`आचार्य अत्रे यांची प्रतिभा अफाट होती. कलमबहाद्दुरी, पल्लेदार वक्तृत्व, विनोद आणि आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी प्रसादांचा नियतीने त्यांच्यावर वर्षाव केला. परंतु शत्रू कोण व मित्र कोण याची पारख करण्याची दृष्टीच त्यांना नियतीने दिली नाही. त्यामुळे किंचितही मतभेद होताच बाबूराव त्याला आपला कट्टर दुष्मन मानून मोकळे होत असत. मग त्याची अर्वाच्य विटबंना करीत. परंतु चांगल्याला आम्ही नेहमीच चांगले म्हणत आलो तसेच वाईटाला वाईट म्हणण्यात कसर करणार नाही.
– – –
राजकीय शत्रू आणि वैयक्तिक मैत्री याची गल्लत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात कधी होऊ दिली नाही. राजकारण्यांवर राजकीय टीका करताना टीकेची पातळी घसरू दिली नाही. चांगल्याला नेहमीच चांगले म्हटले आणि वाईटाला वाईट म्हणायची कसर कधी केली नाही. हे करीत असताना शत्रूशीही मैत्री चांगल्या रीतीने निभावली. अगदी त्या व्यक्तीच्या निधनानंतरही. मित्र आणि राजकीय शत्रू यांच्या निधनानंतर मनातील भावना बाळासाहेबांनी खास त्यांच्या शैलीत व्यक्त केल्या.
१९६०च्या दशकात झालेला `मराठाकार’ आचार्य अत्रे-बाळासाहेब ठाकरे वाद हा सर्वश्रृत आहे. एक मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर `मुंबई-महाराष्ट्रात आली परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता,’ अशा वेळी अत्रे साहेबांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर, १३ ऑगस्ट १९६० रोजी सुरू झालेल्या `मार्मिक’ मधून बाळासाहेबांनी लिखाणातून आणि व्यंगचित्रांतून दबलेल्या मराठी माणसाचा आवाज उठवला होता. त्याचवेळी औद्योगिक क्षेत्रात कम्युनिस्टांनी धुमाकूळ घातला होता. याचा फटका गिरणी कामगार व इतर कामगारांना बसत होता. त्यांचा देखील बाळासाहेब ‘मार्मिक’मधून समाचार घेत होते. त्यामुळे कम्युनिस्ट आणि बाळासाहेब आणि नंतर कम्युनिस्ट आणि शिवसेना यांच्यात सतत संघर्ष होत होता. `मराठा’मधून आचार्य अत्रे हे बाळासाहेब आणि शिवसेनेवर कडाडून टीका करायचे. कधी-कधी टोकाची टीका असायची. मग बाळासाहेबही आपल्या स्टाईलने कधी व्यंगचित्राद्वारे तर कधी लिखाणाने उत्तर द्यायचे. असा अत्रे-ठाकरे वाद पराकोटीला जायचा. कम्युनिस्ट मंडळी आचार्य अत्रेंचा वापर शिवसेनेविरुद्ध करून घेत होती.
असे असले तरी, बाळासाहेबांना आचार्य अत्रे यांच्याविषयी नेहमीच आदर असे. कारण ते संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे एक शिलेदार होते. `वाद म्हणजे वैर नव्हे’ ही बाळासाहेबांची भूमिका असे. म्हणून आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी मार्मिकच्या २२ जुलै १९६९च्या अंकात `असा पुरुष होणे नाही’ हा अग्रलेख लिहून आदरांजली वाहिली. त्या अग्रलेखात बाळासाहेब लिहितात `आचार्य अत्रे यांची प्रतिभा अफाट होती. कलमबहाद्दुरी, पल्लेदार वक्तृत्व, विनोद आणि आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी प्रसादांचा नियतीने त्यांच्यावर वर्षाव केला. परंतु शत्रू कोण व मित्र कोण याची पारख करण्याची दृष्टीच त्यांना नियतीने दिली नाही. त्यामुळे किंचितही मतभेद होताच बाबूराव त्याला आपला कट्टर दुष्मन मानून मोकळे होत असत. मग त्याची अर्वाच्य विटबंना करीत. परंतु चांगल्याला आम्ही नेहमीच चांगले म्हणत आलो तसेच वाईटाला वाईट म्हणण्यात कसर करणार नाही. बाबूरावांचे आणि आमचे स्नेहबंध एक-दोन दिवसाचे नव्हे तर अनेक वर्षाचे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनचे होते. पण ते जरी आमच्याकडे वैरी म्हणून पहात होते. तरी आम्ही त्यांच्याविषयी वैरभावाला कल्पनेतही कधी थारा दिला नाही. वाद म्हणजे वैर नव्हे ही आमची भूमिका आहे नि असते. पण ते जेव्हा विरोधालाच उठले तेव्हा आम्हालाही अस्तन्या वर साराव्या लागल्या. ठाकरे कुळाची अमर्याद बदनामी, फार काय, विध्वंस करण्याइतपत हलक्या कानांच्या बाबूरावांची जेव्हा मजल येऊन ठेपली तेव्हा त्यांच्या टोल्याला प्रतिटोला देण्याशिवाय आम्हाला गत्यंतरच उरले नाही. त्यांच्या मागे कम्युनिस्ट होते. कम्युनिस्टांच्या विळख्यात सापडलेल्या बाबूरावांना तो विळखा तोडून बाहेर पडणे शक्य झाले नाही. एक गोष्ट जगजाहीर आहे की कम्युनिस्टांनी बोलावे आणि बाबूरावांनी डोलावे अशी त्यांची अवस्था होऊन बसली. ती त्यांच्या अखेरपर्यंत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची निरगांठ सोडविण्यात ज्या अत्रेबहाद्दूरांनी स्पष्टोक्तीचा घनगंभीर तोफखाना सर्व महाराष्ट्रभर झाडला, तोच आसामी, अखेर कम्युनिस्टांच्या पिंजर्यात बोलका पोपट होऊन राहावा ही त्यांच्या चारित्र्याची शोकांतिका होय. अत्रे आणि ठाकरे यांच्यामधील द्वैताची दरी कायम ठेवण्यात कम्युनिस्ट यशस्वी झाले असले तरी आता हा पहाड त्या दरीतच कोसळल्यामुळे ती कायमची बुजली आहे.’
काँग्रेस नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येनंतर सारा देश हळहळला. काँग्रेस पक्ष आणि देशाचे एक खंबीर नेतृत्व हरवल्यामुळे राजकीय विरोधकांनाही धक्का बसला. त्या काळात केंद्रात व बहुतांश राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. त्यामुळे काँग्रेसच्या धोरणांवर-निर्णयांवर नेहमीच टीका होत होती. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष होत होता. इंदिरा गांधी यांच्या मुस्लीम तुष्टीकरणावर बाळासाहेब प्रहार करायचे. काँग्रेसलाही झोडपायचे. परंतु इंदिराजींच्या निधनानंतर बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये ११ नोव्हेंबर १९८४ रोजी `रक्षकच भक्षक बनले’ हा अग्रलेख लिहून इंदिरा गांधींविषयी आदरच व्यक्त केला. `माझी काया, वाणी, गेली म्हणत अंत:करणी, परि मी आहे जगज्जीवनी, निरंतर’ अशी सुरुवात करून पुढे ते लिहितात – इंदिराजी गेल्या! कोणीतरी उकळत्या तेलाप्रमाणे ती बातमी आमच्या कानात ओतली आणि एकाचवेळी मस्तकाला असंख्य मुंग्या डसल्यासारखे वाटले. इंदिराजींवर एका खलिस्तानी नराधमाने गोळ्या झाडल्याची बातमी तासाभरापूर्वी आली पण आम्ही विश्वास ठेवला नव्हता. कारण ज्या भारत वर्षात अनादिकालापासून स्त्री ही मातेसमान मानली गेली. त्या भूमीवर साक्षात सैतानाने जरी पाऊल ठेवले तरी त्याच्या हातूनही स्त्रीहत्येचे पातक कदापि होणार नाही. आपल्या देशातील सत्तर कोटी जनतेप्रमाणे आमचाही दृढ विश्वास होता. पण तो विश्वास त्याक्षणी दुभंगला. या देशावर अनेक संकटे आली पण इंदिराजींनी निधड्या छातीने या देशाचा कारभार हाकला. या देशातील हरेक मानवावर त्यांनी प्रेम केले. सर्व भाषांना त्यांनी गोंजारले. ज्या देशाला इंदिराजींनी आयुष्यभर सर्व काही भरभरून दिले, त्या देशाने कृतज्ञतेने त्यांना शतायुषी झाल्यावर पालखीतून वैभवाने स्वर्गलोकी निरोप द्यायला हवा होता. त्याच देशातील आमच्या बांधवाने त्यांच्यावर अमानुषपणे गोळ्यांचा वर्षाव केला आणि एक धवल जीवन संपुष्टात आणले. आता आम्ही कितीही हुंदके दिले आणि अश्रू ढाळले तरी काळ आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.’
अशा रीतीने बाळासाहेबांनी राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवून वैयक्तिक मैत्री जपून माणुसकीचं दर्शन वेळोवेळी जगाला घडवले आणि वाद म्हणजे वैर नव्हे हे अधोरेखित केले. त्यांच्यातील निरागस कलावंताची हीच खरी ओळख!