लष्करातील शिपाई, वैमानिक, सिने-नाट्यकलावंत, पायलट, अगदी चहा विकणाराही एखाद्या राष्ट्राचा प्रमुख, पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री बनल्याची उदाहरणे देशात आणि परदेशात अनेक आहेत. परंतु बाळासाहेब ठाकरे यांना यापैकी काहीही व्हायचे नव्हते. तरी देखील एक सहृदयी व्यंगचित्रकार, रंगात रंगलेला इंद्रधनुषी कलावंत एका बलाढ्य राज्याभिमानी संघटनेचा सरसेनापती होतो, शिवसेनाप्रमुख होतो आणि जगन्मान्य हिंदुहृदयसम्राट होतो हे साठच्या दशकानंतर अनेकांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या प्रादेशिक भूमिकेवर, संकुचित वृत्तीवर स्वत:ला `राष्ट्रवादी’ म्हणवणारे राजकीय पक्ष व नेते तुटून पडत. समकालीन पत्रकार, लेखक मंडळीही बाळासाहेबांवर लिखाणातून टीका-टिप्पणी करीत. बाळासाहेबांच्या स्वभावावर, त्यांच्या वागण्या-बोलण्यावर टीका करीत. आपल्या लेखणीने बाळासाहेब व्यंगावर बोट आणि ढोंगावर फटका देत होते. कुंचल्याचे फटकारे देत होते. कारण बाळासाहेबांना जे पटलं, दिसलं ते बोलले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा स्थायीभाव होता. जिथे अन्याय झाला, तिथे न्यायाच्या बाजूने लढून न्याय मिळवून दिला. आपल्या देशाला लोकशाही परवडणारी नाही. त्यामुळे ते मर्यादित हुकमशाही हवी असे बोलत. शिवाजी महाराज हे आदर्श हुकुमशहा होते असे त्यांचे मत होते. बाळासाहेब हुकुमशहा आहेत. ते चिडखोर आहेत. तापट आहेत, तिरसट आणि हेकट आहेत, असे त्यांच्याविषयी त्याकाळी नाना तर्क-वितर्क, समज-गैरसमज होते. बाळासाहेब असे का वागतात, याचा उलगडा बाळासाहेबांनी वयाची साठी पूर्ण केल्यावर १९८७च्या `मार्मिक’च्या एका अंकात केला आहे. योगेंद्र ठाकूर यांनी संकलित केलेल्या या लेखात अनेकांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर आहे.
– – –
‘मी असा का वागतो’ या लेखात बाळासाहेब लिहितात, मी असा का वागतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. माझ्याविषयी अनेकांना हा प्रश्न उगाचच सतावत राहातो. अनेकांच्या चेहर्यावर मला हा प्रश्न दिसलेला सुद्धा आहे. म्हणूनच मलाही हा प्रश्न स्वत:ला विचारावासा वाटतो आणि त्याचे उत्तर द्यावेसे वाटते.
साठावे वर्ष म्हणजे काही फार नव्हे, फार वय झाले असेही म्हणता येत नाही. माझ्या मागे-पुढे असलेली परिचित माणसंही ऐंशी-नव्वद वर्षे जगली आहेत. जगताना मी पाहिली आहेत. मग साठावे वर्ष मला लागलं, मी अनुभवतोय ते काही फार म्हणता येणार नाही. पण शिवसेना निर्माण केल्यापासून गेल्या वीस वर्षांत जेवढ्या चांगल्या बातम्या कानावर आल्या त्यापेक्षाही वाईट बातम्यांचे प्रमाण अधिक आणि मग त्याचा ताण तसा अधिक.
माझ्याकडे गार्हाणी, तक्रारी, अडचणी घेऊन अक्षरश: हजारो लोक येत असतात. शंभर भेटणारे असले तरी त्यांना भेटणारा मी एकच असतो. त्यांचे गार्हाणे प्रत्येकी एकच असते. पण त्यांची एकत्र गार्हाणी माझ्यासमोर शंभर होतात. फार थोड्या लोकांना या वास्तवाचे भान असते की मीसुद्धा माणूस आहे. माणूस म्हणून माझी शारीरिक क्षमता, मानसिक ताकद यांना कुठेतरी मर्यादा असतेच. दिवसांचे किती तास त्याच प्रकारचे शब्द ऐकत राहावे आणि ऐकत वा बोलत बसून राहावे यांना कुठेतरी मर्यादा असतेच. पण कितीजण माझ्याकडे ‘हासुद्धा माणूसच आहे’ अशा माणुसकीच्या नजरेतून पाहतात? अर्थात गार्हाणी तक्रारी घेऊन येण्याबद्दल माझी तक्रार नाही. पण अतिरेक झाला मग असह्य होते. मी अगदी उद्विग्न होऊन जातो. कधीच कुणाला भेटू नये असेच वाटू लागते. पण पुन्हा नव्या सूर्योदयाबरोबर लोकांना सामोरा जातो. कालची उद्विग्नता कुठल्या कुठे गायब झालेली असते.
मी शिवसेनाप्रमुख आहे म्हणून मंडळी माझ्याकडे येत असतात. पण येणारे सारे शिवसैनिक वा शिवसेनाप्रेमी असतात असे नव्हे. काँग्रेस, जनता, भाजप आदी पक्षांच्या पाठीराख्यांपासून कुठल्याच पक्षाची बांधिलकी नको असलेलेही अनेक असतात. अनेकांना सेनाभवन कुठे आहे याचाही थांगपत्ता नसतो. सुधीर जोशी वा दत्ताजी साळवी कोण हे त्यांच्या गावीही नसते. तरीही शिवसेनेचे पुरस्कर्तेच असल्याचा आव आणून तक्रारी सोडवण्यासाठी येतात. मग मीसुद्धा अशांची फजिती व्हावी म्हणून मुद्दाम दत्ताजींची, सुधीर जोशी म्हणून वा सुधीर जोशींची प्रमोद नवलकर अशी त्या माणसाची ओळख करून देण्याचा खट्याळपणा करतो आणि ते माना डोलावतात, तेव्हा त्यांची आत्मीयता व प्रामाणिकपणा उघडा पडतो.
पण हल्ली ताण वाढलाय. असह्य झालाय. ताण लपविण्यात काय हशील? खाजगी आयुष्य म्हणून काही उरले नाही. सार्वजनिक जीवनात उडी विचारपूर्वक घेतली होती. म्हणून खाजगी आयुष्य कमी झाल्याबद्दल तक्रार करत नाही. पहिला नातू झाला. पण त्याला मांडीवर खेळवता आले नाही. त्याचे दुरूनच दर्शन घेत राहिलो. आता नात आलीय. तिला घेऊन शतपावली करण्याचेही जमू नये याचा विशाद आजोबाला वाटणार नाही? माझेच नव्हे तर हिचेही असेच होते. नातीला साधे खेळवताही येऊ नये इतके आम्ही दमून जातो.
माझी वैयक्तिक भेट होत नाही, अशी अनेकांची तक्रार असेल. पण ती तक्रार चाहते व प्रेमी मंडळींचीच आहे असे नव्हे. माझ्या मुलाबाळांचीही आहेच ना? पण शेवटी एक विचार करायला हवा की वैयक्तिक तक्रारीत मी किती वेळ लक्ष घालू? शिवसेनाप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर पसरत चाललेल्या शिवसेनेला आकार देणे, शिस्त लावणे, बांधीव, ठाशीव बनविणे ही माझी जबाबदारी आहे याचा विसर पडून कसे चालेल? प्रादेशिक पक्ष म्हणून नव्या उमेदीने महाराष्ट्रात पाय रोवून उभी राहात असलेल्या शिवसेनेचा पसारा वाढवत ठेवून तिची संघटनात्मक बांधणी करणे, भरपूर प्रमामात पुढील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निवडून आणणे ही कामे मग कुणी करायची? मी त्या कामात वेळ द्यावा की वैयक्तिक तक्रारींच्या निवारणात श्रम खर्ची घालावेत याचा आता लोकांनी गंभीर विचार करायला हवाय.
महापालिकेच्या संदर्भात काही अडचण तक्रार असेल तर प्रथम स्थानिक नगरसेवकाकडे जायला हवे. शाखाप्रमुखाकडे जायला हवे. पण जो उठतो तो थेट इथे. पण हा गार्हापणी, तक्रारींचा लोंढा माझ्याकडे येऊन आदळत असतो. सार्यांनी आपापला भार उचलला व जबाबदार्या पाळल्या तर माझा भार हलका होईल आणि नुसता भार हलका होईल. एवढेच नव्हे तर संघटनात्मक काम व राज्यव्यापी शिवसेनेची बांधणी करण्यासाठी त्याच वेळचा सदुपयोग मला करता येईल. सुदैवाने अन्य पक्षांपेक्षा शिवसेना बरीच सुसंघटित व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बनलेली आहे. तरी पण इथेही मूठभर झगडे असतातच आणि असे तंटे मला बेचैन करतात. उदा. शाखाप्रमुखाविषयीच्या तक्रारी, कोण हवा कोण नको असे वैयक्तिक झगडे, नगरसेवकांचे शाखाप्रमुखाबद्दलचे हट्ट अशा संघटनात्मक बाबी समोर आल्या म्हणजे कष्टी होतो. यांना शिवसेना समजली तरी आहे काय हा विचार मला बेचैन करतो. मग माझ्या पद्धतीने त्यांना हुकूमशाहीचे वळसे हाती द्यावे लागतात. असली भूतबाधा दूर करावी लागते. पण काही ठिकाणची गळवे ठुसठुसत राहतात. तरीही मला अभिमान एकाच गोष्टीचा वाटत राहातो की एका पवित्र विचाराने ही पिढी उभी राहिली आहे. इतर पक्षांना, राजकीय नेत्यांना ही गोष्ट जमलेली नाही.
गेल्या वीस वर्षांत शिवसेनेच्या रूपाने जे चढउतार पाहिले त्यात मला अलोट प्रेम मिळाले. माझ्या वाढदिवशी पहाटेपासून शिवप्रेमी जनतेची जी रीघ लागते त्यामुळे मी अनेकदा गहिवरून जातो. म्हणूनच काही वर्षांपूर्वी माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहीने पत्र काढून घरोघरी पाठविले होते. ते खालीलप्रमाणे- क्षणिक थकत चालल्याची जाणीव होत असली तरी खूप काही देण्याची इच्छा माझ्या मनात सतत आहेच, उमेदही आहे. माझे चिंतन, मनन चालू असते तेव्हा माझ्या मराठी माणसाला, शिवसैनिकाला काय विचार देऊ काय नको याचे मनात वादळ चालू असते. विचारांचे काहूर माजते. आज सर्वत्र राजकीय दलदल चालू असताना सुडाची, द्वेषाची, मत्सराची मच्छरे माजली आहेत. परंतु झोपडवासीयांबद्दल जेव्हा मी विचार मांडतो, तेव्हा त्यावर खवचटपणाने कोणी बोलेल. छद्मीपणाने हसेलही. एकीकडे झोपड्या पाडण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडे झोपडीवासीयांबद्दल आपुलकीने बोलता असेही म्हणेल.
कुणालाही आश्चर्य वाटेल अशी गोष्ट आहे. मुंबईत ५० लाख झोपडीवासी आहेत असं म्हणतात. सरकारने राजकारण बाजूला ठेवून मुंबईत सुधारणा करायची म्हटली तर ४० लाख झोपडीवासीयांना अत्यंत तातडीने टुमदार घरे मिळतील अशी योजना माझ्याकडे तयार आहे. सांगण्यासारखे खूप आहे. फसवेगिरीच्या राजकारणाने मन उदास होते. ज्यांच्या हिताचे सांगावे त्यालाही कळू नये याचा खेद होतो, रागही येतो. हे सारे मनोगत इथे मांडण्याचे कारण तेच. ‘मी असा का वागतो’ त्याचे थोडे सत्यदर्शन इथे माझ्या दाराशी येणार्यांना घडावे हाच त्यामागचा प्रामाणिक हेतू. माणसाला नुसते निर्हेतुक पोखरण्यापेक्षा तुमच्याच हितासाठी त्याचा योग्य वापर करून घ्यावा हीच त्यामागची भूमिका आहे. माझ्याकडे येणारे सुज्ञ आहेत. मी आणखी काय सांगू?’
बाळासाहेबांचे अंतरंग कसे निर्मळ आहे आणि भूमिकेत सुस्पष्टता आहे हे यावरून दिसते.
———–
हळव्या मनाचा मोठा माणूस!
बाळासाहेबांना मी गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून ओळखतो. मी बाळासाहेबांना पोलीस खात्यात असल्यापासून जवळून पाहिले आहे. १९८०पर्यंतचा काळ आठवतो. जेव्हा बाळासाहेब हे राजकीय प्राबल्यवान नेते नव्हते, तेव्हा त्यांना आजच्याइतकी कडक सिक्युरिटी नसायची. कधी कधी प्रसंगानुसार भेट व्हायची. मी ८० साली मंत्रिमंडळात गेलो आणि आमच्या भेटीगाठीत खंड पडला. मधल्या काळात माहिमला ये-जा होत असे.
मला बाळासाहेब एकदा रात्री ११ वाजता दादरला ज्योतिषाकडे मी मुख्यमंत्री कधी होणार म्हणून घेऊन गेले होते. जेव्हा एवढी कडक सुरक्षा नव्हती. मीनाताई असायच्या तेव्हा तर त्या जेवायचा आग्रह करून थांबून घ्यायच्या. गणेशोत्सव काळात दोघेही अनेकवेळा यायचे माझ्याकडे. पण १९८८ सालानंतर बाळासाहेबांचे जसे जसे राजकारणात प्राबल्य वाढत गेले, तेव्हा जाणे येणे कमी झाले.
त्यांचा पक्ष वेगळा, माझा वेगळा, त्यांचे विचार वेगळे, मी काँग्रेसचा असल्यामुळे माझं घर सोडून जाऊ शकलो नाही. बाळासाहेब जरी कोरडे वागत असले, खंबीर असले तरी मनाने फार हळवे आहेत. एखाद्यावर प्रेम केले की ते जिवापाड करतात. तसे जर म्हटले तर हा माणूस नेता, मैत्री जपणारा आहे; पण गेल्या काही वर्षांत त्यांची माझी भेट बंद झाली आहे. भेटलोच तर समारंभाच्या निमित्तानेच.
मी वेगळ्या विचाराचा, ते वेगळ्या विचाराचे त्यांची वेगळ्या विचाराची बांधीलकी असली तरी माणूस म्हणून बाळासाहेब हा मोठा माणूस आहे. आज ते ७५ वर्षांचे झाले आहेत, असे वाटत नाही त्यांचा मिस्किलपणा, विनोदबुद्धी कॉलेजमधील तरुणालाही लाजवणारी. अगदी कोणाचीही टर उडविण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत. असा हा मनाने तरुण नेता आज ७६व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
– सुशीलकुमार शिंदे
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अमृतमहोत्सवी गौरवग्रंथातून