अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू-मंगळ वृश्चिकेत, रवी-शुक्र (वक्री) धनुमध्ये, शनी-बुध-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्युन कुंभेत, हर्षल मेषेत, चंद्र मीनेत त्यानंतर मेष आणि वृषभेत.
दिनविशेष – १३ जानेवारी रोजी पुत्रदा एकादशी, १४ जानेवारी रोजी मकर संक्रात.
मेष – तुमची नव्या वर्षाची सुरुवात खूप काही धमाकेदार होणार नसली तरी मनाचे समाधान करणारे अनुभव या काळात येतील. बुद्धीच्या जोरावर एखादे काम मिळवण्यात यशस्वी व्हाल. घरात भावाकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी प्रवास होतील, त्यामुळे थोडी दगदग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्चपदावर काम करणार्या मंडळींनी कामाच्या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर केला तर ते अंगाशी येऊन नस्ती आफत मागे लागू शकेल. संततीबाबत भाग्यवर्धक घटना घडतील. प्राध्यापक, प्रवचनकार, वक्ते यांना विशेष प्रसिद्धी मिळेल. आपल्याकडून कोणाची निंदा होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ – आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी चांगला काळ आहे. नातेवाईक, व्यावसायिक भागीदार यांच्या माध्यमातून विदेशात उद्योग विस्तार करण्यासाठी काही प्रयत्न सुरू असतील, तर त्यात घवघवीत यश मिळालेले दिसेल. पत्रकार, ज्योतिषी यांना धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरदारांनी कोणत्याही लोभाला बळी न पडता काम करत राहावे. कामाच्या ठिकाणी सहकार्याबरोबर जमवून घ्यावे लागेल. उगाचच छोट्या कारणांमुळे वाद निर्माण होऊ देऊ नका. त्यातून भविष्यात चांगला फायदा मिळेल. वैद्यकीय व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल.
मिथुन – कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पैसे खर्च होऊन खिशाला झळ पोहचण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पैसे सांभाळून ठेवा. अति कामामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढल्यामुळे कामात विस्कळीतपणा निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ देऊ नका. षष्ठातल्या मंगळ-केतूमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही मंडळींना बुद्धीच्या जोरावर चांगली प्रसिद्धी मिळेल. सार्वजनिक जीवनात नावलौकिकात भर पडलेली दिसेल. राजकीय व्यक्तींना प्रसिद्धीप्राप्ती मिळवून देण्याचा काळ राहील.
कर्क – स्पष्टवक्तेपणा अडचणीत आणू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. नोकरी, कामाच्या ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. सट्टा, ब्रोकरेज, लॉटरी या व्यवसायातील मंडळींना चांगले पैसे मिळतील. क्रीडास्पर्धांमध्ये खेळाडूंना ऐन मोक्याच्या क्षणी अपयश येण्याची दाट शक्यता आहे. अमावस्या त्रासदायक राहील. घरात पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीत वाद सुरू असतील, तर त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. भावंडांमध्ये वितुष्ट येणार नाही, याची काळजी घ्या.
सिंह – राशीस्वामी रवी पंचमात वक्री शुक्राबरोबर आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्र, करमणूक करणारे कलाकार, यांना त्यांच्या क्षेत्रात भरघोस यश मिळेल. राजकीय व्यक्तींना कुशल संघटकांची भूमिका पार पाडावी लागू शकते, त्यात यश मिळेल. मंगळाची चतुर्थ दृष्टी सप्तमावर राहणार असल्यामुळे काही शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात. महिलावर्गाने आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी सुखाचे दिवस अनुभवायास मिळतील. नवीन नोकरीची संधी समोर येऊ शकते.
कन्या – आगामी काळात विद्यार्थीवर्गास शिक्षणक्षेत्रात घवघवीत यश मिळणार आहे. एखादी शिष्यवृत्ती देखील मिळू शकते. खासकरून लेखक, पत्रकार समाजमाध्यमांमध्ये काम करणार्या मंडळींना हा आठवडा अगदी उत्तम जाणार आहे. पंचमातील शनी-बुध युती संशोधनकार्यात यश मिळवून देणारी आहे. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. त्याबाबत मानसिक चिंता सतावू शकते. नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक स्थिती राहील. पत्नीची काळजी घ्या.
तूळ – येणारा आठवडा चांगला जाणार आहे, मित्रमंडळी आणि बंधुवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. गायन, अभिनय, फोटोग्राफीचा छंद असणार्या मंडळींना अनपेक्षित लाभ होतील. कलाकारांचा सरकारकडून गौरव होईल. प्रवास करताना काळजी घ्या. सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून काम करत राहा, म्हणजे अडचण येणार नाही. नोकरदारांना कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, त्यामुळे थोडे त्रासलेले असाल. मंगळ-केतू अंगारक योग होत असल्यामुळे सर्वजण शत्रुसमान भासतील. सुखस्थानातील गुरूमुळे हा तिढा सुटायला मदत होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस विशेष लाभाचे राहणार आहेत. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. राजकीय व्यक्तींना यश मिळेल. पत्नीकडून आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल, त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
धनू – राशीस्वामी गुरूचे पराक्रमात भ्रमण होत असल्यामुळे धार्मिक कार्यात जास्त काळ रमाल. घरात धार्मिक कार्य पार पडेल. व्ययस्थानातील केतू-मंगळामुळे एखाद्या कटकारस्थानाचे बळी ठरू शकाल. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. प्रकृतीसाठी अयोग्य काळ आहे. व्यवसायातील आर्थिक पेच सुटतील. भावंडांना पैशाच्या स्वरूपात मदत करावी लागेल. मात्र, कोणताही आर्थिक व्यवहार करताना योग्य काळजी घ्या.
मकर – अनेक दिवसांपासून संधीच्या शोधात असाल तर ती आता दारात येणार आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचे पुण्य पदरात पडणार आहे. त्याचा अनुभव या आठवड्यात येईल. हातून एखादे शुभकार्य घडेल. लेखकांना, जागतिक पातळीवर काम करणार्या मंडळींना चांगली पतप्रतिष्ठा मिळेल. त्यामुळे खूष राहाल. लाभातल्या मंगळ-केतूमुळे अनपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ – अनपेक्षित खर्च समोर येतील, त्यामुळे त्यासाठी आर्थिक नियोजन करून ठेवा. हितशत्रूंपासून लांब राहा. पगार मिळण्यास काही कारणामुळे विलंब होऊ शकतो. विवाहेच्छु मंडळींना सकारात्मक बातमी कानावर पडेल. सासुरवाडीकडून चांगले लाभ होतील. मित्रमंडळींचा आधार मिळेल. एखादी उंची वस्तू भेट म्हणून मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ होतील. सार्वजनिक क्षेत्रात यश मिळेल.
मीन – या आठवड्यात तुमच्या हातून एखादे लोकोपयोगी कार्य घडणार आहे. धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होतील, शनी-बुध लाभात आहेत. त्यामुळे व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळू शकतात. वकिलांना फायद्याचा काळ राहणार आहे. राजकारण्यांना उत्तम काळ राहणार आहे, एखादे चांगले पद मिळू शकते. सत्कार-समारंभावर पैसे खर्च होतील. आठवड्याचे सुरुवातीचे दोन-तीन दिवस मानसन्मानाचे राहणार आहेत.