त्यांच्या शब्दा-शब्दांतून मराठी बांधवासाठी कळकळ दिसून आली मला. त्यांच्याच तीव्र इच्छाशक्तीमुळे, भगीरथ प्रयत्नांमुळे आज या राज्यात हजारो मराठी बांधव मोठ्या प्रमाणावर मानाचे, कर्तृत्वाचे स्थान मिळवून आहेत… या सगळ्यामागे बाळासाहेबांचेच अविरत परिश्रम आणि तळमळ होती… बांधवांसाठी निरपेक्षपणे लढण्याचे त्यांचे गुण, जिद्द, तळमळ मनाला स्पर्शून गेलेत आणि त्यांच्याबद्दल माझा आदर कित्येक पटीने द्विगुणित झाला… असे सच्चे, निडर राजकीय नेते बाळासाहेबांनंतर माझ्या पाहण्यात नाहीत.
– – –
जगात हातांच्या बोटावर मोजता येणार्या व्यक्ती आयुष्यात येतात, ज्या पहिल्या भेटीतच चुंबकाप्रमाणे आपल्याला खेचून घेतात, आपल्या होऊन जातात, त्यांच्याशी आपले जन्म-जन्मांतरीचे ऋणानुबंध जाणवत राहतात… पूजनीय बाळासाहेब ठाकरे यात अग्रभागी होते माझ्या आयुष्यात… माझ्यासारख्या चित्रपट व्यावसायिकावर त्यांनी निरपेक्षपणे प्रेम केलं, ते माझे हितचिंतक होते, नेहमी योग्य तोच सल्ला त्यांनी मला दिला… आमची मैत्री कुठल्याही व्याख्येत बसली नाही… माझ्याप्रमाणेच ते अनेकांचे सहृदय हितचिंतक होते…
माझ्या आठवणीप्रमाणे माझी आणि बाळासाहेबांची पहिली भेट दादरच्या त्यांच्या कार्यालयात झाली. आता त्या जागेवर भव्य शिवसेना भवन उभे आहे. १९७०चा काळ होता तो. माझे अब्बाजान मला म्हणत, बेटा, कुणी घरी आमंत्रित केल्यास यजमानाचे डोळे पाहावेत… त्यांच्या डोळ्यात तुला तुझ्याविषयी प्रेम, आदर, ओलावा दिसून आला तर समजावे तर योग्य घरी आलास… मी बाळासाहेबांच्या डोळ्यांत माझ्याविषयीचे ओतप्रोत प्रेम पाहिले, सच्ची आपलेपणाची भावना मला त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवली… त्यांनी हस्तांदोलन केलं आणि एका क्षणात मला आपलंसं केलं… पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांचे दोस्त झालो… आमची मैत्री चिरंतन ठरली!
त्या पहिल्या भेटीनंतर आमच्यातील शिष्टाचाराची बंधनं गळून पडली ती कायमची… मी अनेकदा शूटिंगहून येता-जाताना त्यांच्या दादरच्या कार्यालयात दत्त म्हणून उभा राहात असे… साहेब कितीही व्यग्र असले तरी प्रेमाने माझे स्वागत करत. गळाभेटीने सुरुवात होऊन अगदी सहज शिळोप्याच्या गप्पा होत… या गप्पा होण्यापूर्वी बाळासाहेब त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांना थोडा वेळ बाहेर जायला सांगत आणि मग गप्पांना खाजगी- घरगुती गप्पांचे स्वरूप येई… आमच्यातील संभाषण नेहमी आमच्यापुरतेच मर्यादित राही… साहेबांचे व्यक्तिमत्व खूप करिश्मायी होते. सहज गप्पांमध्येही त्यांच्यातील सेन्स ऑफ ह्युमर आणि हजरजबाबीपणा मला थक्क करून जात असे… ही मैत्री प्रत्येक भेटीत मला समृद्ध करत असे.
१९५६च्या काळात मी टीनएजर असता मुंबईला भेट द्यायचो, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं लोण मोठ्या प्रमाणावर पसरलं होतं… राज्य पातळीवरच्या आणि राष्ट्रीय दैनिकांतून रोज पहिल्या पानापासून या बातम्यांनी वर्तमानपत्रं खच्चून भरलेली असत आणि बाळासाहेबांचे या चळवळीत अतिशय वरचे स्थान होते. बाळासाहेबांना वगळून कुठलीही बातमी पूर्ण होत नसे. मराठी भाषिकांविषयी मला फारशी माहिती नव्हती… मराठी भाषिक म्हणजे कामगार वर्ग, धुणे भांडी करणारा वर्ग असे चित्र माझ्यासमोर होते… पण बाळासाहेबांसमवेत झालेल्या भेटींतून त्यांच्या स्वभावातील अनेक पैलू माझ्यासमोर उलगडत गेले आणि मराठी समाजही समजत गेला. समस्त मराठी बांधवांसाठी, त्यांना नोकरी-व्यवसायात अधिकाधिक प्रमाणात संधी मिळावी, त्यांनी स्वाभिमानाने जगावे, समाजाच्या मुख्य धारेत त्यांना सामावून घ्यावे, यासाठी ते कळवळीने बोलत, धडपड करत. पांढरपेशा नोकरीत मराठी टक्का वाढावा म्हणून साहेबांचे योगदान प्रचंड होते… त्यांच्या शब्दा-शब्दांतून मराठी बांधवासाठी कळकळ दिसून आली मला. त्यांच्याच तीव्र इच्छाशक्तीमुळे, भगीरथ प्रयत्नांमुळे आज या राज्यात हजारो मराठी बांधव मोठ्या प्रमाणावर मानाचे, कर्तृत्वाचे स्थान मिळवून आहेत… या सगळ्यामागे बाळासाहेबांचेच अविरत परिश्रम आणि तळमळ होती… बांधवांसाठी निरपेक्षपणे लढण्याचे त्यांचे गुण, जिद्द, तळमळ मनाला स्पर्शून गेलेत आणि त्यांच्याबद्दल माझा आदर कित्येक पटीने द्विगुणित झाला… असे सच्चे, निडर राजकीय नेते बाळासाहेबानंतर माझ्या पाहण्यात नाहीत. सर्वसामान्यांसाठी त्यांचा प्रत्येक शब्द काळजी, कळकळ, चिंता यांनी ओथंबलेला असे. मराठी माणसासाठी लढणारे ते खरेखुरे सच्चे नेते होते…
बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना मुस्लिमविरोधी आहे, असं चित्र निर्माण झालं होतं. एकदा बातचीतीच्या ओघात हा मुद्दा निघाला, त्या क्षणी बाळासाहेब म्हणाले, संजय, क्या मैं आपको एंटीमुस्लिम महसूस हुआ हूँ कभी? अनेक प्रवाद याबाबत कानांवर पडल्याने मी गप्प बसलो… पण असा प्रश्न त्यांना माध्यमांतून वरचेवर विचारण्यात येई, तेव्हा साहेब म्हणत, मी अँटी-मुस्लिम नाही… मी फक्त अँटी-पाकिस्तान आहे! अशाच एका वार्ताहराने साहेबांना, तुमचा एखादा मुस्लिम मित्र सांगा पाहू असं म्हटल्यावर साहेबांनी त्याच्यापुढे किमान १०० मुस्लिम मित्रांची नावे सादर केली. यात माझे वडील बंधू फिरोज खान आणि माझेही नाव समाविष्ट होते. साहेबांनी हेही जाहीर केलं की त्यांचा खानसामा आणि ड्रायव्हर हे दोघंही धर्माने मुस्लिम आहेत… मुस्लिम व्यक्ती साहेबांच्या ‘मातोश्री’ बंगल्यात नोकरीला होत्या, साहेब आणि त्यांचे कुटुंबीय यांना अन्न रांधून घालणारा जर मुस्लिम असू शकतो तर त्यांच्यावर असणारा मुस्लिम द्वेषी हा आरोप संपूर्णतः निराधार, असत्य होता हे सिद्ध होतं…
२३ जानेवारी दिवस जसा जवळ येतो, माझ्या या आदरणीय मित्राच्या अनेक आठवणी माझ्याभोवती फेर धरतात…
साहेब अधून मधून वाईन घेत आणि वाईनसोबत त्यांना त्यांचे मित्र सोबत हवे असत. एकदा त्यांनी मला वाईन आणि गप्पासाठी मातोश्रीवर बोलावलं. इन फॅक्ट साहेबांची तब्येत जरा बरी नव्हती. डॉक्टरांनी त्यांना जेवणापूर्वी थोडी वाईन घेण्याचा सल्ला दिला होता. आमच्या गप्पा वाईनसह सुरू झाल्या. त्यादरम्यान एक चार वर्षांचे बाळ आमच्या दिशेने आले. या गोंडस बाळाने मला एक छान स्मित दिले आणि तो बाळासाहेबांच्या गळ्यात हात घालून त्यांना बिलगला आणि आजोबांशी प्रेमाने बोलू लागला… बाळासाहेब म्हणाले, संजय, हा पठ्ठा फक्त चार वर्षांचा आहे… पण आजोबांनी काय करावे आणि काय करू नये, हे तो आजोबांना सांगतो… मला जीव लावतो… माझा हा नातू आदित्य… उद्धवचा चिरंजीव आहे! आजोबा आणि नातवाचं हे हृदय नातं मला स्पर्शून गेलं…
नंतर जेव्हा माझी आजचा युवा नेता आदित्य ठाकरेशी भेट झाली, तेव्हा त्याच्याशी झालेली पहिली भेट त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षी झाली होती, हे सांगितलं, तो प्रसंग सांगितला… आदित्य या आठवणीने सद्गदित झाला. आजोबांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आदित्यने आजोबांचे नेतृत्वगुण अगदी समर्थपणे घेतले आहेत.
बाळासाहेबांच्या पत्नी सौ. मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले, तेव्हा बाळासाहेबांचे कुटुंब तात्पुरते वडाळ्याला राहायला गेले होते. बाळासाहेब आणि त्यांचे कुटुंब खचून गेले होते… बाळासाहेबांकडे जाऊन, त्यांना भेटून त्यांना धीर देण्याचे माझ्याकडे मानसिक बळ नव्हते… पण मोठ्या हिंमतीने मी माझी पत्नी आणि मुलं बाळासाहेबांना भेटण्यास वडाळ्याच्या घरी गेलो. एक वेगळेच बाळासाहेब मला दिसले, भासले! मनाने उध्वस्त झालेल्या बाळासाहेबांना मला पाहवत नव्हते… त्या क्षणी माझा हा देवमाणूस मित्र इतकंच बोलू शकला, ‘माझा देवावरचा विश्वास उडाला संजय!’ माझ्या वाघासारखा मित्राला मी इतक्या प्रदीर्घ प्रवासात प्रथमच इतके अगतिक, असहाय आणि दुःखी पाहिले! बाळासाहेबांसाठी मीनाताई अवघं विश्व होत्या. ते अचानक उद्ध्वस्त झाल्याने ते उन्मळून पडले होते… त्यांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते!