लेखक – श्रीकांत आंब्रे
हल्ली कुणीही उठतो आणि राज्यपाल कोश्यारी हे आपले हक्काचे सल्लागार आहेत, म्हणून त्यांच्याकडे आपल्याला बोचणार्या समस्यांवर सल्ला मागण्यासाठी बिनधास्त जातो. तेही कधी कुणाला नाही म्हणत नाहीत. हसत हसत त्यांच्याबरोबर फोटोही काढू देतात. आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांचा नव्हता इतका त्यांचा स्वभाव दयाळू, मायाळू, ममताळू, कनवाळू अगदी जर्दाळूसारखा लाघवी आहे. अगदी दिवसा, रात्री, मध्यरात्री, पहाटे दिल्लीहून बड्या राजकीय नेत्यांचा फोन आला तरी ते सांगितलेली कामगिरी बिनबोभाट पार पाडतात. कसला गर्व नाही की मनात काही लपवाछपवी नाही. असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळणे हे तर महाराष्ट्राचे खरोखरच भाग्य.
सकाळी राजभवनाच्या प्रांगणात फुलोरा पसरून नाचणार्या मोरांचे नृत्य पाहून झाले की आज कोण कोण भेटायला येणार आहे याची विचारणा ते त्यांच्या सचिवांकडे करतात.
म्हणूनच आमच्या चाळीतल्या पत्रकार बंड्याने त्यांची मुलाखत घेण्याचे ठरवले. त्याने डायरेक्ट राजभवनावर फोन करून अपॉइंटमेंट घेताना कारण सांगितले की, त्याला देशाच्या आणि राज्याच्या काही ज्वलंत समस्यांवर बोलायचे आहे आणि त्यावर राज्यपालांना काय वाटतं हे जाणून घ्यायचं आहे.
राजभवनावरून होकार मिळाल्यावर बंड्याने आपल्या मित्राच्या घरी मुलाखतीची प्रॅक्टिस करण्याचे ठरवलं. आपला मित्र चंद्या याला त्याने तू राज्यपालांची भूमिका कर आणि मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे तुझ्या पद्धतीने दे. चंद्या हो म्हणाला. तो मुळातच नकलाकार होता आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आवाज हुबेहूब काढायचा. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेत शिरताना त्याला फार त्रास झाला नाही. त्याशिवाय त्याचा राजकीय सेन्स जबरदस्त होता. पत्रकार बंड्याला जितकी माहिती नसेल, इतका राजकीय माहितीचा साठा त्याच्याकडे होता. त्यामुळे मुलाखतीला सुरुवात झाली. बंड्याने मुलाखतीचे व्हिडीयो शूटिंग करण्याची व्यवस्थाही केली होती. म्हणजे एखादा मुद्दा विचारायचा राहून गेला असेल तर त्याची नोंद घेता यावी. चंद्या राज्यपालांच्या भूमिकेत सोफ्यावर बसला होता तर पत्रकार बंड्या त्याच्या बाजूच्या कोचाच्या कडेला बसला हाता. लाईट… कॅमेरा… अॅक्शन.. टेक… म्हणताच मुलाखतीच्या शूटिंगला सुरुवात झाली.
– नमस्कार राज्यपाल. मी बंड्या सातरस्ते. ‘नग्नसत्य’ या वृत्तपत्रात मी काम करतो.
– म्हणजे एका वेगळ्या विषयावरचे तुमचे वृत्तपत्र आहे तर. पण मी एक सत्य नागरिक आहे. आणि भलत्या सलत्या विषयात मला रस नाही. कोणीही, कशावरही, काहीही विचारायला येतो.
– नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या इंग्रजी आवृत्तीचे नाव आहे, ‘नेकेड ट्रूथ.’ मराठी आणि इंग्रजी अशा आमच्या दोन्ही आवृत्त्यांत ही मुलाखत चार दिवस प्रसिद्ध होईल. इतकी वाईड पब्लिसिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
– विचारा तर.
– सर, रस्त्यावर बरेच भटके कुत्रे फिरत असतात. ते रस्त्यात घाण करतात, जोरजोराने भुंकून लोकांना त्रास देतात. कधी कधी चावतात. तर त्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आपण सरकारला किंवा पालिकेला आदेश द्यावा. कारण तेवढी कुणालाही आदेश देण्याची ताकद तुमच्यात आहे.
– तसा आदेश मी खाजपच्या तिरकिट रामय्यांना देऊ शकतो. कारण तेही नेहमी आंदोलन करण्यासाठी समस्येच्या शोधात हुंगत असतात. पण तुमच्या वृत्तपत्राचा हवाला देऊन मी त्यांना सांगणार आहे की, रस्त्यावर कुत्रेच काय, पण कोणत्याही प्राण्याला नग्न अवस्थेत फिरू देऊ नका. प्राणीमित्र संघटनांना त्यांच्यासाठी युनिफॉर्म शिवायला सांगा. म्हणजे रस्त्यावरील अनैतिक प्रकारांना आळा बसेल आणि त्यांनाही प्रश्चाताप होईल.
– थँक्यू सर. चांगला पर्याय सुचवला तुम्ही. माझा दुसरा प्रश्न आहे पडद्यावर उत्तान अंग्रदर्शन करत नाचणार्या नट्यांना आचारसंहिता घालून देण्याचा.
– त्याबाबत मला तज्ज्ञ अभिनेत्री रंगना खानावळ हिचा सल्ला घ्यावा लागेल. माणूस जन्माला येताना उघडा येतो, जाताना उघडा जातो. तुमच्या मराठीत याबाबत चांगले गाणे आहे – येशी उघडा जाशी उघडा, कपड्यांसाठी करिशी नाटक दोन प्रवेशाचे… वा… वा… जवाब नाही. आपण कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायद्याने गदा आणू शकत नाही. तरीही सिनेमातील नट-नट्यांचा ड्रेस कोड ठरविण्याचा आदेश मी सरकारला देईन आणि आपल्या खाजपाचे नेते नवीन बरेकर यांना या समस्येचा पाठपुरावा करण्यास सांगेन.
– खरंच फार मोठे उपकार होतील तरुण पिढीवर. आज समाजात बलात्काराची, अनैतिक कृत्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. त्याची मूळ प्रेरणा याच गोष्टीत आहे, असं मला वाटते.
– माझं म्हणणं आहे की सिनेमाच्या किंवा मोबाईलच्या पडद्यावरच नव्हे तर रस्त्यावरही अंगप्रदर्शन होऊ नये. आमच्या वेळी असे नव्हते. आता हे सगळे मुद्दामहून केलेले चाळवाचाळवीचे प्रकार वाटतात. पुरुषसुद्धा बर्म्युडा घालून फिरतात. उद्या शॉर्टकट पत्करतील हे चालणार नाही. आपली संस्कृती कशात आहे, हे प्रत्येकाला कळलेच पाहिजे. तिची जपणूक योग्य तर्हेने करण्याची काळजी घेतली पाहिजे. जय रामदेवबाबा.
– खरं आहे तुमचं म्हणणं. सर, माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. आता मी एवढ्या मोठ्या वृत्तपत्रात आहे, पण तरीही माझं लग्न जमत नाही. माझ्यासारखे अनेक तरुण या व्यवसायात असे असतील. त्यांच्यासाठी काही मार्ग काढा ना. तुम्ही कशावरही काहीही मार्ग मध्यरात्रीही काढू शकता.
– तो अपवाद होता. पण लग्न न जमणे ही एक समस्या आहेच. त्यासाठी एक सर्वप्ाक्षीय वधुवर मंडळ काढण्याचा आदेश मी सरकारला देईन. तिथे रक्तगटासह पसंतीपर्यंत सर्व चाचण्या मोफत होतील. आणि विवाहानंतर मधुचंद्रासाठी उत्तराखंडात जाण्याचा खर्च मी स्वत: करीन, मग तर झालं?
– सर, किती प्रेमळ आहात तुम्ही! तुमची लोकप्रियता अशीच कायम राहो, ही सदिच्छा…
पत्रकार बंड्या स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या स्वप्नात पिसारा फुलारून राजभवनातील मोर नाचत होते.