राजकारणाची दुनिया म्हणजे मुखवट्यांची दुनिया… मनात एक असताना चेहर्यावर दुसरंच दाखवणार्यांची… पोटात एक असताना ओठावर दुसरंच चाखवणार्यांची… हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या मुखवट्यांच्या दुनियेतला खराखुरा बेडर चेहरा होते, म्हणून मराठीजनांना त्यांची भुरळ पडली… ते राजकारणी नव्हतेच, ते व्यंगचित्रकार होते, इतरांमधलं व्यंग आरपार पाहू शकत होते आणि ते आपल्यात निर्माण होऊ नये, यासाठी दक्ष राहू शकत होते… एका संक्रांतीला त्यांनी राजकारणातल्या टिपिकल ‘गोडबोल्या’ नीतीचा घेतलेला हा समाचार पाहा… यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण या नेत्यांमधून विस्तव जात नसताना वरकरणी दोघे गोड गोड चेहर्याचे मुखवटे घालून एकमेकांना ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ म्हणत आहेत… प्रत्यक्षात दोघांना एकमेकांचं तोंडही पाहायचं नाही… मात्र, आज तो काळ बरा होता, असं म्हणायची वेळ आली आहे, निदान औपचारिकपणे का होईना लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते, कटुता होती, पण शत्रुत्व नव्हतं… आता समोरच्याला राज्यातून, देशातून, राजकारणातून, आयुष्यातून उठवून टाकण्याचा विडा उचलण्याचं, लोकशाहीचा गळा घोटणारं राजकारण सुरू आहे… त्यापेक्षा हे देखावे बरे होते!