नाट्यप्रशिक्षणाविषयी तुमचं मत काय? कोणतीही कला शिकवून येते का?
सुमती लेले, औरंगाबाद
कोणती ही कला शिकवून येत नाही… ती मुळात असावी लागते, पण तिला प्रशिक्षित करता येतं… अधिक टोकदार करता येतं…
पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा निर्बंध… कधी आणि कशी सुटका होणार या दुष्टचक्रातून?
बाळकृष्ण चव्हाण, गडहिंग्लज
बहुतेक नाहीच…
आपण काम करत असलेलं नाटक किंवा सिनेमा फसणार आहे, हे कधी लक्षात येतं का? अशावेळी काय करता?
किशोर गोडांबे, मूर्तिजापूर
नाटकाचं खूप वाईट वाटतं अशा वेळी… कारण, ते रोज सादर करावं लागतं… फिल्ममध्ये एकदा काम केलं की त्यातून सुटका होते…
मानवजात १०० वर्षांनंतर अस्तित्त्वात राहील की नाही, अशी शंका काही समाजशास्त्रज्ञ व्यक्त करतात. तुमचं मत काय?
इरावती अंत्रोळकर, इंझापूर
सगळी पृथ्वी नष्ट व्हायच्या आत मंगळ किंवा तत्सम ग्रहावर त्याने सोय केलेली असेल…
‘रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते’ या जुन्या गाण्याची मला काही टोटल लागत नाही. आपलं नातं काय हे त्याने तिला कानात सांगायचं, त्यासाठी रानात जायचं, मग ती भल्या पहाटे येणार, हा सगळा चमत्कारिक प्रकार नाही वाटत?
उदयन नाफडे, उंदरी, हवेली
ती रानात येतेय, परत भल्या पहाटे येतेय… इतकं कोण करतं?… ते महत्वाचे!
तुम्ही कोकणातले ना, तिथे भुतंखेतं, देवचार खूप आहेत म्हणे! तुम्ही पाहिलंय का कधी भूत? कसं दिसतं?
आसावरी शेंडे, उमरी
नाही… अंधश्रद्धा आहेत सर्व!
तुम्हाला नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले तर सर्वात महत्त्वाची मांडणी काय कराल? कशात सुधारणा किंवा बदल कराल?
गनी अब्दुल शेख, कदमवाडी
सर्वात आधी मी नाट्यसंमेलन बंद करण्यासंदर्भात ठराव मांडेन.
जवळपास महाराष्ट्राइतकंच आकारमान आणि आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या इंग्लंडने एकेकाळी ज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, असं साम्राज्य उभं केलं… आजही जगात त्यांचा भाषेच्या रूपाने दबदबा आहेच. हे कसं झालं असेल?
श्रीनिवास घोडखिंडीकर, दादर
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे…
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, तुमच्या मागे कोण आहे?
यामिनी कुरवंडे, घाटकोपर
माझ्या मागे माझी पत्नी आहे…
मोबाइल : शाप की वरदान?
लीलाधर माने, शिवाजीनगर, पुणे
तुम्ही किती सुशिक्षित आहात त्यावर ते अवलंबून आहे…
आजकालची मुलं स्मार्ट आहेत की ओव्हरस्मार्ट?
दमयंती नेने, गायकवाडी
स्ट्रीट स्मार्ट
जो दुसर्याच्या मागे त्याची निंदा करत नाही, असा एक तरी माणूस तुम्हाला माहिती आहे का?
निनाद बेडकीहाळ, बेळगाव
नाही… भाषेचा जन्मच मुळात समोर बोलण्याची हिम्मत नसल्यामुळे झाला आहे.
किर्लोस्कर, देवलांच्या काळातल्या एखाद्या संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन करायचं झालं, तर तुम्हाला कोणत्या नाटकात कोणती भूमिका साकारायला आवडेल आणि कोणतं पद गायला आवडेल?
विभाकर नाडगौडा, काळाचौकी
संगीत नाटकाची आता गरज नाही राहिलेय…
तुमच्यात असलेला आणि अद्याप रसिकांसमोर न आलेला असा एखादा गुण आहे का?
भास्कर कानविंदे, मुलुंड
गृह सजावट
पु. ल. देशपांडे यांनी अभिवाचन केलेल्या एखाद्या कथेचं, व्यक्तिचित्राचं नव्याने अभिवाचन करायची संधी मिळाली तर कशाचं अभिवाचन करायला आवडेल?
राहुल क्षीरसागर, बोपोडी
सगळी व्यक्तिचित्रं
‘शिरा पडो तुझ्या तोंडार’ असं काहीतरी म्हणतात ना तळकोकणात? चांगला शिर्याचा उल्लेख आहे आणि मग हे अपशब्द कसे?
प्रभाकर पाटील, खिद्रापूर
मलाही नक्की ठाऊक नाहीयेय… चौकशी करून सांगतो!