधीतरी सांगितल्याप्रमाणे पटकळणीचे पाच पाकळ्यांचे फूल मिळाले तर आपण भाग्यवान ठरतो किंवा अचानक दैवी लाभ होतो. जित्राबाबरोबर चालताना वाटेतील पटकळणीच्या झुडुपात पाच पाकळ्यांचे फूल शोधण्याचा आम्हा गुराख्यांना छंदच लागला. कधीतरी ते फूल हाताला लागले तर आश्चर्याने व आनंदाने आकाशाला हात लागायचे. थोरा-मोठ्यांचे ते शब्द आठवायचे, त्याच शब्दांच्या प्रभावाने काही दिवस मन तरल गिरक्या घ्यायचे, अविरत फुलपाखरासारखे. असाच अनुभव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीत आला…
‘’अरे, हल्लीच मी एक तुझे एक व्यंगचित्र पाहिले… कव्हरवर… हत्तीसारखे, पुष्कळ बारीक-बारीक रेषा वापरलेल्या…’ साहेबांनी भेटीत प्रश्न केला. मी कोड्यात पडलो… हत्तीसारखे?… साहेब, आठवत नाही…
बाळासाहेबांनी लगेच स्वीय सहायक रवी म्हात्रेला विचारलं, रवी, कोणते मॅगझीन?
रवीचे तात्काळ उत्तर, लोकप्रभा!
आता माझी ट्यूब पेटली… हा संवाद घडत होता ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे मुखपृष्ठ तयार करतानाच्या चर्चेवेळी. साहेबांना आठवलेल्या व्यंगचित्रात हत्ती नव्हता, तर अनेक लफडी, घोटाळे, भ्रष्टाचार रिचवून पोट फुटेपर्यंत गडगंज संपत्तीने मढलेला ढेरपोट्या राजकारणी-साखर कारखानदार होता… कपटाने मिळवलेला कारखाना गुपचूप दावणीला नेऊन बांधण्यासाठी धडपडणारा, त्यासाठी धोतर सुटून अब्रूचे धिंडवडे निघाले तरी बेहत्तर असा निडर, हातात दारूची बाटली, ते त्याच्या रंगेलपणाचे प्रतीक. पार्श्वभागी त्याच्याच विश्वासघाताने कोळलेले कष्टकरी शेतकरी.
मी बाळासाहेबांना सांगू लागलो,
‘वॉटरप्रूफ शाई असलेले पेन मी वापरतो. त्याने चित्राची आउटलाइन करतो. त्यानंतर चित्रात रंग भरतो. पूर्वी कॅम्लिनची
वॉटरप्रूफ काळी शाई वापरत होतो. ती १०० टक्के वॉटरप्रूफ होती. तिच्यावर द्रवरूपातले रंग वापरले तरीही काळ्या रेषा विरघळत नसल्याने आपल्याला पाहिजे तोच परिणाम साधता येत होता. परंतु आत्ता जी कॅम्लिनची काळी शाई बाजारात उपलब्ध आहे तिचा उपयोग ब्रश किंवा टाक वापरून आउटलाइन साकारण्यासाठी केला आणि त्यावर द्रवरूपात रंग लावले तर ती आउटलाइन पसरते. रेखीव राहत नाही. त्यामुळे आपल्याला पाहिजे तो परिणाम चित्रामध्ये साधता येत नाही. म्हणून १०० टक्के वॉटर प्रूफ इंक असलेल्या पेनचा वापर केला आहे’.
हे ऐकून बाळासाहेब स्तब्ध झाले. क्षणात कॅम्लिनचे संचालक सुभाष दांडेकर यांना त्यांनी फोन लावायला सांगितला. फोनवर इतर बोलणे झाल्यावर बाळासाहेब दांडेकरांना म्हणाले, माझा एक आर्टिस्ट आहे, त्याची तुम्ही निर्माण केलेल्या रंगांसंदर्भात तक्रार आहे, जरा त्याच्याशी बोलून घ्या.
मी त्या विशिष्ट काळ्या शाईसंदर्भातील समस्या सुभाष दांडेकर यांना सांगितली. ते म्हणाले, मी हैद्राबादला आहे, दोन दिवसांत माझी माणसे तुमच्या घरी येतील. तुमच्या ज्या समस्या असतील त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करा, ते सर्व शंकांचे निराकरण करतील.
काय आश्चर्य, दोन दिवसांनी माझ्या घरी कॅम्लिनचे तीन विभागांचे तीन उच्चाधिकारी रंगांची अनेक उत्पादने घेऊन आले. माझी समस्या विचारून त्यावर उपाय सुचवून काही रंगांची सॅम्पल्स देऊन, पुन्हा कधीही काहीही समस्या आली तर आमच्याशी थेट संपर्क साधा, अशी सूचना करून निरोप घेते झाले. याचे सर्व श्रेय दादांनी बाळासाहेबांना घालून दिलेल्या धड्याला जाते. ते म्हणाले होते, ‘लक्षात ठेव, आपल्या दरवाज्यात चपलांचा ढीग दिसला पाहिजे. तीच आपली संपत्ती.’ माणसं जोडण्यासाठी आणि जपण्यासाठी साहेब किती तत्परतेने निर्णय घेत याचं दर्शन मला झालं.
विचार करा, बाळासाहेब ठाकरेंसारखा जगप्रसिद्ध नेता, पट्टीचा व्यंगचित्रकार एक व्यंगचित्र पाहतो, त्याचे रेखांकन त्यांच्या नजरेस खटकते. ते व्यंगचित्र साकारणार्या व्यंगचित्रकारांची अनेक दिवसांनी भेट झाल्या-झाल्या ‘त्या‘ रेखांकनासंदर्भात विचारणा केली जाते. व्यंगचित्रकार आश्चर्याने अवाक्. साहेबांचे वय वर्षे ८४ आणि एवढी स्मरणशक्ती… चित्रकलेबद्दल इतकी तळमळ… ध्यास… मी कॅम्लिनच्या शाईतील उणीवेमुळे बारीक रेषा काढणे भाग कसे पडले, हे सांगताच त्यांनी भारतातल्या अग्रगण्य कंपनीच्या मालकाशी थेट फोनवरून भेट घालून दिली! केवढी ही पराकोटीची तत्परता. हा अनुभव तेव्हा येतो ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या कामात काळजाच्या बुडापासून बुडालेली असते त्याच वेळी. त्या-त्या क्षणी ते-ते काम झालेच पाहिजे यावर बाळासाहेबांचा कटाक्ष असायचा. या व्यंगचित्राच्या माध्यमातून हाच धडा आयुष्यभरापुरता मला बाळासाहेबांकडून शिकता आला आणि सहज त्या पाच पाकळ्यांच्या पटकळणीच्या फुलांची आठवण झाली.
——————–
हे व्यंगचित्र होते राजकारण्यांची दांभिक वृत्ती आणि हसर्या मुखवट्याखाली लपलेला बेरका आणि स्वार्थी नेता दाखवणारे. अनेक वर्षे यशाची शिखरे गाठणारे सहकारी साखर कारखाने राजकीय नेत्यांच्या ‘जाऊ तेथे खाऊ’ या वृत्तीमुळे डबघाईस येऊ लागले. २०१० साली लोकप्रभा साप्ताहिकाचे मुखपृष्ठ करण्यासाठी संपादकांनी मला हा विषय सुचविला. सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीसंदर्भात झोल कसा केला जात आहे आणि कारखाने गट्टम करायला पुढार्यांची टोळधाड कशी तुटून पडलीय, यासंबंधी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात ‘सहकार’ या कार्यप्रणालीचे जनक स्व. धनंजय गाडगीळ. असंघटित शेतकर्यांच्या विस्कटलेल्या व दयनीय अवस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी संघटित रूप देऊन सहकार या तत्वाने काम केले तर आणि तरच सर्वांचा उद्धार होईल, हा विचार शेतकर्यांच्या गळी अतिशय प्रतिकूल विचारसरणी असताना त्यांनी उतरवला आणि १९२९ साली त्यांनी सहकाराचे रोपटे पश्चिम महाराष्ट्राच्या काळ्या मातीत रोवले. कालपरत्वे रोपटे बाळसे धरू लागले. शेतकर्यांनी अंगिकारलेला सहकार पाहून प्रवरा नदी आनंदाने दुथडी भरून वाहू लागली. त्याच अवखळ पाण्याच्या सिंचनाने एका रोपट्याचे अनेक रोपटी होऊन प्रवरेच्या दोन्ही काठावर क्षितिजापर्यंत पसरलेल्या ऊसाच्या अलौकिक हिरव्या छटांनी प्रवरा नव्या नवरीसारखी हरखून गेली. हातात आलेले उसाचे पीक पाहून सर्व उसकर्यांनी त्या उसातून साखरेचे सोने निर्माण करण्यासाठी सोसायटी तयार केली. जो काही नफा-तोटा होईल तो फक्त शेतकर्यांच्याच या बोलीवर. हे नवखे आणि अशक्यप्राय शिवधनुष्य पेलण्यासाठी स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांच्या दूरदृष्टी आणि सामाजिक समर्पण भावनेतून १९४९ साली प्रवरेच्या काठावर प्रवरा नगर सहकारी साखर कारखान्याची पहिली गुढी उभारली गेली. शेतकर्यांमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले. साखर कारखाना दिमाखात साखर उत्पादनाचे उच्चांक मोडू लागला. प्रवरा नगरचे नाव दिल्लीपर्यंत दुमदुमू लागले. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी विखे पाटील यांची तोंडभर कौतुक करून लागेल ती मदत देऊ केली. विखे पाटील यांच्या भरारीची स्फूर्ती घेऊन उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनीही सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारण्याचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्रात सहकार साखर कारखान्यांची साखळी निर्माण झाली. साखरेची देशाची गरज भागवूनही साखर परदेशात निर्यात होऊ लागली. सहकाराच्या गालावर कोणीतरी तीट लावायचे विसरून गेले असावे. सहकाराचा हेतू व ध्येय फक्त शेतकर्यांचे हित, हा आदर्शवाद मागे पडू लागला. गुळाच्या ढेपीला मुंगळे चिकटतात त्याप्रमाणे सहकार कारखान्यात राजकारण्यांनी लांडग्याच्या पावलांनी प्रवेश केला. हळूहळू लांडग्यांनी सहकाराचा फड फस्त करायला सुरुवात केली. कारखान्यावर स्वतःची मालकी असलेला छाती पुढे करून चालणारा शेतकरी दंडुकेशाही, घराणेशाही आणि सत्तेचा माज असलेल्या राजकारण्यासमोर याचनेची झोळी पसरवू लागला. कष्टकरी शेतकरी गुलाम झाले बाहुबली राजकारण्यांचे. सहकारात राजकारणाचे फड रंगू लागले. घुंगराच्या चाळावर आणि ढोलकीच्या कडकटावर साखर कारखाना हादरू लागला. बाटलीतल्या उग्र-रंगीत पाण्याने साखर बाटगी झाली. शुगर लॉबीचा राक्षस शेतकर्यांच्या उरावर बसला. साम, दाम, दंड आणि भेद या सूत्रांचा वापर करून निवडणुका भिडल्या जाऊ लागल्या. त्यामधूनच स्थानिक, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर राजकीय नेतृत्व निर्माण होऊ लागले. कावेबाज राजकारण्यांच्या सुपीक डोक्यात कारखाना बळकावण्याचा कीड वळवळायला लागली. फसलेला शेतकरी स्वतःला गहाण ठेवून नेत्यांच्या भूलथापांच्या जाळ्यात अडकू लागला. सोन्याची अंडी देणारी कोंबडी फस्त करण्यासाठी गावरान नेते क्लृप्त्या लढवू लागले… प्रथम तो साखर कारखाना घाट्यात न्यायचा. बोली लावायची. आपल्याच गोतावळ्यातल्यांनी ती बोली कवडीमोल किंमतीत खिशात घालायची, सहकाराचा स्वाहाकार करून कारखाना खाजगी मालकीचा करायचा. असे अनेक कारखाने नामवंत राजकारण्यांच्या नावाची टिकली लावून सरकारी मदतीच्या झुलीवर समाजात मिरवताहेत. अजूनही या ‘फेमस’ बोलींचे बदनाम पडघम टीव्ही/ वर्तमानपत्रात घुमत असतात…