देशभर मकर संक्रांतीचा सण साजरा होत असताना देशातील वातावरण मात्र उत्साहाचे नाही. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे, तिसरी लाट सुरू झाली आहे. एकप्रकारे देशावरच नव्हे, तर जगावर संक्रांतच आलेली आहे.
खरे तर मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या उत्तरायणाचा सोहळा साजरा करणारा आहे. देशाच्या कृषिसंस्कृतीशी प्राचीन काळापासून जोडलेला आहे. या दिवशीचे वाण आणि आदल्या दिवशीची भोगीची भाजी यातून आपण शेतात पिकलेले नवे धान्य, फळफळावळ, भाज्या यांचे सेवन करतो, नव्या बहराचे स्वागत करतो. त्याचबरोबर एकमेकांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याच्या शुभेच्छाही देतो. पण हीच संक्रांत मराठी भाषेत मात्र कोणावरही येते तेव्हा ती चांगली नसते. याचे कारणही पूर्वापारपासूनचीच एक समजूत आहे. संक्रांतीला देवीरूप मानले जाते आणि ही देवी दर वर्षी कोणत्या ना कोणत्या वाहनावर बसून येते. ती ज्या दिशेने येते, त्या दिशेला समृद्धी निर्माण होते आणि ज्या दिशेला जाते, त्या दिशेवर संकट येते, असे मानले जाते. या वर्षीची संक्रात जगाच्या कोणत्याही कोपर्यातून येत असली तरी ती संकटच घेऊन आलेली आहे.
कोरोनाचा जगभरात विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती आज आहे. आतापर्यंतच्या दोन्ही लाटांमध्ये ज्या गतीने रुग्णवाढ झाली नव्हती, त्या गतीने रुग्णवाढ होते आहे. आज मुंबईसारख्या शहरात सर्दीपडशाने आजारी नाही, असा माणूस सापडणे मुश्कील आहे, यातल्या ज्यांच्या चाचण्या होतात, त्यापैकी ८० टक्के लोक बाधित आढळतात. हे गणित लक्षात घेतले तर कोरोनाबाधितांची खरी संख्या किती असेल, त्याचा अंदाज करता येईल.
मात्र, तिसर्या लाटेत कोरोना आपल्यावर मेहेरबान आहे, असेच म्हणावे लागेल. कारण हा संसर्ग सर्वाधिक प्रमाणात आहे तो ओमायक्रॉन व्हेरिअंटचा. हा विषाणू घशातून फुप्फुसात जाण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे पेशंट घरच्या घरी बरे होत आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. हे सर्वसामान्यांबरोबर आरोग्यव्यवस्थेसाठी सुद्धा दिलासादायक आहे. दुसर्या लाटेच्या काळात रस्त्यावरून सतत दिवसरात्र अँब्युलन्सचे आवाज ऐकून काळजात धडधड होत असे. यावेळी तसा प्रकार नाही, हे आपले भाग्यच म्हणायला हवे.
जे लोक रुग्णालयात ऑक्सिजन बेडवर दाखल आहेत, त्यांच्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक मंडळींनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कोरोना हे कारस्थान आहे, साधे सर्दीपडसे आहे, डॉक्टर उगाच घाबरवतात, कशाला मास्क घालायचा, लस घेतली तरी आजार कसा होतो, अशा अवैज्ञानिक आणि भाकड कल्पनाजालात अडकलेल्यांना कोरोनाने जाता जाता हा महाप्रसाद दिला आहे. आता तरी बेजबाबदारपणा टाळून साध्या साध्या नियमांचे पालन करायला हवे आणि कोरोनाचा संसर्ग टाळायला हवा.
कोरोनाची ही संक्रांत कोणत्या दिशेला जाणार आहे, याची कल्पना नाही; पण ती आपल्याकडून निघाली आहे, हे मानण्यासारखी परिस्थिती आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा उच्चांक गाठल्यानंतर कोरोना विषाणूची ताकद क्षीण होईल, भारतात हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली असेल आणि चौथी लाट येण्याची शक्यता संपुष्टात आलेली असेल आणि कोरोना हा अन्य अनेक सर्दीखोकला-फ्लूच्या आजारांपैकी एक बनून राहील, असे अनेक वैज्ञानिकांचे भाकित आहे. ते खरे ठरो, अशीच कामना करायला हवी.
कोरोनाच्या या लाटेत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. देशाच्या राज्याची दिशा ठरवणार्या उत्तर प्रदेशासह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात विधानसभा निवडणुका होत आहेत. पंजाब हे राज्य भारतीय जनता पक्षाच्या कायम विरोधात उभे ठाकले आहे. यावेळीही तिथे बाकी काही घडले तरी भाजपला सत्तालाभ मिळण्याची शक्यता नाही. त्यात तिथे सभा घेण्यासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी एसपीजी ताफ्यासह एका उड्डाणपुलावर २० मिनिटे अडकून पडले आणि त्यांनी ‘तुमच्या सीएमना धन्यवाद सांगा की मी जिवंत परतलो’ अशा आशयाचे उद्गार काढून पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी चर्चेचे वादळ उसळवले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत नेमक्या काय त्रुटी आल्या, त्याचा अहवाल यथावकाश समोर येईलच. पण त्याआधीच पंतप्रधानांनी एका संपूर्ण राज्याविषयी उर्वरित देशाच्या मनात संशय निर्माण करणारे विधान एवढ्या घाईने करणे इष्ट होते का, याची चर्चा अजूनही सुरू आहे.
यावेळी सगळ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशाच्या कौलाकडे लागलेले असणार आहे. तेथील योगी आदित्यनाथ सरकारने देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देऊन उत्तर प्रदेशाचा केवढा प्रचंड विकास झाला आहे किंवा सुरू आहे, असे वातावरण निर्माण करायला घेतले आहे. हे प्रचारतंत्र २०१४ साली गुजरातची अशीच इमेज तयार करून देशभर वापरण्यात आले होते. त्यातील फोलपणा एव्हाना उघड झाला आहे. उत्तर प्रदेश देशात कोणत्याही निर्देशांकांमध्ये आघाडीवर नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी तिथे आणि इतरत्रही सामाजिक ध्रुवीकरणाची खेळी खेळली जाणार, यात शंका नाही. किंबहुना तो खेळ आधीच सुरू झालेला आहे. अशा विखारी वातावरणात शहाण्या माणसांनी ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ हा भ्ााईचार्याचा, बंधुभावाचा संदेश द्यायला हवा, त्याचबरोबर ‘तिळगुळ घ्या, सुरक्षित राहा’, हेही सांगायला हवे.