• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एका पक्षाचा तिळगूळ मेळावा

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 15, 2022
in टोचन
0

मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या अशा आम्ही दोघांनी यंदा संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भव्य राजकीय तिळगूळ मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात तिळगुळाच्या पाककृती स्पर्धा तिळाचे लाडू वळण्याच्या स्पर्धा, तिळाचे लाडू खाण्याच्या स्पर्धा, तीळ सुंदरी स्पर्धा, तिळावरून पडलेल्या म्हणीच्या स्पर्धा अशा अनेक स्पर्धा तसेच तिळाच्या पदार्थापासून बनवलेले सुग्रास भोजन, तिळाचा मठ्ठा, तिळाचे सरबत, तिळाचे श्रीखंड, बासुंदी, चटणी अशा नाना व्हरायटी भोजनात होत्या. त्यामुळे तिळगूळ मेळाव्याला गर्दी होणार हे नक्की होते.
समारंभाच्या अध्यक्षपदी आम्ही भाजपचे तिळगूळ सम्राट खासदार रावसाहेब दानवे यांची सर्वानुमते, म्हणजे आमच्या दोघांच्या मते एकमुखाने नियुक्ती केली होती. त्यामुळे तिळाच्या लाडवाला मुंग्या याव्यात तशी सकाळपासूनच सभामंडपात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. या निमित्ताने सर्वांशी गोड बोलून त्यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी प्रमुख नेत्यांनी सभासद नोंदणीचे अर्ज आणून, आपल्याच पिताश्रींचे प्रवेशद्वार म्हणून प्रवेशद्वारावरच टेबल टाकून नोंदणीस सुरुवात केली होती. पक्षात प्रवेश करणार्‍यांना तिळाचे छोट्या आकाराचे पाच लाडू प्लास्टिकच्या पिशव्यातून दिले जात होते. इथे लाडू मिळतात याची बातमी परिसरात पसरल्यानंतर तर आईबापांबरोबर चिल्यापिल्ल्यांचीही गर्दी लोटली होती. भाजपाशिवाय इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वा कार्यकर्त्यांनी मंडपात तोंडही दाखवले नाही.
हे तिळगूळ संमेलन आहे की भाजप स्नेहसंमेलन आहे, हेच कळत नव्हते. माझ्या ही चूक लक्षात आली तेव्हा पोक्या म्हणाला, अशा ठिकाणी घुसखोरी केली नाही तर ते भाजपवाले कसले? संमेलनाचा खर्च त्यांच्याच पक्षाचे दंगल-प्रसाद मोठा यांनी उचललल्याचे काल रात्रीच त्यांनी मला फोनवर सांगितले होते. त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हते. ते संमेलनात काय घालायचा तो गोंधळ घालू देत, आपण फक्त गंमत बघायची, असा सल्ला टोक्याला दिल्यावर तो कोपर्‍यावरच्या खुर्चीत जाऊन बसला.
थोड्या वेळाने व्यासपीठावर भाजपचे सन्माननीय नेते स्थानापन्न झाले. अध्यक्षस्थानी आम्ही एकमुखाने ठरवलेले भाजपचे खासदार रावसाहेब होते. त्यांच्या बाजूला समारंभाला शोभतील असे सुधीर मुनगंटीवार होते. मी पुढचा मुख्यमंत्री कसा होणार याविषयी शेलारांशी तावातावाने वाद घालताना दोनदा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस दिसत होते. प्रवीण दरेकर यांनी दोन्ही गालात आधीच तिळाचे लाडू भरले असल्यामुळे आधीच फुगलेले त्यांचे गाल अधिक फुगलेले दिसत होते. तिळातिळाने जमवलेल्या पैशावर माणूस काहीही करू शकतो, या विषयावर भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. समारंभात राडा नको म्हणून भाजपच्या राडेबाज नेत्यांना न देण्याच्या सूचना दिल्लीतून वायरलेसमधून देण्यात आल्या होत्या.
फडणवीसांनी तिळांच्या लाडवांचा लाडूगुच्छ देऊन दानवेंचे स्वागत केले. आपल्या भाषणात दानवे म्हणाले, या समारंभाच्या निमित्ताने मी सर्व जनतेला आवाहन करतो की देशात तिळाचे उत्पादन करण्याचा आणि वाढवण्याचा संकल्प आमच्या पक्षाने केला आहे. त्याच स्वरूपात मी हे न फुटणारे दोन लाडू गिळून करतो आहे. तीळ हा माणसाला लाभलेला अंगभूत दागिना आहे. म्हणूनच आम्ही या निमित्ताने स्त्रियासाठी तीळ सौंदर्यस्पर्धा ठेवली आहे. अर्थात स्पर्धा बंद खोलीत बंद दाराआड होईल. परीक्षक आहेत साक्षात आमच्या वहिनी. त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. तिळाने शरीराचे सौंदर्य वाढते एवढेच मी वाचले आणि पाहिलेही होते. वहिनीताईंची सौंदर्यदृष्टी अफाट असल्यामुळे त्या स्पर्धेला योग्य न्याय देतील, याची मला खात्री आहे.
त्यानंतर फडणवीस म्हणाले की अशी तिळगूळ संमेलने देशभर घेऊन भारतीय संस्कृतीबरोबरच भाजपचाही प्रचार करणे हे आपले कर्तव्य आहे. यानिमित्ताने होणारे स्त्रियांचे हळदीकुंकू समारंभ हा तर स्त्रियांचा कार्यक्रम पण यंदापासून पुरुषांनाही यात सामील करून त्यांच्याकडून एकमेकांना गुलाल लावण्याचा व भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम होईल. हा खर्च पक्ष स्पॉन्सर करील कारण प्रत्येकाला वाण देणे, मग ते छोटे असो की मोठे. ते आपले कर्तव्यच असावे. उद्या लोकांनी आपल्याला निवडणुकीत व्हाण दाखवली तरी त्याची पर्वा करू नका. जो लढतो तो कधी ना कधी जिंकून परत येतो. मी पुन्यांदा येईन, मी पुन्यांदा येईन, मी पुन्यांदा येईन. धन्यवाद.
त्यानंतर तिळगुळ क्रीडास्पर्धा सुरू झाली. पक्षाच्या सर्व उपस्थित नेत्यांनी त्यात भाग घेतला. तिळाचे लाडू वळून त्याचे मोठे टणक चेंडू केले होते आणि आता क्रिकेट सामन्याला सुरुवात होणार होती. पहिले बॉलर राम शिंदे चेंडू खात खातच त्याची लकाकी घालवत होते. त्यांना टाकलेल्या पहिल्याच चेंडूच्या दानवेंनी तो उंचच टोलवून त्याच्या ठिकर्‍या उडवल्या आणि त्या खाण्यासाठी क्षेत्ररक्षक मैदानभर धावत सुटले. असे शिंदेचे चेंडू दानवेंनी ठिकर्‍या करूनच अस्मानात पाठवले अशा बर्‍याच लाडवांचा कुस्कर झाल्यामुळे स्वत: दानवेंनीच खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. फडणवीस तर शेलारांच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिचीत झाले. तो चेंडू यष्टीरक्षक प्रवीण दरेकर यांनीच मटकावला. चेंडू फुटत चालल्यामुळे क्रिकेट स्पर्धा अखेर थांबवण्यात आली. तोपर्यंत उपस्थितांच्या पोटात आग पडली होती. तिळाचे वेगवेगळे पदार्थ स्त्रिया एका बाजूला बनवत होत्या. त्याच्या तळण्याचा, कुटण्याचा, वाटण्याचा खमंग वास दरवळत होता. तुमच्या स्पर्धा राहू द्या, आहेत त्यातच नंबर लावा आणि एकदा जेवणाच्या पंक्ती बसू द्या असा प्रेमळ आग्रह प्रेक्षकांकडून होऊ लागला. संयोजकांनी ते मान्य केले. चित्रा वाघ यांनी प्रत्येक पदार्थ बोटाने चाखून त्याची चव घेतली आणि भोजन सुरू करण्याची घोषणा केली. पंक्तीवर पंक्ती तुटून पडल्या. भोजन आटोपल्यावर तिळांवरून पडलेल्या म्हणी आणि उखाण्यांची स्पर्धा होती. काही म्हणी चांगल्या तर काही चावट होत्या. शेवटी अमृतावहिनींनी तीळसुंदरी स्पर्धेचा निकाल जाहीर केला आणि तीन क्रमाकांच्या तीन महिला व्यासपीठावर आल्या. त्यांना रावसाहेब दानवे यांच्या हस्ते विजयी सुवर्णमुकुट परिधान करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली आणि मी व पोक्याने तिथून काढता पाय घेतला.

Previous Post

१५ जानेवारी भविष्यवाणी

Next Post

नया है वह

Next Post

नया है वह

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.